Friday, February 11, 2011

भिंतीला तुंबड्या

लहानपणी जगन न्हाव्याचे दुकान हे आधी भीतीचे आणि नंतर आकर्षणाचे केंद्र होते. 
भीती... प्रत्येक लहान मुलाला वस्त-याची वाटते तीच. 
आकर्षण... अंमळ चावट आणि चविष्ट गावगप्पांचे वयात येणा-या मुलांना वाटते तेच.
लहानपणी जगन न्हाव्याचे दुकानहोते. रिफाडांचा म्हणजे फळकुटांचा आठ बाय आठ फुटांचा एक विषमभुज चौकोन. खडबडीत जमीन. फळकुटाचेच बाकडे. पारा उडालेला आरसा. समोर उंच केलेली साधी खुर्ची. एकदोन कात्र्या, दातपडके कळकट कंगवे, फेस सुकलेले ब्रश, पितळेची मूळ रंगावर पुटे चढलेली वाटी, सर्व लहान मुलांना स्वप्नात येऊन दचकवते ते केस कापण्याचे मशीन आणि पांढ-या पायजमा-शर्टातला गांधी टोपीधारी जगन न्हावी.
 
सर्वाचे केस बागेतील हिरवळीप्रमाणे एका लांबीचे करणे, हा जगनचा कटिंगचा साधा फण्डा होता. लहान मुलांसाठी मशीन वापरायची आणि मोठय़ा माणसांसाठी कैची, एवढाच काय तो फरक. हिरोमंडळींप्रमाणे केशरचना करणे, हे वाया जाण्याचे लक्षण आहे, यावर जगन आणि घरोघरची मोठी माणसे यांच्यात एकमत होते. त्यात या ष्टायली जगनला करताच येत नाहीत, ही झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली.
 इतका सरधोपट कारभार असतानाही जगनचे दुकान कधी ओस पडले नाही. त्याच्या दुकानी हजर असलेल्या इसमांपैकी डुई भादरून घ्यायला आलेली गि-हाईके नेमकी किती असत, हे कोणालाच कळले नाही. कारण, कुचाळक्या या नावाने ओळखता येईल, अशी सर्व प्रकारची चर्चा तेथे सुरू असायची आणि हजर असलेली सर्व मोठी माणसे त्यात रंगून जायची. टाळ्या द्यायची. मोठमोठय़ाने हसायची. निव्वळ टवाळकी करायला आलेल्या एकाही इसमाला जगनने कधी हुसकावले नाही. उलट, त्याला बसायला जागा नसेल, तर एखाद्या पोट्टय़ाला दुपारून ये केस कापायला,’ असे सांगून पिटाळले जात असे. या टवाळांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणताही विषय वर्ज्य नव्हता आणि विषयतर अजिबात वर्ज्य नव्हता. काही विशिष्ट वर्तमानपत्रांमध्ये ठळक आणि ठसठशीत अवयवांच्या ललनांच्या छायाचित्रांनिशी ज्यांची जाहिरात छापून येते, ते सिनेमे कोण पाहात असेल, या प्रश्नाचे आपल्या ओळखीची बहुतेक सर्व मोठी माणसेहे धक्कादायक उत्तर त्या चर्चामधूनच समजायचे. दुकानात तीन-चार वर्तमानपत्रे असत. त्यातील एक सोडून सगळी समोरच्या मोफत वाचनालयातलीच असत. त्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांवर जोरजोराने चर्चा चालत. सगळय़ांचे सगळे बोलून झाले की जगन त्यावर खास आपल्या शैलीत मत व्यक्त करीत असे. जगनचा एक डोळा जरा तिरळा होता. एखादी खास कथा रंगवून सांगताना किंवा मत व्यक्त करताना तो डोळा आणखी तिरळा व्हायचा आणि जगन एकदम कावळ्यासारखा दिसायला लागायचा. एकाच वेळी निरागस आणि बेरकी. त्या रसभरित चर्चा स्वत:च करण्याचे वय होत गेले आणि केसांच्या ष्टायली करून वाया जाण्याचा अधिकार मिळत गेला, तसे जगनच्या दुकानाला वळसा बसायला लागला.. पुढे पुढे तर वाटच बदलली.. 

*     *     * 

खूप वर्षांनी जगनच्या दुकानी जाण्याचा योग आला. जगनचे दुकान आता दुकानराहिलेले नाही. कारण, त्याला हेअर कटिंग सलूनम्हणण्याचा आणि बिल्लूला बार्बरही न म्हणण्याचा काळ आला आहे. भरपूर पिकलेला जगनही आता जगनशेठ झाला आहे. वस्तरा, कैची, मशीन ही त्याच्या हातातली आयुधे कधीच म्यान झाली आहेत. (त्यामुळेच त्याच्या दुकानात गि-हाईकांची गर्दी होऊ लागली आहे, असे जुने जाणते टवाळ तोंडाचे बोळके दाखवत सांगतात. त्यात जगनशेठही दिलखुलासपणे सामील होऊन जाते.) मराठी वहिवाटीप्रमाणे हा धंदा सोडून जगनशेटच्या मुलाने कुठेतरी फिक्स पगाराची चाकरी पत्करली आहे. फिरोझ, सादिक, अकबर वगैरे नावांची उत्तर प्रदेशातून आलेली चटपटीत पोरे जगनशेठचे धि बॉम्बे हेअर कटिंग सलूनसांभाळतात. 
नमस्कार चमत्कार झाल्यावर जगनशेठ विचारतात, ‘‘तुम्ही काय बाँबेलाच शिफ्ट झालात म्हणे! कसं काय राहाता तुम्ही त्या गर्दीत. लोकलमध्ये आपली बॅग पकडलेला हात आपला आहे का दुस-याचा ते उतरेपर्यंत कळत नाही.’’
‘‘तुम्ही कधी आला होतात मुंबईला?’’
‘‘दीड वर्षापूर्वी आलो होतो. रेल्वेत तुमच्या कोणी ओळखीचा आहे का?’’ 
ही खास जगनशेठची स्टाइल. अमेरिकेवर काही टिपणी करायची असेल, तर त्या ओबामाच्या ऑफिसात कोणी ओळखीचा आहे का हो?’ असा प्रश्न विचारणार. 
‘‘का हो?’’
‘‘ती स्टेशनांवरची अलाऊन्समेंट जरा बदलून घ्यायला सांगा.’’
‘‘कोणती हो?’’
‘‘स्टेशन आप की संपत्ती है. इसे साफ सुथरा रखने में हमारी मदद कीजीए.’’
‘‘त्यात काय प्रॉब्लेम?’’ 
‘‘आपल्या लोकांना असं सांगून उपयोग काय? स्टेशनं आहेत का स्वच्छ तुमची?’’ 
‘‘मग काय करायला पाहिजे?’’
‘‘स्टेशन आप के बाप की संपत्ती नहीं है, इसको गंदा मत करो, नाहीतर दांडू मिलेगा, अशी अलाऊन्समेंट करा. बघा कशी चकाचक राहातात स्टेशनं. आपल्या लोकांना हीच भाषा कळते.’’
सलूनसमोरचे वाचनालय कधीच हटले होते. तरी सलूनमध्ये तीन-चार ष्टॅंडर्ड पेपर होते. एक तर इंग्रजी. सगळ्या पेपरांच्या पहिल्या पानावर सानिया-शोएबचा बँडबाजा वाजत होता. जगनशेठची तोफ तिकडे वळवली.‘‘अखेर या पोरीच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला...’’
‘‘...आणि घटस्फोटाचा सुद्धा.’’ क्षणाचाही विलंब न लावता जगनशेठनी वाक्य पूर्ण केले. वर म्हणाले, ‘‘पण, पोरीने शेवटच्या क्षणी गडबड केली.’’
‘‘काय केलं?’’ 
‘‘सरळसरळ लग्नाला तयार झाली.’’
‘‘मग, तुमची काय अपेक्षा होती?’’ 
‘‘मला वाटलं होतं, ती नंतर जाहीर करेल की मीही या हरामखोराशी लग्न करणार नाही. तसा माझा कधीच विचार नव्हता. या भंपक माणसाने माझ्या जिवष्टश्च कंठष्टश्च मैत्रिणीला दगा दिला. त्याचा सूड घेण्यासाठी मी याच्याशी लग्नाचं नाटक केलं.’’ 
‘‘जगनशेठ. अहो, तुम्ही चुकीच्या धंद्यात आलात. हिंदी सिनेमाने एक चांगला स्क्रिप्टरायटर गमावला.’’
 जगनशेठची कळी खुलली. वाणीला धार आली.‘‘आम्ही कसले स्क्रिप्टरायटर? खरे स्क्रिप्टरायटर तुमचे ते राष्ट्रवादीवाले.’’
हीसुद्धा जगनशेठची आणखी एक भाषिक अदा. ज्याच्यावर पुढचा बाँब पडणार आहे तो माणूस लगेच तुमचा.कधीकधी ते तुमची ती रेखा, तुमची ती माधुरी, तुमची ती पामेलाअसंही म्हणतात, म्हणून लोक तुमचे ते राष्ट्रवादीवालेसहन करतात. 
‘‘राष्ट्रवादीवाले कोण?’’
‘‘तुमचे ते आव्हाड आणि आबा.’’
‘‘त्यांनी काय केलं?’’ 
‘‘ती बुटाची बातमी वाचली नाहीत तुम्ही?’’
‘‘कोणती?’’ 
‘‘बुटात म्हणे पावडर टाकतात हिंदुत्ववादी अतिरेकी. तिचा पायाला स्पर्श झाला की माणूस तीन दिवसात खलास. पोस्टमॉर्टेममध्ये सापडतच नाही कशानी मेलाय तो.’’ 
‘‘असा शोध लागला असेल तर?’’
‘‘महेंद्र संधू नावाचा नट माहितीये का तुम्हाला?’’ 
‘‘मला ठाऊक आहे. तुम्हाला तो ठाऊक आहे याचं आश्चर्य वाटतंय.’’ 
‘‘तो काढायचा ना एजंट विनोदवगैरे नावांचे सिनेमे. त्यांच्यात असायच्या अशा बालिश आयडिया. संधूला विचारा तुम्ही. आबा लिहिणार असतील, तर परत सिनेमात काम करायला तयार होईल तो.’’
समोरच्या टीव्हीवर आयपीएलची मॅच, भोजपुरी गाण्यांचे चॅनेल आणि सलमान खानचा सिनेमा यांचा खो खो सुरू. कारागीरांचे डोळे टीव्हीवर खिळलेले. एकाने गि-हाईकाच्या केसांऐवजी कानांवर कात्री चालवली. रक्त निघाले. गि-हाईकाने तोंडाचा पट्टा सोडला. पोरांच्याने तो आवरेना, तेव्हा जगनशेठ मैदानात उतरले. सलूनमधले प्रेक्षकया तेंडुलकरची बॅटिंगबघायला सावरून सज्ज झाले.
‘‘का उगाच आरडताय राव!’’ जगनशेठनी एकदम थंडपणे स्टान्स घेतला, ‘‘एक एवढासा कान कापला, तर केवढा तमाशा करताय. परवा हा पोरगा एकाची दाढी करत होता. तिकडे त्या युसूफ पठाणनी सिक्सर हाणला आणि इकडे ह्याचा वस्तरा कच्चकन फिरला, आख्खं नरडंच चिरलं गेलं गिऱ्हाईकाचं. बादलीभर रक्ताचं थारोळं साचलं होतं. तरी तो बिचारा चकार शब्दानी काही बोलला नाही शववाहिनीत जाईपर्यंत. आणि तुम्ही..’’.. 
पुढचं ऐकायला गि-हाईक खुर्चीत होते कुठे?

(11/4/10)

No comments:

Post a Comment