Thursday, March 7, 2013

जाओ गोरख, मच्छिंदर तो ‘गया’!


चलो मच्छिंदर, गोरख आयाअशी हाक कधीतरी कानी येईल आणि आपल्याला स्त्रीराज्यातून बाहेर पडावं लागेल, असं ज्याच्या घरात स्त्रीराज्य प्रस्थापित झालेलं आहे, अशा प्रत्येक पुरुषाला वाटतं...

...या राज्यातली पहिली स्त्री म्हणजे बायको. ती प्रत्येक विषमलिंगी आकर्षण असलेल्या पुरुषाने केलीच पाहिजे, असा समाजाचा आग्रह असतो. तो स्वत:ला समाजपुरुष आणि समाजस्त्री समजणारे मित्र, नातेवाईक वगैरे वेळोवेळी करत असतात. गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाने किंवा भावाने लग्न केल्यानंतर ज्यांच्या त्याच्यावरच्यास्वामिनीत्वहक्कांवर थेट टाच येणार असते, अशी आई आणि बहीण या मोहिमेत सर्वात जास्त आघाडीवर असतात. नंतर कौटुंबिक रणधुमाळीच्या प्रसंगीतुला हौसेने सून म्हणून घरात आणली हेच चुकलंअसे ज्वलज्जहाल उद्गार निघतात खरे; पण तोवर त्यांची धार आणि चूकदुरुस्तीची वेळ या दोन्ही गोष्टी निघून गेलेल्या असतात.


ज्याच्या घरात आई आणि बहीण किंवा बहिणी असं स्त्रीराज्य आधीपासूनच अस्तित्वात असतं, तो माणूसहीमालकीत बदल हाच त्यातल्या त्यात विरंगुळाम्हणून की काय, पण पत्नीनामाचा अदृश्य सिंदूर भांगात भरून घ्यायला तयार होतो. कथानायक हा निर्णय घेऊन संस्कृतिरक्षण आणि वंशसातत्य या दोन महान जबाबदार्या पार पडत असल्याने इथपर्यंत समाजपुरुष आणि समाजस्त्रिया खुश होऊन विकट हास्य करत असतात. ते हास्य लुप्त होऊन त्यांचा चेहरा खर्रकन उतरतो, तो स्त्रीराज्यातला दुसरा मेंबर म्हणजे दुसरी मेंबरीण घरात अवतरते तेव्हा.

जुन्या पिढीतल्या लोकांचं एक बरं असतं. ते आपले थेट शब्दांत आपले जुनाट आणि बुरसटलेले विचार मांडतात, त्यामुळे त्यांच्याचसमोर ते कोळिष्टकासारखे झटकून तरी टाकता येतात. ‘आम्हाला पहिला नातूच हवा बरं काअसं अतीव कौतुकानं तोंडभरून हसून बोलून दाखवणार्या कोणाही काका-मामा-मावशीलातुमची ऑर्डर नोंदवून घेतलेली आहे, बघतो आता कसं जमतं ते,’ असं सांगून वाटेला लावता येतं. पण स्वत:ला आधुनिक म्हणवणारी मंडळी आडून आडून आपला कल काय आहे, याचा अंदाज घेऊन त्यानुसार शुभेच्छांची पुडी बांधायला घेतात. वर पुन्हाआजकालच्या जगात मुलगा काय, मुलगी काय, सारखेचअसंतुम्हाला मुलगी झालीच, तर असू द्या हा ॅडव्हान्स शोकसंदेशअशा थाटात   सांगतात, तेव्हा हे ठोंबे डोक्यात जातात. अरेच्या, माणसं कायआता एक मुलगाच घालतो जन्माला, मस्तपैकी गोरापान, बुद्धिमान आणि ताकदवानकिंवाएक गोड गोजिरी मुलगीच घालतो जन्मालाअसं ठरवून मुलांचा निर्णय घेतात का? आता बाळ हवं, एवढंच ठरलेलं असेल, तर उभयतांत काहीतरी दोष आहे, अशा नजरेने कशाला बघायचं? मुलगा हवा की मुलगी हवी, यातलं काहीतरी एक पक्कंच असायला हवं आणि ते एक काय हे तर सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे... मुलगा, मुलगा, मुलगा.

त्यामुळेच अर्धवट ग्लानीत असलेल्या नवप्रसूत मातेला डॉक्टरमुलगी झालीहे सहसा अशा गांभीर्याने सांगतात की ते पाहून हिंदी सिनेमातले उलटा स्टेथास्कोप लावलेले मख्ख चेहर्याचे बावळट डॉक्टर नायकाला सांगतात ना कीहमने बहुत कोशिश की लेकिन आपके बच्चे को बचा नहीं पाये’, त्याचीच आठवण होते. त्यात जरमुलगी झालीहे ऐकल्यावर नवप्रसूत मातेने तोंडात बोट घालून एक शिट्टीच मारली आनंदाची तर डॉक्टरीणबाई बेशुद्ध पडायच्याच बाकी राहतात आणि तिला चुकीचं ऐकू गेलं असावं अशा समजुतीनेमुलगी झालीये मुलगीअसं सांगतात. त्यानंतरही तिचा आनंद तसाच राहिला तरप्रसूतीच्या वेळी होतं असं कधी कधी, येईल भानावरअसं मानून डॉक्टरीणबाई मुलीच्या वडिलांना ही वार्ता सांगायला जातात. तो जर ही खबर ऐकून आनंदाने चित्कारला तर डॉक्टरीणबाई, मघाशी रहित केलेला, बेशुद्ध पडण्याचा बेत आता मात्र अमलात आणतातच. त्या तरी किती सहन करू शकतील?

मुलगी झाली होअशी द्वाही फिरवायला घेतल्यानंतर येणार्या प्रतिक्रिया तर फारच गमतीच्या असतात. अनेकांचे चेहरेअरेरे, इतकं करून तुमच्याकडे उंदराचं पिल्लूच आलं जन्माला!’ इतक्या वाईट भावांनी भरलेले असतात. थोडाफार पाचपोच असलेली मंडळीपहिली बेटी, धनाची पेटीअसं म्हणून वेळ मारून नेतात. जणू पैशाचं आमिष नसतं, तर बापाने लेकीचा गळाच घोटला असता. बहुसंख्या असते तीमुलगा काय, मुलगी काय, आजकालच्या काळात सारखीचअसं आतमध्ये उकळ्या फुटत असताना दु:खाने मान हलवत सांगणार्या गणंगांची.


खरा बाँब फुटतो तो स्त्रीराज्यात तिसरा मेंबर दाखल होतो तेव्हा. आधी मुळातदुसरा चान्सहाच अनेकांसाठी धार्ष्ट्याचा विषय. ज्या अर्थी तो घेतला आहे, त्या अर्थी हे लोक वेळ निघून जाण्याआधी वंशाचा दिवा पेटवून त्रिखंडात उजेड पाडायला सिद्धच झालेले आहेत, अशी अधिकृत समजूत समाजपुरुष आणि समाजस्त्रिया करून घेतात. आता उघडपणेफाटला बरं का टरटरा तुमच्या स्त्रीधार्जिण्या पुरोगामित्वाचा बुरखाअसा कुत्सित चेहरा करूनकाळजी करू नका, या वेळी मुलगाच होईलअसा खवचट आशीर्वाद दिला जातो. घरात मुलगा आणि मुलगी असे दोन्ही असले कीबॅलन्सराहतो, असं एक संशोधनही गंभीर चेहर्याने ऐकवलं जातं. ‘आम्हाला दोन वेण्या घातलेल्या दोन पर्याच हव्या होत्याकिंवाआता ताईला भाऊ हवायापैकी काय तो एक संवाद निवडा, असा या मंडळींचा आग्रह असतो. दुसरं मूल हेहीजे होईल ते आपलंइतक्या स्वच्छपणे आणि आनंदाने स्वीकारता येतं, यावर कुणाचाच विश्वास बसलेला दिसत नाही.

दुसरीही जेव्हा मुलगीच होते, तेव्हा डॉक्टरीणबाई, आपल्या हातून असं कसं घडलं, अशा पश्चात्तापदग्ध चेहर्यानेधरणीमातेने आपल्याला पोटात घेतलं तर बरंअशा कावर्याबावर्या होत्सात्या ही वार्ता बाबांच्या कानावर घालतात. कडेवर घेतलेल्या बालिकेला टाळी देऊन दोन्ही बापलेक जेव्हाबेबी झालीम्हणून खुश होतात, तेव्हा डॉक्टरीणबाई व्यवसाय बदलून दुपटी शिवण्याचा कारखाना टाकावा काय, याचा विचार करू लागल्याचं स्पष्ट दिसतं. समाजपुरुष आणि समाजस्त्री यांचा तर इतका विरस होतो की त्यांना काय बोलावं हेच सुचत नाही. त्यात दोन मुलींची आई आणि बाप हे दोघेही खरोखरचे खुश दिसत असले, तर कलियुग कलियुग म्हणतात ते हेच, याची त्यांना खात्री पटते. असं चौकोनी कुटुंब दिसलं की हेच तोंड लपवू लागतात. हे हतभागी समाजपुरुषा आणि गे कन्यासुखवंचित समाजस्त्रिये, रडण्याच्या श्रमांनी क्लांत झालेली छोटी कन्या बाबाच्या गुबगुबीत हातावर गाल टेकवून आणि गादीसारख्या गरगरीत पोटावर विसावलेली आहे आणि त्याच वेळी कानाशी चिमणीसारखी चिवचिवत मोठी कन्या त्याला 1171 व्या वेळेलाछोटा भीमची साडेतीन ओळींची गोष्ट रंगवून रंगवून साभिनय सांगते आहे, या दृश्यातली गोडी तुम्हाला कुठून कळणार?
जाओ गोरख, या जन्मात तरी मच्छिंदर तोगया’!

पूर्व-प्रसिद्धी : मधुरिमा, दिव्य मराठी 
(महिला दिन विशेष, ८ मार्च २०१३ )

4 comments:

  1. रडण्याच्या श्रमांनी क्लांत झालेली छोटी कन्या बाबाच्या गुबगुबीत हातावर गाल टेकवून आणि गादीसारख्या गरगरीत पोटावर विसावलेली आहे आणि त्याच वेळी कानाशी चिमणीसारखी चिवचिवत मोठी कन्या त्याला 1171 व्या वेळेला ‘छोटा भीम’ची साडेतीन ओळींची गोष्ट रंगवून रंगवून साभिनय सांगते आहे..

    व्वा.. बेस्ट..
    शैलेंद्र

    ReplyDelete
  2. paripurn, dada.

    ReplyDelete