Friday, February 11, 2011

मोरूचे वर्तमान

चक्क कंबरड्यात बापाची लाथ न बसता मोरूला जाग आली आणि असे आक्रित घडल्यामुळे तो जागा होताच तात्काळ चिंताक्रांत झाला. आपल्याला झोप जास्त झाली की रात्री जास्तझाली की बापाचं काही बरंवाईट झालं, असे अनेक कुविचार त्याच्या मनात एकसमयावच्छेदेकरून दाटून येतात न येतात तोच समोर पेपर दिसला आणि मोरूला ४४० व्होल्टचा शॉकच बसला.. ..त्या पेपरमधल्या बातम्याच तशा होत्या....पहिली बातमी होती..
मलबार हिल ते मंत्रालय लोकल रेल्वे सुरू
मलबार हिल ते मंत्रालय हे अंतर अवघ्या अडीच मिनिटांत कापणा-या सुपरफास्ट रेल्वेचे उद्घाटन राहुल गांधी यांनी झेंडा दाखवून केले. राहुल यांनी केलेल्या लोकलप्रवासापासून प्रेरणा घेऊन सर्व पक्षाच्या सर्व स्तरांवरील नेत्यांमध्ये लोकलने प्रवास करण्याची चढाओढ सुरू झाली होती. मात्र, सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुखदु:खांशी समरस होण्याच्या घाईत तिकीट न काढता प्रवास करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे रेल्वे तोट्यात जायला लागली होती. चवलीपावली पुढा-यांसोबतही सुरक्षारक्षकांचे लेंढार असल्यामुळे सामान्य प्रवासी कातावले होते. यावर उपाय म्हणून अखेरीस रेल्वेने मलबार हिल ते मंत्रालय ही राजकारणी स्पेशल विदाऊट तिकीट एसी लोकल सुरू केली आहे. या लोकलचा पहिला डबा लाल दिव्याचा असेल आणि त्यातून केवळ मंत्रीच प्रवास करू शकतील. प्रवासाचा शिणवटा घालवण्यासाठी सर्व डब्यांत सर्व प्रकारच्या खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे. या बातमीतली चौकट
राजकारणी स्पेशल रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तिच्यातून प्रवास करण्याऐवजी राहुल गांधी यांनी तडक चर्नी रोड स्टेशनकडे मोर्चा वळवला. टॅक्सी पकडून ते स्टेशनला पोहोचले. वाटेत उत्तर प्रदेशी टॅक्सीवाल्याची त्यांनी हिंदीत आस्थेने विचारपूस केली. चर्नी रोड स्टेशनवर त्यांनी भेळ विकत घेतली, बूट पॉलिश करणा-या मुलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि रेल्वेच्या स्टॉलवर ते गाजराचा ज्यूस प्यायले. संध्याकाळची विरार लोकल पकडून बोरिवलीला उतरण्याचा त्यांचा मानस होता. परंतु, ते राहुल गांधी असले तरी त्यांना लोकलमध्ये चढणे शक्य होणार नाही आणि विरार लोकलमधून बोरिवलीला उतरणे तर अशक्यच आहे, असे सांगण्यात आल्याने अखेर वांद्रय़ाची ट्रेन पकडून मोतमाऊलीच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
पुढची बातमी आणखी धक्कादायक होती..
अमिताभच्या चित्रपटांवर चित्रपटसृष्टीचा बहिष्कार
प्रख्यात अभिनेता अमिताभ बच्चन याने कलावंतांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आणणा-या नेत्यांची भलामण केल्याचा निषेध म्हणून वितरकांनी त्याच्या चित्रपटांवर उत्स्फूर्त बहिष्कार घातला आहे. देशातील सर्व चित्रपटगृहांमधून त्याचे चित्रपट उतरविण्यात आले आहेत. कलाकारांवर प्रतिसेन्सॉर आणि अतिसेन्सॉर बसविणा-या नेत्यांचा उदोउदो करून अमिताभने चित्रपटसृष्टीचा अपमान केला आहे, तो सर्व कलावंतांची माफी मागत नाही, तोपर्यंत त्याचे चित्रपट प्रदर्शित करणार नाही, असे थिएटर ओनर्स असोसिएशनने जाहीर केले आहे. त्यांना संपूर्ण चित्रपटसृष्टीने एकमुखाने पाठिंबा दिला आहे. आपल्यालाही अधूनमधून लाथा मारत असले, तरी हे नेतेच आपले मित्र, मार्गदर्शक, वडील भाऊ, काका, मामा, तात्या, अण्णा, आजी वगैरे सर्व काही आहेत. त्या आदराच्या भावनेतूनच आपण त्यांचा उदोउदो केला, असा खुलासा अमिताभने केला आहे. मात्र, ‘रणया चित्रपटाकडे पाठ फिरवून प्रेक्षकांनी आधीच अमिताभवर बहिष्कार घातलेला असल्याने आता इन्शुरन्सच्या माध्यमातून नुकसान भरून काढण्यासाठी अमिताभनेच ही बहिष्काराची खेळी खेळली असावी, असा तर्क काही जाणकारांनी लढवला आहे.शेजारीच दुसरी बातमी होती..
मराठीच्या अटीमुळे मराठीला नेता नाही
मराठी माणसांचे नेतृत्त्व करायचे असेल, तर आपला व्यवहारही मराठी आहे, याची प्रमाणपत्रे सादर करण्याची सक्ती मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केल्यामुळे या अटी-शर्तीमध्ये बसेल, असा नेताच मराठीला लाभत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. मराठी माणसांचे कडवट नेतृत्त्व करू इच्छिणा-यांना उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने हा कडू काढा पाजला आहे. नेता बनू इच्छिणा-यांची मुले मराठी माध्यमात शिकत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. इंग्रजी माध्यमात शिकणा-या मुलांसाठी सलग पाच मिनिटे विनाप्रॉम्प्टिंग शुद्ध मराठीत बोलण्याची परीक्षा द्यावी लागेल. आपला इस्त्रीवाला मराठी आहे, आपल्या व्यवसायातील मजुरांपासून भागीदारांपर्यंत सारे मराठी आहेत, आपण सर्व काळ सर्वाशी फक्त मराठीच बोलतो, आपण फक्त मराठी उद्योजक-व्यावसायिकांकडूनच खंडणी घेतो, अशी २७ प्रमाणपत्रे विहित नमुन्यांत आणि सक्षम अधिका-यांकडून साक्षांकित करून घेण्याची अट न्यायालयाने घातल्यामुळे मराठीच्या नेत्यांची दाणादाण उडाली आहे. या जाचक अटींविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र काही काळापुरती तरी या नेत्यांच्या तावडीतून सुटका झाल्यामुळे सामान्य जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
याच बातमीतली चौकट
बालवाडी वाहिनीचे धाबे दणाणलेआपली वाहिनी नेमकी कोणत्या भाषेतील आहे, याचे स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा एका लायसन्सवर त्रभाषिक वाहिनी चालवल्याचा ठपका ठेवून दंड आकारू, असा सज्जड इशारा न्यायालयाने दिल्याने बालवाडी वाहिनीचे धाबे दणाणले आहे. शिशुवर्गातील बालबालिकांना घेऊन मराठी वृत्तवाहिनी चालविण्याचा किफायतशीर उपक्रम या वाहिनीने चालवला आहे. माननीय अबक हे त्यांच्या ब्रँड न्यू कारमधून बाय रोड ट्रॅव्हल करून शिवाजी पार्कमध्ये पोहोचले. तेथे त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. मग त्यांनी ह्यूज गॅदरिंगला अड्रेस केले. त्यांचे भाषण ऐकायला घमासान गर्दी उसळल्यानें या परिसरातील ट्रॅफिक ठप्प झाले होते. त्यांचे भाषण ऐकताना तरुणांनी टाळय़ाशिटय़ांची एकच धूम मचवली,’ अशी या वाहिनीची भाषा आहे. मात्र, हीच उद्याच्या पिढीची मराठी भाषा आहे, असा दावा बालवाडीच्या चालकांनी केला असून त्याला त्यांच्या अनेक यंग व्ह्यूअर्सनी सपोर्टपण केलेले आहे. न्यायालयाने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावून बालवाडी वाहिनीला चांगलीच चपराक दिली आहे.
खाड्मोरू चमकला. पेपरमधल्या चपराकीचा वास्तवात आवाज?
खाड्कमाल झाली.
 आज काय चाल्लंय तरी काय?
खाड्आता तर चपराक मोरूच्या गालफडावर बसली!!!
पेपरातली चपराक वाचकाला बसते!!!
खाड्..आता मोरूचे डोळे खाड्कन उघडले..
..कंबरड्यात लाथा घालून मोरू जागा होत नाही, हे पाहून मोरूच्या बापाने त्याला कानफटवण्याचा मार्ग अवलंबला होता..
बाबा, थांबा! आजचा पेपर कुठाय पेपर?’ मोरू जागा होताच किंचाळला. बापाने काही अलिहणीय शिव्यांची सरबत्ती चालू ठेवून मोरूवर पेपर भिरकावला..तो पाहून मोरू पुरता भानावर आला..त्यात त्याच्या परिचयाच्या नेहमीच्या यशस्वी बातम्या होत्या
..इंग्रजी कवीपित्याने जर्मन भाषाकोविदपित्याला मराठी कुणाच्या बापाचीयावरून ठणकावले होते
..दोघांनी मिळून मुंबई कुणाचीयावरून राज्य सरकारला ठणकावले होते..
कुणीही घाबरू नका, तक्रार करेल, त्याला संरक्षण देऊ’, असा दिलासा घाब-याघुब-या चेह-याचे गृहमंत्री एका बातमीतून देत होते
..पेपरातल्या फोटोमध्ये एका थिएटरच्या काचांचा खच आणि फोटोग्राफरकडे पाहून दात विचकत एका अभिनेत्याची प्रतिमा जाळणारे तीन नरपुंगव दिसत होते..
समांतर सेन्सॉरशिपला बळी पडलेल्या कलावंतांच्या कलाकृतींसाठी मुख्यमंत्र्यांनी आणखी एका पॅकेजची घोषणा केली होती....
मोरूचे डोके आता गरगरू लागले..
 .. भोवळ येणार तेवढय़ात मोरूचे लक्ष पेपरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातमीकडे गेले..
..‘मुंबईकरांना आजपासून तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
..ताबडतोब अंथरूण उडवून देऊन, बापाने फेकलेला तांब्या चुकवत मोरू उठला आणि बादली घेऊन तळमजल्यावरच्या नळासमोरच्या दीड किलोमीटर लांबीच्या रांगेत नंबर पटकावण्यासाठी जीव खाऊन धावू लागला..

(7/2/10)

No comments:

Post a Comment