Tuesday, February 15, 2011

चौथी मिती


तुम्हाला टू डी सिनेमा माहितीये?
म्हणजे आपला नॉर्मल सिनेमा... नेहमी पाहतो तो... त्यात फक्त लांबी आणि रूंदी या दोनच मिती (टू डायमेन्शन्स) असल्यामुळे त्याला टू डी सिनेमा म्हणतात...
आता थ्री डी सिनेमा हा 'थ्री डी' का असतो, ते समजलं असेल ना? त्यात आपल्याला विशिष्ट चष्म्यामुळे खोलीचाही आभास होतो. सुपरमॅन आपल्या अंगावर येतोय असं वाटतं, समुद्राच्या लाटा आपल्या अंगावर उसळतात, खलनायकाने खुपसलेली तलवार आपल्याच पोटात खुपसली जातेय असा भास होतो... आयमॅक्सच्या डोम थिएटरमध्ये हाच अनुभव आणखी भव्य स्वरूपात दिला जातो...
सिनेमा हा खोटा खोटा सिनेमा नाहीच तो तुमच्या आसपासच घडतोय, असा अनुभव देण्याचा हा प्रयत्न आहे. याचीच पुढची पायरी म्हणजे फोर डी सिनेमा. तो तुम्हाला चौथ्या मितीत घेऊन जातो...
पण, आपलं जग तर त्रिमितीच आहे... चौथी मिती वगैरे जाम जड शास्त्रीय संकल्पना आहेत... एकदम वैश्विक... डार्क मॅटर वगैरे अवघड गुंत्यात घेऊन जाणाऱ्या...
चिंता करू नका! सिनेमावाल्यांना धंदा करायचाय... आणि त्यासाठी बोळयानं भरवता येईल असंच पचपचीत काहीतरी विकावं लागतं, हेही त्यांना कधीच कळलंय... त्यांनी ही चौथी मिती त्यांच्या पध्दतीने शोधलीये. म्हणजे ते दाखवणार थ्री डी सिनेमा आणि त्यात चौथ्या मितीची भर घालणार.
ती कशी? तर थ्री डी सिनेमात समुद्राची लाट अंगावर आल्याचा भास होतो की नाही? इथे त्या वेळी तुमच्या अंगावरून खरीखुरी लाट जाणार. समोर गुलाबाच्या ताटव्याचं दृश्य असेल, तेव्हा गुलाबाचा सुगंध येणार, पडद्यावर तापल्या मातीत पावसाचे थेंब तडतडले की थिएटरभर मृद्गंध पसरणार...
...अशा या फोर डी सिनेमाचा पहिला खेळ 2010 साली भारतात होईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे सगळे चॅनेलवाले प्रेक्षकांवर तुटून पडतील, तेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा असतील...
एक सुकन्या : अनुभव फारच चांगला आहे, पण इम्रान हाश्मीचा किसिंग सीन त्याच्या बाजूने दिसतो हा पक्षपात आहे... आम्हाला उदिता गोस्वामीचंच चुंबन घेतल्याचा भास होतो ना!
दुसरी कन्यका : अगं, त्या उंदीरतोंडया इम्रानपेक्षा तीच बरी. फक्त तिने लॅक्मेऐवजी दुसरं कुठलं तरी लिपस्टिक वापरलं तर बरं होईल!
(या सर्व काळात पहिल्या कन्यकेचा बॉयफ्रेंड लाजेने लालेलाल होऊन ओठावरचे लिपस्टिक पुसतो आहे.
.....
अण्णा पावशे : अहो, ती राखी अंगांग हलवत अशी समोर नाच करते, तेव्हा... मजा येते... पण, घामाच्या वासाचा इफेक्ट देण्याची गरज होती का?
....
बाळुअण्णा घारे : छे छे छे! भयंकर अनुभव. अहो, त्या अमिताभ बच्चनला या वयात कशाला गोळीबार करायला लावतात. हात थरथरताना स्पष्ट दिसतो आणि एक गोळी माझ्या कानाला चाटून गेली. तिच्या आवाजाने माझी डुलकी मोडून मी सरळ झालो म्हणून! नाहीतर डोक्याची भकलंच झाली असती माझ्या!
....
निर्वी नरकापुरे (नाकावर रूमाल दाबून) : तो धारावीच्या झोपडपट्टीचा सीन डोक्यात आणि नाकात घुमतोय माझ्या आणि जाम मळमळतंय... (तोंडावर रूमाल दाबून टॉयलेटकडे धावते.)
....
जॉनी डिसुझा : त्या शाहरूख खानला निदान फोर डी सिनेमात तरी सिगारेटी ओढायला बंदी घाला हो! आमच्या संस्थेतर्फे अंबुमणी रामडॉसना निवेदनच पाठवणार आहोत आम्ही.
.....
झंप्या दामले : मला माझे पैसे परत हवे आहेत आत्ताच्या आत्ता. शुध्द फसवणूक आहे हा सिनेमा म्हणजे. अहो, मघाशी ती लाट उसळली पडद्यावर आणि आमच्या अंगावरून गेली, तेव्हा चुकून तोंड उघडं होतं माझं. तोंडात पाणी गेलं ते गोड होतं. असा गोडया पाण्याचा समुद्र काय यांच्या तीर्थरूपांनी बांधलाय की काय? द्या, पैसे परत द्या...

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment