Sunday, September 21, 2014

उत्सवरूपी उच्छादांच्या भयकारी देशा...

किचनमध्ये कामात असताना हवेने अवचित कॅलेंडर फडफडलं, तशी फडतरे काकूंना नवा महिना सुरू झाल्याची आठवण झाली आणि त्यांनी लगेच काम हातावेगळं करण्यासाठी कॅलेंडरचा महिना बदलून टाकला... महिन्याच्या शेवटाकडे लक्ष गेल्यानंतर त्यांचा चेहरा एकदम पालटला आणि त्यांनी कातर आवाजात फडतरे काकांना हाक मारली... काकांनीही लाल अक्षरातली ती तारीख पाहिली. `अरे बापरे, एक वर्ष झालंसुद्धा' असा मनाशी विचार करून त्यांनी फोन फिरवायला घेतला... आता मंदारला फोन करण्याशिवाय काही तरणोपाय नव्हता...
****
फोन संपला, तेव्हा मंदारचाही चेहरा गंभीर झाला होता. त्याने गणित करून पाहिलं. आधीच या महिन्याचं बजेट टाइट होतं. या महिन्यात असाही खर्च वाढणार होता. त्यात आता हे काका-काकू दहा दिवसांसाठी येणार. अर्थात त्यांची अडचणही समजून घ्यायलाच हवी होती. एकेकाळी या निपुत्रिक काकांनी या सगळय़ा भावंडांसाठी खूप काही केलं होतं. आता म्हातार्या वयात या वयात दर वर्षी एकेका पुतण्याच्या दारात दहा दिवस जाऊन पडणं आलेलं होतं. त्यांच्या वार्षिक फेरीतून केदार मात्र वाचला होता...
****
या दिवसांत केदारला स्वतःलाच पळता भुई थोडी व्हायची. त्यात काकांना कुठून सांभाळलं असतं त्याने? या दिवसांत सगळं ऑफिस त्याच्यावर खुश असायचं. सगळय़ांना सुटय़ा हव्या असायच्या आणि त्यांचं काम करायला केदार एका पायावर तयार असायचा. ऑफिसात रात्री उशिरात उशिरापर्यंत बसून तो पहाटे घरी पोहोचायचा. थोडी झोप काढून दुपारपर्यंत पुन्हा कामावर हजर व्हायचा. त्याच्यापुढेही दुसरा मार्ग नव्हता, नाहीतर त्याचा भिंगारदिवे झाला असता...
****
भिंगारदिवेला लोकांनी सांगितलं होतं, पण त्याने ऐकलं नाही. तो आपल्या घरातच थांबला. हे माझं घर आहे, ते मी सोडून जाणार नाही म्हणाला. शेवटी व्हायचा तो परिणाम झालाच आणि एक दिवस तो अत्यवस्थ स्थितीत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलातून तीन महिन्यांनी बाहेर पडला, तो आयुष्यभर भोगावे लागणारे काही परिणाम सोबत घेऊनच...
****
``सो, दीज आर दी केस स्टडीज फ्रॉम टार्गेट एरिया! व्हॉट डु यू मेक आउट ऑफ देम! कळतंय का तुम्हाला काही? हे सगळं कशामुळे झालं असेल, या सगळय़ा गोष्टींमध्ये काय कॉमन आहे?'' चीनच्या शिक्सियापाँग भागातल्या `महाराष्ट्र विजय केंद्रा'चे संचालक पेंग ली अस्खलित मराठीत (म्हणजे मराठी माणसांप्रमाणेच अनावश्यक इंग्रजी शब्द पेरत) बोलत होते. हे केंद्र अस्तित्त्वात असल्याची महाराष्ट्रात कोणालाही कल्पना नाही. हा सगळा भाग चीनच्या पोलादी पडदय़ाच्या आत आहे. इथे 16 एकरांवर प्रशस्त भारत विजय केंद्र आहे. त्यातली एक इमारत महाराष्ट्र विजय केंद्राची. आजकालच्या काळात देश जिंकण्यासाठी लढाया करण्यात काहीच पॉइंट नसतो, हे चीनला कळून चुकलेलं आहे. आजकाल एखादय़ा देशाची बाजारपेठ काबूत आणली की सगळय़ा आर्थिक नाडय़ा हातात येतात आणि मग त्या हव्या तशा पिरगळता येतात, हे लक्षात घेऊन या प्रांतभरात विश्व विजय जिल्हाच वसवण्यात आलेला आहे. तिथे एकेका देशाच्या नावाचा एकेक परिसर आहे. त्यात चिनी माणसं त्या त्या देशाची भाषा बोलतात, त्या त्या प्रांतातल्या चालीरिती आत्मसात करतात. त्या त्या देशातल्या गरजांप्रमाणे कोणती उत्पादनं अतिशय स्वस्त दरात तिथल्या बाजारात उतरवायची आणि स्थानिक उत्पादकांचं कंबरडं कसं मोडायचं, याच्या धोरणांची आखणी तिथे चालते. त्या त्या इमारतीत त्या प्रांताचीच भाषा बोलायची, असा नियम आहे. तर पेंग ली यांनी प्रश्न विचारला की या संभाषणातून काय अर्थबोध झाला?
त्यांच्या सहकार्यांचे चेहरे प्रश्नार्थकच राहिले.
मग पेंग म्हणाले, ``महाराष्ट्रात आता सणासुदीचा माहौल आहे. हे सगळं वर्णन दहीहंडी, गणेशोत्सव, गरबा या सणांना लागू होणारं आहे, हे तुमच्यापैकी एकाच्याही लक्षात आलं नाही. महाराष्ट्राविषयी इतकी कमी माहिती असायला तुम्ही काय मराठी माणूस आहात की काय? असो. फडतरे काकांच्या गल्लीत एक राजा बसतो. आता हे एका गणपतीचं नाव आहे, हे मला वेगळं सांगायला लावू नका.'' पेंग ली यांनी हे बोलता बोलता रिमोटचं बटन दाबलं. समोरच्या पडदय़ावर फडतरे काकांचं घर दिसायला लागलं. एका चाळीतल्या त्यांच्या खोलीच्या समोरचा रस्ता क्षणार्धात फास्ट मोशनमध्ये चालणार्या चलतचित्रात एका मंडपाने व्यापला, तिथून मैलोन्मैलांचे कठडे उभारले गेले. फडतरे काकांसह तीन चाळींमध्ये उजेड तर सोडाच, साधी हवाही येणार नाही, अशी अवस्था मंडपामुळे झाली. सगळीकडे कार्यकर्त्यांचा आणि पोलिसांचा बंदोबस्त लागला. फडतरे काकांना स्वतःच्या इमारतीत शिरण्यासाठी सात प्रकारचे पुरावे सोबत ठेवण्याची पाळी आली. तरी त्यांची परिस्थिती बरीच बरी होती. पलीकडच्या चाळीतल्या लोकांना तर घाईची लागण्याचीही सोय नव्हती दहा दिवस. त्यांना टमरेलाबरोबर सात पुरावे घेऊन जावं लागत होतं स्वच्छतागृहात. म्हणूनच काका कधी या पुतण्याच्या तर कधी त्या पुतण्याच्या घरी दहा दिवस राहायला जात होते. त्यांच्या बिल्डिंगमधल्या ज्यांना मुलंबाळं होती आणि त्यांचे अभ्यास-परीक्षा होत्या, त्यांना तर ही सोयही नव्हती.
पुढच्या दृश्यांमध्ये मंदारचं घर दिसायला लागलं. हा फडतरे काकांचा त्यांचा पुतण्या परधर्मीय वस्तीत राहात होता. तिथे त्यांचे स्वतंत्र उत्सव चालत होते, पण हे दहा दिवस शांतता असायची. त्यामुळे त्याचं घर या अशा गावोगावच्या उत्सवपीडित नातेवाईकांची धर्मशाळाच होऊन बसायचं या दहा दिवसांत. तोही बिचारा सगळय़ांचं सगळं हौसेने नाही, तरी निगुतीने करायचा. या महिन्यात खर्चासाठी त्याला 12 महिने सेव्हिंग करायला लागायचं. काही काळानंतर इथेच एखादी जागा घेऊन मोठी धर्मशाळा बांधली, तर बर्याच लोकांची सोय होईल, असं त्याला वाटायला लागलं होतं...
पुढच्या क्लिपमध्ये दिसणारा, मंदारचा भाऊ केदार या तापातून वाचला होता. कारण, या दिवसांत त्याच्याकडे जाणं हे आगीतून फुफाटय़ात जाण्यासारखं होतं. तो अतिशय धार्मिक लोकांच्या वस्तीत राहात होता. भारतात जेवढं पाप अधिक तेवढं धर्माचरण कडक, असा प्रघात आहे. दिवसभर व्यापाराच्या नावाखाली लोकांच्या मुंडय़ा मुरगळायच्या आणि मग भजनं गाऊन, देवाच्या नावाने कोकलून, देवाला सोन्यानाण्याची लाच देऊन त्याला आपल्या पापात भागीदार करून घ्यायचं, असा या धर्मपरायण मंडळींचा खाक्या. त्यामुळे या उत्सवपर्वात तिथे भजनी मंडळांना उत्साह चढायचा. त्यांच्या घराघरातली भजनंही लोकांना तारस्वरात लाउडस्पीकरवरून दिवसभर ऐकवली जायची. रात्री वेगवेगळय़ा देवांचे जागरण गोंधळ होतेच. शिवाय गणेशोत्सवात त्याच्या दारातही मंडप होताच. हे 17 मुलांनी मिळून बनवलेलं बालमित्र मंडळ होतं. पण, 170 कुटुंबांच्या वस्तीला वेठीला धरण्याची ताकद त्याच्यात होती. तिथे रात्रभर देवापुढे `ये दुनिया पित्तल दी', `एक बॉटल व्होडका', `आता माझी सटकली' वगैरे जनप्रबोधनपर गाण्यांचा धुमाकूळ चालत होता. त्याच्यापासून सुटका हवी म्हणून केदार या काळात ऑफिसातच जास्तीत जास्त वेळ थांबायचा. कधी कधी तर तिथल्याच बाथरूममध्ये फ्रेश होऊन, कँटीनमध्ये नाश्ता करून कपडे बदलून सकाळी परत कामावर रुजू व्हायचा.
आपला भिंगारदिवे होऊ नये, असं केदारलाच नाही, तर त्यांच्या ऑफिसातल्या प्रत्येकाला वाटत होतं. त्याची कहाणी पुढच्या दृश्यात होती. भिंगारदिवेला ब्लड प्रेशरचा त्रास होता. शिवाय अतिशय भडकू स्वभाव. सणासुदीचा काळ आला की त्याच्या रसवंतीला बहार यायची. तोही नेमका उत्सवप्रिय वस्तीतच राहात होता. त्यामुळे त्याला हा सगळा ताप व्हायचा आणि तो त्याला त्याच्या स्वभावामुळे दुप्पट त्रास दय़ायचा. तो दिवसरात्र त्या सगळय़ा धर्मपरायण मंडळींचे वाभाडे काढायचा आणि स्वतःचं रक्त उकळवून घ्यायचा. केदारने त्याला आपल्याप्रमाणेच सुटकेचा मार्ग काढण्याची सूचना केली. पण, त्याच्या स्वभावानुसार त्याने ती फेटाळून लावली. शेवटी एक दिवस असा तणतणत असतानाच कोसळला, बीपी वाढल्यामुळे त्याला ऍडमिट केलं, त्या हॉस्पिटलबाहेरून गणेशविसर्जनाची मिरवणूक जात होती. रात्रभर हॉस्पिटलच्या दारं-खिडक्यांची तावदानं थरथरत राहतील, इतका भयंकर आवाज होत राहिला आणि भिंगारदिवेचा आजार तिपटीने वाढला. तीन महिन्यांनी तो घरी आला तेव्हा स्ट्रोकमुळे उजवा हात आणि पाय कामातून गेले होते...
स्क्रीनवरचं चित्र मालवून पेंग ली म्हणाले, ``आता सांगा, तुम्हाला हे पाहून काय वाटतं?''
``वाईट वाटतं सर'', डेंग म्हणाला.
झियाओ पिंग विषारी हसत म्हणाला, ``लेका, या सगळय़ाचं महाराष्ट्रातल्या लोकांना कौतुक वाटतंय. त्यांना आपल्या कोवळय़ा मुलांनी हातपाय तोडून घ्यायला दहीहंडीवर चढण्यात मोठा पराक्रम वाटतोय. कान फोडणार्या स्पीकरच्या भिंती उभारल्याने संस्कृती जपली जाते, असं त्यांना वाटतंय. तू कशाला वाईट वाटून घेतोयस उगाच.''
चांग ली म्हणाली, ``सर, मला याच्यात बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिसते आहे.''
सांग लीने तिला मध्येच अडवलं आणि ती म्हणाली, ``सर, पण आपण तर तिकडचं सगळंच मार्केट कॅप्चर केलंय. गणपतीच्या मूर्तीही आपल्याकडून आधी पेणला आणि मग महाराष्ट्रभर जातात. आपली दुर्वांची आणि कमळांची शेतीच तिकडची गरज भागवते आहे. स्वीट मोमो म्हणजे मोदकांचे कारखानेही जोरात आहेत. गरब्याच्या दांडियांपासून वाढीव मागणी असलेल्या गर्भनिरोधकांपर्यंत सगळं आपणच पुरवतो. गेल्याच वर्षी आपण रंगीत दही लावलेल्या नक्षीदार हंडय़ाही पाठवायला सुरुवात केलेली आहे. आता या मार्केटचं पूर्ण सॅच्युरेशन झालेलं आहे. आता आपण तिथे काय विकणार?''
``तेच तर मी सांगते आहे,'' चांग ली सांगू लागली, ``सर, आता दिवस कमी राहिले आहेत. आपण आपल्या सगळय़ा कारखान्यांमध्ये संपूर्णपणे वेगळी उत्पादनं बनवायला हवी आहेत.''
पेंग ली यांच्या चेहर्यावर हसू फुलत होतं. चांग ली ही नावाप्रमाणेच त्यांची चांगली शिष्या होती. तिने त्यांच्या प्रेझेंटेशनचा गाभा बरोब्बर ओळखला होता. चांग ली भराभर आपल्या कम्प्यूटरच्या साहय़ाने चित्रं-आरेखनं स्क्रीनवर दाखवत बोलू लागली, ``सगळय़ात जास्त मागणी असेल ती या स्पेशल मटिरियलच्या बोळय़ांना. हे कानात घातले की आवाज निम्म्याने कमी होईल. सर्वसामान्य माणसांसाठी साधे कापसाचेच बोळे थोडय़ा रंगीत शोशाइनगिरीसकट विकता येतील. पण, उच्चभ्रू ग्राहकांसाठी कानात न दिसणारे किंवा एकदम स्टायलिश बोळे बनवायला लागतील. त्यांच्यातून हाय डेसिबल आवाज फिल्टर होतील आणि लो डेसिबल आवाज ऐकू येतील. म्हणजे माणसांचे रोजचे व्यवहार चालू राहतील. फडतरे काकांसाठी हे आयडेन्टिफिकेशन गॅजेट. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे स्कॅनर असतील. काकांच्या गळय़ात राजाचं लॉकेट घालायचं. त्या लॉकेटमध्येच काकांचं आयडेंटिफिकेशन असेल. काकांना ठिकठिकाणी पुरावे दाखवत बसायला लागणार नाही आणि राजाचा प्रचार होईल तो वेगळा. मंडपांमुळे, फलकांमुळे ज्यांच्या घरात प्रकाश आणि हवाच खेळत नाही, त्यांच्यासाठी हे ऑक्सिजन सिलिंडर आणि सनलँप्स उपयोगी ठरतील. केदारच्या घरात आपण ही विंडो विकू शकतो. नॉइजलेस विंडो. काचेच्या या खिडकीची रचना अशा प्रकारची आहे की तिच्या अगदी बारीक-नॅनो जाळीतून हवा आत येते, पण आवाज गाळून. त्याच्या खिडकीवर स्पीकर लावला तरी तो आत शांतपणे घोरत पडू शकेल, अशी खिडकी. ज्यांना इतकी महागडी विंडो परवडणार नाही, त्यांना आपण कस्टमाइझ्ड भिंत विकू. म्हणजे दहा दिवस थोडी गैरसोय सहन करायची. ही स्वस्तातली साउंडप्रूफ भिंतच आपल्या खिडक्यांमध्ये बसवून टाकायची. इथेही सिलिंडर आणि सन लँप खपतील. इतकं करूनही भिंगारदिवेंसारख्या माणसांना त्रास होणारच. त्यांच्यासाठी आपण वेगवेगळी चिनी औषधं बाजारात टाकू. गेंडय़ाच्या कातडीचं, वाघाच्या नखांचं, मुंगीच्या केसांचं औषध. बुद्धीला बधिरता आणणारं औषध दिलं की माणूस काहीही सहन करायला तयार होतो. त्यातही कुणाला त्रास झाला, तर आपण वेगवेगळय़ा मेडिक्लेम योजना फ्लोट करूयात. फक्त उत्सवकाळासाठी. एकदा प्रिमियम भरायचा आणि चार महिने चिंतामुक्त बनायचं.''
``वाह, वाह,'' सगळय़ांनी टाळय़ा वाजवून या कल्पनेचं स्वागत केलं. टांग लीने आणखी एक सूचना केली, तो म्हणाला, ``सर, या राज्यात असे बरेच उत्सवपीडित असतील. त्या सगळय़ांना आपण या काळात स्वस्तात एखादय़ा शांत जागी नेण्याची आयडिया काढली तर?''
``कल्पना चांगली आहे तुझी,'' पेंग ली म्हणाले, ``पण, या राज्यातल्या एकंदर उत्सवपीडितांची संख्या पाहिली, तर त्यांना सामावण्यासाठी आपल्याला चीनमध्ये एक वेगळं राज्यच वसवायला लागेल. तेही एकवेळ करता येईल, पण, हे लोक एकदा जथ्याने एकत्र आले की इथेही उत्सव सुरू करतील आणि आपली उत्पादनं आपल्यालाच वापरायची वेळ येईल!''

No comments:

Post a Comment