घुर्रर्रर्रर्र...
घुर्रर्रर्रर्रर्र...
घुंईईईई...`घुंईईईई...
अतिशय संथपणे होत
असलेला आवाज हळुहळू जवळ येत गेला आणि शेवटी नाकाला गारेगार स्पर्श झाला, तेव्हा
परळकर साहेबांची झोपमोड झाली... शिंची कटकट म्हणून कूस बदलण्याचा प्रयत्न त्यांनी
केला, तेव्हा पलंग पाण्यात डुचमळल्याचा आवाज त्यांना आला आणि मग जागं व्हावंच
लागलं. त्यांनी उशाशी ठेवलेला रिमोट दाबून आधी कानाशी घरघरणारा पंखा बंद केला आणि
पाणी उपसण्याचा पंपही रिमोटने सुरू केला, तेव्हा त्यांच्या कॉटखालचं पाणी झपाटय़ाने
ओसरू लागलं आणि छतावरच्या पंख्याला चिकटलेला पलंग खाली येऊ लागला. पाच फुटांची गॅप
तयार झाल्यावर त्यांनी पंप थांबवला आणि यांत्रिक खुर्ची जवळ ओढली. त्या खुर्चीत
उभे राहून त्यांनी वल्हय़ांसारख्या पेडल्सनी खुर्चीला गती दिली आणि ते बाथरूममध्ये
निघाले. वाटेत किचनमध्ये सौं.नी तरंगत्या गॅसवर पोहे फोडणीला घातले होते. ``येणारच
होते मी, इतक्यात मोटर चालू झाल्याचा आवाज आला, तेव्हा कळलं तुम्ही जागे झाले
असणार. फ्रेश होऊन या, तोवर नाश्ता मांडते.''
पायाने वल्ही मारत
मारत सगळी आन्हिकं आटोपताना परळकर साहेबांच्या मनात आलं... यंदाच्या प्रमोशनला
स्वयंचलित वल्हय़ांची खुर्ची घेतलीच पाहिजे. उन्हाळय़ात ऑफ सीझन डिस्काऊंट मिळेल.
एकावर एक फ्री मिळाली तर बायकोलाही छान गिफ्ट होईल. आताशा दोघांचेही पाय किती
दुखतात. तरंगत्या डायनिंग टेबलाशेजारी आल्यावर त्यांनी वॉटरप्रुफ कागदावर
छापलेल्या पेपरांचा गठ्ठा उचलला. अपेक्षेप्रमाणे सगळीकडे त्यांच्यासारख्या
वॉटरप्रूफ घरांच्या, अंडरवॉटर जीवनावश्यक वस्तूंच्या जाहिरातींची रेलचेल होती.
त्यांचं घर 17व्या मजल्यावर होतं म्हणून त्यांना आजवर अंडरवॉटर वस्तूंची गरज फारशी
लागली नव्हती. पण, यापुढे सांगता येणं कठीण होतं. या ऑल सीझन घराचे हप्ते फिटत आले
की रिनोव्हेशनमध्ये सगळं घर अंडरवॉटरप्रुफ करून घ्यायला हवं, असं त्यांनी मनोमन
ठरवलं. तेव्हा धाडस केलं म्हणून हे घर झालं नाहीतर आताच्या रेटमध्ये हे घर परवडलं
नसतं त्यांना. त्यांच्या घराबरोबर पाण्याची एक स्वतंत्र टाकी होती. पावसात पूर
येऊन पाणी चढलं की सेन्सर्सच्या साहय़ाने आपोआप घराभोवती फिल्ट्रेशनच्या जाळय़ा चढत
आणि त्यांच्यातून आरओ सिस्टमने स्वच्छ झालेलं पाणीच घरात शिरत असे. घरातल्या सगळय़ा
वॉटरप्रुफ यंत्रणा कार्यान्वित होत आणि गरजेनुसार पंपाच्या साहय़ाने एकेका खोलीतलं
पाणी टाकीत चढवून त्या खोलीतल्या पाण्याची पातळी हवी तेवढी कमी-जास्त करता येत
असे. अशी घरं गरिबांनाही मिळावीत, अशा मागण्या आणि आश्वासनांचीच पेपरमध्येही
रेलचेल होती. पुनर्वसन योजनांमध्ये हलक्या दर्जाचे पंप आणि जाळय़ा पुरवल्यामुळे
झालेल्या हानीच्या बातम्या होत्या आणि दिलसे संघटनेने केलेल्या `कंत्राटदारांचे
ऑक्सिजन मास्क ओढा' या `फुस्स फटय़ॅक' आंदोलनालाही जोरदार प्रसिद्धी मिळाली होती.
``अहो ऐकलंत का?''
गरमागरम पोहे, सौंचा प्रेमळ स्वर म्हणजे चिरंजीवांची काहीतरी मागणी `थ्रू प्रॉपर
चॅनेल' पुढे आलेली दिसतेय, हा त्यांचा अंदाज खरा ठरवत सौ. म्हणाल्या, ``अनीशची
स्पीडबोट सारखीच बंद पडतेय म्हणतो. एक्स्चेंजमध्ये दिली तर होंडाची नवी चांगल्या
क्वालिटीची स्वस्तात येईल म्हणतोय.''
``बघू.'' परळकर
गुरगुरले, ``आहे कुठे तो?''
``वॉटर सायकलिंगला
गेलाय. आराध्या पोहायला गेलीये.''
आपल्या मुलीला
स्विमिंग टँकवर पोहायलाही पाण्यातून पोहतच जावं लागतं, या गंमतीने परळकरांना हसू
आलं. ती संधी साधून सौ. परळकरांनी लेकीसाठी वॉटरप्रुफ मेकअपचे आणखी दोन किट पदरात
पाडून घेतले आणि परळकर ऑफिसच्या तयारीला लागले.
.....................
हातातली
वॉटरप्रूफ बॅग सांभाळत उंची वॉटरप्रूफ सूटमध्ये पायातल्या उंची फॉर्मल शूजची
प्युअर लेदर वल्ही वल्हवत परळकर बाहेर पडले, तेव्हा या सीझनमध्ये नेहमी त्यांना
पडणारा यक्षप्रश्न आजही त्यांना पडला. आपली स्पीडबोट काढावी की न काढावी? आज
सीझनचा पहिला दिवस, म्हणजे सगळीकडे ट्रफिक चोकअप झालं असणार. इथे लोकांना आखीव
रस्त्यातून शिस्तीने गाडय़ा चालवता येत नाहीत. पूर्ण मोकळय़ा पाण्यात तर यांच्या
बेशिस्तीला बहर येतो. त्यांच्या डोळय़ासमोर वॉटरस्कूटर दामटणारा अनीशच चमकला. त्यात
त्यांचं ऑफिस मंत्रालयाच्या परिसरात. आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. म्हणजे
विरोधकांनी दंगा करून बंद पाडण्याआधीच्या तीन मिनिटांच्या कामकाजात हजेरी
लावण्यासाठी निघालेल्या मंत्र्यांच्या बोटी, यॉट आणि कॅटमरॉनना जाऊ देण्यासाठी
ट्रफिक थांबवलं जाणार. त्यात काही गब्बर मंत्र्यांचे सीप्लेनचे ताफे उतरणार. नकोच
ती कटकट. असा विचार करून त्यांनी चावी खिशात टाकली, तोंडावर मास्क ओढला आणि
पाण्यात सूर मारला.
......................................
स्टेशनच्या वरच्या
दरवाजात झालेल्या गर्दीतून आत शिरताना परळकरांच्या मनात सारखा विचार येत होता,
यापेक्षा आपण स्पीडबोटच काढायला हवी होती का? स्पीडबोट ही परळकरांसारख्या उच्च
मध्यमवर्गीयांनाच परवडू शकत होती. गोरगरीब, कष्टकर्यांसाठी आणि मध्यमवर्गासाठी
वॉटरलोकलचाच पर्याय होता. अमेरिकेने पोसलेल्या वर्ल्ड बँकेने दिलेल्या कर्जातून
जपानी तंत्रज्ञानाच्या वॉटरट्रेन नेहमीच्याच रुळांवरून धावत होत्या आणि स्वस्तातले
चायना मेड वॉटरप्रूफ कपडे घालून आणि ऑक्सिजन मास्क लावून गोरगरीब पाण्याखाली राहात
होते, पाण्याखालून प्रवास करत होते. परळकर एरवीच्या दिवसांमध्ये कधी या लोकलकडे
फिरकायचे नाहीत. पण, फर्स्टक्लासचा त्यांचा वार्षिक पास वर्षातून या सीझनमध्ये
आठदहा दिवस कारणी लागायचा. सुदैवाने बर्याच लोकांनी पुराच्या पहिल्या दिवशी दांडी
मारलेली असल्यामुळे परळकरांना ट्रेनमध्ये व्यवस्थित बसायला जागा मिळाली. या सीझनचा
एक फायदा होता. तोंडावर मास्क असल्यामुळे प्रवाशांची मोठय़ा आवाजातली सततची
च्यावच्याव, ख्याख्याखुखु आणि भजनं बंद होती. शिवाय, गुटखा, मावा, पान खाऊन
थुंकणार्यांच्या तोंडांनाही तात्पुरता लगाम बसला होता. पण, आता पिचकार्या
मारण्याची सुविधा असलेले मास्क बाजारात येणार, अशी चर्चा होती. तसं झालं तर
आपल्याला इकडे फिरकायलाच नको, परळकरांनी मनोमन निर्धार केला आणि विंडो सीट
मिळाल्याचा आनंद तिच्या कडेवर डोकं टेकवून डोळे मिटत साजरा केला.
..................................
पुढे परळकर त्यांच्या
वॉटरप्रुफ ऑफिसात गेले, त्यांनी अंडरवॉटर मीटिंग घेतली, वॉटरप्रुफ कागदांवर सहय़ा
केल्या.
अनीश आणि आराध्या
अंडरवॉटर कॉलेजात शिकायला गेले. दोन लेक्चर झाल्यानंतर अनीश अजून पाण्याच्या वर
असलेल्या स्काय मल्टिप्लेक्समध्ये मैत्रिणीबरोबर सिनेमा पाहायला गेला. कोरडय़ा
मल्टिप्लेक्समध्ये त्याला चौपट दराने तिकीट घ्यावं लागलं, पण आरामदायक आयुष्याची
किंमत मोजावीच लागते, असं तो स्वतःशीच सुस्कारा सोडत म्हणाला. दोन लेक्चरनंतर
आराध्याही बंक मारून कॉलेज कँटिनमध्ये हॉट ड्रिंकचे सिप मारत सगळय़ा मैत्रिणींबरोबर
एखादय़ा गरम हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत आखत होती.
सौ. परळकर दुपारी
मार्केटला गेल्या. तिथल्या गर्दीत नेमकं त्यांच्या पायाचं वल्हं तुटलं, पण
नाक्यावरच्या चांभाराने लगेच टाके मारून दिले. ``साहेबांना सांगून नवी घेऊन टाका
की वल्ही, बाटामध्ये नवीन स्टॉक आलाय. किती दिवस तीच वल्ही टाके मारून वापरताय.
तुमच्या स्टेटसला शोभत नाही,'' हा टोमणा मारायला जावडेकर काकू नेमक्या तेव्हाच हजर
झाल्या. काटकसरीचं महत्त्व या सरकारी ऑफिसरांच्या बायकांना कोण सांगणार? त्यासाठी
घाम गाळून पैसा कमावावा लागतो, असा विचार सौ. परळकरांच्या मनात आला, पण तो त्यांनी
मनातच दाबला.
......................................
संध्याकाळी सगळं
कुटुंब अर्ध्या पाण्यात बुडालेल्या टीव्हीपुढे बसलं होतं. सगळय़ांच्या डोळय़ावर
पाण्यातलं चित्र आणि पाण्याबाहेरचं चित्र यांचा समन्वय साधून एकाच प्रकारचं चित्र
दाखवणारे गॉगल होते. टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. चकचकीत वॉटरप्रुफ पोषाखातले एक
नेते महोदय भाषण देत होते, ``मित्रहो, सतराव्या स्वातंत्र्यलढय़ाची वेळ आता आलेली
आहे. किती काळ आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहणार आहोत. आता आपण मुक्त व्हायला
हवं. मोकळा श्वास घ्यायला हवा...'' नेमकी त्याचवेळी पाण्याची लाट उसळल्यामुळे
त्यांना पटकन मास्कमध्ये तोंड घालून मोकळा श्वास घ्यायला थांबावं लागलं, तेव्हा
सगळय़ांच्याच चेहर्यावर हसू फुललं.
``बाबा, सध्या यांच्या
पार्टीचा जोर आहे. आमच्या कॉलेजमध्येही जोरदार निदर्शनं झालीत,'' अनीश म्हणाला.
``म्हणजे हे खरोखरच
ब्रिटिशांना घालवतील की काय?'' सौ. परळकर चिंतेत पडल्या.
``छय़ा! ही फक्त
खंडणीसाठीची आंदोलनं. दुसरं यांना काय जमलंय,'' श्री. परळकर त्वेषाने म्हणाले.
त्यांचंही बरोबरच
होतं. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराच्या व्यवस्थापनाचा संपूर्ण बोजवारा
उडून 80 वर्षांपूर्वी जेव्हा निम्मं शहर पाण्याखाली जायला लागलं, तेव्हा या शहराचा
खरोखरचा अभ्यास करण्यात आला. या शहरात ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात तयार
केलेल्या यंत्रणाच तेवढय़ा कार्यक्षम आहेत आणि स्वातंत्र्योत्तर काळात या शहराचे
तीनतेरा वाजलेले आहेत, हे सर्वज्ञात कटुसत्य तेव्हा सर्वांनाच मान्य करावं लागलं
आणि शहराच्या व्यवस्थापनाकरता ब्रिटिशांना सन्मानाने पाचारण करण्यात आलं. ते आले,
त्यानंतरच या शहराच्या अंडरवॉटर आणि वॉटरप्रुफ यंत्रणा मार्गी लागल्या आणि शहर
जिवंत राहिलं, त्यातल्या सगळय़ा यंत्रणा सुविहित झाल्या. 999 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय
लीझने या शहराचा ताबा घेतलेले ब्रिटिश कधीही इथून हलणार नाहीत, त्यांच्याप्रमाणे
कारभार करण्याची आपली पात्रता नाही, हे पक्कं ठाऊक झालेले शहरवासीच आता ओरिजिनल
`साहेबा'ला जाऊ देणार नाहीत. भावुक आधारासाठी पोसलेले हे फुटकळ साहेब किरकोळ
गर्जना करत राहिले तरी मांडवळी होतच राहणार, पाण्याखाली बुडालेलं हे शहर ऑक्सिजन
मास्कच्या आडून का होईना, श्वास घेतच राहणार, हे त्यांना माहिती होतं...
... आता 50 फूट
पाण्याखाली बुडालेल्या मुंबई महापालिकेच्या टॉवरवर फडफडणारा ब्रिटिशांचा युनियन
जॅक सलतो कधीकधी मनात... पण त्याला काही इलाज नाही.
No comments:
Post a Comment