आम्ही कट्टर लोकशाहीवादी
आहोत...
लोकशाही ही आमच्या
नसांनसांत भिनलेली आहे... त्यामुळे आम्ही दर पाच वर्षांनी घनघोर निद्रेतून
महत्प्रयासाने जागे होतो... आसपास ढोलच तेवढय़ा मोठय़ा आवाजात वाजू लागलेले असतात,
हा एक योगायोग म्हणायचा- पण आम्ही जागे होतो आणि लोकशाहीच्या पंचवार्षिक उत्थानकार्याकडे
वळतो. एकदाचं बटण दाबून बोटावर शाई उमटली की आम्ही पुढची पाच वर्षं झोपायला मोकळे
होतो ना!
या शिरस्त्यानुसार
आम्ही जागे झालो आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कोण कोण कसे कसे झटतायत, हे
पाहण्याच्या आमच्या गुप्त कार्यक्रमाकडे वळलो. आम्हाला आणि आमच्या अज्ञ, भोळय़ा
वाचकांना सुज्ञपणे निवड करणं सोपं व्हावं, यासाठी आम्ही दर पाच वर्षांनी ही मोहीम
हाती घेतो आणि अत्यंत निरलस वृत्तीने, कोणाकडूनही छदाम न घेतल्याने (कोणी देत
नाही, हे कशाला सांगा) अत्यंत तटस्थ असा आमचा अहवाल जनतेपुढे सादर करतो. हा अहवाल
सँपल गोळा करून केलेला सर्व्हे नाही, खुद की आँखों से देखा हुआ हाल है, त्यामुळे
तो विश्वासार्ह मानायला हरकतच नाही, तर प्रत्यवायच नाही.
अट्टल दारुडय़ा माणसाला
परक्या गावात मुक्काम असला तरीही भल्या पहाटे आपल्या पसंतीची दारू देणारा गुत्ता
कसा बरोब्बर सापडतो, तसाच आम्हालाही महाराष्ट्रहिताच्या घडामोडी कुठे सुरू आहेत,
त्याचाही बरोब्बर माग लागतो. गुत्त्याची सवय कुठे कुठे कामी येते पाहा. यंदाही
आम्ही जागे होताच दीर्घ श्वास घेतला, तसा नाकात मेकअपच्या रंगांचा वास शिरला.
अरेच्चा! आपल्या नाकाने कसा आपल्याला दगा दिला? आपण काही `महाराष्ट्राचे कलाकार'
शोधण्याच्या मोहिमेवर निघालेलो नाही, मग हा गंध कुठून बरे आला आणि का आला, या
विचारांनी आम्ही बेचैन झालो. आमच्या नाकपुडय़ांमधून मेकअपचा वास हुसकावून लावला आणि
पुन्हा एकदा एकाग्रतेने छाती भरून वास घेतला, तर आता त्यात आय लायनर, लिपस्टिका
वगैरे कसले कसले वास शिरले आणि पोटात डुचमळलेच. अखेर आपल्या नाकांवर विश्वास ठेवून
आणि नासिकाग्रावर लक्ष ठेवून (भज्या नाकांच्या बाबतीत फार कठीण असतं ते) निघालो...
आमच्या नाकाने आम्हाला
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर किंवा पक्षकार्यालयांच्या बाहेर आणून उभं
करण्याच्या ऐवजी `महाराष्ट्र नाटक कंपनी'च्या दारात आणून उभं केलं, तेव्हा आम्ही
च्याटमच्याट (थँक यू ब्रिटिश नंदी!) पडलो. पण आलोच आहोत तर डोकावून जाऊ ही आमची
सवय (डोक्यावरची तीन टेंगळं, पाठीला आलेलं पोक, एक लंगडता पाय आणि अर्धी गायब
झालेली बत्तीशी हे याच सवयीचे देणे-असो!). आम्ही द्वारपालांना `साहबने अर्जंट
बुलाया है' असं सांगून घाईघाईने आत शिरलो. कुठ्ठेही शिरकाव करण्याची ही आमची पेटंट
आयडिया आहे. आत कोणी ना कोणी साहेब असतोच आणि तो सारखा कुणाला ना कुणाला बोलावत
असतोच. ही युक्ती लढवून आम्ही आत शिरलो आणि आमच्या लक्षात आलं की इथे तर आमचे
सगळेच साहेब मौजूद आहेत...
...खरंतर हे पहिल्या
फटक्यात आमच्या लक्षात आलं नव्हतं बरं का! डोक्यावरच्या कोंबडय़ातून एक बट कपाळावर
रेंगाळत असलेले राजशेखर आम्हाला समोरून येताना दिसले, तेव्हा आम्ही स्वतःला चिमटा
काढून पाहिला. राजशेखर दिसतायत म्हणजे आपण स्वर्गात तर पोहोचलो नाही ना, याची
खात्री करून घेण्यासाठी. `ओय ओय ओय' म्हणून आम्ही जोराने किंचाळलो, तेव्हा कोणीतरी
संवादांची प्रॅक्टिस करत असेल असं वाटून की काय, एकानेही आमच्याकडे पाहिलं नाही.
राजशेखर महोदय तोंड स्थिर ठेवून बोलण्याची प्रॅक्टिस करत होते, हे पाहिल्यावर
आमच्या लक्षात आलं की हे तर आपले परमपूज्य (कंपोझिटर, एकच शब्द लिहा, पूज्य वेगळे
काढू नका, अर्थ बदलतो) बाबाजी! मालिकेतले नव्हे हो, प्रत्यक्षातले. मा.मु. म्हणजे
माननीय मुख्यमंत्री. आमच्या शिवाजी पार्क भागातील दैवताने या बाबाजींना `मराठी
सिनेमातल्या व्हिलनसारखे दिसतात' असं म्हटल्यापासून आम्हाला ते समोर आले की `त्या
राजाभाऊला इंजीन पुसायला लावून, उद्धोबाला देशोधडीला लावून नाही कमळाबाईच्या
घरादारावरून नांगर फिरवला तर नावाचा बाबाजी नाही' असं काहीतरी त्यांच्या तोंडून
बाहेर पडेल असं वाटतं. पण, रस्सेदार मटणाच्या अपेक्षेने पातेल्यावरचं झाकण उचलावं
आणि आत भेंडीची नाहीतर कोबीची भाजी निघावी, असा अनुभव त्यांनी प्रत्यक्षात तोंड
उघडल्यावर मिळतो. तेच आदरणीय बाबाजी तोंडाला रंग लावून आपल्या चेहर्यावरचा `कुठून
आलो या झमेल्यात' हा पर्मनंट चिकटलेला भाव काढून टाकून आनंद, दुःख, आवेश वगैरे भाव
आणण्याचे प्रयत्न करतायत, हे पाहून आम्हाला धक्काच बसला.
पण, ही तर सुरुवात
होती. पुढच्या दालनात कुठेही धबाबा बोलणार्या वक्तृत्वकुशल आबाबांची भाषणांची
प्रॅक्टिस सुरू होती. आता या सद्गृहस्थाला खरंतर गप्प बसण्याची प्रॅक्टिस दय़ायला
हवी. भाषण तर ते कधीही, कशावरही देऊ शकतात. मग असं लक्षात आलं की मुंबईत राहून
आबाबांना इतर मराठी माणसांप्रमाणेच हिंदीत बोलण्याची आणि त्यातून घोळ निर्माण
करण्याची सवय लागलेली आहे. त्यांच्या भाषणात हिंदी शब्द येणार नाही, याची
प्रॅक्टिस त्यांना दिली जात होती. त्यांच्यापलीकडे आमचे आदरणीय दादा हे फक्त
कागदावर लिहिलेलंच वाचण्याची प्रॅक्टिस करत होते. उत्स्फूर्त बोलण्याचे फटके बसू
नयेत, यासाठी ही खबरदारी घेतली जात होती.
पुढच्या दालनातून
कसलाच आवाज येत नाही, यामुळे आम्ही च्याट पडलोच होतो- पण, आत साक्षात सिंधुदुर्ग
विराजमान असूनही आवाज येत नाही, हे पाहून आम्ही पुन्हा च्याटमच्याट पडलो (पुन्हा
थँक यू ब्रिटिश नंदी!). मग लक्षात आलं की त्यांना गप्प बसण्याची प्रॅक्टिस दिली
जातेय. फार कठीण परीक्षा होती हो! त्यांच्याकडेला चि. निलेश आणि चि. नितेश (या
दोहोंपैकी कोणता कोण, हे आम्हाला स्पष्ट झालं की तुम्हाला कळवू) बागडत होते आणि
त्यांच्या बाललीलांनी वैतागून जायचं नाही, चिडायचं नाही, त्यांना ओरडायचं नाही,
सतत मनमोहन सिंह मोडमध्येच राहायचं, अशी खडतर प्रॅक्टिस सुरू होती.
एका दालनात बरीच
रेटारेटी सुरू होती, त्याअर्थी ते मोदी पार्टीचं दालन असणार, हे आमच्या लक्षात
आलं. या पक्षाचं काहीतरी एक वेगळं नाव होतं असं ऐकिवात आहे खरं. पण आताशा ते नाव
कोणाच्या लक्षात नाही. लक्षात ठेवण्याचं काही कारणही नाही. कारण, नाव काहीही असलं
तरी ती आता मोदी पार्टीच आहे. तिथे आरसा एक आणि खुर्ची एक असताना एकावेळी पाचसात
लोक आरशासमोर उभे राहण्याची आणि खुर्चीत बसण्याची धडपड करत होतं. शिवाय या गडबडीत
मध्ये आपलाच नंबर लागेल या आशेने उभे असलेले वेगळे काही लोक होतेच दबा धरून
बसलेले. एक जाडगेले गृहस्थ आणि दुसरे जाडगेले होण्याच्या वाटेवर असलेले गृहस्थ
मिळून `अहो, वेगळा विदर्भ झाला की आम्ही कशाला येतोय तुमच्यात. मग दोन खुर्च्या,
दोन आरसे होतील, तोवर धीर धरा', म्हणून सांगत होती आणि आपणही तीच जागा पटकावण्याचा
प्रयत्न करीत होती.
या दालनाशेजारचं दालन
मित्रपक्षाचं होतं. तिथे आदय़ मेकअपपटू सर मेकअप करून दय़ायला बसले होते. त्यांना
फारसं काम नव्हतं. कारण, त्यांना स्वतःचा आणि उद्धोजीराजेंचा असा दोघांचाच मेकअप
करायचा होता. अधूनमधून आसपास बागडणारे आदित्यराजे बाबांच्या डोक्यावर
श्रावणक्वीनचा मुकुट ठेवून, `माझे पप्पा सीएम सीएम' असा खेळ खेळत होता.
तिसर्या दालनात
प्रिंटाच प्रिंटा पसरून हुसेनसाहेबांच्या श्वेतांबरा या प्रदर्शनाची आठवण येईल,
अशी मांडणी केलेली होती. हा काय प्रकार म्हणून आम्ही विचारात पडतो ना पडतो, तोच
आमच्या शिवाजी पार्कातील आदरस्थानाचा करडा स्वर ऐकू आला, `लाइट्स!' सगळीकडे निळा
प्रकाश पसरला आणि प्रिंटांच्या ब्लूप्रिंटा झाल्या तेव्हा आमच्या डोक्यात प्रकाश
पडला.
त्यानंतरच्या एका
दालनातून शीघ्रकवितेच्या `कौरवांचा गुरू द्रोण आहे, मला विचारतो कोण आहे, अरे
सत्तेची ऊब महत्वाची, विचारबिचार गौण आहे' अशा ओळी ऐकायला येत होत्या. तिथून
शीघ्रतेने पुढे येऊन बाहेर पडलो, तर या दाराशी एक दरवान कान कोरत बसलेला. त्याला
विचारलं, ``हे काय नाटक आहे?''
तोंडातला तंबाखू
बाजूला थुंकून तो म्हणाला, ``तुम्ही म्हणाला, तेच आहे. नाटक!''
आम्ही विचारलं, ``अरे
बाबा, इथे हे सगळे लोक मेकअपबिकअप करून प्रतिमानिर्मितीच्या उदय़ोगात मग्न आहेत.
महाराष्ट्राचं हित, सामान्य जनतेचे प्रश्न, राज्याचा विकास वगैरे गोष्टींचं काय?
ते कोण बघणार?''
पुन्हा एक भक्कम पिंक
टाकून तो म्हणाला, ``आतापर्यंत कोण बघत होतं? तुमचं तुम्हीच बघायचं. नाटक कंपनीत
फक्त खेळ पाहायला मिळतो. चला, पुढच्या दाराने तिकीट काढून या पुढच्या पाच
वर्षांचं.''
No comments:
Post a Comment