Friday, February 11, 2011

भागवत-पुराण

या फोटोमधला माणूस 55 वर्षाचा होता, हे नुकतंच कळलं.. त्याच्या निधनाच्या बातमीत. एरवी, असा डोक्यामागे शिंग लावून घेऊन खोडकर हसणारा मनुष्य पन्नाशी पार करून साठीच्या धारेला लागलेला असेल, यावर कुणी विश्वास ठेवला असता? तरीही हे भागवतांचं फारच सोबर रूप झालं..मिड डेची पुंगळी तोंडावर कण्यासारखी धरून तिच्या आतून ‘‘मी प्रमोद भागवत मिड डे मधून बोलतोय..’’ अशी घोषणा भर ऑफिसात- तीही महाराष्ट्र टाइम्ससारख्या परीटघडीच्या ऑफिसात- करणा-या भागवतांना ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना भागवतांचं वय वाचून शॉकच बसला असेल.. या उमद्या, धडाडीच्या, कृतीप्रवण, मनस्वी पत्रकाराच्या एका अगदी विचित्र (इंग्रजीतबिझार) अपघातात झालेल्या निधनाची बातमी वाचून बसला असेल, तेवढाच.
यावरून आणि यापुढच्या मजकुरातील भागवतांच्या काही सुपरहिट किश्शांचे वानोळे वाचून अशी एखाद्याची समजूत होईल की, भागवत हा एक अत्रंगी, अवली, कलंदर, गमत्या आणि विक्षिप्त माणूस होता.. बरोबर, अगदी शंभर टक्के बरोबरच आहे ही समजूत, मात्र भागवत हे फक्त तेवढेच नव्हते.. चिडीचुप्प ऑफिसात ‘‘कूऽक’’ असा आवाज काढून वात्रट पोरासारखा हसणारा हा माणूस एका बलाढय़ कंपनीला, ठाणे शहराला कसरीसाख्या पोखरणा-या राजकारणी नावाच्या गुंडांच्या टोळीला आणि भ्रष्ट निगरगट्ट नोकरशाहीला एकटय़ाने आव्हान देण्याची हिंमत दाखवणारा बहाद्दर पत्रकारही होता. अन्यायाची त्यांना अतिप्रचंड चीड होती. त्यांच्या सगळ्याच क्रिया-प्रतिक्रिया अति आणि प्रचंडच होत्या म्हणा; पण, अन्यायाविरुद्ध शेंडी तुटो वा पारंबी अशा निर्धाराने ते उभे ठाकायचे. बहुतेक वेळा शेंडी तर तुटायचीच, पण डोकंही फुटायचं.. पण, पाच फुटांच्या आगेमागे असलेल्या भागवतांची बटुमूर्ती तेव्हा विशाल भासायची. आग, अ‍ॅसिड, धगधगता निखारा.. भागवतांचं नाव घेतलं की, अशा ज्वालाग्रही चिजाच नजरेसमोर येतात.. भागवतांच्या जवळ जाणा-या प्रत्येक माणसाला त्यांच्या प्रखर, उग्र अस्तित्वाने चटके दिले आहेत.. काहींना कधीच न भरून येणारे व्रणही.. पण, त्यातून त्यांच्या मित्रांना एवढंच वाटायचं की, आपल्याला इतक्या लांबून इतके चटके बसतायत, तर याची स्वत:ची किती होरपळ होत असेल?
 
अन्यायाविरुद्ध झगडताना भागवत प्रारंभीच्या काळात जाम क्रिएटिव होते. तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठात संगीताची पदव्युत्तर पदवी नाही म्हटल्यावर  त्यांनी तंबोरा गळ्यात अडकवून एकट्याचा मोर्चा काढला होता. एका शिंप्यानं शर्ट बिघडवला आणि भरपाई द्यायला नकार दिला, तेव्हा त्याच्या दुकानासमोर तो शर्ट पेटवून देऊन, तो जळता शर्ट हातात धरून भागवत येणा-या-जाणा-या प्रत्येकाला ओरडून सांगत होते की, याच्याकडे कपडे शिवू नका. हा ते बिघडवतो.
 
काळ बदलला. सत्याग्रहाला दाद न देणा-या निबर कातडीची आणि दगडी मनांची माणसं सत्तास्थानांवर बसली. त्यांना गुदगुल्या होत नाहीत, हे  भागवतांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी जहाल पत्रकारितेची नखं बाहेर काढली.
 
औरंगाबादसारख्या मागास भागातून मुंबईत मटामध्ये ते आले तेव्हा अंगावर गावाकडचा सदरा पायजमा, गळय़ात झोळी आणि भरघोस दाढी असं साजिरं रूप होतं. ते ध्यान पाहून साक्षात गोविंद तळवलकरांनी भागवतांना माणसांत आणणारा मेकओव्हर करवून घेतला होता म्हणे! भागवत जोसेफ नरोन्हांचे शिष्य.. शिष्योत्तमच म्हणायला हवेत. नरोन्हांच्या तालमीत त्यांचं व्याकरण पक्कं झालं आणि मटामधल्या अनेक पिढ्यांना हसतखेळत व्याकरणाची तालीम देता-देता भागवतांनी पत्रकारितेच्या भाषाशुचितेचीही संथा दिली. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की हे भागवतांचं अतिशय आवडतं वाक्य. ते कुणी लिहिलं की लगेच ते विचारायचे, आपल्या भाषणात ते म्हणाले म्हणजे काय? दुस-याच्या भाषणात कुणी बोलू शकतं का? तसं झालं तर तीच बातमी होईल आणि पुढे म्हणाले म्हणजे काय? मागे कसं म्हणता येतं? -हस्व-दीर्घ चुकलं की भागवत नाटय़मय पद्धतीने त्या चुकीच्या शब्दांचे उच्चार करून त्यात काय चूक आहे, ते निदर्शनाला आणून देत. प्रसंगी या उपक्रमाला आंगिक अभिनयाची बेजोड जोड असे. बातमीचं अचूक आणि नेटकं संपादन करणा-या भागवतांना अनेकदा त्या बातमीला आणि आपण लावलेल्या पानाला भागवत टच देण्याची अनावर ऊर्मी यायची. मग ते एखाद्या टीचभर बातमीला (त्यांच्या मते) आकर्षक शीर्षक देण्यासाठी जंग जंग पछाडायचे. एकदाचं ते सुचलं की राक्षसासारखे विकट हास्य करून ते हेडिंग जगजाहीर करायचे, ‘‘काकिनाडय़ाच्या किनारपट्टीवर कमांडोंची कुशल कारवाई’’ किंवा ‘‘बाहेरून बंद बियर बारवर बडगा!!’’
 चमत्कृतीपूर्ण वाक्यरचनांची त्यांची हौस बातम्यांपुरती मर्यादित नव्हती. ती त्यांच्या साध्या बोलण्यातही झळकायची आणि मग भागवती वाक्यांचे फटाके  तडतडायचे, त्यांना सुयोग्य अंगविक्षेपांची जोड मिळायची आणि न्यूज रूममधलं जडगंभीर वातावरण हलकंफुलकं होऊन जायचं. हे भागवतांचं एक रूप. तेच भागवत कधी-कधी जराशा गोष्टीनंही संतापायचे, तेव्हा तेच ऑफिस डोक्यावर घ्यायचे. आपल्या दुप्पट आकाराच्या सहका-याला तुला इथून खाली फेकून देईन, असं जरबेनं सांगायचे आणि तोही बिचारा चक्क घाबरायचा. चल खाली रस्त्यावर, चोपून काढेन तुला, असं दुपारी त्यांनी ज्याला आव्हान दिलेलं असायचं, त्याच्याच गळ्यात हात टाकून ते संध्याकाळी एकत्र ऑफिसच्या बाहेर पडायचे आणि मग बहुधा त्यांची एकत्र वाट प्रेस क्लबाकडे वाकडी व्हायची. सरळ तर सूत, नाहीतर भूत, असा भागवतांचा खाक्या ठाणे (पूर्व) करांना चांगलाच परिचयाचा झाला, तो भागवतांच्या धडाकेबाज सामाजिक कामांमुळे. बेकायदा बांधकामांपासून महापालिकेतल्या भ्रष्टाचारापर्यंत काहीही भागवतांच्या तडाख्यातून सुटेना. त्यातून ठाण्याच्या कार्यालयावर मोर्चा येण्यापर्यंत पाळी गेली. या लढायांमध्ये भागवतांमधला कार्यकर्ता त्यांच्यातल्या पत्रकाराला मागे सारून पुढे यायला लागला आणि त्यांचे मित्र चपापले. त्यांनी भागवतांना सावध करायचा प्रयत्न केला; पण सावधगिरी, दूरदृष्टी, स्ट्रॅटेजी म्हणजे भ्याडपणा आणि एक घाव दोन तुकडे म्हणजे शौर्य, अशी  भागवतांची पक्की धारणा होती. त्यातच रेल्वे स्टेशनात कुटुंबियांसमोर आपल्यावर हात उचलणा-या मोटरमनला आणि रेल्वे पोलिसाला भागवतांनी ठोकलं आणि रेल्वे नावाची अवाढव्य यंत्रणा या एकट्या माणसाच्या विरोधात उभी राहिली. त्याच सुमारास ठाण्यातल्या शूरवीर नरपुंगवांनी भागवतांवर तीक्ष्ण शस्त्रांनी प्राणघातक हल्लाही केला होता. त्यातून सुदैवानेच बचावलेल्या भागवतांबरोबर सदैव स्टेनगनधारी पोलिस दिसू लागला. ही भागवतांच्या संरक्षणापेक्षा त्यांच्या ठाण्यातल्या संचाराला आळा घालण्याची आयडिया असावी.
कार्यकर्ता भागवतांनी पत्रकार भागवतांच्या कारकिर्दीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं ते त्यांच्या बदलीच्या रूपानं. नागपूरला झालेली कार्यालयीन बदली  आपल्याला डावलण्यासाठी केली गेली आहे, या मुद्यावर भागवत कंपनीविरुद्ध कोर्टात गेले आणि नियतीच्या एका भयंकर दुष्टचक्रात अडकले. बडय़ा कंपनीविरुद्ध लेबर कोर्टात लढणं म्हणजे हाराकिरी, असं कंपनी, कायदा आणि कोर्ट यांना ओळखून असलेली माणसं जीव तोडून सांगत होती; पण, भागवतांवर अतिप्रचंड अन्याय झाला होता, त्यावर त्यांची प्रतिक्रियाही अती आणि प्रचंडच असणार होती.. फक्त ती भागवतांसाठी आणि त्यांच्या जवळच्यांसाठी अतिशय क्लेशदायी आणि प्रचंड आर्थिक नुकसान करून टाकणारी ठरत गेली. भागवतांसारख्या लढवय्या पत्रकाराची उमेदीची वर्ष  बिनलेखणीची गेली, हे सर्वात मोठं नुकसान. भागवतांनी केस मागे घ्यावी, त्यांना सन्मानाने व्हीआरएस आणि पूर्ण आर्थिक भरपाई देण्यात येईल, हा तोडगा अनौपचारिकरित्या त्यांच्यापुढे जेव्हा-जेव्हा मांडला गेला, तेव्हा कंपनी हरणार आहे, म्हणून ती घाबरली आहे. तडजोडीची भाषा करते आहे. मी असा विकला जाणार नाही. कंपनीला धडा शिकवेन, तरच नावाचा भागवत, हाच त्यांचा धोशा होता.. तो व्यक्त करण्याची शब्दकळा अधिकाधिक शिवराळ होत गेली आणि मध्यस्थांचे अवसान गळाले.
तेच भागवत केस हरल्यानंतर मात्र नागपूरला हजर झाले होते आणि त्यानंतर ज्या गावाचा रत्तीभराचा परिचय नव्हता, तिथलं झकास रिपोर्टिग करून राहिले होते. भागवतांनी असं कसं केलं, असा प्रश्न पडला, तेव्हा उत्तर मिळालं, भागवत या कोर्टाच्या निकालामुळे कामावर रुजू झाले असले, तरी कंपनीविरुद्ध हायकोर्टात गेलेले आहेतच.हे खास भागवती होतं.
 
ते एखाद्या लंबकासारखे कायम दोन टोकांमध्ये आंदोळत राहिले. पराकोटीचं प्रेम नाहीतर पराकोटीचा द्वेष. पराकोटीची आवड नाहीतर टोकाची नावड. ब्लॅक किंवा व्हाईट. ग्रे शेडस् त्यांच्या गावीही नव्हत्या. त्यांना असं भयावह गतीनं भिरभिरताना पाहणा-यांचे डोळे चक्रावायचे. मग स्वत:च फिरवत असलेल्या या गरगर फिरत्या आकाशपाळण्यात भागवतांचं डोकं ठिकाणावर कसं राहिलं असेल? त्यांना इतके मित्र कसे लाभले? अनेकदा त्यांनी तडातडा तोडून टाकले तरी त्यांनाच चिकटून राहिले, असे मित्र. मित्रांच्या किमान तीन पिढ्या भागवतांच्या हाताचे पातेलंभर खेकडे किंवा चरचरीत मटण सार्थकी लावल्याच्या आठवणी सांगत त्यांच्या जिव्हाळय़ाचे उमाळे काढतात आणि पत्रकारांच्या किमान तीन पिढ्या भागवतांनी व्याकरण घटवून घेतल्याची, बातमीची भाषा शिकवल्याची साक्ष देतात. हे आक्रित कसं घडलं?
 या प्रश्नांची उत्तरं शेजारच्या फोटोत दडलेली आहेत.. आत सदैव स्फोट होत असताना या माणसाचे डोळे कधी खदिरांगारी झाले नाहीत. ते एखाद्या व्रात्य पोरासारखे हसरे आणि मिचमिचे राहिले. पोरकटपणा म्हणून बदनाम झालेली निरागसता या वाघाचं काळीज असलेल्या माणसाला कधीही सोडून गेली नाही.
तो फोटो नीट बघा..
 त्यातला माणूस पंचावन्न वर्षांचा होता, यावर विश्वास बसत नाही.. तो आता नाही, यावरही.

(8/8/10)

8 comments:

  1. Mukesh , mazyavar sudhha tuch mrutulekh lihi bare...mhanje mi jar tevdhi mothi zali tar...1 paragraph lihilas tari chalel..nakki...nahi mhanu nakos....

    bhetuyaat.

    ReplyDelete
    Replies
    1. या पेक्षा चांगला अभिप्राय या लेखावर असूच शकत नाही

      Delete
  2. खूप चांगल्या शैलीतला चांगला मृत्यूलेख आता सहसा वाचायला मिळत नाही. भागवतांचा माझा परिचय होता. तुमच्या लिखाणाने त्यांच्याशी झालेल्या भेटी डोळ्यासमोर येत राहिल्या. शैली असेल तर मोठे ब्लॉगपोस्टही वाचले जातात, ती नसेल तर चाळ ओळींचे पोस्ट वाचणंही जमता जमत नाही. ब्लॉग माध्यमाचा चांगला उपयोग तुम्ही करता आहात हे वाचकांना पहायला मिळतय. शुभेच्छा. - माधव शिरवळकर

    ReplyDelete
  3. Pramod Bhagawatna agadi ek-donadaach bhetalo hoto.Manoos manaswee hota.Tujha lekh wachun akaali gelelyaa ya tarun mitraachi aathawan punha jaagi jaagi jhali.Kalay Tasmay Nam:!

    ReplyDelete
  4. म. टा. च्या दिवसात डेस्क वर ठेका धरून " कविराजा, कविता के तुम मत कान मरोडो - धंदे की कुछ बात करो, कुछ पैसे जोडो" गायला मजा यायची

    ReplyDelete
  5. khoop khoop sundar lekh lihila aahe tumhi.aatta tyanchyashi sakshat bhet ghadvoon dilit ki ho tumhi !

    ReplyDelete
  6. प्रमोद भागवतांच्या अश्या अनेक आठवणी माझ्यासारख्या त्याच्या अनेक मित्रांच्या मनात ताज्या आणि रसरशीत आहेत. पुण्यात त्या वेळच्या माझ्या जिन्यातल्या कॉटवर दोघांचीच रमलेली मैफल. दुसऱ्या दिवशीचा सकाळचा पाहिलेला किशोरकुमारचा हाफ तिकीट सिनेमा. त्यानंतर पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल मधील जेवण. सर्वच्या सर्व यानिमित्ताने डोळ्यासमोर आलं. पम्या होताच तसा लाघवी आणि अतरंगी. आम्ही सुजातामध्ये जेवत असतांना एक परिवार शेजारीच जेवायला बसला. त्यांची कॉलेज कन्या सुंदर असल्याची मी खाजगीत पावती दिली. पम्या सरळ उठला आणि तिच्या पिताश्रीला जाऊन म्हणाला कि ओ काका तुमची मुलगी खूप सुंदर आणि गोड आहे हो.
    आता पुढे काय होणार या कल्पनेने मी उडालो आणि पलायनाची तायली केली. नशीब आमचं कि ते काका समंजस आणि दिलखुलास होते. ते हसले आणि त्यांनीही दाद दिली. असा हा पम्या खट्याळ आणि दिलखुलास. व्रण न उमटवता बोचकरणारा. मनापासून मदत करणारा. तो वारला तेव्हा त्याच्या मौतीला ठाण्यात मी आणि यमाजी मालकर गेलो होतो. फार वाईट प्रसंग होतं तो. हसरा प्रमोद निपचित पडलेला. त्याचं ते थंड शरीर आणि त्या आड विझलेला विद्रोह. मग आम्ही त्याच्या त्या निपचित देहालाच चिताग्नी देऊन परतलो. दोघांच्याही मनात एका प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं ते म्हणजे दर वर्षी खास सुट्टी काढून सर्व मित्रांना आवर्जून भेटणारा प्रमोद प्रवासात स्वतःची आणि इतरांची खूप काळजी घ्यायचा. त्याला भेटून परतणाऱ्या मित्रांना प्रवासात काय काय काळजी घ्यावी याच्या सूचना करायचा. आमच्याकडून आजवर काही चूक झाली नाही पण त्या दिवशी त्याच्याकडून काय चूक झाली कळले नाही. प्रवासात असतांनाच एका बस स्थानकावरच तो गेल्याची बातमी आली आणि मन सुन्न झालं.

    ReplyDelete
  7. अशी माणसं (येथे असे पत्रकार) आता पुन्हा होणे नाही... 🙏🏻

    ReplyDelete