1.
अधिकृत बांधकामे
तोडण्याचे आश्वासन
महापौरांच्या हस्ते
महापालिका इमारतीवरील बेकायदा बांधकामाचे उद्घाटन
मौजे रिकामटेकडेमधील
छपरी-पिंपवड भागातील तुरळक अधिकृत बांधकामांमुळे अनधिकृत बांधकामांना आणि त्यांत
राहणार्या रहिवाशांना भोगावा लागणारा त्रास कायमचा बंद करण्यासाठी या भागातील
अधिकृत बांधकामे लवकरात लवकर तोडली जातील, असे आश्वासन महापौर दैनाबाई दगड यांनी
नुकतेच येथे दिले. महापालिकेच्या मुख्यालयावर बांधण्यात आलेल्या सातमजली बेकायदा
बांधकामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिले.
महापालिकेच्या खास
मर्जीतील कंत्राटदार गदळराव गोचीड यांनी रात्रंदिवस श्रमून अवघ्या साडे-सतरा
दिवसांत सात मजली इमारत, तीही महापालिकेच्या इमारतीच्या वर बांधलेली आहे, हा
विश्वविक्रमी चमत्कार आहे, अशा शब्दांत त्यांनी गोचीड यांचे कौतुक केले. मुळात दोन
मजल्यांची परवानगी असताना महापालिकेची मूळ इमारत आज 18 मजली झाली आहे. तिच्यावर
आणखी सात मजले वरच्या वर चढवून अविनय कायदेभंगाची ही महापालिकेनेच सुरू केलेली
चळवळ पुढे नेऊन महापालिकेच्या शिरावर गोचीड यांनी हा सरताज चढवला आहे, असे त्या
म्हणाल्या. ब्रिटिशकाळात बांधल्या गेलेल्या काही अधिकृत इमारतींमुळे बेकायदा
इमारतींवर आणि त्यांच्यात राहणार्या लक्षावधी नागरिकांच्या डोक्यावर अनिश्चिततेची
तलवार टांगलेली असते. या इमारतींना कायदय़ानुसार सुविधा पुरवण्याचा महापालिकेच्या
यंत्रणेवर ताण येतो. या सततच्या त्रासावर कायमचा उपाय
म्हणून शहरातील सर्व अधिकृत बांधकामे लवकरच पाडून टाकली जातील आणि त्यांच्यातील
नागरिकांचे, दंडात्मक रक्कम आकारून बेकायदा इमारतींमध्ये पुनर्वसन केले जाईल,
असेही त्यांनी टाळय़ांच्या गजरात सांगितले.
`कसेल त्याची जमीन' या
तत्त्वावर `जो जिथे उभारील ते बांधकाम' हेच नैसर्गिक न्यायाचे तत्त्व असताना
सरकारने उगाचच शहर नियोजनाच्या नावाखाली लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच
केलेला आहे, असे परखड मत यावेळी विरोधीपक्षनेते तात्याजीराव ताटलीमांजरे यांनी
व्यक्त केले. लोकांनी हवे तिथे हव्या तेवढय़ा आकाराचे बांधकाम उभारावे. महापालिका
त्यात हस्तक्षेप करणार नाही. उलट अशा बांधकामांना वीज-पाणी-रस्ते वगैरे सर्व
पायाभूत सोयी तातडीने पुरवल्या जातील, असे आश्वासन आयुक्त खा. के. गब्बर यांनी दिले.
अशा इमारतींना सर्व आवश्यक परवानग्या देण्यासाठी बेकायदा एकखिडकी ऑफिस दिवसरात्र
सुरू राहील आणि विशिष्ट रकमेचा विनापावती रोखीने भरणा करताच त्यांच्या इमारती
कायदेशीर करून दिल्या जातील, अशी व्यापक जनहिताची घोषणाही त्यांनी केली.
बेकायदा इमारती
बांधताना करावे लागणारे सोपस्कार कमी करणार्या या घोषणेचे स्वागत करून श्री. गोचीड
म्हणाले की बेकायदा इमारत बांधणे हे फार मोठे आव्हान असते. बांधकामखर्चाच्या
कित्येक पट रक्कम संबंधित यंत्रणेतील अधिकार्यांना खाऊ घालावे लागतात. त्यात
सुसूत्रता आणण्याबरोबरच विकासकांना प्रोत्साहन म्हणून सर्व प्रकारचे कर 99
वर्षांकरता माफ करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. आयुक्त आणि महापौरांनी ती
तात्काळ मान्य करून 15 टक्के कमिशनच्या बोलीवर सर्व बेकायदा बांधकाम करणार्या
बिल्डरांना मजल्यामागे एक लाख रुपयांचा सरसकट प्रोत्साहन भत्ताही जाहीर करण्यात आला
आहे.
.....................................................
2.
प्रख्यात फेसबुकी विचारवंत
भा. री. अब्जबुद्धे यांचे निधन
येथील प्रख्यात
फेसबुकी विचारवंत (कंपोझिटर, फेसबुकवरच्या सवयीने विचार`जंत' लिहू नका,
दोघांच्याही नोकर्या घालवाल) भा. री. अब्जबुद्धे यांचे नुकतेच येथे अतिविचाराच्या
ताणाने निधन झाले. त्यांचे फेसबुकवरील वय सात वर्षांचे होते.
फेसबुकवर पोस्ट टाकत
असतानाच त्यांच्या छातीत कळ आली. `छातीत विलक्षण कळ आली आहे, काय करू?' अशी
विचारणा त्यांनी पहाटे अडीच वाजता फेसबुकवरच केली होती. त्यावर `कविता करा'पासून
`इनो घ्या' इथपर्यंत अनेक सूचना आल्या. हा हृदयविकाराचा झटका असू शकतो, असे सांगून
सावध करणारी 173वी कॉमेंट पडेपर्यंत त्यांनी `मी बहुदा मेलो आहे' अशी शेवटची पोस्ट
टाकली. त्यांच्याकडून, एफबीवर ऑनलाइन असूनही पुढच्या 17 मिनिटांत एकही पोस्ट न
आल्यामुळे ही आशंका खरी निघाल्याचे त्यांच्या फेसबुक फ्रेंड्सच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांच्या, तेव्हा फेसबुकवर ऑनलाइन असलेल्या जवळच्या नातेवाईकांशी संपर्क
साधून त्यांना ही माहिती दिली गेली. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा तोडून उघडण्यात आला
तेव्हा अब्जबुद्धे हे हातात लॅपटॉप घेतलेल्या स्थितीत ऑनलाइन निवर्तल्याचे लक्षात
आले.
श्री. अब्जबुद्धे हे
पाणीखात्यात नळाला चावी देण्याच्या नोकरीतून दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते.
मात्र, नोकरीच्या काळात शब्दकोडय़ांची मराठी वर्तमानपत्रे प्रचंड प्रमाणात
वाचल्याने आणि वाचकांच्या पत्रात पत्रे लिहिल्याने त्यांच्या विद्वत्तेचा दबदबा
सर्वत्र पसरलेला होता. मराठीतल्या बहुतेक वर्तमानपत्रांचे अग्रलेख अनेक वर्षे
वाचलेले असल्यामुळे त्यांना सर्व विषयांमध्ये मत होते. `एखादय़ा विषयावर मला मत
आहे, म्हणजेच त्यात मला गती आहे,' असे ते ठामपणे सांगत आणि रॉकेट सायन्सपासून
भेंडीची भाजी उभी चिरावी की आडवी, इथपर्यंत कोणत्याही विषयावर मत व्यक्त करत.
निवृत्तीनंतर त्यांच्या ज्ञानाचे आणि विद्वत्तेचे भांडार जगाला खुले व्हावे (आणि
आपली ज्ञानसाधनेतून सुटका व्हावी) या हेतूने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना
लॅपटॉप भेट दिला होता. त्याच्या साहय़ाने ते फेसबुकवरून दिवसरात्र जगाला ज्ञानाचे
डोस पाजत असत.
`श्री. अब्जबुद्धे सर
यांच्या निधनाने फेसबुकवरील एक खंदा मार्गदर्शक हरवला आहे,' अशा शब्दांमध्ये
त्यांच्या मित्रयादीतील अनेकांनी त्यांना फेबुवरच आदरांजली वाहिली. आता
सातवाहनकालीन नाण्यांपासून बुद्धकालीन लेण्यांपर्यंत, युक्रेनच्या पेचप्रसंगापासून
पेरू देशातील एका गल्लीत प्रख्यात असलेल्या विचारवंताच्या व्यासंगापर्यंत, मौजे
रिकामटेकडेमधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येपासून विश्वामित्राच्या तपस्येपर्यंत
विविध विषयांवर अधिकारवाणीने दिलेले पोकळ मत जाणून घेण्यासाठी यापुढे फेसबुककरांना
`दैनिक रिकामकट्टा'च्या ऑनलाइन एडिशनवरील अग्रलेखांवरच विसंबून राहावे लागणार आहे,
अशीही खंत अनेक फेसबुककरांनी व्यक्त केली.
.........................................................
3.
मराठी संवादांच्या
अतिरेकामुळे
अभिनेत्री संतापून
सेटवरून बाहेर
एका मराठी चित्रपटातील
अवघड मराठी संवादांच्या अतिरेकामुळे संतापून आजची आघाडीची अभिनेत्री, बिकिनी गर्ल
जुई गोफणकर ही एका चित्रपटाच्या सेटवरून निघून गेल्याची चर्चा मौजे रिकामटेकडेच्या
फिल्म इंडस्ट्रीत आज दबक्या आवाजात सुरू होती. मराठी कलावंतांचा असा छळ सहन केला
जाणार नाही, तात्काळ सोप्या मराठीत किंवा हिंदीत संवाद बदलून दिले गेले नाही, तर
या चित्रपटाचे चित्रिकरण बंद पाडू, असा इशारा मांजरसेना आणि नवमांजरसेना या दोन्ही
स्थानिक पक्षांच्या चित्रपट शाखांनी दिला आहे.
मराठी फिल्म इंडस्ट्री
हिंदीची हुबेहूब नक्कल करून `लय भारी' `टाइमपास' करून `बालक-(बालबुद्धीचे) पालक'
यांचे भरघोस मनोरंजन करून यशोशिखरे काबीज करत असताना काही नतद्रष्ट मंडळी अजूनही
अस्सल मराठी सिनेमा काढण्याचा प्रयत्न करतात आणि मराठी सिनेमाच्या यशस्वी
घोडदौडीला गालबोट लावतात, असे स्पष्ट मत प्रख्यात लेखक-दिग्दर्शक-अभिनेते-गायक-प्रेक्षक-गॉडफादर-राजकीय
कार्यकर्ते आणि चित्रपट कलावंतांचे लाडके परदेश सहल आयोजक नरेश पिंजरेकर यांनी
व्यक्त केले. या चित्रपटात एकही पूर्ण हिंदी गाणे नाही, हिंदीच गाणे ऐकतो आहोत,
असे वाटायला लावणारे मराठी गाणे नाही आणि वर गाण्यांचे सगळे शब्द व्यवस्थित कळतात,
हे समजल्यानंतरच मला काहीतरी काळेबेरे असल्याची शंका आली होती. ती संवाद हातात
आल्यानंतर खरी ठरली,'' असे जुईने आमच्या प्रतिनिधीला फोनवर सांगितले. ती म्हणाली,
``पडदय़ावर इतकं मराठी बोलायची हौस असती, तर मी टीव्ही मालिका नसत्या का केल्या? शिवाय
बिकिनी घातलेल्या नटीच्या तोंडी इतके अवघड संवाद देणं हा प्रेक्षकांचाही रसभंग
आहे.''
जुईच्या वॉकआउटनंतर
हादरलेल्या निर्मात्याने दिग्दर्शकाला फैलावर घेऊन सगळे संवाद बदलण्याची सूचना
केल्याची बातमी आहे. निर्मात्याच्या फोर्थ स्टँडर्डमध्ये शिकणार्या मुलाला समोर
बसवून त्याला कळतील, असेच संवाद लिहायचे, अशी सक्त ताकीद संवादलेखकाला देण्यात
आलेली आहे. जुईच्या या धाडसी कृतीमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांना
भोगावा लागणारा मराठी बोलण्याचा त्रास कमी होणार असल्याने सर्व थरांतून तिचे
अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment