Friday, February 11, 2011

मलाव्य क्रमांक 11

हल्लीच्या काळी काहीही अफवा पसरतात आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या नंतर ख-याही ठरतात.
 
अशीच एक अफवा गेल्या आठवडय़ात पसरली आणि खरीही ठरली.. सुधीर गाडगीळांची षष्टय़ब्दीपूर्ती झाली..
 
भले शाबास! अहो, हा गृहस्थ 35 वर्षापूर्वी पंचविशीत होता, तिथून तिशीत यायलाच त्यानं किमान 15 वर्ष घेतली असतील.. आजही चेहऱ्यावर तोच गोंडस गोडवा, वाणीत तीच मिठ्ठास, बोलता बोलता डोईवरची भरघोस झुलपं मागे सारण्याची तीच दिलखेचक अदा.. फारतर पाचेक र्वष जोडा.. हवं तर आणखी पाच वाढवू आणि चाळीसवर तुकडा पाडू.. नाहीतरी गाडगीळांनी चाळिशी पार केलीये, याची एकतरी खूण दिसते का त्यांच्या व्यक्तित्त्वात? (गाडगीळांचे पुणेरी मित्र म्हणतील की हा गाडगीळांना त्यांच्याच शैलीत मारलेला तिरकस टोला आहे.. पण, कथानायकाची षष्टय़ब्दी असल्याने आणि कथालेखकाने पुणे सोडून बराच काळ झाला असल्याने हा आणि यापुढचे असे उल्लेख निखळ कौतुकाचेच आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.)
 
ओरिजिनल ‘मलाव्य’ अर्थात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे हयात होते, तेव्हा सुधीर गाडगीळांनी आपण ‘महाराष्ट्राचं तिसरं लाडकं व्यक्तिमत्त्व’ आहोत, असा दावा करून म्हणे खळबळ उडवून दिली होती. त्यावर त्यांच्या त्याच पुणेरी मित्रांनी गाडगीळ हे ‘मलाव्य क्र. 11’ आहेत, अशी टिपणी केली होती. म्हणजे एक ते दहा क्रमांकांवर पु.ल. आणि अकराव्यावर गाडगीळ. हा टोमणा होता खरा, पण त्यात अवघा महाराष्ट्र पुलंनंतर गाडगीळांनाच ओळखतो, हा गौरवही अनुस्यूत होताच.
 
गोंडस रुपडं लाभलेले गाडगीळ हे इतकं गोड गोड आणि गुडी गुडी सूत्रसंचालन करतात, की त्यांचं खरं आडनाव ‘गोडगीळ’च आहे, असं संशोधन त्यांच्या मित्रांनी केलंय. गाडगीळ पुण्याचे असूनही त्यांच्यात एवढा गोडवा कुठून आला, याचा शोध एकेकाळी चितळे बंधूंनी घेतल्याचीही अफवा होती. (पुण्यातला सगळा गोडवाोपल्या मिठायांमध्येच संपून जातो, अशी चितळेंची समजूत असणार.) पण, खरं सांगायचं तर गाडगीळ (फक्त) गोडच बोलतात, ही गोड गैरसमजूत आहे. गाडगीळ हे महाराष्ट्रातले पहिले आणि कदाचित अजूनही एकमेव ‘प्रोफेशनल’ सूत्रसंचालक आहेत.. म्हणजे सूत्रसंचालन हा व्यवसाय करणारे, या अर्थाने नव्हे, तर सूत्रसंचालनाचं काम प्रोफेशनली करणारे, या अर्थाने. त्यांच्याइतक्या कर्मठ प्रोफेशनॅलिझमची अघळपघळ महाराष्ट्राला सवय नाही, त्यामुळे गाडगीळांबद्दलचं जजमेंट चुकत असावं. आपल्याला नेमकं काय करण्यासाठी बोलावलंय, याचा विचार करूनच गाडगीळ सूत्रसंचालन किंवा मुलाखती करतात. महाराष्ट्राला शिवाजी पार्कवरच्या वार्षिक शिमग्यापलीकडे परखड कटुतेची सवय नाही. 
आपले बहुतेक समारंभ ‘थोर, महान, दिग्गज’ वगैरे विभूतींना हारतुरे अर्पण करणारेच असतात. आपण असे औपचारिक, दिखाऊ, खोटे खोटे समारंभ आयोजित करायचे आणि त्यांची शोभा वाढवण्यासाठी बोलावलेल्या गाडगीळांनी सत्कारमूर्तीला किंवा मुलाखतमूर्तीला आडवं लावून त्यात रंगत आणावी, अशी अपेक्षा करणं म्हणजे निखिल वागळेंनी सुधीर गाडगीळांच्या शैलीत सूत्रसंचालन करावं, अशी अपेक्षा करण्यासारखं भंपकपणाचं आहे.. अर्थात अशा कौतुकप्रचुर सोहळ्यांमध्येही गाडगीळ व्यासपीठावरच्या मान्यवरांबरोबर असलेले व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध आणि मराठी भाषेवरचं प्रभुत्व यांच्या बळावर बिट्वीन द लाइन्स’ आणि ‘पॉझेस’ वापरून गंमत आणतातच. जिथे समोरच्याच्या उलटतपासणीची मुभाच असते, अशा कार्यक्रमात गाडगीळ आग्रही गांभीर्याने तरी सभ्यतेच्या मर्यादांमध्ये राहून समोरच्या माणसाला आडवा घेतात.
 
गाडगीळ पुण्याचे आणि पिंडाने पत्रकार असल्यामुळे कितीही थोर माणसाविषयी अतीव आदर बिदर मनात दाटून येऊ द्यायचा नाही, हा त्यांच्या मनावरचा पहिला संस्कार असणार. आदर दाटून आलाच, तर लगेच त्याला ‘कट टु साइझ’ करणारा शंकेखोरपणा उफाळून येणारच. या ‘गुणा’मुळे खरं तर गाडगीळांचं सूत्रसंचालनाचं दुकान सुरू होण्याआधीच बंद व्हायला हवं होतं. पण, गाडगीळांकडे या चिकित्सक वृत्तीला माणसं जोडण्याच्या आणि त्यांच्यात रमण्याच्या वृत्तीची जोड आहे. त्यांना जिव्हाळ्याचा मेकअप करावा लागत नाही, तो आतून उमळून चेह-यावर उमटतो, जिभेवर खळाळतो, मिष्कील डोळय़ांमधून चमकतो आणि मग गोड गाडगीळच सामूहिक स्मरणात राहतात.
 स्वत: गाडगीळांना आपल्या या बदनामीची फारशी फिकीर दिसत नाही. एखादा गायक जसा मैफलीत तल्लीन होतो, तसे गाडगीळ आपल्या व्यवसायात तल्लीन असतात.. ते सूत्रसंचालनाचा रियाझ करतात, असं कुणी सांगितलं तरीही आश्चर्य वाटू नये. एखाद्या गायकानं आपला गळा जपावा, एखाद्या वादकानं वाद्याची देखभाल करावी, तशा निगुतीनं ते आपल्या व्यावसायिक आयुधांची जपणूक करतात. सदैव सजग मन असंख्य घटना, प्रसंग, आठवणी, किस्से टिपकागदासारखं टिपतं आणि त्यातलं आपल्या कामाचं काय, ते मेंदूच्या कप्प्यात फाईलबंद करतं. योग्य  वेळी योग्य तो संदर्भ देणं, चपखल पंच सुचणं, गुणवर्णनपर नेमकी वाक्यं सुचणं, ऐनवेळी बदलणा-या कार्यक्रमपत्रिकेला सावरून घेणं, यातल्या प्रत्येक गुणाच्या संदर्भात गाडगीळ समव्यावसायिकांना दहा क्रमांक मागे सोडून पुढे येतील.
सूत्रसंचालनाची एखाद्या कलेसारखी साधना करीत असताना गाडगीळांनी कलावंतांचा कथित कलंदरपणा मात्र आपल्यापासून चार हात दूर ठेवलाय. आपल्याला सतत चारचौघांत वावरायचं असतं, लोकांमध्ये आपली काही इमेज असते, तेव्हा अस्ताव्यस्त गबाळेपणा करायचा नाही, कायम ‘प्रेझेंटेबल’ दिसलं पाहिजे, ही व्यावसायिक शिस्त त्यांनी कसोशीनं जपलेली आहे. एकवेळ देवीचा रोगी सापडेल, पण दाढीचे खुंट वाढलेल्या, पारोशा, गबाळ्या अवतारातला गाडगीळांचा फोटो कुठे सापडायचा नाही.
 
गाडगीळांची ही प्रसन्नता व्यवसायजातही असेल- सदासर्वदा इतके प्रसन्न राहायला गाडगीळ काही रोबो नाहीत- पण, कोणत्याही भावस्थितीतल्या माणसाला गाडगीळ समोर दिसले की प्रसन्न वाटतं, आठय़ा निघतात, चेहरा खुलतो, हास्याचे शिडकावे होतात, हे काय कमी आहे? स्टेजवर उभं राहून किंवा दूरचित्रवाणीच्या कॅमेऱ्यासमोरून हजारो-लाखो किंवा कोटय़वधी माणसांशी ते सुसंवाद साधत नसतात, तेव्हाही ते कुठल्या ना कुठल्या अड्डय़ावर गप्पांचा फड जमवून धमाल उडवत असतात. समारंभांमध्ये आब राखून वावरणारे गाडगीळ समारंभातला त्यांचा सहभाग संपला आणि उर्वरित समारंभ फार वकूबाचा नसला की एखाद्या यारदोस्ताच्या खांद्यावर हात टाकून म्हणतात, ‘चल, पुष्करिणी भेळेच्या समोर एक नवा मिसळवाला सापडलाय. एकदम टॉप मिसळ मिळते तिथं.’ त्यांच्यासोबत दिवसाच्या अशा वेगवेगळ्या वेळांना, त्या त्या वेळेला योग्य अशा, वेगवेगळ्या ठिकाणच्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेणं, हा एक ‘टॉप’ अनुभव असतो. बकाणे भरता भरता नाना विषय, माणसं, प्रसंग, किस्से, नकला, आठवणी, गप्पा, टिंगली, टवाळय़ा, खेचाखेची.. असे आनंदाचे डोही आनंद तरंग.
 
गाडगीळ कधी कधी त्यांच्या ‘दिवाण ए खास’मध्ये (हा साधारणपणे शनिवारवाडय़ाच्या आकाराचा ठेवावा लागेल) मोठय़ा माणसांची गुह्यंही कधी खास आतला आवाज लावून डोळे मिचकावत सांगतात, पण त्यात चिखल उडवणारा रावडय़ा असंस्कृतपणा नसतो, परीटघडीवर पिचकारीने रंग उडवणाऱ्या गोंडस पोराचा वात्रटपणाच दिसतो..
  ..गेल्याच आठवडय़ात हे पोर साठीचं झालं, ही धक्कादायक अफवा जरी खरी ठरली असली आणि गाडगीळ (स्वत:च्या साठीची सवय नसल्याने) ‘कॉमर्स ग्रॅज्युएट असूनही बँकेत न चिकटता छंदाचा व्यवसाय केला, म्हणून इथे पोहोचलो’, अशी कृतकृत्य होत्साते उच्चारली जाणारी भावभीनी वाक्यं उच्चारत असले, तरी त्यांचं हे षष्टय़ब्दीविभोर दुर्वर्तन फार काळ चालणार नाही, याची त्यांच्या मित्रपरिवाराला खात्री आहे.. एक ना एक दिवस ही साठीची पगडी उतरवून ते एखाद्या मित्राच्या (वयोगट 15 ते 75 वर्षे) खांद्यावर हात टाकून ‘चल रे जरा अनिलकडे पान खायला’ किंवा ‘..सारसबागेत मसाला पाव चापायला’ असं म्हणतील आणि त्यांचे मित्र सुटकेचा नि:श्वास टाकून म्हणतील, ‘‘आला, सुधीर पुन्हा माणसांत आला.’’ 

(28/11/10)

2 comments:

 1. Chapakhal
  Pan kaahee velaa haa godavaa agadeech gilgileet waatato. Yaa maanasaalaa kaahee swataachee matey aahet kee naaheet? Swataache likes , dis-likes?
  kaahee velaa saanskrutik laachaareechehee darshan hotey.

  ReplyDelete
 2. Farach Bhari... Apratim... Khas Maachkar Style ne utaravilaya... Gaadgil pan Dhanya Zale astil vachun...

  Ashish Chandorkar

  ReplyDelete