Friday, October 23, 2015

एक सनातन गोची

तिशीतला मराठी तरुण आहे... 
अतिशय हुशार. शाळाकॉलेजात ब्रिलियंट म्हणून नावाजलेला.
कॉलेजशिक्षण सुरू असताना आवर्जून एका परदेशी भाषेचं शिक्षण घेतलं... ती स्थानिकांइतक्या सहजतेने बोलू लागलात्याचं त्याच्या विषयातलं ज्ञान आणि त्या भाषेवरचं प्रभुत्व यामुळे त्या देशात त्याला आधी नोकरी मिळाली, मग कायमस्वरूपी राहण्याचा परवानाआता त्याची बायको आणि मुलगीही त्याच्याबरोबर तिकडेच स्थायिक आहेत, मुलगी तर तिथेच जन्मलेली, त्यामुळे त्या देशाचीच नागरिक
सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याच्यातला अभ्यासक त्याला शांत बसू देईना. त्याच्या सदैव खाद्य मागणाऱ्या बुद्धीला विषय मिळाला इंडॉलॉजी... भारताचा अभ्यास.प्राचीन भारताचा अभ्यास करताना त्याच्यासमोर आलेले अनेक विधी त्याला चक्रावून टाकणारे होते...एका पशुचा, रक्तही सांडता बळी देण्याचा विधी (त्याचे तपशील मला माहिती आहेत, पण, इथे देऊ नयेत इतके भयंकर आहेत) त्याने वाचला आणि तो थक्क झाला...तो पशू आज देशातला राष्ट्रीय पशु होऊन बसला आहे......गाय.
हा तरुण मध्यंतरी भारतात आला होता, तेव्हा त्याच्या अभ्यासाला दिशा देण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून त्याला मराठीतल्या एका नामवंत अभ्यासक-संशोधकाकडे पाठवलं गेलं. ते वयोवृद्ध संशोधक या तरुणाचा अभ्यास पाहून, त्याची बुद्धिमत्ता पाहून संतोष पावले. त्याने बोलता बोलता इच्छा व्यक्त केली, तिकडचा सगळा कारभार गुंडाळून कधीतरी भारतात येईन आणि मग इथे राहून इंडॉलॉजीच्या अभ्यासालाच वाहून घेईन. त्या संशोधकांनी त्याला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं... असा विचारसुद्धा मनात आणू नकोस. कोणत्याही दबावाविना, त्रासाविना, भयाविना भारताचा, प्राचीन भारताचा अभ्यास करायचा असेल आणि निष्कर्ष मांडायचे असतील, तर तू भारताबाहेरच राहा. इथे ते आता शक्य नाही. त्याचं आयुष्य आणि अभ्यास यांच्यात कसलाही व्यत्यय येऊ नये, म्हणून ही गोष्ट कोणाला सांगू नका, असं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितलं होतं... त्याचं नाव म्हणूनच इथे घेतलेलं नाही...
***
फेसबुकवर अश्लाघ्य भाषेत पुरोगाम्यांना झोडपण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असलेल्या एका हिट पोस्टचा विषय होता गोमांसविक्री बंदी. तिथे दोन जण प्रतिवादासाठी उतरले. मुद्दा साधा होता. एके काळी या देशात, आज ज्यांचा वारसा सांगणारे गायीच्या पावित्र्याचा कंठशोष करतायत, तेच लोक तीच गाय यज्ञात बळी देत होते, तिचे मांस खात होते, सुरापान करत होते
त्यावर प्रमाण द्या, वेदातल्या ऋचा सांगा, अशा प्रकारच्या विचारणा झाल्या. मग यांनी ऋचा सांगितली की, त्यांनी ती नाहीच, तुमची प्रत कोणती, आमची कोणती, मग हा अर्थ कोणी लावला, याचं विवेचन सुरू झालं. जो विद्वान आपल्या सोयीचा अर्थ सांगणार नाही, तो विद्वानच नाही, त्याने भारताची बदनामी करण्यासाठीच ऋचांचा अर्थ असा लावला, अशी तर्कटं सुरू झाली. भारतीय वेदांचा, उपनिषदांचा, पुराणग्रंथांचा अनुवाद करून, त्यांच्यातील प्रक्षिप्त भाग शोधून, त्यांची कालनिश्चिती करून, अवघड भाषा आत्मसात करून या अभ्यासकांनी आयुष्य खर्ची घातलं ते भारताला बदनाम करण्यासाठी, हा अफलातून शोध या चर्चेत हिरीरीने मांडला जात होता. गंमत म्हणजे अभ्यासक होते ख्रिस्ती, युरोपीय. तिथे मांस खाणं, गोमांस खाणं किंवा सुरापान या तर रोजच्या जीवनातल्या सामान्य गोष्टी. त्या वेदांमध्ये हिरीरीने शोधून त्यातून भारतीयांची बदनामी करायची, त्यांचा तेजोभंग करायचा, असा कावा रचण्याइतके तेव्हा भारताला महत्त्व होते, ही कल्पनाच फार रम्य आहे, नाही का?
या चर्चेची पातळी कुठवर आली? तर गोमांस सोडा, वेदात मांसभक्षण आणि सुरापान अशा अर्थाचे जे संस्कृत शब्द आहेत, त्यांचा खरा अर्थ शाकाहार आणि मद्य नसलेल्या पेयाचं पान असाच आहे, हे सिद्ध करण्यासाठी संस्कृत भाषेचा असा काही खिमा करण्यात आला की त्यापुढे बडे का खिमा झक् मारेल
***
या विषयावर चर्चा सुरू असताना कळलं की, महाडजवळच्या काही गावांतल्या देवीसमोर पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यंत बैलाचा बळी दिला जात होता. शिवाय इथल्या काही लोकांमध्ये आजही कणकेची गाय करून तिचा बळी देण्याची पद्धत आहे... हे सगळे कट्टर हिंदूच आहेत.
***
ही सगळी अहिंसक मारामारी चालू होण्याआधीच गोमांस शिजवल्याच्या संशयावरून एका मुसलमानाचा खून झालाय, दुसऱ्याने बीफ पार्टी केली म्हणून त्याला जम्मू काश्मीरच्या विधिमंडळात जाहीरपणे थोबडवण्यात आलंय. देशातल्या एका मोठ्या वर्गाचा आहारघटक अचानकपणे देशातला सर्वात मोठा कळीचा मुद्दा बनून पुढे आला आहे.
तुम्ही खरे हिंदू आहात की नाही, याची मोजपट्टी म्हणजे तुमचं या विषयावरचं मत.
आता गंमत म्हणजे अमुक एक करतो किंवा करत नाही तो हिंदू, असं काही म्हणताच येत नाही. तुम्ही एका प्रकारचा हिंदू दाखवला की दुसऱ्या प्रकारचा हिंदू दाखवता येतो. देव मानणारा नास्तिकही हिंदू असतोच. बीफ खाणारे हिंदू देशाच्या अनेक भागांमध्ये आहेत. बीफ असा सरसकट उल्लेख ज्याचा केला जातो, ते गायीचं मांस असत नाही. भारतात विकल्या जाणाऱ्या बीफमध्ये सर्वात मोठा वाटा म्हशीच्या मांसाचा आहे. भारतीय माणूस आपल्या आईपेक्षा जास्त दूध म्हशीचं पितो आणि मातापदाचा मान गाईला देतो, हे आपल्या स्वभावधर्माला धरूनच आहे. म्हशीला कोणी मावशीपदाचाही मान देत नाही. गोसेवा म्हणून बांधलेल्या पाण्याच्या कुंडांवर म्हशींना पाणी पाजण्यास मनाई करणारे कृतघ्न फलक आपण प्राण्यांच्या बाबतीतही कसा जातीयवाद राबवू शकतो, याची चुणूक देतात.
गोहत्याबंदी हा गांधीजींच्या आग्रहामुळे काँग्रेसच्याही आग्रहाचा विषय होता. त्यामुळेच, बहुतेक राज्यांमध्ये गोहत्याबंदीचा कायदा आहेच. म्हणजे गायीचं मांस हे असंही देशात फारसं कुठे उपलब्ध नाही. ते काँग्रेसच्या काळातही होत नव्हतं, त्याचा इश्यू झाला नसल्यामुळे ते आपल्याला माहिती नव्हतं. आता हा विषय गोवंशहत्याबंदीकडे वळवण्यात आला आहे... म्हणजे बैलांनाही कापायचं नाही. ज्यांनी हे कायदे लागू केले आहेत, त्यांनी भाकड जनावरांच्या व्यवस्थेसाठी काही व्यवस्था केल्याचं ऐकिवात नाही. भारत हा जगातला प्रमुख बीफ एक्स्पोर्टर आहे आणि निर्यातदार कंपन्यांपैकी बहुतेकांचे मालक हिंदूच आहेत. भाकड जनावरांच्या सांभाळासाठीच्या गोशाळांशी त्यांनी संधान साधलं तर काय होईल, याचा विचार करून अनेक शेतकरी त्यांच्याकडे जनावरं सोपवायला कचरतात...
...गोसेवा आणि गोसंवर्धनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या बहुतेकांचा शेतीशी आणि गोधनाशी काहीही संबंध नसतो, हेही लक्षणीय आहे
***
सांगण्याचा मुद्दा इतकाच की गाय ही काही हिंदूंसाठी आज अचानक पवित्र झाली, अशातला भाग नाही. ती काहीजणांसाठी पवित्र असताना कालपर्यंत याच देशातले, त्याही धर्मातले काहीजण बीफ खात होते आणि दोघांनाही एकमेकांच्या खासगी भावनांमध्ये ढवळाढवळ करावीशी वाटत नव्हती. लोक मतभेदांसह, मनभेदांसह, आहारभेदांसह एकमेकांबरोबर नांदत होते.आज असं काय घडलंय की दुष्काळ, महागाई, विकासाच्या नावाखाली झालेली फसगत, भ्रष्टाचार वगैरे लोकांच्या प्रत्यक्ष जगण्यामरण्याशी थेट संबंधित विषयांपेक्षा हा विषय ऐरणीवर यावा?
तुम्हाला सापडतंय का काही कारण?
की तुम्हीही वाट पाहताय, भारताबद्दल भयमुक्त तटस्थ विचार करण्यासाठी भारताबाहेर जाण्याच्या पहिल्या संधीची?

No comments:

Post a Comment