Sunday, September 21, 2014

मौजे रिकामटेकडे समाचार-3

1.  
गोवा नव्हे, `गोसेवा' म्हणा!- दुर्दिन ढवळीकर
गोवा या राज्याचे मूळ नाव `गोसेवा' असेच होते, काळाच्या ओघात स्थानिक हिंदूंचा `से' कमी झाल्यामुळे राज्याच्या नावातला `से'ही गळून पडल्यामुळे त्याचे नामकरण `गोवा' असे झाले, असा दावा तेथील राज्य इतिहास मोडतोड मंडळाचे अध्यक्ष व आमदार दुर्दिन ढवळीकर यांनी नुकताच येथे केला आणि गोव्याचे नाव बदलून `गोसेवा' असे करावे, अशी मागणीही त्यांनी केली. मौजे रिकामटेकडे इतिहास फिरवाफिरव परिषदेच्या अधिवेशनात ते बोलत होते.
`इतिहासाचे सोयीस्कर पुनर्लेखन ः सनातन धर्माची गरज' या विषयावरील व्याख्यान गुंफताना दुर्दिन ढवळीकर म्हणाले की माझ्या या विधानाला माझ्या आडनावाचाच सणसणीत पुरावा आहे. माझे समर्थक आमदार पवळीकर या आडनावाचे आहेत, हा योगायोग नाही. ढवळय़ा-पवळय़ाची जोडी असे मराठीत कोणत्या प्राण्याला म्हणतात, तो कोणत्या वंशाचा असतो, असा सवाल त्यांनी केला, तेव्हा उपस्थित मंडळींनी (कंपोझिटर, `प्राण्यांनी' असे लिहू नका आणि गोवंशात तर मुळीच शिरू नका, नाहीतर शिंगावर घेतले जाल) जोरदार माना डोलावल्या. प्राचीन काळात या भागात धष्टपुष्ट गोधन होते आणि गायी नारळाच्या झावळय़ांचा चारा खाऊन खूप उंचही झाल्या होत्या, याचे वर्णन करणारा दुर्मीळ ऐतिहासिक दस्तावेज आपल्याला एका उत्खननात फेणीच्या बाटलीत सापडला, तेव्हा स्थानिकांनी बाटलीतली फेणी यानेच संपवलेली दिसते, अशी आपली हुर्यो उडवली, असा हृदयद्रावक प्रसंग त्यांनी सांगितल्यानंतर `शेम शेम' असे उद्गार सभागृहात उमटले. आयोजकांनी सोटा उगारून `शेम' हा शब्दही विदेशी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर `लाज लाज' असे त्याचे स्वदेशी रूपांतर करण्यात आले. मात्र आपण संबंधितांना त्याच ठिकाणी लडखडत का होईना, पण ठामपणे उभे राहून, `शेणी' या शब्दापासूनच `फेणी' उगम पावली आहे, असे ठणकावून सांगितल्यानंतर त्यांची तोंडे गोमूत्र प्यायल्यासारखी झाली होती, असेही त्यांनी टाळय़ांच्या गजरात सांगितले.
गोव्यात निसर्गरम्य समुद्रकिनारा असल्यामुळे आणि पोर्तुगीज तेथे परदेशी संस्कृतीचा शिरकाव झाला. ती मोडून काढून आता आपली संस्कृती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व किनार्यांवर गंगेच्या धर्तीवर विस्तीर्ण घाट बांधावेत आणि तिथे रोज सागरपूजनाचे सोहळे आणि दीपोत्सव साजरे करावेत, म्हणजे तिथे आता सुरू असतात ते `दिवे लावण्याचे' उदय़ोग बंद पडतील, अशी सूचनाही त्यांनी केली. मलमूत्र-सांडपाणी, निर्माल्य विसर्जन आणि अन्य मार्गांनी आपण समुद्राचे पाणीही गंगेइतकेच पवित्र करून टाकू, त्याकरिता पाण्यात फेकण्यासाठी प्रसंगी देशाच्या इतर भागांतून कट्टर सनातनधर्मीयांचे मृतदेह मागवून घेऊ, असेही ते म्हणाले.
...................................
2.  
उत्सवकाळासाठी उच्छादवादी पक्षाकडून 
बोळय़ांचे आणि गोळय़ांचे वाटप
आगामी चार महिन्यांमध्ये मौजे रिकामटेकडेमधील काही नागरिक जे उत्सव साजरे करणार आहेत, त्यांचा उच्छाद सहन करण्याची शक्ती अन्य नागरिकांमध्ये यावी, यासाठी उच्छादवादी पक्षाचे धडाडीचे नेते आणि आधुनिक अधर्मभास्कर बंटी बोंबले यांच्यातर्फे नागरिकांना बोळय़ांचे आणि गोळय़ांचे वाटप करण्यात आले. उत्सवाच्या आवाजाने बहिरेपण येऊ नये, यासाठी बोळय़ांचे आणि ब्लड प्रेशर वाढून हृदयविकाराच्या झटक्याने प्राणोत्क्रमण होऊ नये, यासाठी गोळय़ांचे वाटप करण्यात येणार आहे.
अधर्मभास्कर बंटी यांच्या आशीर्वादाने बेकायदा बांधण्यात आलेल्या सातमजली इमारतरूपी झोपडय़ांच्या तकलादू भिंती उत्सवकाळात स्पीकर्सच्या भिंतींच्या दणदणाटाने कोसळून त्याखाली मरण पावणार्या नागरिकांपैकी दोघांची सोडत पद्धतीने नावे काढून त्यांना मरणोत्तर संस्कृतीभूषण पुरस्कार देण्यात येणार असून दहीहंडी फोडताना किंवा फटाक्यांनी भाजून, आगीत जळून मरण पावणार्यांपैकी दोघांची सोडत पद्धतीने निवड करून त्यांना संघर्षरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे जाणते राजे शरद चांदणे यांच्या कानात बोळे कोंबून आणि जागेपणी झोप आणणार्या गोळय़ा भरवून अभिनव पद्धतीने करण्यात आले. या बोळय़ांमुळे आणि गोळय़ांमुळे त्यांना उत्सवाच्या नावाने सुरू असलेला गिल्ला ऐकूच आला नाही आणि नागरिकांच्या तक्रारीही त्यांच्या कानावर पडल्याच नाहीत. त्यांचे मंदस्मित हा त्यांचा उत्सवी उच्छादाला रुकारच असल्याचे बंटी बोंबले यांनी जाहीर केले, तेव्हाही चांदणे मंद हसत (कंपोझिटर, हा शब्द गाळू नका) होते.
जंगली श्वापदे मानवी वस्तीच्या जवळ येऊ नयेत, म्हणून रोज रात्री दारू पिऊन नाच करण्याची आदिवासींची परंपरा होती. तीच आज उत्सवांच्या रूपाने आपण दिवसाही चालू ठेवली आहे, असे आधुनिक अधर्मभास्करांनी जाहीर केले, तेव्हा त्यांच्या उत्सवाच्या नशेत झिंगलेल्या समर्थकांनी एकच कल्ला करून त्यांना अनुमोदन दिले. जोपर्यंत या उत्सवांमुळे माझे हातपाय तुटत नाहीत आणि माझा जीव जात नाही, तोपर्यंत मी या उत्सवांची उच्छादी संस्कृती जतन करण्यासाठी संघर्ष करणारच, असेही ते म्हणाले. या सणांमुळे कान किटतात, अनेक विकार बळावतात, याकडे क्षीण आवाजात काही लोकांनी लक्ष वेधल्यानंतर त्यांनी विचारले की सर्वसामान्य नागरिकांची कान, डोळे, नाक, वगैरे सर्व इंद्रियांची शक्ती वाढवण्यासाठीच आम्ही जिवावर उदार होऊन हे उत्सव करतो आहोत. या देशातल्या बहुसंख्य नागरिकांना, बहुसंख्यांच्या धर्माच्याच पुढार्यांचे नाना प्रकारचे उदय़ोग सहन करण्याची शक्ती या बहुसंख्यांच्या उत्सवांच्या उच्छादातूनच मिळणार असल्यामुळे त्यांनी बोळे आणि गोळय़ा यांच्या साहय़ाने उत्सवाचा आनंद लुटायला शिकावे, नाहीतर फुटावे, असा दमही त्यांनी भरला.
........................................
3.  
पंतप्रधानांनी वाढीव कामाची घोषणा 
मागे न घेतल्यास उपोषणाचा इशारा
सरकारी कर्मचारी जेवढा वेळ काम करतील, त्यापेक्षा एक तास अधिक काम आपण करू, ही घोषणा पंतप्रधानांनी ताबडतोब मागे घ्यावी, नाहीतर आम्ही उपोषण करू असा इशारा दोन वेगवेगळय़ा संघटनांनी दिल्यामुळे मौजे रिकामटेकडेवासियांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यापैकी एक इशारा सरकारी कर्मचारी संघटनेने दिला आहे, तर दुसरा इशारा सर्वसामान्य नागरिक संघाने दिला आहे.
पंतप्रधानांनी असे सरसकट विधान केल्यामुळे सगळे सरकारी कर्मचारी कामाच्या तासांमध्ये (तरी) काम करतात, असा गैरसमज नागरिकांमध्ये पसरला असून ठिकठिकाणी नागरिक आणि सरकारी कर्मचारी यांच्यात त्यामुळे खटके उडत आहेत. आपल्या नोकरीमध्ये काम करण्याची अटच नसताना अचानक या विधानामुळे आपल्याकडून कामाची अपेक्षा निर्माण झाल्यामुळे मानसिक ताण आल्याची तक्रार अनेक कर्मचार्यांनी नोंदवली असून त्यांच्यापैकी अनेकांनी वैदय़कीय रजेवर जाणे पसंत केले आहे. नाश्त्याची वेळ, चहाची वेळ, जेवणाची वेळ, पाय मोकळे करण्याची वेळ, विडी-काडी-पानसेवनाची सुटी, सर्व सणावारांच्या सुटय़ा, संप वगैरे वजा जाता आजच सर्व कर्मचार्यांवर दैनंदिन साडे सतरा मिनिटांच्या कामाचा अतीव ताण असताना त्यांच्यावर आणखी बोजा लादणे अमानवी स्वरूपाचे आहे, असे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. या अन्याय्य अपेक्षेविरुद्ध उपोषण करणार असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी जाहीर केले आहे.
मात्र त्याचवेळी, पंतप्रधानांच्या आवाहनानुसार वाढीव काम सुरू केलेल्या सरकारी कर्मचार्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला ताप लक्षात घेता पंतप्रधानांनी हे आवाहन मागे घ्यावे आणि स्वतःही अधिक काम करू नये, असे आवाहन सर्वसामान्य नागरिक संघाने केले आहे. वाढीव काम करावे, या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काही विशिष्ट `खात्या'च्या कर्मचार्यांनी त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवायला सुरुवात केली होती. भूसंपादनासारख्या कामात गुंतलेल्या अधिकार्यांनी दिवसरात्र राबून सातबाराच्या उतार्यांमध्ये फेरफार वगैरे दैनिक उपक्रमांच्या रात्रशाखाही सुरू केल्यामुळे आधीच पिडित असलेले नागरिक हैराण झाले आहेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी बारमध्ये बसून बारमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केल्यामुळे त्यांना मोफत सेवा पुरवून पुरवून बारमालक हैराण झाले आहेत आणि नागरिकांचे पेयपानावरचे लक्ष उडाले आहे, असे या संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. रस्त्यांवर जे खड्डे पडण्यासाठी सहा महिन्यांचा आणि दुरुस्तीसाठी सहा महिन्यांचा काळ लागत होता, तेच खड्डे आता दिवसरात्र काम सुरू झाल्यापासून तीन महिन्यांत पडतात आणि वर्षातून दोन वेळा त्यांच्या दुरुस्तीची पाळी येते आहे. अशा दुप्पट वेगाने सरकारी कामकाज सुरू राहिल्यास सरकारी खजिने पाच वर्षांच्या कार्यकाळाऐवजी अडीच वर्षांतच खाली होतील, असा इशारा अर्थतज्ञांनी दिला आहे, याकडेही संघाने लक्ष वेधले आहे.
हाच धोका लक्षात घेऊन आम्ही सरकारी कर्मचारी कमीत कमी काम करतील, अशी व्यवस्था केली होती. ती मोडून सरकारने काय साधले, अशी संतप्त विचारणा विरोधी पक्षाचे नेते पप्पू पोंबुर्पेकर यांनी केली आहे.

मौजे रिकामटेकडे समाचार --2

1. 
अधिकृत बांधकामे तोडण्याचे आश्वासन
महापौरांच्या हस्ते महापालिका इमारतीवरील बेकायदा बांधकामाचे उद्घाटन
मौजे रिकामटेकडेमधील छपरी-पिंपवड भागातील तुरळक अधिकृत बांधकामांमुळे अनधिकृत बांधकामांना आणि त्यांत राहणार्या रहिवाशांना भोगावा लागणारा त्रास कायमचा बंद करण्यासाठी या भागातील अधिकृत बांधकामे लवकरात लवकर तोडली जातील, असे आश्वासन महापौर दैनाबाई दगड यांनी नुकतेच येथे दिले. महापालिकेच्या मुख्यालयावर बांधण्यात आलेल्या सातमजली बेकायदा बांधकामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिले.
महापालिकेच्या खास मर्जीतील कंत्राटदार गदळराव गोचीड यांनी रात्रंदिवस श्रमून अवघ्या साडे-सतरा दिवसांत सात मजली इमारत, तीही महापालिकेच्या इमारतीच्या वर बांधलेली आहे, हा विश्वविक्रमी चमत्कार आहे, अशा शब्दांत त्यांनी गोचीड यांचे कौतुक केले. मुळात दोन मजल्यांची परवानगी असताना महापालिकेची मूळ इमारत आज 18 मजली झाली आहे. तिच्यावर आणखी सात मजले वरच्या वर चढवून अविनय कायदेभंगाची ही महापालिकेनेच सुरू केलेली चळवळ पुढे नेऊन महापालिकेच्या शिरावर गोचीड यांनी हा सरताज चढवला आहे, असे त्या म्हणाल्या. ब्रिटिशकाळात बांधल्या गेलेल्या काही अधिकृत इमारतींमुळे बेकायदा इमारतींवर आणि त्यांच्यात राहणार्या लक्षावधी नागरिकांच्या डोक्यावर अनिश्चिततेची तलवार टांगलेली असते. या इमारतींना कायदय़ानुसार सुविधा पुरवण्याचा महापालिकेच्या यंत्रणेवर ताण येतो.  या सततच्या त्रासावर कायमचा उपाय म्हणून शहरातील सर्व अधिकृत बांधकामे लवकरच पाडून टाकली जातील आणि त्यांच्यातील नागरिकांचे, दंडात्मक रक्कम आकारून बेकायदा इमारतींमध्ये पुनर्वसन केले जाईल, असेही त्यांनी टाळय़ांच्या गजरात सांगितले.
`कसेल त्याची जमीन' या तत्त्वावर `जो जिथे उभारील ते बांधकाम' हेच नैसर्गिक न्यायाचे तत्त्व असताना सरकारने उगाचच शहर नियोजनाच्या नावाखाली लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच केलेला आहे, असे परखड मत यावेळी विरोधीपक्षनेते तात्याजीराव ताटलीमांजरे यांनी व्यक्त केले. लोकांनी हवे तिथे हव्या तेवढय़ा आकाराचे बांधकाम उभारावे. महापालिका त्यात हस्तक्षेप करणार नाही. उलट अशा बांधकामांना वीज-पाणी-रस्ते वगैरे सर्व पायाभूत सोयी तातडीने पुरवल्या जातील, असे आश्वासन आयुक्त खा. के. गब्बर यांनी दिले. अशा इमारतींना सर्व आवश्यक परवानग्या देण्यासाठी बेकायदा एकखिडकी ऑफिस दिवसरात्र सुरू राहील आणि विशिष्ट रकमेचा विनापावती रोखीने भरणा करताच त्यांच्या इमारती कायदेशीर करून दिल्या जातील, अशी व्यापक जनहिताची घोषणाही त्यांनी केली.
बेकायदा इमारती बांधताना करावे लागणारे सोपस्कार कमी करणार्या या घोषणेचे स्वागत करून श्री. गोचीड म्हणाले की बेकायदा इमारत बांधणे हे फार मोठे आव्हान असते. बांधकामखर्चाच्या कित्येक पट रक्कम संबंधित यंत्रणेतील अधिकार्यांना खाऊ घालावे लागतात. त्यात सुसूत्रता आणण्याबरोबरच विकासकांना प्रोत्साहन म्हणून सर्व प्रकारचे कर 99 वर्षांकरता माफ करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. आयुक्त आणि महापौरांनी ती तात्काळ मान्य करून 15 टक्के कमिशनच्या बोलीवर सर्व बेकायदा बांधकाम करणार्या बिल्डरांना मजल्यामागे एक लाख रुपयांचा सरसकट प्रोत्साहन भत्ताही जाहीर करण्यात आला आहे.
.....................................................
2.  
प्रख्यात फेसबुकी विचारवंत
भा. री. अब्जबुद्धे यांचे निधन
येथील प्रख्यात फेसबुकी विचारवंत (कंपोझिटर, फेसबुकवरच्या सवयीने विचार`जंत' लिहू नका, दोघांच्याही नोकर्या घालवाल) भा. री. अब्जबुद्धे यांचे नुकतेच येथे अतिविचाराच्या ताणाने निधन झाले. त्यांचे फेसबुकवरील वय सात वर्षांचे होते.
फेसबुकवर पोस्ट टाकत असतानाच त्यांच्या छातीत कळ आली. `छातीत विलक्षण कळ आली आहे, काय करू?' अशी विचारणा त्यांनी पहाटे अडीच वाजता फेसबुकवरच केली होती. त्यावर `कविता करा'पासून `इनो घ्या' इथपर्यंत अनेक सूचना आल्या. हा हृदयविकाराचा झटका असू शकतो, असे सांगून सावध करणारी 173वी कॉमेंट पडेपर्यंत त्यांनी `मी बहुदा मेलो आहे' अशी शेवटची पोस्ट टाकली. त्यांच्याकडून, एफबीवर ऑनलाइन असूनही पुढच्या 17 मिनिटांत एकही पोस्ट न आल्यामुळे ही आशंका खरी निघाल्याचे त्यांच्या फेसबुक फ्रेंड्सच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या, तेव्हा फेसबुकवर ऑनलाइन असलेल्या जवळच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली गेली. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा तोडून उघडण्यात आला तेव्हा अब्जबुद्धे हे हातात लॅपटॉप घेतलेल्या स्थितीत ऑनलाइन निवर्तल्याचे लक्षात आले.
श्री. अब्जबुद्धे हे पाणीखात्यात नळाला चावी देण्याच्या नोकरीतून दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. मात्र, नोकरीच्या काळात शब्दकोडय़ांची मराठी वर्तमानपत्रे प्रचंड प्रमाणात वाचल्याने आणि वाचकांच्या पत्रात पत्रे लिहिल्याने त्यांच्या विद्वत्तेचा दबदबा सर्वत्र पसरलेला होता. मराठीतल्या बहुतेक वर्तमानपत्रांचे अग्रलेख अनेक वर्षे वाचलेले असल्यामुळे त्यांना सर्व विषयांमध्ये मत होते. `एखादय़ा विषयावर मला मत आहे, म्हणजेच त्यात मला गती आहे,' असे ते ठामपणे सांगत आणि रॉकेट सायन्सपासून भेंडीची भाजी उभी चिरावी की आडवी, इथपर्यंत कोणत्याही विषयावर मत व्यक्त करत. निवृत्तीनंतर त्यांच्या ज्ञानाचे आणि विद्वत्तेचे भांडार जगाला खुले व्हावे (आणि आपली ज्ञानसाधनेतून सुटका व्हावी) या हेतूने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लॅपटॉप भेट दिला होता. त्याच्या साहय़ाने ते फेसबुकवरून दिवसरात्र जगाला ज्ञानाचे डोस पाजत असत.
`श्री. अब्जबुद्धे सर यांच्या निधनाने फेसबुकवरील एक खंदा मार्गदर्शक हरवला आहे,' अशा शब्दांमध्ये त्यांच्या मित्रयादीतील अनेकांनी त्यांना फेबुवरच आदरांजली वाहिली. आता सातवाहनकालीन नाण्यांपासून बुद्धकालीन लेण्यांपर्यंत, युक्रेनच्या पेचप्रसंगापासून पेरू देशातील एका गल्लीत प्रख्यात असलेल्या विचारवंताच्या व्यासंगापर्यंत, मौजे रिकामटेकडेमधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येपासून विश्वामित्राच्या तपस्येपर्यंत विविध विषयांवर अधिकारवाणीने दिलेले पोकळ मत जाणून घेण्यासाठी यापुढे फेसबुककरांना `दैनिक रिकामकट्टा'च्या ऑनलाइन एडिशनवरील अग्रलेखांवरच विसंबून राहावे लागणार आहे, अशीही खंत अनेक फेसबुककरांनी व्यक्त केली.
.........................................................
3.
मराठी संवादांच्या अतिरेकामुळे
अभिनेत्री संतापून सेटवरून बाहेर
एका मराठी चित्रपटातील अवघड मराठी संवादांच्या अतिरेकामुळे संतापून आजची आघाडीची अभिनेत्री, बिकिनी गर्ल जुई गोफणकर ही एका चित्रपटाच्या सेटवरून निघून गेल्याची चर्चा मौजे रिकामटेकडेच्या फिल्म इंडस्ट्रीत आज दबक्या आवाजात सुरू होती. मराठी कलावंतांचा असा छळ सहन केला जाणार नाही, तात्काळ सोप्या मराठीत किंवा हिंदीत संवाद बदलून दिले गेले नाही, तर या चित्रपटाचे चित्रिकरण बंद पाडू, असा इशारा मांजरसेना आणि नवमांजरसेना या दोन्ही स्थानिक पक्षांच्या चित्रपट शाखांनी दिला आहे.
मराठी फिल्म इंडस्ट्री हिंदीची हुबेहूब नक्कल करून `लय भारी' `टाइमपास' करून `बालक-(बालबुद्धीचे) पालक' यांचे भरघोस मनोरंजन करून यशोशिखरे काबीज करत असताना काही नतद्रष्ट मंडळी अजूनही अस्सल मराठी सिनेमा काढण्याचा प्रयत्न करतात आणि मराठी सिनेमाच्या यशस्वी घोडदौडीला गालबोट लावतात, असे स्पष्ट मत प्रख्यात लेखक-दिग्दर्शक-अभिनेते-गायक-प्रेक्षक-गॉडफादर-राजकीय कार्यकर्ते आणि चित्रपट कलावंतांचे लाडके परदेश सहल आयोजक नरेश पिंजरेकर यांनी व्यक्त केले. या चित्रपटात एकही पूर्ण हिंदी गाणे नाही, हिंदीच गाणे ऐकतो आहोत, असे वाटायला लावणारे मराठी गाणे नाही आणि वर गाण्यांचे सगळे शब्द व्यवस्थित कळतात, हे समजल्यानंतरच मला काहीतरी काळेबेरे असल्याची शंका आली होती. ती संवाद हातात आल्यानंतर खरी ठरली,'' असे जुईने आमच्या प्रतिनिधीला फोनवर सांगितले. ती म्हणाली, ``पडदय़ावर इतकं मराठी बोलायची हौस असती, तर मी टीव्ही मालिका नसत्या का केल्या? शिवाय बिकिनी घातलेल्या नटीच्या तोंडी इतके अवघड संवाद देणं हा प्रेक्षकांचाही रसभंग आहे.''
जुईच्या वॉकआउटनंतर हादरलेल्या निर्मात्याने दिग्दर्शकाला फैलावर घेऊन सगळे संवाद बदलण्याची सूचना केल्याची बातमी आहे. निर्मात्याच्या फोर्थ स्टँडर्डमध्ये शिकणार्या मुलाला समोर बसवून त्याला कळतील, असेच संवाद लिहायचे, अशी सक्त ताकीद संवादलेखकाला देण्यात आलेली आहे. जुईच्या या धाडसी कृतीमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांना भोगावा लागणारा मराठी बोलण्याचा त्रास कमी होणार असल्याने सर्व थरांतून तिचे अभिनंदन होत आहे.

मुलाखती : `देणे' आणि `घेणे'

``नेक्स्ट।़।़।़''
आम्ही पुकारा केला आणि बेलवर हात मारला. बेलवरची धूळ उडून आम्हाला चार शिंका येण्यापलीकडे काहीही घडलं नाही. शिवाय शेजारी बसलेले हायकमांडचे निरीक्षक जागे झाले, त्रासून त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि बसल्याजागी कूस वळवून, म्हणजे मान वळवून ते पुन्हा झोपी गेले.
आम्हीही खरंतर नेक्स्ट असं म्हणण्याचं कारण नव्हतं. कारण आधीच कुणी आलं नव्हतं मुलाखतीला, तर पुढे कोण येणार होतं? पण, आपल्यालाही डुलकी लागू नये म्हणून आम्ही मधूनमधून `नेक्स्ट' म्हणत होतो, दाराबाहेर रेंगाळणारा एक भटका कुत्रा तेवढा आत येत होता आणि आम्ही हाड् म्हटलं की पुन्हा बाहेर जात होता. तो माणूस नसल्यामुळे आता इथे `खायला' काही नाहीये, हे त्याच्या लक्षात आलं नसावं.
अरेरे, बापूजींच्या, पंडितजींच्या, इंदिराजींच्या, राजीवजींच्या, सोनियाजींच्या, राहुलजींच्या या देदीप्यमान इतिहास लाभलेल्या पक्षाच्या नशिबात असा सन्नाटा यावा!
आता आम्ही- जै की निर्भीड, निष्पक्ष (आणि त्यामुळे `निःनोकरी') असे पोटावळे पत्रकारू असताना एका पक्षाच्या मुलाखतप्रसंगी नेमके काय करत होतो, असा प्रश्न कैकांना पडेल. आमचे सर्वपक्षीय स्नेहसंबंध आणि संचार ज्ञात नसलेल्या अज्ञांची संख्या मराठी मुलखात कमी नाही. तर त्यांना सांगायला हरकत नाही की आम्ही वार्तांकनासाठी (कोणी छापो ना छापो, आम्ही वार्तांकन करून ठेवतो- कोण रे तो `तेवढाच चहा-नाश्ता सुटतो' म्हणतोय?) काँग्रेसच्या कचेरीत गेलो असताना आधी आम्हाला उमेदवारीचा इच्छुक समजून खुर्चीत बसवण्यात आलं. `खोकी-पेटय़ा' वगैरे ऐकल्यावर आम्ही `आंब्याचा सीझन गेला, आता कसल्या पेटय़ा?' असं बोलल्यानंतर आमची झडती घेण्यात आली आणि आमच्या खिशात मोजून साडेबारा रुपये निघाल्यावर आमची `खर्च करण्याची' ऐपत लक्षात आली आणि आम्ही उमेदवार व्हायला आलो नसणार, याची खात्री पटून आमची सुटका करण्यात आली. तेवढय़ात मान्नीय प्रचारप्रमुखांना आमची ओळख पटली आणि आता जरा मुलाखती घेण्यात आम्हाला मदत करा, असं सांगून ते निसटले, आम्ही अडकलो.
अर्धा दिवस होत आला तरी एकही उमेदवारीचा इच्छुक इकडे फिरकताना दिसला नाही. काय हा बाबाजींच्या स्वच्छ कारभाराचा प्रताप, असे म्हणून आम्ही कपाळावर हात मारून घेणार इतक्यात एक चेहरा डोकावला. आम्ही ताबडतोब शिपायांना खुणा केल्या (तेही पेंगत होते, त्यामुळे `धरा धरा' असे कोकलावेच लागले.) शिपायांनी त्या इसमाला पकडून आणताक्षणी निरीक्षकही जागे झाले आणि त्यांनी विचारलं, ``बोलो, किधर से चाहिए?''
तो म्हणाला, ``इधर से चाहिए.''
अरे व्वा! पक्षाचं मुख्यालय असलेल्या ठिकाणी (तरी) पक्षाचं अस्तित्व आहे.
निरीक्षकांनी विचारलं, ``काम किया है क्या?''
तो म्हणाला, ``बहुत काम किया है?''
``स्वतःसाठी नाही, इतरांसाठी काम केलंय का, असं विचारतायत ते!'' आम्ही मध्ये तोंड घातलं.
तो म्हणाला, ``इतरांसाठीच भरपूर काम केलंय. पक्षासाठी पण भरपूर काम केलंय.''
कमाल झाली. सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असूनही लोकांचं काम करतो म्हणजे आश्चर्यच नाही का!
निरीक्षक म्हणाले, ``खर्चा करना पडेगा.''
तो म्हणाला, ``उस के लिए तो आया हूँ. आप पैसा दोगे, तो खर्चा करूँगा ना!''
आम्ही पुन्हा मध्ये तोंड घातलं, ``भारतीय लोकशाहीच्या उज्वल परंपरेची काहीच कल्पना नाही की काय तुम्हाला? तुम्ही पक्षाला पैसे दय़ायचे, तर वर पक्षाकडे पैसे मागताय? अशी कशी उमेदवारी मिळणार?''
तो निर्विकारपणे म्हणाला, ``पण इथे कुणाला उमेदवारी पाहिजे?''
आम्ही च्याट, निरीक्षक च्याट. दोघेही एकसमयावच्छेदेकरून ``मग काय पाहिजे?''
``अहो, माझं बिल पाहिजे. त्या मशाली पेटवल्या ना विजयाच्या. त्या मी दिल्या होत्या. तिकडे ते सेनावाले कोकलून राहिलेत आमचं पर्मनंट बुकिंग असताना मशाली का नेल्यात तिकडं म्हणून?''
त्याच्या खुलाशाने आम्ही डबल च्याट पडलो. शेवटी आमच्या साडेबारा रुपयांतले दहा आणि निरीक्षकांकडचे 990 (त्यांनाही खिशात रोकड ठेवण्याची सवय नाही- गरजच पडत नाही) अशी भरपाई करून त्याचं बिल चुकतं केलं आणि पुढचे देणेकरी यायच्या आत आम्ही धूम बाहेर पळालो...
पण, आम्ही पळून पळून पळणार किती? पुढच्याच वळणावर आमच्या कानाजवळून `सूं' करून बाण गेला आणि जिथे पाऊल टाकणार तिथेच घुसला. ब्रेक लावून, एका पायावर थबकून आम्ही वळून पाहतो, तो चि. आदित्यराजे धनुर्धराच्या वेषात दिसले. `खबरदार, पुढे पाऊल टाकाल तर! तिकडे तात मलनसीत आय मीन मतलबीत... व्हॉट अ डिफिकल्ट वर्ड...'
``मसलतीत आहेत म्हणायचंय का तुम्हाला?'' `रामराज्य मीट्स शिवशाही मीट्स हाइक' अशा सिच्युएशनमध्ये अडकलेली बाळे आम्हाला सतत भेटत असतात. आम्ही त्यांच्या साहय़ाला तत्पर असतोच.
``करेक्ट, त्यात आहेत. कोणालाही खलबत्त्यात प्रवेश नाही.''
``अहो, स्वतःहून आलं-लसूण-मिरची तरी जाईल का खलबत्त्यात?'' आम्ही मनोमन म्हणालो, पुढे लगेच उघडपणे जोड दिली, ``बाळराजे, आम्हालाही खलबत्त्यात जाण्याची हौस नाहीच. खलबतखान्यात अमितभाईंनी दिलेली एक चिठी पाठवायची आहे, म्हणून आलोय.''
अमितभाईंचं नाव निघताच बाळराजेंचा चेहरा शक्य तेवढा (विदिन द लिमिट्स ऑफ पॉसिबिलिटीज) नम्र झाला, थोडासा कसनुसाही झाला आणि आमच्या हातातली वाणसामानाची तीन महिन्यांपूर्वीची यादी वापरून आम्ही प्रांगणात शिरकाव करून घेतला.
पण, आमची धाव तिथपर्यंतच राहिली. आतल्या मुलाखत कक्षापर्यंत तर मुंगीलाही घुसणं शक्य नव्हतं. आम्हालाच आठदहा मुंग्या बाहेर तिष्ठत असलेल्या भेटल्या. झुंबडच झुंबड उडाली होती. गंमत म्हणजे मुलाखत कक्षात कुणालाच प्रवेश नव्हता. बाहेरची मंडळी एकेका चिटोर्यावर आपलं नाव, मतदारसंघ आणि खाली एक आकडा टाकून चिठ्ठय़ा आत पाठवत होती आणि त्यांच्या चिठ्ठय़ा वाढीव आकडय़ांसह बाहेर येत होत्या. मग काही लोक चेहरे पाडून निघून जात होते. बाकीचे नव्याने आकडे टाकून त्याच चिठ्ठय़ा आत पाठवत होते आणि मग त्यांच्यातल्या एकीवर साहेबांचा टिळा लागून ती बाहेर आली की जल्लोष सुरू होत होता...
इथे ही परिस्थिती, तर कमळकुंजात काय स्थिती असेल, असा विचार करून आम्ही त्या दिशेने कूच केली. वाटेत नवनिर्माणाच्या यार्डात शुकशुकाट दिसला. तिथे तुरळक गर्दी होती, पण ती सैरावैरा पळत होती. त्यांचाही काही इलाज नव्हता. यार्डात ठेवलेलं शोभेचं इंजीन बेभान होऊन इकडे तिकडे धावत होतं, आपल्याच माणसांच्या अंगावर चालून जात होतं, कधी इकडे तर कधी तिकडे... रूळांवरून तर ते कधीच घसरलेलं होतं... प्रस्तुत वृत्तांत मत्प्रिय वाचकाच्या हाती ठेवण्यासाठी कुडीत जीव शिल्लक राहायला हवा, हे लक्षात घेऊन आम्ही तिथून इंजिनाला गुंगारा देत निसटलो आणि कमळकुंजाच्या दाराशी येऊन ठेपलो. इथे गर्दीचा उच्चांक झालेला होता. इथे प्रांगणात शिरणंही शक्य नव्हतं, 173 मुंग्या आम्हाला दारातच भेटल्या, त्यांनाही शिरायला जागा नव्हती. दाराबाहेर हातात कमळफुलं घेतलेल्यांची गर्दी तिष्ठत होती. पण, ज्यांच्या हातात कमळांच्या जागी घडय़ाळं होती, त्यांच्यासाठीच दरवाजे उघडत होते. पुन्हा बंद होत होते. कमळकुंजाबाहेर कमळफुलं कोमेजत होती.
आता हे गुपित उलगडण्यासाठी आम्हाला राष्ट्रवादी मुख्यालय गाठावं लागलं. तिथे पोहोचल्यावर आम्हाला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मूळ गंगोत्रीवर पाणी प्यायला सोडा, पाणी पाजायला कोणी नाही- आणि या प्रादेशिक झर्यावर पजेरो, फॉर्च्युनर, एक्स्यूव्ही, अशा देशी-विदेशी `गाईगुरां'ची झुंबड. आमची शंका आम्ही आमचे परममित्र आराराबांकडे बोलून दाखवली. त्यांनी आमच्या डोसक्यावर टांगलेल्या बोर्डाकडे बोट दाखवलं. त्यावर लिहिलं होतं, `इनकमिंग फ्री, आउटगोइंग फ्री'. मुलाखतीसाठी एकेक दांडगे गडी येत होते. लोकसेवेचं तेज अंगावर चढलेलं, गळाभर, हातभर चढवलेल्या सोन्याच्या दिव्य प्रभेने कांती उजळलेली, चेहर्यावर उन्नत (कंपोझिटर, `उन्मत्त' लिहू नका, तुम्हालाही हातपाय आहेत आणि ते ब्रेकेबल आहेत, याचं भान ठेवा) भाव असे एकेक शंभर किलो वजनी गटातले इच्छुक उमेदवार आत येत होते. दोन-पाच प्रश्नांनंतर काहींची रवानगी बाहेर, तर काहींची आतल्या कक्षात होत होती. आता हा काय प्रकार? आतल्या कक्षात नेमकं काय सुरू आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही करंगळी वर उचलली (हा देहधर्म वार्ताहरधर्माच्या फार उपयोगी येतो) आणि प्रसाधनगृहाकडे जाण्याच्या मिषाने निघून कोणाचे लक्ष नाही हे पाहून चटकन् आतल्या खोलीत डोकावलो आणि जागेपणी बेशुद्धच पडलो...
...मुलाखतीत यशस्वी झालेल्या उमेदवारांना तिथे भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे फॉर्म वाटणं सुरू होतं आणि थोरले साहेब जातीने इच्छुकांकडून ते भरून घेत होते...

महाराष्ट्र नाटक कंपनी

आम्ही कट्टर लोकशाहीवादी आहोत...
लोकशाही ही आमच्या नसांनसांत भिनलेली आहे... त्यामुळे आम्ही दर पाच वर्षांनी घनघोर निद्रेतून महत्प्रयासाने जागे होतो... आसपास ढोलच तेवढय़ा मोठय़ा आवाजात वाजू लागलेले असतात, हा एक योगायोग म्हणायचा- पण आम्ही जागे होतो आणि लोकशाहीच्या पंचवार्षिक उत्थानकार्याकडे वळतो. एकदाचं बटण दाबून बोटावर शाई उमटली की आम्ही पुढची पाच वर्षं झोपायला मोकळे होतो ना!
या शिरस्त्यानुसार आम्ही जागे झालो आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कोण कोण कसे कसे झटतायत, हे पाहण्याच्या आमच्या गुप्त कार्यक्रमाकडे वळलो. आम्हाला आणि आमच्या अज्ञ, भोळय़ा वाचकांना सुज्ञपणे निवड करणं सोपं व्हावं, यासाठी आम्ही दर पाच वर्षांनी ही मोहीम हाती घेतो आणि अत्यंत निरलस वृत्तीने, कोणाकडूनही छदाम न घेतल्याने (कोणी देत नाही, हे कशाला सांगा) अत्यंत तटस्थ असा आमचा अहवाल जनतेपुढे सादर करतो. हा अहवाल सँपल गोळा करून केलेला सर्व्हे नाही, खुद की आँखों से देखा हुआ हाल है, त्यामुळे तो विश्वासार्ह मानायला हरकतच नाही, तर प्रत्यवायच नाही.
अट्टल दारुडय़ा माणसाला परक्या गावात मुक्काम असला तरीही भल्या पहाटे आपल्या पसंतीची दारू देणारा गुत्ता कसा बरोब्बर सापडतो, तसाच आम्हालाही महाराष्ट्रहिताच्या घडामोडी कुठे सुरू आहेत, त्याचाही बरोब्बर माग लागतो. गुत्त्याची सवय कुठे कुठे कामी येते पाहा. यंदाही आम्ही जागे होताच दीर्घ श्वास घेतला, तसा नाकात मेकअपच्या रंगांचा वास शिरला. अरेच्चा! आपल्या नाकाने कसा आपल्याला दगा दिला? आपण काही `महाराष्ट्राचे कलाकार' शोधण्याच्या मोहिमेवर निघालेलो नाही, मग हा गंध कुठून बरे आला आणि का आला, या विचारांनी आम्ही बेचैन झालो. आमच्या नाकपुडय़ांमधून मेकअपचा वास हुसकावून लावला आणि पुन्हा एकदा एकाग्रतेने छाती भरून वास घेतला, तर आता त्यात आय लायनर, लिपस्टिका वगैरे कसले कसले वास शिरले आणि पोटात डुचमळलेच. अखेर आपल्या नाकांवर विश्वास ठेवून आणि नासिकाग्रावर लक्ष ठेवून (भज्या नाकांच्या बाबतीत फार कठीण असतं ते) निघालो...
आमच्या नाकाने आम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर किंवा पक्षकार्यालयांच्या बाहेर आणून उभं करण्याच्या ऐवजी `महाराष्ट्र नाटक कंपनी'च्या दारात आणून उभं केलं, तेव्हा आम्ही च्याटमच्याट (थँक यू ब्रिटिश नंदी!) पडलो. पण आलोच आहोत तर डोकावून जाऊ ही आमची सवय (डोक्यावरची तीन टेंगळं, पाठीला आलेलं पोक, एक लंगडता पाय आणि अर्धी गायब झालेली बत्तीशी हे याच सवयीचे देणे-असो!). आम्ही द्वारपालांना `साहबने अर्जंट बुलाया है' असं सांगून घाईघाईने आत शिरलो. कुठ्ठेही शिरकाव करण्याची ही आमची पेटंट आयडिया आहे. आत कोणी ना कोणी साहेब असतोच आणि तो सारखा कुणाला ना कुणाला बोलावत असतोच. ही युक्ती लढवून आम्ही आत शिरलो आणि आमच्या लक्षात आलं की इथे तर आमचे सगळेच साहेब मौजूद आहेत...
...खरंतर हे पहिल्या फटक्यात आमच्या लक्षात आलं नव्हतं बरं का! डोक्यावरच्या कोंबडय़ातून एक बट कपाळावर रेंगाळत असलेले राजशेखर आम्हाला समोरून येताना दिसले, तेव्हा आम्ही स्वतःला चिमटा काढून पाहिला. राजशेखर दिसतायत म्हणजे आपण स्वर्गात तर पोहोचलो नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी. `ओय ओय ओय' म्हणून आम्ही जोराने किंचाळलो, तेव्हा कोणीतरी संवादांची प्रॅक्टिस करत असेल असं वाटून की काय, एकानेही आमच्याकडे पाहिलं नाही. राजशेखर महोदय तोंड स्थिर ठेवून बोलण्याची प्रॅक्टिस करत होते, हे पाहिल्यावर आमच्या लक्षात आलं की हे तर आपले परमपूज्य (कंपोझिटर, एकच शब्द लिहा, पूज्य वेगळे काढू नका, अर्थ बदलतो) बाबाजी! मालिकेतले नव्हे हो, प्रत्यक्षातले. मा.मु. म्हणजे माननीय मुख्यमंत्री. आमच्या शिवाजी पार्क भागातील दैवताने या बाबाजींना `मराठी सिनेमातल्या व्हिलनसारखे दिसतात' असं म्हटल्यापासून आम्हाला ते समोर आले की `त्या राजाभाऊला इंजीन पुसायला लावून, उद्धोबाला देशोधडीला लावून नाही कमळाबाईच्या घरादारावरून नांगर फिरवला तर नावाचा बाबाजी नाही' असं काहीतरी त्यांच्या तोंडून बाहेर पडेल असं वाटतं. पण, रस्सेदार मटणाच्या अपेक्षेने पातेल्यावरचं झाकण उचलावं आणि आत भेंडीची नाहीतर कोबीची भाजी निघावी, असा अनुभव त्यांनी प्रत्यक्षात तोंड उघडल्यावर मिळतो. तेच आदरणीय बाबाजी तोंडाला रंग लावून आपल्या चेहर्यावरचा `कुठून आलो या झमेल्यात' हा पर्मनंट चिकटलेला भाव काढून टाकून आनंद, दुःख, आवेश वगैरे भाव आणण्याचे प्रयत्न करतायत, हे पाहून आम्हाला धक्काच बसला.
पण, ही तर सुरुवात होती. पुढच्या दालनात कुठेही धबाबा बोलणार्या वक्तृत्वकुशल आबाबांची भाषणांची प्रॅक्टिस सुरू होती. आता या सद्गृहस्थाला खरंतर गप्प बसण्याची प्रॅक्टिस दय़ायला हवी. भाषण तर ते कधीही, कशावरही देऊ शकतात. मग असं लक्षात आलं की मुंबईत राहून आबाबांना इतर मराठी माणसांप्रमाणेच हिंदीत बोलण्याची आणि त्यातून घोळ निर्माण करण्याची सवय लागलेली आहे. त्यांच्या भाषणात हिंदी शब्द येणार नाही, याची प्रॅक्टिस त्यांना दिली जात होती. त्यांच्यापलीकडे आमचे आदरणीय दादा हे फक्त कागदावर लिहिलेलंच वाचण्याची प्रॅक्टिस करत होते. उत्स्फूर्त बोलण्याचे फटके बसू नयेत, यासाठी ही खबरदारी घेतली जात होती.
पुढच्या दालनातून कसलाच आवाज येत नाही, यामुळे आम्ही च्याट पडलोच होतो- पण, आत साक्षात सिंधुदुर्ग विराजमान असूनही आवाज येत नाही, हे पाहून आम्ही पुन्हा च्याटमच्याट पडलो (पुन्हा थँक यू ब्रिटिश नंदी!). मग लक्षात आलं की त्यांना गप्प बसण्याची प्रॅक्टिस दिली जातेय. फार कठीण परीक्षा होती हो! त्यांच्याकडेला चि. निलेश आणि चि. नितेश (या दोहोंपैकी कोणता कोण, हे आम्हाला स्पष्ट झालं की तुम्हाला कळवू) बागडत होते आणि त्यांच्या बाललीलांनी वैतागून जायचं नाही, चिडायचं नाही, त्यांना ओरडायचं नाही, सतत मनमोहन सिंह मोडमध्येच राहायचं, अशी खडतर प्रॅक्टिस सुरू होती.
एका दालनात बरीच रेटारेटी सुरू होती, त्याअर्थी ते मोदी पार्टीचं दालन असणार, हे आमच्या लक्षात आलं. या पक्षाचं काहीतरी एक वेगळं नाव होतं असं ऐकिवात आहे खरं. पण आताशा ते नाव कोणाच्या लक्षात नाही. लक्षात ठेवण्याचं काही कारणही नाही. कारण, नाव काहीही असलं तरी ती आता मोदी पार्टीच आहे. तिथे आरसा एक आणि खुर्ची एक असताना एकावेळी पाचसात लोक आरशासमोर उभे राहण्याची आणि खुर्चीत बसण्याची धडपड करत होतं. शिवाय या गडबडीत मध्ये आपलाच नंबर लागेल या आशेने उभे असलेले वेगळे काही लोक होतेच दबा धरून बसलेले. एक जाडगेले गृहस्थ आणि दुसरे जाडगेले होण्याच्या वाटेवर असलेले गृहस्थ मिळून `अहो, वेगळा विदर्भ झाला की आम्ही कशाला येतोय तुमच्यात. मग दोन खुर्च्या, दोन आरसे होतील, तोवर धीर धरा', म्हणून सांगत होती आणि आपणही तीच जागा पटकावण्याचा प्रयत्न करीत होती.
या दालनाशेजारचं दालन मित्रपक्षाचं होतं. तिथे आदय़ मेकअपपटू सर मेकअप करून दय़ायला बसले होते. त्यांना फारसं काम नव्हतं. कारण, त्यांना स्वतःचा आणि उद्धोजीराजेंचा असा दोघांचाच मेकअप करायचा होता. अधूनमधून आसपास बागडणारे आदित्यराजे बाबांच्या डोक्यावर श्रावणक्वीनचा मुकुट ठेवून, `माझे पप्पा सीएम सीएम' असा खेळ खेळत होता.
तिसर्या दालनात प्रिंटाच प्रिंटा पसरून हुसेनसाहेबांच्या श्वेतांबरा या प्रदर्शनाची आठवण येईल, अशी मांडणी केलेली होती. हा काय प्रकार म्हणून आम्ही विचारात पडतो ना पडतो, तोच आमच्या शिवाजी पार्कातील आदरस्थानाचा करडा स्वर ऐकू आला, `लाइट्स!' सगळीकडे निळा प्रकाश पसरला आणि प्रिंटांच्या ब्लूप्रिंटा झाल्या तेव्हा आमच्या डोक्यात प्रकाश पडला.
त्यानंतरच्या एका दालनातून शीघ्रकवितेच्या `कौरवांचा गुरू द्रोण आहे, मला विचारतो कोण आहे, अरे सत्तेची ऊब महत्वाची, विचारबिचार गौण आहे' अशा ओळी ऐकायला येत होत्या. तिथून शीघ्रतेने पुढे येऊन बाहेर पडलो, तर या दाराशी एक दरवान कान कोरत बसलेला. त्याला विचारलं, ``हे काय नाटक आहे?''
तोंडातला तंबाखू बाजूला थुंकून तो म्हणाला, ``तुम्ही म्हणाला, तेच आहे. नाटक!''
आम्ही विचारलं, ``अरे बाबा, इथे हे सगळे लोक मेकअपबिकअप करून प्रतिमानिर्मितीच्या उदय़ोगात मग्न आहेत. महाराष्ट्राचं हित, सामान्य जनतेचे प्रश्न, राज्याचा विकास वगैरे गोष्टींचं काय? ते कोण बघणार?''
पुन्हा एक भक्कम पिंक टाकून तो म्हणाला, ``आतापर्यंत कोण बघत होतं? तुमचं तुम्हीच बघायचं. नाटक कंपनीत फक्त खेळ पाहायला मिळतो. चला, पुढच्या दाराने तिकीट काढून या पुढच्या पाच वर्षांचं.''

उत्सवरूपी उच्छादांच्या भयकारी देशा...

किचनमध्ये कामात असताना हवेने अवचित कॅलेंडर फडफडलं, तशी फडतरे काकूंना नवा महिना सुरू झाल्याची आठवण झाली आणि त्यांनी लगेच काम हातावेगळं करण्यासाठी कॅलेंडरचा महिना बदलून टाकला... महिन्याच्या शेवटाकडे लक्ष गेल्यानंतर त्यांचा चेहरा एकदम पालटला आणि त्यांनी कातर आवाजात फडतरे काकांना हाक मारली... काकांनीही लाल अक्षरातली ती तारीख पाहिली. `अरे बापरे, एक वर्ष झालंसुद्धा' असा मनाशी विचार करून त्यांनी फोन फिरवायला घेतला... आता मंदारला फोन करण्याशिवाय काही तरणोपाय नव्हता...
****
फोन संपला, तेव्हा मंदारचाही चेहरा गंभीर झाला होता. त्याने गणित करून पाहिलं. आधीच या महिन्याचं बजेट टाइट होतं. या महिन्यात असाही खर्च वाढणार होता. त्यात आता हे काका-काकू दहा दिवसांसाठी येणार. अर्थात त्यांची अडचणही समजून घ्यायलाच हवी होती. एकेकाळी या निपुत्रिक काकांनी या सगळय़ा भावंडांसाठी खूप काही केलं होतं. आता म्हातार्या वयात या वयात दर वर्षी एकेका पुतण्याच्या दारात दहा दिवस जाऊन पडणं आलेलं होतं. त्यांच्या वार्षिक फेरीतून केदार मात्र वाचला होता...
****
या दिवसांत केदारला स्वतःलाच पळता भुई थोडी व्हायची. त्यात काकांना कुठून सांभाळलं असतं त्याने? या दिवसांत सगळं ऑफिस त्याच्यावर खुश असायचं. सगळय़ांना सुटय़ा हव्या असायच्या आणि त्यांचं काम करायला केदार एका पायावर तयार असायचा. ऑफिसात रात्री उशिरात उशिरापर्यंत बसून तो पहाटे घरी पोहोचायचा. थोडी झोप काढून दुपारपर्यंत पुन्हा कामावर हजर व्हायचा. त्याच्यापुढेही दुसरा मार्ग नव्हता, नाहीतर त्याचा भिंगारदिवे झाला असता...
****
भिंगारदिवेला लोकांनी सांगितलं होतं, पण त्याने ऐकलं नाही. तो आपल्या घरातच थांबला. हे माझं घर आहे, ते मी सोडून जाणार नाही म्हणाला. शेवटी व्हायचा तो परिणाम झालाच आणि एक दिवस तो अत्यवस्थ स्थितीत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलातून तीन महिन्यांनी बाहेर पडला, तो आयुष्यभर भोगावे लागणारे काही परिणाम सोबत घेऊनच...
****
``सो, दीज आर दी केस स्टडीज फ्रॉम टार्गेट एरिया! व्हॉट डु यू मेक आउट ऑफ देम! कळतंय का तुम्हाला काही? हे सगळं कशामुळे झालं असेल, या सगळय़ा गोष्टींमध्ये काय कॉमन आहे?'' चीनच्या शिक्सियापाँग भागातल्या `महाराष्ट्र विजय केंद्रा'चे संचालक पेंग ली अस्खलित मराठीत (म्हणजे मराठी माणसांप्रमाणेच अनावश्यक इंग्रजी शब्द पेरत) बोलत होते. हे केंद्र अस्तित्त्वात असल्याची महाराष्ट्रात कोणालाही कल्पना नाही. हा सगळा भाग चीनच्या पोलादी पडदय़ाच्या आत आहे. इथे 16 एकरांवर प्रशस्त भारत विजय केंद्र आहे. त्यातली एक इमारत महाराष्ट्र विजय केंद्राची. आजकालच्या काळात देश जिंकण्यासाठी लढाया करण्यात काहीच पॉइंट नसतो, हे चीनला कळून चुकलेलं आहे. आजकाल एखादय़ा देशाची बाजारपेठ काबूत आणली की सगळय़ा आर्थिक नाडय़ा हातात येतात आणि मग त्या हव्या तशा पिरगळता येतात, हे लक्षात घेऊन या प्रांतभरात विश्व विजय जिल्हाच वसवण्यात आलेला आहे. तिथे एकेका देशाच्या नावाचा एकेक परिसर आहे. त्यात चिनी माणसं त्या त्या देशाची भाषा बोलतात, त्या त्या प्रांतातल्या चालीरिती आत्मसात करतात. त्या त्या देशातल्या गरजांप्रमाणे कोणती उत्पादनं अतिशय स्वस्त दरात तिथल्या बाजारात उतरवायची आणि स्थानिक उत्पादकांचं कंबरडं कसं मोडायचं, याच्या धोरणांची आखणी तिथे चालते. त्या त्या इमारतीत त्या प्रांताचीच भाषा बोलायची, असा नियम आहे. तर पेंग ली यांनी प्रश्न विचारला की या संभाषणातून काय अर्थबोध झाला?
त्यांच्या सहकार्यांचे चेहरे प्रश्नार्थकच राहिले.
मग पेंग म्हणाले, ``महाराष्ट्रात आता सणासुदीचा माहौल आहे. हे सगळं वर्णन दहीहंडी, गणेशोत्सव, गरबा या सणांना लागू होणारं आहे, हे तुमच्यापैकी एकाच्याही लक्षात आलं नाही. महाराष्ट्राविषयी इतकी कमी माहिती असायला तुम्ही काय मराठी माणूस आहात की काय? असो. फडतरे काकांच्या गल्लीत एक राजा बसतो. आता हे एका गणपतीचं नाव आहे, हे मला वेगळं सांगायला लावू नका.'' पेंग ली यांनी हे बोलता बोलता रिमोटचं बटन दाबलं. समोरच्या पडदय़ावर फडतरे काकांचं घर दिसायला लागलं. एका चाळीतल्या त्यांच्या खोलीच्या समोरचा रस्ता क्षणार्धात फास्ट मोशनमध्ये चालणार्या चलतचित्रात एका मंडपाने व्यापला, तिथून मैलोन्मैलांचे कठडे उभारले गेले. फडतरे काकांसह तीन चाळींमध्ये उजेड तर सोडाच, साधी हवाही येणार नाही, अशी अवस्था मंडपामुळे झाली. सगळीकडे कार्यकर्त्यांचा आणि पोलिसांचा बंदोबस्त लागला. फडतरे काकांना स्वतःच्या इमारतीत शिरण्यासाठी सात प्रकारचे पुरावे सोबत ठेवण्याची पाळी आली. तरी त्यांची परिस्थिती बरीच बरी होती. पलीकडच्या चाळीतल्या लोकांना तर घाईची लागण्याचीही सोय नव्हती दहा दिवस. त्यांना टमरेलाबरोबर सात पुरावे घेऊन जावं लागत होतं स्वच्छतागृहात. म्हणूनच काका कधी या पुतण्याच्या तर कधी त्या पुतण्याच्या घरी दहा दिवस राहायला जात होते. त्यांच्या बिल्डिंगमधल्या ज्यांना मुलंबाळं होती आणि त्यांचे अभ्यास-परीक्षा होत्या, त्यांना तर ही सोयही नव्हती.
पुढच्या दृश्यांमध्ये मंदारचं घर दिसायला लागलं. हा फडतरे काकांचा त्यांचा पुतण्या परधर्मीय वस्तीत राहात होता. तिथे त्यांचे स्वतंत्र उत्सव चालत होते, पण हे दहा दिवस शांतता असायची. त्यामुळे त्याचं घर या अशा गावोगावच्या उत्सवपीडित नातेवाईकांची धर्मशाळाच होऊन बसायचं या दहा दिवसांत. तोही बिचारा सगळय़ांचं सगळं हौसेने नाही, तरी निगुतीने करायचा. या महिन्यात खर्चासाठी त्याला 12 महिने सेव्हिंग करायला लागायचं. काही काळानंतर इथेच एखादी जागा घेऊन मोठी धर्मशाळा बांधली, तर बर्याच लोकांची सोय होईल, असं त्याला वाटायला लागलं होतं...
पुढच्या क्लिपमध्ये दिसणारा, मंदारचा भाऊ केदार या तापातून वाचला होता. कारण, या दिवसांत त्याच्याकडे जाणं हे आगीतून फुफाटय़ात जाण्यासारखं होतं. तो अतिशय धार्मिक लोकांच्या वस्तीत राहात होता. भारतात जेवढं पाप अधिक तेवढं धर्माचरण कडक, असा प्रघात आहे. दिवसभर व्यापाराच्या नावाखाली लोकांच्या मुंडय़ा मुरगळायच्या आणि मग भजनं गाऊन, देवाच्या नावाने कोकलून, देवाला सोन्यानाण्याची लाच देऊन त्याला आपल्या पापात भागीदार करून घ्यायचं, असा या धर्मपरायण मंडळींचा खाक्या. त्यामुळे या उत्सवपर्वात तिथे भजनी मंडळांना उत्साह चढायचा. त्यांच्या घराघरातली भजनंही लोकांना तारस्वरात लाउडस्पीकरवरून दिवसभर ऐकवली जायची. रात्री वेगवेगळय़ा देवांचे जागरण गोंधळ होतेच. शिवाय गणेशोत्सवात त्याच्या दारातही मंडप होताच. हे 17 मुलांनी मिळून बनवलेलं बालमित्र मंडळ होतं. पण, 170 कुटुंबांच्या वस्तीला वेठीला धरण्याची ताकद त्याच्यात होती. तिथे रात्रभर देवापुढे `ये दुनिया पित्तल दी', `एक बॉटल व्होडका', `आता माझी सटकली' वगैरे जनप्रबोधनपर गाण्यांचा धुमाकूळ चालत होता. त्याच्यापासून सुटका हवी म्हणून केदार या काळात ऑफिसातच जास्तीत जास्त वेळ थांबायचा. कधी कधी तर तिथल्याच बाथरूममध्ये फ्रेश होऊन, कँटीनमध्ये नाश्ता करून कपडे बदलून सकाळी परत कामावर रुजू व्हायचा.
आपला भिंगारदिवे होऊ नये, असं केदारलाच नाही, तर त्यांच्या ऑफिसातल्या प्रत्येकाला वाटत होतं. त्याची कहाणी पुढच्या दृश्यात होती. भिंगारदिवेला ब्लड प्रेशरचा त्रास होता. शिवाय अतिशय भडकू स्वभाव. सणासुदीचा काळ आला की त्याच्या रसवंतीला बहार यायची. तोही नेमका उत्सवप्रिय वस्तीतच राहात होता. त्यामुळे त्याला हा सगळा ताप व्हायचा आणि तो त्याला त्याच्या स्वभावामुळे दुप्पट त्रास दय़ायचा. तो दिवसरात्र त्या सगळय़ा धर्मपरायण मंडळींचे वाभाडे काढायचा आणि स्वतःचं रक्त उकळवून घ्यायचा. केदारने त्याला आपल्याप्रमाणेच सुटकेचा मार्ग काढण्याची सूचना केली. पण, त्याच्या स्वभावानुसार त्याने ती फेटाळून लावली. शेवटी एक दिवस असा तणतणत असतानाच कोसळला, बीपी वाढल्यामुळे त्याला ऍडमिट केलं, त्या हॉस्पिटलबाहेरून गणेशविसर्जनाची मिरवणूक जात होती. रात्रभर हॉस्पिटलच्या दारं-खिडक्यांची तावदानं थरथरत राहतील, इतका भयंकर आवाज होत राहिला आणि भिंगारदिवेचा आजार तिपटीने वाढला. तीन महिन्यांनी तो घरी आला तेव्हा स्ट्रोकमुळे उजवा हात आणि पाय कामातून गेले होते...
स्क्रीनवरचं चित्र मालवून पेंग ली म्हणाले, ``आता सांगा, तुम्हाला हे पाहून काय वाटतं?''
``वाईट वाटतं सर'', डेंग म्हणाला.
झियाओ पिंग विषारी हसत म्हणाला, ``लेका, या सगळय़ाचं महाराष्ट्रातल्या लोकांना कौतुक वाटतंय. त्यांना आपल्या कोवळय़ा मुलांनी हातपाय तोडून घ्यायला दहीहंडीवर चढण्यात मोठा पराक्रम वाटतोय. कान फोडणार्या स्पीकरच्या भिंती उभारल्याने संस्कृती जपली जाते, असं त्यांना वाटतंय. तू कशाला वाईट वाटून घेतोयस उगाच.''
चांग ली म्हणाली, ``सर, मला याच्यात बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिसते आहे.''
सांग लीने तिला मध्येच अडवलं आणि ती म्हणाली, ``सर, पण आपण तर तिकडचं सगळंच मार्केट कॅप्चर केलंय. गणपतीच्या मूर्तीही आपल्याकडून आधी पेणला आणि मग महाराष्ट्रभर जातात. आपली दुर्वांची आणि कमळांची शेतीच तिकडची गरज भागवते आहे. स्वीट मोमो म्हणजे मोदकांचे कारखानेही जोरात आहेत. गरब्याच्या दांडियांपासून वाढीव मागणी असलेल्या गर्भनिरोधकांपर्यंत सगळं आपणच पुरवतो. गेल्याच वर्षी आपण रंगीत दही लावलेल्या नक्षीदार हंडय़ाही पाठवायला सुरुवात केलेली आहे. आता या मार्केटचं पूर्ण सॅच्युरेशन झालेलं आहे. आता आपण तिथे काय विकणार?''
``तेच तर मी सांगते आहे,'' चांग ली सांगू लागली, ``सर, आता दिवस कमी राहिले आहेत. आपण आपल्या सगळय़ा कारखान्यांमध्ये संपूर्णपणे वेगळी उत्पादनं बनवायला हवी आहेत.''
पेंग ली यांच्या चेहर्यावर हसू फुलत होतं. चांग ली ही नावाप्रमाणेच त्यांची चांगली शिष्या होती. तिने त्यांच्या प्रेझेंटेशनचा गाभा बरोब्बर ओळखला होता. चांग ली भराभर आपल्या कम्प्यूटरच्या साहय़ाने चित्रं-आरेखनं स्क्रीनवर दाखवत बोलू लागली, ``सगळय़ात जास्त मागणी असेल ती या स्पेशल मटिरियलच्या बोळय़ांना. हे कानात घातले की आवाज निम्म्याने कमी होईल. सर्वसामान्य माणसांसाठी साधे कापसाचेच बोळे थोडय़ा रंगीत शोशाइनगिरीसकट विकता येतील. पण, उच्चभ्रू ग्राहकांसाठी कानात न दिसणारे किंवा एकदम स्टायलिश बोळे बनवायला लागतील. त्यांच्यातून हाय डेसिबल आवाज फिल्टर होतील आणि लो डेसिबल आवाज ऐकू येतील. म्हणजे माणसांचे रोजचे व्यवहार चालू राहतील. फडतरे काकांसाठी हे आयडेन्टिफिकेशन गॅजेट. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे स्कॅनर असतील. काकांच्या गळय़ात राजाचं लॉकेट घालायचं. त्या लॉकेटमध्येच काकांचं आयडेंटिफिकेशन असेल. काकांना ठिकठिकाणी पुरावे दाखवत बसायला लागणार नाही आणि राजाचा प्रचार होईल तो वेगळा. मंडपांमुळे, फलकांमुळे ज्यांच्या घरात प्रकाश आणि हवाच खेळत नाही, त्यांच्यासाठी हे ऑक्सिजन सिलिंडर आणि सनलँप्स उपयोगी ठरतील. केदारच्या घरात आपण ही विंडो विकू शकतो. नॉइजलेस विंडो. काचेच्या या खिडकीची रचना अशा प्रकारची आहे की तिच्या अगदी बारीक-नॅनो जाळीतून हवा आत येते, पण आवाज गाळून. त्याच्या खिडकीवर स्पीकर लावला तरी तो आत शांतपणे घोरत पडू शकेल, अशी खिडकी. ज्यांना इतकी महागडी विंडो परवडणार नाही, त्यांना आपण कस्टमाइझ्ड भिंत विकू. म्हणजे दहा दिवस थोडी गैरसोय सहन करायची. ही स्वस्तातली साउंडप्रूफ भिंतच आपल्या खिडक्यांमध्ये बसवून टाकायची. इथेही सिलिंडर आणि सन लँप खपतील. इतकं करूनही भिंगारदिवेंसारख्या माणसांना त्रास होणारच. त्यांच्यासाठी आपण वेगवेगळी चिनी औषधं बाजारात टाकू. गेंडय़ाच्या कातडीचं, वाघाच्या नखांचं, मुंगीच्या केसांचं औषध. बुद्धीला बधिरता आणणारं औषध दिलं की माणूस काहीही सहन करायला तयार होतो. त्यातही कुणाला त्रास झाला, तर आपण वेगवेगळय़ा मेडिक्लेम योजना फ्लोट करूयात. फक्त उत्सवकाळासाठी. एकदा प्रिमियम भरायचा आणि चार महिने चिंतामुक्त बनायचं.''
``वाह, वाह,'' सगळय़ांनी टाळय़ा वाजवून या कल्पनेचं स्वागत केलं. टांग लीने आणखी एक सूचना केली, तो म्हणाला, ``सर, या राज्यात असे बरेच उत्सवपीडित असतील. त्या सगळय़ांना आपण या काळात स्वस्तात एखादय़ा शांत जागी नेण्याची आयडिया काढली तर?''
``कल्पना चांगली आहे तुझी,'' पेंग ली म्हणाले, ``पण, या राज्यातल्या एकंदर उत्सवपीडितांची संख्या पाहिली, तर त्यांना सामावण्यासाठी आपल्याला चीनमध्ये एक वेगळं राज्यच वसवायला लागेल. तेही एकवेळ करता येईल, पण, हे लोक एकदा जथ्याने एकत्र आले की इथेही उत्सव सुरू करतील आणि आपली उत्पादनं आपल्यालाच वापरायची वेळ येईल!''

मुंबई : 2114

घुर्रर्रर्रर्र... घुर्रर्रर्रर्रर्र...
घुंईईईई...`घुंईईईई...
अतिशय संथपणे होत असलेला आवाज हळुहळू जवळ येत गेला आणि शेवटी नाकाला गारेगार स्पर्श झाला, तेव्हा परळकर साहेबांची झोपमोड झाली... शिंची कटकट म्हणून कूस बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तेव्हा पलंग पाण्यात डुचमळल्याचा आवाज त्यांना आला आणि मग जागं व्हावंच लागलं. त्यांनी उशाशी ठेवलेला रिमोट दाबून आधी कानाशी घरघरणारा पंखा बंद केला आणि पाणी उपसण्याचा पंपही रिमोटने सुरू केला, तेव्हा त्यांच्या कॉटखालचं पाणी झपाटय़ाने ओसरू लागलं आणि छतावरच्या पंख्याला चिकटलेला पलंग खाली येऊ लागला. पाच फुटांची गॅप तयार झाल्यावर त्यांनी पंप थांबवला आणि यांत्रिक खुर्ची जवळ ओढली. त्या खुर्चीत उभे राहून त्यांनी वल्हय़ांसारख्या पेडल्सनी खुर्चीला गती दिली आणि ते बाथरूममध्ये निघाले. वाटेत किचनमध्ये सौं.नी तरंगत्या गॅसवर पोहे फोडणीला घातले होते. ``येणारच होते मी, इतक्यात मोटर चालू झाल्याचा आवाज आला, तेव्हा कळलं तुम्ही जागे झाले असणार. फ्रेश होऊन या, तोवर नाश्ता मांडते.''
पायाने वल्ही मारत मारत सगळी आन्हिकं आटोपताना परळकर साहेबांच्या मनात आलं... यंदाच्या प्रमोशनला स्वयंचलित वल्हय़ांची खुर्ची घेतलीच पाहिजे. उन्हाळय़ात ऑफ सीझन डिस्काऊंट मिळेल. एकावर एक फ्री मिळाली तर बायकोलाही छान गिफ्ट होईल. आताशा दोघांचेही पाय किती दुखतात. तरंगत्या डायनिंग टेबलाशेजारी आल्यावर त्यांनी वॉटरप्रुफ कागदावर छापलेल्या पेपरांचा गठ्ठा उचलला. अपेक्षेप्रमाणे सगळीकडे त्यांच्यासारख्या वॉटरप्रूफ घरांच्या, अंडरवॉटर जीवनावश्यक वस्तूंच्या जाहिरातींची रेलचेल होती. त्यांचं घर 17व्या मजल्यावर होतं म्हणून त्यांना आजवर अंडरवॉटर वस्तूंची गरज फारशी लागली नव्हती. पण, यापुढे सांगता येणं कठीण होतं. या ऑल सीझन घराचे हप्ते फिटत आले की रिनोव्हेशनमध्ये सगळं घर अंडरवॉटरप्रुफ करून घ्यायला हवं, असं त्यांनी मनोमन ठरवलं. तेव्हा धाडस केलं म्हणून हे घर झालं नाहीतर आताच्या रेटमध्ये हे घर परवडलं नसतं त्यांना. त्यांच्या घराबरोबर पाण्याची एक स्वतंत्र टाकी होती. पावसात पूर येऊन पाणी चढलं की सेन्सर्सच्या साहय़ाने आपोआप घराभोवती फिल्ट्रेशनच्या जाळय़ा चढत आणि त्यांच्यातून आरओ सिस्टमने स्वच्छ झालेलं पाणीच घरात शिरत असे. घरातल्या सगळय़ा वॉटरप्रुफ यंत्रणा कार्यान्वित होत आणि गरजेनुसार पंपाच्या साहय़ाने एकेका खोलीतलं पाणी टाकीत चढवून त्या खोलीतल्या पाण्याची पातळी हवी तेवढी कमी-जास्त करता येत असे. अशी घरं गरिबांनाही मिळावीत, अशा मागण्या आणि आश्वासनांचीच पेपरमध्येही रेलचेल होती. पुनर्वसन योजनांमध्ये हलक्या दर्जाचे पंप आणि जाळय़ा पुरवल्यामुळे झालेल्या हानीच्या बातम्या होत्या आणि दिलसे संघटनेने केलेल्या `कंत्राटदारांचे ऑक्सिजन मास्क ओढा' या `फुस्स फटय़ॅक' आंदोलनालाही जोरदार प्रसिद्धी मिळाली होती.
``अहो ऐकलंत का?'' गरमागरम पोहे, सौंचा प्रेमळ स्वर म्हणजे चिरंजीवांची काहीतरी मागणी `थ्रू प्रॉपर चॅनेल' पुढे आलेली दिसतेय, हा त्यांचा अंदाज खरा ठरवत सौ. म्हणाल्या, ``अनीशची स्पीडबोट सारखीच बंद पडतेय म्हणतो. एक्स्चेंजमध्ये दिली तर होंडाची नवी चांगल्या क्वालिटीची स्वस्तात येईल म्हणतोय.''
``बघू.'' परळकर गुरगुरले, ``आहे कुठे तो?''
``वॉटर सायकलिंगला गेलाय. आराध्या पोहायला गेलीये.''
आपल्या मुलीला स्विमिंग टँकवर पोहायलाही पाण्यातून पोहतच जावं लागतं, या गंमतीने परळकरांना हसू आलं. ती संधी साधून सौ. परळकरांनी लेकीसाठी वॉटरप्रुफ मेकअपचे आणखी दोन किट पदरात पाडून घेतले आणि परळकर ऑफिसच्या तयारीला लागले.
.....................
 हातातली वॉटरप्रूफ बॅग सांभाळत उंची वॉटरप्रूफ सूटमध्ये पायातल्या उंची फॉर्मल शूजची प्युअर लेदर वल्ही वल्हवत परळकर बाहेर पडले, तेव्हा या सीझनमध्ये नेहमी त्यांना पडणारा यक्षप्रश्न आजही त्यांना पडला. आपली स्पीडबोट काढावी की न काढावी? आज सीझनचा पहिला दिवस, म्हणजे सगळीकडे ट्रफिक चोकअप झालं असणार. इथे लोकांना आखीव रस्त्यातून शिस्तीने गाडय़ा चालवता येत नाहीत. पूर्ण मोकळय़ा पाण्यात तर यांच्या बेशिस्तीला बहर येतो. त्यांच्या डोळय़ासमोर वॉटरस्कूटर दामटणारा अनीशच चमकला. त्यात त्यांचं ऑफिस मंत्रालयाच्या परिसरात. आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. म्हणजे विरोधकांनी दंगा करून बंद पाडण्याआधीच्या तीन मिनिटांच्या कामकाजात हजेरी लावण्यासाठी निघालेल्या मंत्र्यांच्या बोटी, यॉट आणि कॅटमरॉनना जाऊ देण्यासाठी ट्रफिक थांबवलं जाणार. त्यात काही गब्बर मंत्र्यांचे सीप्लेनचे ताफे उतरणार. नकोच ती कटकट. असा विचार करून त्यांनी चावी खिशात टाकली, तोंडावर मास्क ओढला आणि पाण्यात सूर मारला.
......................................
स्टेशनच्या वरच्या दरवाजात झालेल्या गर्दीतून आत शिरताना परळकरांच्या मनात सारखा विचार येत होता, यापेक्षा आपण स्पीडबोटच काढायला हवी होती का? स्पीडबोट ही परळकरांसारख्या उच्च मध्यमवर्गीयांनाच परवडू शकत होती. गोरगरीब, कष्टकर्यांसाठी आणि मध्यमवर्गासाठी वॉटरलोकलचाच पर्याय होता. अमेरिकेने पोसलेल्या वर्ल्ड बँकेने दिलेल्या कर्जातून जपानी तंत्रज्ञानाच्या वॉटरट्रेन नेहमीच्याच रुळांवरून धावत होत्या आणि स्वस्तातले चायना मेड वॉटरप्रूफ कपडे घालून आणि ऑक्सिजन मास्क लावून गोरगरीब पाण्याखाली राहात होते, पाण्याखालून प्रवास करत होते. परळकर एरवीच्या दिवसांमध्ये कधी या लोकलकडे फिरकायचे नाहीत. पण, फर्स्टक्लासचा त्यांचा वार्षिक पास वर्षातून या सीझनमध्ये आठदहा दिवस कारणी लागायचा. सुदैवाने बर्याच लोकांनी पुराच्या पहिल्या दिवशी दांडी मारलेली असल्यामुळे परळकरांना ट्रेनमध्ये व्यवस्थित बसायला जागा मिळाली. या सीझनचा एक फायदा होता. तोंडावर मास्क असल्यामुळे प्रवाशांची मोठय़ा आवाजातली सततची च्यावच्याव, ख्याख्याखुखु आणि भजनं बंद होती. शिवाय, गुटखा, मावा, पान खाऊन थुंकणार्यांच्या तोंडांनाही तात्पुरता लगाम बसला होता. पण, आता पिचकार्या मारण्याची सुविधा असलेले मास्क बाजारात येणार, अशी चर्चा होती. तसं झालं तर आपल्याला इकडे फिरकायलाच नको, परळकरांनी मनोमन निर्धार केला आणि विंडो सीट मिळाल्याचा आनंद तिच्या कडेवर डोकं टेकवून डोळे मिटत साजरा केला.
..................................
पुढे परळकर त्यांच्या वॉटरप्रुफ ऑफिसात गेले, त्यांनी अंडरवॉटर मीटिंग घेतली, वॉटरप्रुफ कागदांवर सहय़ा केल्या.
अनीश आणि आराध्या अंडरवॉटर कॉलेजात शिकायला गेले. दोन लेक्चर झाल्यानंतर अनीश अजून पाण्याच्या वर असलेल्या स्काय मल्टिप्लेक्समध्ये मैत्रिणीबरोबर सिनेमा पाहायला गेला. कोरडय़ा मल्टिप्लेक्समध्ये त्याला चौपट दराने तिकीट घ्यावं लागलं, पण आरामदायक आयुष्याची किंमत मोजावीच लागते, असं तो स्वतःशीच सुस्कारा सोडत म्हणाला. दोन लेक्चरनंतर आराध्याही बंक मारून कॉलेज कँटिनमध्ये हॉट ड्रिंकचे सिप मारत सगळय़ा मैत्रिणींबरोबर एखादय़ा गरम हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत आखत होती.  
सौ. परळकर दुपारी मार्केटला गेल्या. तिथल्या गर्दीत नेमकं त्यांच्या पायाचं वल्हं तुटलं, पण नाक्यावरच्या चांभाराने लगेच टाके मारून दिले. ``साहेबांना सांगून नवी घेऊन टाका की वल्ही, बाटामध्ये नवीन स्टॉक आलाय. किती दिवस तीच वल्ही टाके मारून वापरताय. तुमच्या स्टेटसला शोभत नाही,'' हा टोमणा मारायला जावडेकर काकू नेमक्या तेव्हाच हजर झाल्या. काटकसरीचं महत्त्व या सरकारी ऑफिसरांच्या बायकांना कोण सांगणार? त्यासाठी घाम गाळून पैसा कमावावा लागतो, असा विचार सौ. परळकरांच्या मनात आला, पण तो त्यांनी मनातच दाबला.
......................................
संध्याकाळी सगळं कुटुंब अर्ध्या पाण्यात बुडालेल्या टीव्हीपुढे बसलं होतं. सगळय़ांच्या डोळय़ावर पाण्यातलं चित्र आणि पाण्याबाहेरचं चित्र यांचा समन्वय साधून एकाच प्रकारचं चित्र दाखवणारे गॉगल होते. टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. चकचकीत वॉटरप्रुफ पोषाखातले एक नेते महोदय भाषण देत होते, ``मित्रहो, सतराव्या स्वातंत्र्यलढय़ाची वेळ आता आलेली आहे. किती काळ आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहणार आहोत. आता आपण मुक्त व्हायला हवं. मोकळा श्वास घ्यायला हवा...'' नेमकी त्याचवेळी पाण्याची लाट उसळल्यामुळे त्यांना पटकन मास्कमध्ये तोंड घालून मोकळा श्वास घ्यायला थांबावं लागलं, तेव्हा सगळय़ांच्याच चेहर्यावर हसू फुललं.
``बाबा, सध्या यांच्या पार्टीचा जोर आहे. आमच्या कॉलेजमध्येही जोरदार निदर्शनं झालीत,'' अनीश म्हणाला.
``म्हणजे हे खरोखरच ब्रिटिशांना घालवतील की काय?'' सौ. परळकर चिंतेत पडल्या.
``छय़ा! ही फक्त खंडणीसाठीची आंदोलनं. दुसरं यांना काय जमलंय,'' श्री. परळकर त्वेषाने म्हणाले.
त्यांचंही बरोबरच होतं. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराच्या व्यवस्थापनाचा संपूर्ण बोजवारा उडून 80 वर्षांपूर्वी जेव्हा निम्मं शहर पाण्याखाली जायला लागलं, तेव्हा या शहराचा खरोखरचा अभ्यास करण्यात आला. या शहरात ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात तयार केलेल्या यंत्रणाच तेवढय़ा कार्यक्षम आहेत आणि स्वातंत्र्योत्तर काळात या शहराचे तीनतेरा वाजलेले आहेत, हे सर्वज्ञात कटुसत्य तेव्हा सर्वांनाच मान्य करावं लागलं आणि शहराच्या व्यवस्थापनाकरता ब्रिटिशांना सन्मानाने पाचारण करण्यात आलं. ते आले, त्यानंतरच या शहराच्या अंडरवॉटर आणि वॉटरप्रुफ यंत्रणा मार्गी लागल्या आणि शहर जिवंत राहिलं, त्यातल्या सगळय़ा यंत्रणा सुविहित झाल्या. 999 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय लीझने या शहराचा ताबा घेतलेले ब्रिटिश कधीही इथून हलणार नाहीत, त्यांच्याप्रमाणे कारभार करण्याची आपली पात्रता नाही, हे पक्कं ठाऊक झालेले शहरवासीच आता ओरिजिनल `साहेबा'ला जाऊ देणार नाहीत. भावुक आधारासाठी पोसलेले हे फुटकळ साहेब किरकोळ गर्जना करत राहिले तरी मांडवळी होतच राहणार, पाण्याखाली बुडालेलं हे शहर ऑक्सिजन मास्कच्या आडून का होईना, श्वास घेतच राहणार, हे त्यांना माहिती होतं...
... आता 50 फूट पाण्याखाली बुडालेल्या मुंबई महापालिकेच्या टॉवरवर फडफडणारा ब्रिटिशांचा युनियन जॅक सलतो कधीकधी मनात... पण त्याला काही इलाज नाही.

Tuesday, July 29, 2014

मौजे रिकामटेकडे समाचार

1.  भारतात फुटबॉलवर बंदीची मागणी
हा खेळ संस्कृतीविरोधी असल्याची टीका
फुटबॉल हा खेळ भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्यामुळे त्याच्यावर सरकारने ताबडतोब बंदी घालावी आणि फुटबॉल वर्ल्ड कपचे थेट प्रसारण रोखावे, अशी मागणी मौजे रिकामटेकडे येथील संस्कृतीरक्षक परिवारातर्फे करण्यात येत आहे. भारतात फुटबॉल खेळायला, पाहायला, विकायलाच नव्हे, तर हा शब्द उच्चारायलाही बंदी करण्यात यावी अशी मागणी परिवाराचे प्रमुख स्वामी आचरटानंद यांनी केली आहे.
भारतीय संस्कृती ही कोणालाही पाय लागला तर नमस्कार करण्याची आहे, फुटबॉलच्या खेळामध्ये एवढे खेळाडू मिळून त्या एवढय़ाशा बॉलला दीड तास लाथा घालत असतात. ते जमले नाही, तर एकमेकांनाही लाथा घालत असतात. हा हीन पाश्चिमात्य संस्कृतीतून उद्भवलेला राक्षसी स्वरूपाचा खेळ पाहत लहानाची मोठी होणारी मुले भविष्यात आपल्या आईबापांना लाथा घातल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा स्वामीजींनी दिला आहे. ते म्हणाले, आजकालची मुले चुकून कोणाला पाय लागल्यानंतर नमस्कार न करता नुसतेच `सॉरी' म्हणतात, हा या उर्मट खेळाच्या प्रसाराचाच परिणाम आहे. संस्कृतीरक्षकांनी समाजाच्या व्यापक आध्यात्मिक आणि आत्मिक विकासासाठी समाजाला शिस्त लावण्याचा थोडासाही प्रयत्न केला, तरी लगेच धाव घेणारे समाजवादी विचारवंत, फेसबुकी विचारवंत, काँग्रेसी किडे, पुरोगामी पाखंडी आणि मानवी हक्कांचा पुळका आलेले लोक या हिंत्र खेळाचा प्रसार होत असताना तोंडात मूग धरून का बसलेले आहेत, असा जळजळीत सवालही स्वामी आचरटानंद यांनी केला.
दरम्यान, फुटबॉलच्या लोकप्रियतेमुळे तमाम भारतीयांच्या आवडत्या क्रिकेटकडे कोणी ढुंकूनही पाहात नसल्यामुळे मौजे रिकामटेकडे क्रिकेट नियामक मंडळानेच स्वामीजींना फूस दिली असून ते अकारण या खेळावर दुगाण्या झाडत आहेत, अशी प्रतिक्रिया एका फुटबॉलप्रेमीने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली आहे. स्वामीजी आणि त्यांचे चेले फुटबॉलचा कितीही द्वेष करत असले तरी आपल्या विरोधकांना लाथाडण्यात त्यांनाही आनंदच मिळतो, त्यामुळे आपला फुटबॉल होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेत असल्याचे तो म्हणाला.
.................................
2.  बघ्यांमुळेच वाढते देशाचे आत्मिक सामर्थ्य
एखादी हिंसक घटना घडत असताना त्यात हस्तक्षेप न करता केवळ बघ्याची भूमिका घेणार्यांवर होणारी टीका अनाठायी आणि अन्याय्य आहे. अशा बघ्यांमुळेच देशाचे आत्मिक सामर्थ्य वाढते, असे स्पष्ट प्रतिपादन केवल बघे यांनी आज येथे केले. मौजे रिकामटेकडे येथील एका महिला बस कंडक्टरचा विनयभंग होत असताना त्यात हस्तक्षेप न करता निव्वळ मजा बघत उभे राहिलेल्या बघ्यांचा सत्कार आज येथील रविवारवाडय़ावर करण्यात आला. तेव्हा बघ्यांच्या वतीने प्रातिनिधिक भावना व्यक्त करताना श्री. केवल बघे यांनी हे उद्गार काढले.
ते म्हणाले, ``एक माणूस आपल्यासमोर एका बाईला लाथाबुक्क्यांनी मारतो आहे, तिचे कपडे फाडतो आहे, तिला शिवीगाळ करतो आहे, हे रोजरोज दिसणारे दृश्य नाही. एरवी असे दृश्य पाहण्यासाठी पदरमोड करून सिनेमागृहांमध्ये जावे लागते. असे दृश्य दिसत असताना मनात कितीही राग, त्वेष उसळून आला तरी तो काबूत ठेवून केवळ ते दृश्य पाहात राहणे हे सोपे काम नाही. त्यासाठी उच्च कोटीची आध्यात्मिक साधना लागते, आत्मसंयमन लागते. आपला देश आणि आपली संस्कृती आध्यात्मिकदृष्टय़ा इतकी उन्नत असल्यामुळेच या देशात असे श्रेष्ठ दर्जाचे बघे निर्माण होतात, असे श्री. बघे म्हणाले तेव्हा सभागृहाने नुसते बघत न राहता टाळय़ांचा कडकडाट केला. त्या महिला कंडक्टरला मारहाण होत असताना नुसते बघत उभे राहिलेले लोक षंढ होते, या टीकेला उत्तर देताना श्री. बघे म्हणाले की अशी टीका केवळ तथाकथित पुरोगामी विचारांचे खूळ डोक्यात भरलेले अर्धवट लोकच करू शकतात. त्या महिलेच्या अंगावर हात उचलणार्या माणसाचा उन्माद केवळ पाहात बसलेल्या 40 प्रवाशांनी जर ठरवले असते, तर त्या गुंडाचा क्षणात चट्टामट्टा झाला असता. पण, सगळे प्रवासी शांत बघत उभे राहिले, कारण, त्यांच्या हस्तक्षेपाने ती महिला दुबळी झाली असती. भविष्यात तिच्यावर हल्ला, विनयभंग किंवा बलात्कारासारखा प्रसंग ओढवल्यास तिने काय दरवेळी मदतीचा धावा करायचा का, तिच्या मदतीला कोणी येण्यासारखी परिस्थिती नसेल, तर तिला अत्याचार सहन करावा लागेलच. तिच्यातच या अत्याचाराचा प्रतिकार करण्याची क्षमता येण्यासाठी बाकीच्यांनी मध्ये न पडणेच इष्ट होते, असे ठामपणे सांगून श्री. बघे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी समाजात जास्तीत जास्त संख्येने असे बघे निर्माण होणे आवश्यक आहे.
बाकीचे सर्व प्रवासी आपल्या संस्कृतीला अनुसरून मारहाण पाहात असताना पलीकडून जाणार्या बसच्या चालकाने आणि वाहकाने ती बस चालवण्याचे आपले कर्तव्य सोडून या मारहाणीत मध्ये पडून हस्तक्षेप केला आणि त्या महिला कंडक्टरची सक्षमीकरणाची संधी हिरावून घेतली, त्याबद्दल त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करणारा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. बसमधील त्या नाटय़मय प्रसंगाच्या- `तिकीट' काढून आलेल्या- प्रेक्षकांचा रसभंग केल्याबद्दल त्या चालक-वाहकांना निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी मौजे रिकामटेकडे नागरिक महासंघातर्फे एमआरटी महामंडळाकडे करण्यात आली आहे.
............................................
शाळाशाळांमध्ये लवकरच दिले जाणार
पुस्तके फाडण्याचे प्रशिक्षण
वेगवेगळय़ा पुस्तकांवर वेगवेगळय़ा स्वरूपाच्या बंदी येत असताना आणि खुद्द न्यायालयही पुस्तकांच्या प्रती फाडून नष्ट करून देण्याचे आदेश देत असताना काळाची गरज ओळखून सर्व शाळांमध्ये पुस्तके शात्रशुद्ध पद्धतीने कशी फाडावीत, याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे मत शालेय शिक्षण मंत्री अज्ञानराव अंगठेबहाद्दर यांनी मौजे रिकामटेकडे येथे व्यक्त केले आणि यंदापासून हा अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यात असल्याची घोषणाही त्यांनी केली. यापुढे पहिलीपासून सर्व शाळांमध्ये ग्रंथनिर्मूलनाचा तास सुरू होत असून त्यात पुस्तके फाडून त्यांची होळी कशी करायची, याचे प्रशिक्षण दिले जाईल.
आजच्या आपल्या समाजाचे सर्व नुकसान पुस्तकांमुळे झाले आहे, असे स्पष्ट मत श्री. अंगठेबहाद्दर यांनी येथील मंबाजी बटॅलियनतर्फे आयोजित पुस्तकहोळी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. ते म्हणाले, आपल्या पूर्वजांनी भूर्जपत्रे, दगड वगैरेंवर लिहून ठेवलेला मजकूर आपल्याला पुरेसा असताना नव्याने मजकूर लिहिण्याची काय गरज आहे, हेच मला कळत नाही. आपल्या गुहेत राहणार्या, वल्कले नेसणार्या, पूर्वजांच्यापेक्षा तुम्ही शहाणे आहात का, असा सवाल त्यांनी केला तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी `नाही, नाही' असे म्हणून माना डोलावून त्यांच्या म्हणण्याला रुकार दिला. कोणीतरी उठतो आणि ऐतिहासिक कादंबरी लिहितो, कोणी उठतो आणि आमच्या पवित्र धर्मग्रंथांवर टीका करणारी विश्लेषक पुस्तके लिहितो आणि आपल्याच पूर्वजांना वेडय़ात काढतो, हे खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी टाळय़ांच्या गजरात सांगितले. पूर्वीच्या काळी पुस्तक लिहिण्याचा, वाचण्याचा अधिकारच मर्यादित होता. पाठांतर हेच ज्ञान होते. ब्रिटिशांच्या राजवटीत कोणीही उठून पुस्तक लिहू लागल्यामुळेच आज आपला समाज रसातळाला गेला आहे. ही सर्व पुस्तके पृथ्वीतलावरून नष्ट केल्याखेरीज बटॅलियन स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.
देशात व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जे खुळे चाळे सुरू झाले आहेत, ते थांबवण्यासाठीच सरकारने आता प्रभावी दगडफेक, घेराव घालून शाई फासणे, झटपट मोडतोड, असे नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यात न्यायालयाच्या पुढाकाराने नव्या अभ्यासक्रमाची भर पडली आहे. त्याने समाजातील पुस्तकरूपी विषवल्ली नष्ट होण्यास मदत होईल, असे श्री. अंगठेबहाद्दर यांनी सांगितले आहे. शक्यतोवर कोणी तशीच निकड असल्याखेरीज पुस्तके छापू नयेत आणि छापल्यास ती फाडायला सोप्या अशा पातळ कागदाची, विसविशीत बांधणीची असावीत, असे निर्देश सर्व प्रकाशकांना देण्यात आले असून पुस्तकछपाईसाठी खास ज्वालाग्राही शाईच वापरण्यात यावी, असेही बंधन घालण्यात आलेले आहे. एखादय़ा प्रकाशकाचे पुस्तक सहजगत्या फाटत किंवा पेटत नसल्याची तक्रार आल्यास आणि तिच्यात सक्षम प्राधिकार्याने केलेल्या चौकशीअंती तथ्य आढळल्यास त्या प्रकाशकाच्या व्यवसायावर बंदी आणण्यात येईल आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागेल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 

अच्छे दिन-बुरे दिन

रात्रीच्या अंधारात `बुरे दिन' अंगावर कांबळ ओढून बाहेर पडले, तरी त्यांच्या डोळय़ांना रस्त्यातल्या गाडय़ांचासुद्धा प्रकाश सहन होत नव्हता... त्यांच्या डोळय़ांना प्रकाशाची सवयच राहिली नव्हती... हे साहजिकच होतं म्हणा! कारण, `बुरे दिन' बरेच दिवस अंधारात दडून बसले होते...
...ही वेळ आपल्यावर येणार याची त्यांना कल्पना होती... पण, माणसांप्रमाणेच दिवसांनाही वेडी आशा असतेच. त्यांनाही असं वाटलं होतं की पप्पूची लॉटरी लागेल आणि आपलं राज्य निर्वेध सुरू राहील. पण, पप्पू फेल झाला आणि `बुरे दिन'चे `बुरे दिन' सुरू झाले... एरवीही लोकांना त्यांच्याविषयी प्रेम नव्हतंच, नफरत होती. खरंतर वाईट दिवस माणसाला आयुष्यभर उपयोगी पडतील, असे धडे शिकवतात. पण, तरीही त्यांना कोणी प्रेमाने जवळ करत नाही किंवा आग्रहाने बोलावून घरीही आणत नाही. रस्त्यात कधी बाहेर पडायची वेळ आली तरी `बुरे दिन'ला तोंड लपवून फिरायला लागायचं. सगळीकडे त्यांच्या नावाने लोक कडकडा बोटं मोडताना दिसायचे. नाही नाही ते शिव्याशाप ऐकून `बुरे दिन'चा जीव तळतळायचा. पण, बोलायची सोय नव्हती. तरीही देशात आपला बोलबाला आहे, लोक आपल्याला घाबरतात, देशभर आपलंच राज्य पसरलंय, हे ऐकू यायला लागल्यानंतर `बुरे दिन'ची छाती अभिमानाने भरून बिरून आली होती. हा सगळा परिणाम आपल्या पक्षात, पक्षाबाहेर, देशात, जगात इतर कोणालाही न मोजणार्या नम्मोजी कोतवालांच्या भाषणांचा होता. आधी `बुरे दिन'चा जीव हरखला आणि जसजशी निवडणूक जवळ आली तसतसा त्यांना आपल्याविरुद्ध लागलेला सापळा लक्षात आला. हे नम्मोजी कोतवाल आपला उदोउदो करतायत ते आपल्याला हुसकवायला आणि आपली जागा `अच्छे दिन' घेणार आहेत, हे कळल्यानंतर ते पिसाळलेच. पण, आता संतापून काही उपयोग नव्हता. नम्मोजी कोतवालाने निवडणूक खिशात घातली होती आणि देश आपल्या कुर्त्यावर गुलाबाच्या फुलासारखा टाचून घेतला होता.
निकाल लागल्यापासून आपलाही निकाल लागला हे लक्षात आल्यामुळे `बुरे दिन'नी स्वतःला दारं-खिडक्या बंद करून पुरतं कोंडूनच घेतलं होतं. आता कोतवालाचे महाराज बनलेल्या नम्मोजींची फौज कधी कुठून कशी घुसेल आणि आपल्याला हुसकावून बाहेर काढेल, या विचाराने त्यांची झोप उडाली होती. जी काही झोप लागायची, तिच्यातही आपल्याला एन्रॉन प्रकल्पाप्रमाणे समुद्रात बुडवून टाकलं आहे, असा भास त्यांना व्हायचा आणि दचकून जाग यायची. नंतर एन्रॉन प्रकल्पाचं तुकारामाच्या गाथेप्रमाणे तरला, त्याचाच दिलासा त्यांच्या मनाला वाटायचा. दाराबाहेर जरा खुट्ट झालं, जरा पावलं वाजली, जरा आवाज झाला, जरा चाहूल लागली तरी `बुरे दिन'चं हृदय थाडथाड उडायला लागायचं. अंगाचं पाणीपाणी व्हायचं. झाली, आपल्या हकालपट्टीची वेळ झाली, असं वाटून त्यांचं अवसानच गळायचं.
बरेच दिवस अशा भीतीच्या सावटाखाली दिवसरात्र कणाकणाने जळत-झिजत काढल्यानंतर अखेरीस आज त्यांनी `शेंडी तुटो वा पारंबी' असा निर्धार केला आणि रात्र होताच मनाचा हिय्या करून बाहेर पडण्याचा निर्धार केला...
...नजर थोडी प्रकाशाला सरावल्यानंतर `बुरे दिन'च्या मनातली भीती थोडी ओसरू लागली. आपल्याला पाहताक्षणी लोक आपल्यावर चाल करून येतील आणि आपली क्षणात चटणी होईल, असं `बुरे दिन'ना वाटलं होतं. किमान आपल्या पाळतीवर असलेले सरकारी लोक तरी पुढे येऊन आपल्याला ताब्यात घेतील आणि जाळीच्या व्हॅनमधून आपली रवानगी होईल, असंही त्यांना वाटलं होतं. त्यातलं काहीच होत नव्हतं. लोकांचं `बुरे दिन'कडे लक्षच नव्हतं म्हणा किंवा त्यांच्या अस्तित्त्वाचं काही विशेष वाटलं नाही म्हणा; पण संपूर्ण रस्त्यात त्यांना कोणीही हटकलं नाही. नम्मोजी महाराजांच्या महालाच्या दारातले शिपाई तरी आपल्याला अटकाव करतीलच आणि मग आपण त्यांचं कडं तोडून जिवाच्या कराराने आत शिरू आणि नम्मोजींच्या पायावर लोळण घेऊ, असं एक कल्पनाचित्र त्यांनी रंगवलं होतं. पण, तसंही काही झालं नाही. उलट आपलं नाव सांगितल्यानंतर नम्मोजींच्या दारातल्या गर्दीतून त्यांना प्राधान्याने आत सोडलं गेलं. एक सचिव महोदय तर `नम्मोजी केव्हापासून आपली वाट पाहात आहेत' असंही म्हटल्याचं त्यांच्या कानांवर पडलं, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला.
खरंच होतं ते! आत नम्मोजी हसर्या चेहर्याने स्वागताला सज्ज होते. तोंडभर हसून `केम छो' म्हणत त्यांनी `बुरे दिन'चं स्वागत केलं आणि तोंडात सुरती खमणचा घास भरवला तेव्हा `बुरे दिन' चक्रावूनच गेले. मग त्यांच्या मनात विचार आला, हा बनिया माणूस. कोण कधी गिर्हाईक म्हणून समोर येईल याचा भरवसा नसल्याने उगाच कोणाशीही वाईटपणा कशाला घेईल. आपली गच्छंती करतानाही प्रेमानेच केली जाणार. ठीकाय. लाथ खाऊन जाण्यापेक्षा हे बरं!
``बोलो, काय काम काढलंत?''
``निरोप घ्यायला आलो होतो... म्हटलं आता तुम्ही आलाच आहात, तर आमची जाण्याची वेळ झालेली आहे. अपमानित होऊन जावं लागण्यापेक्षा स्वेच्छेने निघालेलं बरं...''
``अरे, शुं वात करू छू? एम कोन बोला?''
``म्हणजे काय? अहो, तुम्हीच तर तुमच्या सगळय़ा प्रचारात जिथे तिथे सांगितलं होतं की अच्छे दिन आने वाले है, अच्छे दिन आने वाले है... आता अच्छे दिन येणारच असतील, तर आम्हाला जावंच लागेल ना?''
हा हा हा हा! मोठा विनोद झाल्यासारखे नम्मोजी महाराज हसायला लागलेले पाहून `बुरे दिन'चं पित्त आणखीनच खवळलं. कसाबसा संताप आवरून ते म्हणाले, ``महाराज, एक प्रश्न विचारू? तुम्हाला आपल्या देशाचा फार अभिमान आहे. तुमच्या पक्षाला तर आपल्या देशात कधीच नव्हत्या अशाही अभिमानास्पद गोष्टी दिसतात आणि ज्यांची लाज वाटायला पाहिजे अशा गोष्टींचाही गर्व वाटतो. तुम्हाला देशाची फॉरेनर बहू चालत नाही, पण देशात तेवढेच फॉरेनर अच्छे दिन आणण्याची गोष्ट करता... गेल्या कित्येक शतकांमध्ये या देशाने हे अच्छे दिन कधी पाहिलेलेच नाहीत. ते आपल्यासाठी इटालियन बहूपेक्षा जास्त परके आहेत. त्यांना तुम्ही घेऊन येणार आणि स्वदेशी बुरे दिन घालवणार... आम्ही या मातीत जन्मलो, वाढलो, हा देश त्याच मातीत घालण्यासाठी राबलो आणि तुम्ही आम्हाला आमच्या कष्टांचं हे इनाम देणार?'' आता `बुरे दिन'ना शोकसंतप्त हुंदका फुटला.
``अरे, रो मत रो मत. हा रूमाल घ्या. डोळे पुसा. नाक शिंकरू नका. आ पंडित नेहरूना रूमाल नथी फ्रान्समध्ये धुवायला जायला. हा माझ्याकडचा एकमेव ऐतिहासिक रूमाल आहे, जो मी निवडून आल्यावर ठिकठिकाणी भावविवश भाषणं करताना डोळे पुसायला वापरला होता. हं... आता मी काय सांगतो ते ऐका. वात सुनो मारी. ही अच्छे दिनची आयडिया पण मन्नूजी महाराजांची आहे!''
``काय सांगता काय!''
``म्हणजे काय? तेच एका भाषणात म्हणाले होते की जगातली परिस्थिती खराब आहे म्हणून भारताची हालत खराब आहे. आता काही दिवसांनी दुनियेची हालत सुधारेल ने बिजा भारताची पण हालत आपोआप सुधारेल. अच्छे दिन आनेवाले है. आता एवढा मोठा इकनॉमिस्ट माणूस खोटा बोलेल काय?''
``म्हणजे तुम्ही त्यांची लाइन उचललीत?''
``अरे एमां शु बडी बात छे? आम्ही त्यांचे दीडशेपेक्षा जास्त उमेदवार उचलले, त्यांची फॉरेन पॉलिसी, इकनॉमिक पॉलिसी उचलली, एक लाइनने काय फरक पडतो?''
``काय फरक पडतो? अहो, तिकडे देशाची हालत सुधारो ना सुधारो. आमची हालत खराब झाली ना! आम्ही आता गाशा गुंडाळून जायचं कुठे, सांगा जायचं कुठे?''
``कुठेच नाही.''
आता संपूर्णपणे चाट पडून `बुरे दिन' म्हणाले, ``अहो, तुमचं धोरण तरी नेमकं काय आहे? अच्छे दिन येणार असतील, तर आम्हाला जावंच लागेल. गंमत कसली करताय?''
नम्मोजी हात हवेत भिरकावत म्हणाले, ``अरे पण मी अच्छे दिन आणू कुठून?''
`बुरे दिन' आता कोसळायचेच बाकी राहिले होते. नम्मोजी म्हणाले, ``पावसाचा पत्ता नाही. जगातली आर्थिक स्थिती बाराच्या भावात गेलेली आहे. इराकमध्ये गेंधळ चाललाय. तेलाचे भाव वाढतायत. तिजोरीत खडखडाट आहे. अर्थव्यवस्थेला चालना देणारं काहीच हातात नाही आणि चांगले दिवस येतील कसे? सगळय़ा जगाशी आता आपण जोडलेले आहोत. सगळं जग खस्ता खात असताना आपल्याला मेवा कुठून खायला मिळणार? लोकांनी समजून घेतलं पाहिजे. देशासाठी त्याग करायला शिकलं पाहिजे.''
``अहो, पण मन्नूजी महाराजांच्या सरकारच्या काळातही हीच परिस्थिती होती. तेव्हा तुम्ही रजनीकांत बनून भलभलती स्वप्नं दाखवत होतात...''
``अरे, पण तो तर सिनेमाच होता... इंडियानी सबसे बडी फिल्म... सौ करोड, दो सौ करोड की नहीं, दो हजार करोड की फिल्म... अब फिल्म तो सुपरहिट हो गयी... पिक्चर देखने के बाद कोई बोलेगा स्टोरीलाइन वीक है, ये नहीं है, वो नहीं है, तो क्या फर्क पडता है... पिक्चर तो सुपरहिट है...''
आता `बुरे दिन'च्या जिवात जीव आला. त्यांनी सावधपणे विचारलं, ``म्हणजे आम्ही कुठे जाण्याची गरज नाहीये. घाबरून जगण्याचीही गरज नाहीये.''
``अजिबात नाही. खुलेआम घूमो. तुम्हाराही राज है.''
``आणि वाटेत अच्छे दिन भेटले तर?''
``कुठून भेटतील? ते इथे आलेत कुठे? त्यांना काय वेड लागलंय काय इतक्या भंपक देशात यायला?''
``अरे बापरे, मग तुम्ही लोकांना काय सांगणार?''
नम्मोजींनी टाळी वाजवली. एक सेवक एक तबक घेऊन हजर झाला. तबकावरचं नक्षीदार कापड दूर करत नम्मोजी म्हणाले, ``कोणाला काही सांगायची गरज काय? अंगातले ते काळे, कुरूप, हिंत्र कपडे काढून टाका आणि हा नवा सुंदर रंगबिरंगी ड्रेस परिधान करा.''
``म्हणजे?''
``म्हणजे काय? या देशात दिवस बदलण्याची गरज नसते. राजवट बदलली तरी लोकांना काही काळ धुंदी चढते आणि त्या धुंदीत त्यांना काहीही सांगितलं तरी पटतं. आता नव्या कपडय़ांमध्ये तुम्हीच लोकांसमोर जायचं आणि आम्ही सांगणार, अच्छे दिन आ गये है...''
``पण, महाराज, सगळे लोक काही मूर्ख नसतात. एखादा तरी शहाणा असेलच. आम्हाला ओळखेलच. तेव्हा काय कराल?''
``सोप्पं आहे,'' डोळे मिचकावत नम्मोजी महाराज म्हणाले, ``तेव्हा आम्ही सांगणार की हा आधीच्या सरकारचा वारसा आहे. काँग्रेसने 65 वर्षांत जी वाट लावली, ती आम्ही लगेच कशी दुरुस्त करणार. अजून 65 वर्षं अच्छे दिन आले नाहीत, तरी हरकत नाही!''
यावर `बुरे दिन'नी नम्मोजींच्या हातावर कडकडीत टाळी दिली आणि ताठ मानेने, गर्वोन्नत माथ्याने ते महालाबाहेर पडले...