हिंस्त्र श्वापदासारखे रोंरावत फेसाळत निघालेले पाणी... वेग हळूहळू वाढत चाललाय... आता प्रचंड वेगाने पाणी पुढे सरतंय आणि... ध्रों धों ध्रों ध्रों करीत पाण्याचा कडेलोट... अख्खाच्या अख्खा रूंद प्रवाह धाडदिशी खाली खोल गर्तेत फेकला जातोय... पाणीही जाम हट्टी... कोसळता कोसळता तुषारांचे रूप घेते आणि खाली कोसळता कोसळता पुन्हा वर उसळते... आग लागलेल्या ठिकाणी धुराचे लोट दिसावेत, तसे मैलोन्मैल अंतरावरूनही आकाशात उसळणारा तो लोट दिसतो आणि समजते नायगारा आला...
नायगाराची ही पहिली चाहूल जंगलांनी व्यापलेल्या, निर्जन पर्वतमय प्रदेशात लागत असावी, असे त्या जागतिक कीर्तीच्या थोर प्रपाताविषयी केवळ ऐकून असलेल्या कोणाचीही अपेक्षा असते. पण, प्रत्यक्षात हे दर्शन घडते अनेकानेक इमारतींच्या मधून. एका टुमदार शहराच्या मधोमध. जसजसे नायगाराच्या जवळ जाऊ लागतो तसतसे समजू लागते की आपल्या कल्पनेतला निसर्गाचा रौद्रभीषण आविष्कार नाही, हा माणसाळवलेला, पाळीव प्रपात आहे.
म्हणजे असे चित्र डोळय़ांसमोर आणा की जंगलामध्ये वनराज सिंह डौलदार चालीने चालला आहे. अचानक त्याला भक्ष्याचा वास येतो. तो थबकतो. स्तब्ध होतो. वळतो. चाल वाढते. पावलांच्या झेपा होतात. भक्ष्य सैरावैरा पळू लागते. सिंह एका झेपेत त्याला गाठतो, पंजाच्या एका फटक्यात त्याला लोळवतो, त्याच्या ताकदवान जबडय़ात भक्ष्याची मान मोडते, उष्ण रक्त वाहू लागते आणि तेवढय़ात... तेवढय़ात मागे दिसते एक उंच जाळीदार कुंपण, त्याचे दार, दारामागे आणखी एक भक्ष्य घेऊन उभे असलेले कर्मचारी, बघ्यांची गर्दी आणि सरतेशेवटी फ्रेममध्ये दिसते `राणीचा बाग'छाप पाटी...
...असे झाले तर जेवढा आणि जसा हिरमोड होईल, तशी नायगारामध्ये `वाइल्ड' सौंदर्य पाहायला जाणाऱयाची होते. एखाद्या योगी ऋषीची डोंगरदरीतील एकांतगुंफा पाहायला म्हणून जावे आणि दारावरच नारळ-लाह्याबत्ताशांच्या प्रसादाची ताटे पुढे करणारी दुकाने दिसावीत, कपाळावर गंध रेखायला कोणीतरी दांडी पुढे करावी आणि `ऐका योगीमहाराजांची कथा' हे कॅसेटमधून कोकलणारे फिल्मी चालीवरचे भक्तिगीत कानी यावे, तशी ही फसगत.
म्हणजे नायगाराच्या अतिप्रसिद्ध धबधब्यात गंमत नाही का?
तसे अजिबात नाही. नायगारा हा एरवीही फार थोर प्रकार आहे. निसर्गाची ताकद अचाट. तिने एक आश्चर्य घडवले. माणसाचे डोके त्याहून अफाट. त्याने त्या आश्चर्याला चहूबाजूंनी वेढून बंदिस्त करून टाकले. नायगारा नावाचे श्वापद माणसाळले की नाही ठाऊक नाही. त्याला अमेरिका आणि कॅनडा या मनुष्यजातीच्या दोन बाहूंनी विळखा घालून साखळबंद मात्र करून टाकले आहे. आता कोणीही पोरेटोरे येतात आणि त्याचे सर्वांगदर्शन घेऊन जातात. `नायगारा पाहिला'मध्ये रोमांच फक्त जगातली प्रसिद्ध चीज पाहिल्याचा. निसर्गाला भिडण्याचा, त्याच्याशी दोन हात करीत टप्प्याटप्प्याने त्या अद्भुतापर्यंत पोहोचण्याचा थरार मात्र विसरायचा.
एकदा तो विसरला की नायगाराचा अनुभव यादगार होतोच होतो. तीच तर अमेरिकन मार्केटिंगची खासियत आहे. तुमच्याकडून योग्य तेवढे डॉलर घ्यायचे आणि मग तेवढय़ा रकमेचा पैसावसूल आनंद द्यायचा. तुमचा प्रत्येक अनुभव `मौलिक' बनवायचा. त्यात कसूर नाही. अमेरिकन यंत्रणा नायगारा कसा `विकते' ते पाहणेच अतिशय रंजक आणि बोधक आहे. नायगाराला राहणे-जेवणे यांच्या उत्तम सोयी आहेत. किती उत्तम? एकटय़ा नायगारात फक्त भारतीय जेवणाचीच हॉटेल्स तब्बल 400 आहेत. सगळी सरदारजींच्या मालकीची. कॅनडा शेजारीच असल्याचा हा परिणाम असावा. एकदा तुमचा मुक्काम पडला की मग जागोजाग `नायगारा विक्री केंद्रे' दिसू लागतात.
नायगाराचा धबधबा ज्या नदीवर आहे, ती नायगारा नदी हीच अमेरिका आणि कॅनडा यांच्यातली सीमारेषा. एकीकडे न्यू यॉर्क राज्याचा बफेलो प्रांत. नदीपलीकडे कॅनडाचे ओन्टॅरिओ शहर. दोन्हीकडून नायगारावर पर्यटकांचे `आक्रमण' सुरू असते. अमेरिकेत जात असलात, तर भारतातच लोक सांगतात, `अरेरे! नायगारा पाहण्याची खरी मजा कॅनेडियन साइडने आहे. बघा, जमलं तर 24 तासांचा व्हिसा घेऊन तिकडून पाहा.' एखादा माणूस कॅनडाला जाणार असेल, तर त्याला काय सल्ला मिळत असेल? `अरे नायगाराची खरी मजा अमेरिकन साइडने आहे...' गंमतीचा भाग सोडा. एकतर कॅनडाचा 24 तासांचा व्हिसा वगैरे गंमत आता इतिहासजमा झाली आहे. दोन्ही देशांमध्ये होणारे तुफान बेकायदा स्थलांतर आणि दहशतवादाची भीती यामुळे आता मुंगीलाही इकडून तिकडे प्रवेश नाही. शिवाय `मेड ऑफ द मिस्ट' टूर घेतलीत की कॅनडाच्या बाजूच्या, नालाच्या आकाराच्या धबधब्याचं समीपदर्शन घडतंच.
नायगाराचे प्रमुख दोन भाग आहेत. एक आहे अमेरिकेच्या बाजूचा. दुसरा कॅनडाच्या बाजूचा. आपल्याला त्यांच्या मधोमध एक बेट. अमेरिकेच्या बाजूचा सगळाच भाग नायगारा नॅशनल पार्कच्या रूपाने लँडस्केपिंग करून सजवण्यात आला आहे. या बागेत आपण नायगारा नदीच्या प्रवाहाच्या अगदी शेजारून चालत, जेथे धबधबा कोसळतो तिथून काही फुटांच्या अंतरावरून फेरी मारू शकतो. ही फेरी रात्रीच्या वेळी असेल, तर नायगारापेक्षा त्याचे `वृंदावन गार्डन' बनवणाऱया मानवी भेजाची कमाल अधिक आकर्षित करते. एवढय़ा अक्राळविक्राळ जलप्रपाताला उजळून काढणारे प्रचंड प्रकाशझोत दिलखेचक रंगसंगतीने एकदम मद्रदेशीय चित्रपटातील नृत्यगीताची आठवण जागी करतात. पण, नायगाराची भव्यता तेव्हा समजत नाही. ती समजते भरदिवसा... `मेड ऑफ द मिस्ट'च्या टूरवर. नायगारापासून काही अंतरावर धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या प्रवाहात ही टूर सुरू होते. शंभरदीडशेजणांचा जथा प्लास्टिकच्या खोळी घालून दुमजली लाँचमध्ये चढतो आणि मग लाँच धबधब्याच्या दिशेने निघते. दोन्ही धबधब्यांच्या इतक्या शेजारी नेते की धो धो कोसळणाऱया पाण्याच्या तुषारांच्या वर्षावात चिंब न्हाऊन निघावे. म्हणूनच तर त्या खोळींचा इंतजाम.
ही टूर करून परतल्यावर धबधब्याच्या शेजारच्या डोंगरावर आखलेल्या वाटेने अर्ध्या उंचीपर्यंत चढून जायचे. तुषारांनी जमिनीवर तयार केलेल्या इंद्रधनुष्याचे रंग न्याहाळायचे. याने पोट नाही भरले, तर हेलिकॉप्टर राइड सज्ज असतेच. हेलिकॉप्टरमध्ये बसायचे आणि आकाशातून नायगाराच्या प्रवाहाचे, अर्धवर्तुळात कोसळणाऱया धबधब्याचे विशाल रूप डोळय़ांत साठवून घ्यायचे. आधी हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा थरार (हेलिकॉप्टर अगदी छोटे, चहूबाजूंनी काचा, डावीकडे वळले की पुढच्या सीटवरचा मधला माणूस थेट पायलटच्या अंगावर रेलणार. दार उघडून पायलट नायगारात आदळला तर हेलिकॉप्टर चालवायचा जिम्मा मधल्या माणसावर) आणि त्याच्या काचांमधून पाहायचा नायगारा. अहाहा!
नायगाराचे वाइल्ड रूप पाहायचे आहे. मग इथल्या आयमॅक्स थिएटरमध्ये सतत दाखवली जाणारी अचाट फिल्म पाहा. त्यात नायगाराचा इतिहास, रेड इंडियन परंपरेतून आलेली `मेड ऑफ द मिस्ट'ची मिथककथा आणि नायगारात उडी घेण्याचे धाडस करणाऱया वेडय़ा फकिरांची चित्तथरारक गाथा मांडलेली आहे. धबधब्याच्या सर्वात जवळ, अगदी धबधब्यातच नेणारी केव्ह ऑफ द विंड्सची टूर आहे. थरारप्रेमींसाठी रिव्हर रॅफ्टिंगचा सुरक्षित अनुभव देणारी राइड आहे. धबधबा सोडून दुसरे काही पाहायचे तर इथल्या किल्ल्यात एका लढाईचा ऍक्शन रिप्ले सुरू असतो, तो पाहा. वाइन ट्रेलवर जा. सुवेनियर शॉपमध्ये नायगाराच्या प्रतिकृती, मेड ऑफ द मिस्टच्या की चेन्स, ग्लास, टी शर्ट आणि इतर काहीबाही खरेदी करा. काय वाट्टेल ते करा, पण मस्त मजा लुटा आणि डॉलर ढिले करीत राहा.
जिथे भारतातून गेलेल्या आपल्यासारख्या सतत मनातल्या मनात `तीन डॉलर म्हणजे दीडशे रुपये. एक हॉट डॉग दीडशे रुपयाला!' असा हिशोब करीत राहणाऱयालाही जिथे डॉलर खर्च करताना मागेपुढे पाहावेसे वाटत नाही, तिथे डॉलरमध्येच कमावणाऱया आणि ते खर्चण्यातच स्वर्गसुख आहे, याचा साक्षात्कार झालेल्या अमेरिकनांची काय कथा? ते नायगारावर नायगारासारखेच डॉलर खर्च करतात. नायगाराचा बाजार मांडलेल्या अमेरिकेने त्याची बजबजपुरी मात्र होऊ दिलेली नाही. त्यामुळे डॉलरवसूल आनंद मिळतोच मिळतो.
(प्रहार, २००९)
No comments:
Post a Comment