Monday, October 5, 2015

टु वॉक ऑर नॉट टु वॉक

प्रतिगामी धर्मांधांचं एक बरं असतं... त्यांना त्यांच्या वजनाची चिंता नसते.
कधीही उठावं, एक पिस्तुल घ्यावं. सकाळी सकाळी पूजाअर्चा झाली की देवाचं नाव घेऊन एखादा धर्मद्रोही, पाखंडी, नास्तिक पुरोगामी विचारवंत शोधून, त्याला मॉर्निंग वॉकच्या वेळी गाठावं, त्याच्या पाठीत दोनपाच गोळ्या झाडाव्यात, विषय संपला. देवकार्याचं पुण्य गाठीला जमा
बहुतेक वेळा त्यांनी स्वत: प्रत्यक्ष काही करण्याचीही गरज नसते. आपला इटुकला पिटुकला मेंदू संस्थेच्या किंवा संघटनेच्या चरणी वाहिलेले, ब्रेन वॉश झालेले साधक रोबो हाताशी असतात. त्यांच्याकरवी किंवा यूपी-बिहारमधून बेरोजगार पोरं बोलावून त्यांच्या हातात बंदुका देऊन त्यांच्यामार्फत या घातक विचारवंतांना उडवून टाकता येतं.
अशा संयत, श्रद्धायुक्त, धर्माचरणी दिनक्रमामुळे प्रतिगाम्यांना वजनाचा सोडा, शरीरप्रकृतीशी संबंधित कसलाच मोठा त्रास नसतोईश्वरस्मरणाच्या कृपेमुळे ही सगळी मंडळी अतिशय शुचिर्भूत, तेजस्वी दिसतात आणि सदैव सात्विक आहार घेत असल्यामुळे वृत्तीने कितीही तामसी असले, तरी शरीरप्रकृती काटक राखून असतात. रोज पहाटे उठून गोळीबार, बाँब बनवणे यांसारख्या योगिक क्रिया करण्याचाही शरीराला मोठा लाभ मिळतो
पुरोगामी, पाखंडी, विचारवंतांच्या (येथून पुढे यांचा उल्लेख पुपावि असा केला जाईल) बाबतीत सगळीच अडचण असते. त्यांच्या बाबतीत मेंदूपासूनच वजनाची चिंता सुरू होते. मुळात विचारबिचार करण्याच्या घाणेरड्या सवयी लागलेल्या असल्यामुळे मेंदू मोठे, ते सतत वापरात असल्यामुळे वजनदार होत राहतात.ही मंडळी परमेश्वराला मानत नसल्यामुळे परमेश्वरही त्यांना मानत नाही (हुडुत् तुमची!) त्यामुळे यांच्यावर देवाची कृपा नाही. साधनेचे (दाभोलकरांची नव्हे, आठवलेंची साधना ) तेज नाही. आहार अगदीच अरबट चरबट. अशा माणसांना कोणी विचारत नाही, उभं करत नाही. त्यामुळे जे मिळेल ते खाऊन पोट भरावं लागतं. त्यात पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी उपवासाच्या दिवशी जेवतील, सणासुदीच्या दिवशी गोडाधोडाचं जेवण्याऐवजी मटणमच्छी खातील, गोवंश वाचवण्याची चर्चा सुरू झाली की हटकून गोमांसभक्षण करतील, अल्पसंख्यकांच्या अनुनयाचा आरोप लागू नये म्हणून पोर्कही खाऊन दाखवतील. शिवाय, रात्रीची पुरोगामित्वप्रसारक अपेयाची आचमनेही नियमितपणे सुरू असतात, ती वेगळीच
सकाळी शिवांबु, गोमूत्र किंवा किमान धारोष्ण गोरसाचे सेवन करण्याऐवजी काळवेळ पाहता, दिवसातून कितीही वेळा चहासारख्या उत्तेजक पेयाचे कपचे कप ढोसत असतात. मनात कायम धर्मद्रोहाचे, समाजद्रोहाचे, देशद्रोहाचे तामसी विचार खळखळत असतात. आता अशा जीवनशैलीत या विचारवंतांच्या शरीरप्रकृतीचं काय होत असेल, विचार करा
त्यांना एकमात्र आधार असतो, तो काही नियमित व्यायाम घडला, तर त्याचाच. यांच्यासारख्या अनियमित दिनचर्येच्या, समाजात पाखंड पसरवण्याच्या कामापुढे प्रकृतीची हेळसांड करायलाही मागेपुढे पाहणाऱ्या निशाचर समाजकंटकांना व्यायामाला वेळ कुठून मिळायचा? घेतलाच तर मॉर्निंग वॉक हाच त्यांच्यासाठी एकमात्र व्यायाम असतो. आता त्यावरच गदा आली आहे. काही सनातनी वृत्तीच्या (कृपया सनातन संस्थेशी बादरायण संबंध जोडू नये) धर्मप्रेमींनी तीन नतद्रष्ट पुपाविंना बरोब्बर या मॉर्निंग वॉकच्या आगेमागेच नेम धरून टिपल्यामुळे या पुपाविंची फार मोठी पंचाईत झालेली आहेस्पोर्ट्स शूज घालून ठरल्या वेळेला वॉकसाठी निघायच्या आधी ते खुर्चीलाच खिळून बसले आहेत... 
हे लोक देवाला मानतच नसल्याने त्याला किंवा देवाची वकिली करणाऱ्या प्रतिगाम्यांना घाबरत नाहीत. पण, विचारांचा सामना कुविचारांनी होतो, तोवरच. विचारांच्या प्रतिवादादाखल बंदुकीची अविचारी गोळी सुटते, तिला ते नक्कीच घाबरतात. बरे प्रतिगाम्यांची गोळी त्यांच्यासारखीच भ्याड. ती बहुतेक वेळा मागून तरी येते किंवा नमस्कार करणाऱ्या हातांतून
माणूस मरण पावला तरी त्याचे विचार मरण पावत नाहीत, हे वाक्य अन्य पुरोगामी विचारवंतांच्या स्मृतीदिनाला उच्चारायलाच छान वाटतं... आपल्या स्मृतीदिनाला हे वाक्य अनेकांकडून वारंवार उच्चारलं जात आहे, ही कल्पना काही फारशी रमणीय नसते. मरण्याची हौस त्यांनाही नसतेच. त्यामुळे त्यांची दुहेरी पंचाईत होऊन बसलेली आहे. टु बी ऑर नॉट टु बी या शेक्सपीयरच्या सवालाप्रमाणे या पुपाविंसमोर खडा ठाकलेला आजचा भेदक सवाल आहे टु वॉक ऑर नॉट टु वॉक (इन मॉर्निंग दॅट इज). 
या एका सवालातून काय काय भानगडी उभ्या राहतात, पाहा.
मॉर्निंग वॉक घ्यायला जावे, तर कोणीतरी येऊन पाठीमागून गोळ्या झाडेल, अशी भीती
व्यायामापेक्षा जीव प्यारा म्हणून मॉर्निंग वॉक घ्यावा, तर तेवढाच एक व्यायाम चुकतो. मॉर्निंग वॉकमध्ये पाहायला मिळणाऱ्या सृष्टीसौंदर्याच्या आस्वादाला मुकण्याची खंत. लोकही येता जाता टोमणे मारणार. एवढे प्रखर विचार मांडता आणि किरकोळ मृत्यूला घाबरता. कुठे तो सॉक्रेटिस, कुठे तो गॅलिलिओ आणि कुठे तुम्ही
ही बदनामी टाळण्यासाठी आपण जिवावर उदार होऊन मॉर्निंग वॉक घेत राहावे आणि खूप काळ लोटला तरी कोणी आपल्याला येऊन गोळीच मारू नये, म्हणजे आणखी मोठा प्रॉब्लेम. आपण थोर पुरोगामी विचारवंत आहोत अशी आपली आणि फेसबुकवरच्या आपल्या कोंडाळ्याची जी समजूत झाली आहे, तिलाच छेद जाणार. आपण राज्यात चालवलेल्या विचारकलहाची सनातन्यांना (वृत्ती, संस्था नव्हे) दखलही घ्यावीशी वाटत नाही, बंदूक उचलून, किमानपक्षी एखादा भाडोत्री मारेकरी नेमून आपला अवतार संपवावासा वाटत नाही, इतके क्षुद्र आहोत आपण. आपल्या पुरोगामित्वाची हीच किंमत. आपणच त्यांच्याकडून एखादी बंदूक मागून आणावी आणि स्वहस्ते स्वमस्तकात गोळी झाडून घ्यावी, इतकी ही घोर अवहेलना!
मॉर्निंग वॉकला येणारे इतर लोक अशा पुपाविंकडे आधी कुतूहलाने पाहात असतात. त्यांच्या आगेमागे राहात असतात. कधीतरी कुठूनतरी एखादा मारेकरी येईल आणि यांच्यावर गोळी झाडेल, तेव्हा आपण सज्ज असलं पाहिजे... मोबाइलच्या कॅमेऱ्यात तो सगळा थरार टिपायला आणि नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुरोगाम्याच्या कलेवराबरोबर सेल्फी काढायला. नंतर चॅनेलांवर बाइट, राज्यभर झळकणारी छबी... या सुखस्वप्नांची पूर्तता या पुपाविकडून होणार नाही, याचा अंदाज जसजसा सहवॉकरांना येऊ लागतो, तसतशी त्यांची दृष्टी बदलत जाते. हा माणूस म्हणतो पुरोगामी स्वत:ला, पण घरात पूजाअर्चा करत असणार. मागच्या वर्षी सत्यनारायण घातला होता म्हणे याने. अहो, नित्यनेमाने गणपती पुजतो हा पाखंडी गावी जाऊन. मग बरोबर. याला कोण गोळी घालणार. श्या, फुकट आपल्या वेळेची बरबादी. सकाळी आठची हिरवळीची वेळ सोडून उगाच याच्यामागे साडे सहापासून फिरत असतो आपण. काय उपयोग झाला? बोगस पुरोगामी लेकाचा.
आता या शिव्याशापांना कंटाळून घरीच बसून राहणं बेहत्तर म्हणून समस्त पुपाविंनी तो मार्ग पत्करला, तर वेगळीच पंचाईत होणार... सगळ्या पुरोगामी थेरांचा निचरा करणारा व्यायामच बंद झाल्यामुळे सगळ्यांची घरी बसून बसून दोंदं सुटणार. सडपातळ, काटक शरीरयष्टीचा, तेजस्वी तोंडवळ्याचा तो प्रतिगामी आणि ढेरपोटा, सुजट चेहऱ्याचा, तांबारलेल्या डोळ्यांचा तो पुरोगामी, अशी एक व्याख्या रूढ होण्याची भीती
या सगळ्या भानगडीत पुरोगाम्यांपेक्षा घाबरून गेले आहेत ते पोलिस... वरच्या वर्णनामुळे आपणच पुरोगामी आहोत, अशी पब्लिकची समजूत होईल, अशी सार्थ भीती त्यांना वाटते आहे...
...दाभोलकरांच्या हत्येपासून एवढा काळ सुस्त राहिलेल्या पोलिसांनी अचानक तपासाचा जो जोर केला आहे, त्याचं खरं कारण हेच तर आहे... 
आपल्यावर पुरोगामित्वाचं बालंट यायला नको म्हणून त्यांनी पुरोगाम्यांचा मॉर्निंग वॉक सुकर करण्याची ही सगळी धडपड चालवली आहे...
पपू राधे माँची शपथ

(पूर्वप्रसिद्धी : मी मराठी लाइव्ह, रेखाटन : प्रदीप म्हापसेकर)


1 comment:

  1. How to make money from making money at a casino
    The best online casino to earn money using money from betting. In this video 바카라 사이트 from Tipsters, we will 인카지노 show you งานออนไลน์ how to make money from

    ReplyDelete