Sunday, September 21, 2014

मौजे रिकामटेकडे समाचार-3

1.  
गोवा नव्हे, `गोसेवा' म्हणा!- दुर्दिन ढवळीकर
गोवा या राज्याचे मूळ नाव `गोसेवा' असेच होते, काळाच्या ओघात स्थानिक हिंदूंचा `से' कमी झाल्यामुळे राज्याच्या नावातला `से'ही गळून पडल्यामुळे त्याचे नामकरण `गोवा' असे झाले, असा दावा तेथील राज्य इतिहास मोडतोड मंडळाचे अध्यक्ष व आमदार दुर्दिन ढवळीकर यांनी नुकताच येथे केला आणि गोव्याचे नाव बदलून `गोसेवा' असे करावे, अशी मागणीही त्यांनी केली. मौजे रिकामटेकडे इतिहास फिरवाफिरव परिषदेच्या अधिवेशनात ते बोलत होते.
`इतिहासाचे सोयीस्कर पुनर्लेखन ः सनातन धर्माची गरज' या विषयावरील व्याख्यान गुंफताना दुर्दिन ढवळीकर म्हणाले की माझ्या या विधानाला माझ्या आडनावाचाच सणसणीत पुरावा आहे. माझे समर्थक आमदार पवळीकर या आडनावाचे आहेत, हा योगायोग नाही. ढवळय़ा-पवळय़ाची जोडी असे मराठीत कोणत्या प्राण्याला म्हणतात, तो कोणत्या वंशाचा असतो, असा सवाल त्यांनी केला, तेव्हा उपस्थित मंडळींनी (कंपोझिटर, `प्राण्यांनी' असे लिहू नका आणि गोवंशात तर मुळीच शिरू नका, नाहीतर शिंगावर घेतले जाल) जोरदार माना डोलावल्या. प्राचीन काळात या भागात धष्टपुष्ट गोधन होते आणि गायी नारळाच्या झावळय़ांचा चारा खाऊन खूप उंचही झाल्या होत्या, याचे वर्णन करणारा दुर्मीळ ऐतिहासिक दस्तावेज आपल्याला एका उत्खननात फेणीच्या बाटलीत सापडला, तेव्हा स्थानिकांनी बाटलीतली फेणी यानेच संपवलेली दिसते, अशी आपली हुर्यो उडवली, असा हृदयद्रावक प्रसंग त्यांनी सांगितल्यानंतर `शेम शेम' असे उद्गार सभागृहात उमटले. आयोजकांनी सोटा उगारून `शेम' हा शब्दही विदेशी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर `लाज लाज' असे त्याचे स्वदेशी रूपांतर करण्यात आले. मात्र आपण संबंधितांना त्याच ठिकाणी लडखडत का होईना, पण ठामपणे उभे राहून, `शेणी' या शब्दापासूनच `फेणी' उगम पावली आहे, असे ठणकावून सांगितल्यानंतर त्यांची तोंडे गोमूत्र प्यायल्यासारखी झाली होती, असेही त्यांनी टाळय़ांच्या गजरात सांगितले.
गोव्यात निसर्गरम्य समुद्रकिनारा असल्यामुळे आणि पोर्तुगीज तेथे परदेशी संस्कृतीचा शिरकाव झाला. ती मोडून काढून आता आपली संस्कृती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व किनार्यांवर गंगेच्या धर्तीवर विस्तीर्ण घाट बांधावेत आणि तिथे रोज सागरपूजनाचे सोहळे आणि दीपोत्सव साजरे करावेत, म्हणजे तिथे आता सुरू असतात ते `दिवे लावण्याचे' उदय़ोग बंद पडतील, अशी सूचनाही त्यांनी केली. मलमूत्र-सांडपाणी, निर्माल्य विसर्जन आणि अन्य मार्गांनी आपण समुद्राचे पाणीही गंगेइतकेच पवित्र करून टाकू, त्याकरिता पाण्यात फेकण्यासाठी प्रसंगी देशाच्या इतर भागांतून कट्टर सनातनधर्मीयांचे मृतदेह मागवून घेऊ, असेही ते म्हणाले.
...................................
2.  
उत्सवकाळासाठी उच्छादवादी पक्षाकडून 
बोळय़ांचे आणि गोळय़ांचे वाटप
आगामी चार महिन्यांमध्ये मौजे रिकामटेकडेमधील काही नागरिक जे उत्सव साजरे करणार आहेत, त्यांचा उच्छाद सहन करण्याची शक्ती अन्य नागरिकांमध्ये यावी, यासाठी उच्छादवादी पक्षाचे धडाडीचे नेते आणि आधुनिक अधर्मभास्कर बंटी बोंबले यांच्यातर्फे नागरिकांना बोळय़ांचे आणि गोळय़ांचे वाटप करण्यात आले. उत्सवाच्या आवाजाने बहिरेपण येऊ नये, यासाठी बोळय़ांचे आणि ब्लड प्रेशर वाढून हृदयविकाराच्या झटक्याने प्राणोत्क्रमण होऊ नये, यासाठी गोळय़ांचे वाटप करण्यात येणार आहे.
अधर्मभास्कर बंटी यांच्या आशीर्वादाने बेकायदा बांधण्यात आलेल्या सातमजली इमारतरूपी झोपडय़ांच्या तकलादू भिंती उत्सवकाळात स्पीकर्सच्या भिंतींच्या दणदणाटाने कोसळून त्याखाली मरण पावणार्या नागरिकांपैकी दोघांची सोडत पद्धतीने नावे काढून त्यांना मरणोत्तर संस्कृतीभूषण पुरस्कार देण्यात येणार असून दहीहंडी फोडताना किंवा फटाक्यांनी भाजून, आगीत जळून मरण पावणार्यांपैकी दोघांची सोडत पद्धतीने निवड करून त्यांना संघर्षरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे जाणते राजे शरद चांदणे यांच्या कानात बोळे कोंबून आणि जागेपणी झोप आणणार्या गोळय़ा भरवून अभिनव पद्धतीने करण्यात आले. या बोळय़ांमुळे आणि गोळय़ांमुळे त्यांना उत्सवाच्या नावाने सुरू असलेला गिल्ला ऐकूच आला नाही आणि नागरिकांच्या तक्रारीही त्यांच्या कानावर पडल्याच नाहीत. त्यांचे मंदस्मित हा त्यांचा उत्सवी उच्छादाला रुकारच असल्याचे बंटी बोंबले यांनी जाहीर केले, तेव्हाही चांदणे मंद हसत (कंपोझिटर, हा शब्द गाळू नका) होते.
जंगली श्वापदे मानवी वस्तीच्या जवळ येऊ नयेत, म्हणून रोज रात्री दारू पिऊन नाच करण्याची आदिवासींची परंपरा होती. तीच आज उत्सवांच्या रूपाने आपण दिवसाही चालू ठेवली आहे, असे आधुनिक अधर्मभास्करांनी जाहीर केले, तेव्हा त्यांच्या उत्सवाच्या नशेत झिंगलेल्या समर्थकांनी एकच कल्ला करून त्यांना अनुमोदन दिले. जोपर्यंत या उत्सवांमुळे माझे हातपाय तुटत नाहीत आणि माझा जीव जात नाही, तोपर्यंत मी या उत्सवांची उच्छादी संस्कृती जतन करण्यासाठी संघर्ष करणारच, असेही ते म्हणाले. या सणांमुळे कान किटतात, अनेक विकार बळावतात, याकडे क्षीण आवाजात काही लोकांनी लक्ष वेधल्यानंतर त्यांनी विचारले की सर्वसामान्य नागरिकांची कान, डोळे, नाक, वगैरे सर्व इंद्रियांची शक्ती वाढवण्यासाठीच आम्ही जिवावर उदार होऊन हे उत्सव करतो आहोत. या देशातल्या बहुसंख्य नागरिकांना, बहुसंख्यांच्या धर्माच्याच पुढार्यांचे नाना प्रकारचे उदय़ोग सहन करण्याची शक्ती या बहुसंख्यांच्या उत्सवांच्या उच्छादातूनच मिळणार असल्यामुळे त्यांनी बोळे आणि गोळय़ा यांच्या साहय़ाने उत्सवाचा आनंद लुटायला शिकावे, नाहीतर फुटावे, असा दमही त्यांनी भरला.
........................................
3.  
पंतप्रधानांनी वाढीव कामाची घोषणा 
मागे न घेतल्यास उपोषणाचा इशारा
सरकारी कर्मचारी जेवढा वेळ काम करतील, त्यापेक्षा एक तास अधिक काम आपण करू, ही घोषणा पंतप्रधानांनी ताबडतोब मागे घ्यावी, नाहीतर आम्ही उपोषण करू असा इशारा दोन वेगवेगळय़ा संघटनांनी दिल्यामुळे मौजे रिकामटेकडेवासियांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यापैकी एक इशारा सरकारी कर्मचारी संघटनेने दिला आहे, तर दुसरा इशारा सर्वसामान्य नागरिक संघाने दिला आहे.
पंतप्रधानांनी असे सरसकट विधान केल्यामुळे सगळे सरकारी कर्मचारी कामाच्या तासांमध्ये (तरी) काम करतात, असा गैरसमज नागरिकांमध्ये पसरला असून ठिकठिकाणी नागरिक आणि सरकारी कर्मचारी यांच्यात त्यामुळे खटके उडत आहेत. आपल्या नोकरीमध्ये काम करण्याची अटच नसताना अचानक या विधानामुळे आपल्याकडून कामाची अपेक्षा निर्माण झाल्यामुळे मानसिक ताण आल्याची तक्रार अनेक कर्मचार्यांनी नोंदवली असून त्यांच्यापैकी अनेकांनी वैदय़कीय रजेवर जाणे पसंत केले आहे. नाश्त्याची वेळ, चहाची वेळ, जेवणाची वेळ, पाय मोकळे करण्याची वेळ, विडी-काडी-पानसेवनाची सुटी, सर्व सणावारांच्या सुटय़ा, संप वगैरे वजा जाता आजच सर्व कर्मचार्यांवर दैनंदिन साडे सतरा मिनिटांच्या कामाचा अतीव ताण असताना त्यांच्यावर आणखी बोजा लादणे अमानवी स्वरूपाचे आहे, असे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. या अन्याय्य अपेक्षेविरुद्ध उपोषण करणार असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी जाहीर केले आहे.
मात्र त्याचवेळी, पंतप्रधानांच्या आवाहनानुसार वाढीव काम सुरू केलेल्या सरकारी कर्मचार्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला ताप लक्षात घेता पंतप्रधानांनी हे आवाहन मागे घ्यावे आणि स्वतःही अधिक काम करू नये, असे आवाहन सर्वसामान्य नागरिक संघाने केले आहे. वाढीव काम करावे, या पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काही विशिष्ट `खात्या'च्या कर्मचार्यांनी त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवायला सुरुवात केली होती. भूसंपादनासारख्या कामात गुंतलेल्या अधिकार्यांनी दिवसरात्र राबून सातबाराच्या उतार्यांमध्ये फेरफार वगैरे दैनिक उपक्रमांच्या रात्रशाखाही सुरू केल्यामुळे आधीच पिडित असलेले नागरिक हैराण झाले आहेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी बारमध्ये बसून बारमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केल्यामुळे त्यांना मोफत सेवा पुरवून पुरवून बारमालक हैराण झाले आहेत आणि नागरिकांचे पेयपानावरचे लक्ष उडाले आहे, असे या संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. रस्त्यांवर जे खड्डे पडण्यासाठी सहा महिन्यांचा आणि दुरुस्तीसाठी सहा महिन्यांचा काळ लागत होता, तेच खड्डे आता दिवसरात्र काम सुरू झाल्यापासून तीन महिन्यांत पडतात आणि वर्षातून दोन वेळा त्यांच्या दुरुस्तीची पाळी येते आहे. अशा दुप्पट वेगाने सरकारी कामकाज सुरू राहिल्यास सरकारी खजिने पाच वर्षांच्या कार्यकाळाऐवजी अडीच वर्षांतच खाली होतील, असा इशारा अर्थतज्ञांनी दिला आहे, याकडेही संघाने लक्ष वेधले आहे.
हाच धोका लक्षात घेऊन आम्ही सरकारी कर्मचारी कमीत कमी काम करतील, अशी व्यवस्था केली होती. ती मोडून सरकारने काय साधले, अशी संतप्त विचारणा विरोधी पक्षाचे नेते पप्पू पोंबुर्पेकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment