Tuesday, February 15, 2011

गाव


गाव वर्षातून दोनदाच गजबजतं...
एकदा होळीला... नंतर एकदम गौरीगणपतीला.
याच काळात 'मुंबयवाले' गावात येतात ना! सणाच्या दोन दिवस आधी सुमो, ट्रॅक्स, टाव्हेरा, स्कॉर्पिओ भरभरून गावात येऊ लागतात. कुलपं उघडता उघडता 'ओ खोतानू', 'ओ तात्यानू', 'ओ बाईवैनी' अशा हाळया जातात. सणाच्या दिवशी मोदकपुरणपोळयांचे आणि इतर दिवशी चिकनमटणाचे घमघमाट गावभर दरळू लागतात. झाकलेल्या ताटवाटयांतून पदार्थांची देवाणघेवाण सुरू होते आणि दुधाच्या रतीबाचेपाण्याचे निरोप सुटतात. मुंबईत एका उपनगरात राहूनही ज्यांना महिनो न् महिने एकमेकांच्या घरी जाण्याची फुरसत मिळत नाही, असे बाप्ये अंगात शर्ट आणि कमरेला बर्मुडा किंवा पट्टेरी चड्डी अशा गणवेशात खबरबात काढायला फिरू लागतात.
रात्री कधी पत्त्यांसोबत तर कधी पत्त्यांविना गप्पांचे फड रंगतात. चर्चेचा मुख्य विषय राजकारण. गावात दोन मोठया समस्या आहेत. पाणी आणि रस्ते. डोंगरावर वसलेल्या या गावात यायला चांगला पक्का रस्ता नाही म्हणून आसपासच्या गावातला कुणी इथे पैसेवाल्यालाही मुलगी द्यायला तयार होत नाही, असं मुहल्ल्यातला 'शौकत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज'चा (म्हणजे गावातलं एकमेव दुकान याचं, पिठाची गिरणी याची, अडीनडीला दारूचा स्टॉक याच्याकडे मिळतो आणि सगळया सणांची वाजंत्री याची) मालक शौकत सांगतो. शिवाय पोरीला विहिरीवरून पाणी भरावं लागेल, ते वेगळंच. त्यामुळेच गावात मिटिंगा लागतात. देवळांचा जीर्णोध्दार वगैरे उपविषयही असतातच. कोणत्या पक्षानं काय केलं, मागच्या निवडणुकीत कोणती वाडी 'फुटली', का फुटली, आता कोणत्या पार्टीचा जोर आहे, सहा महिन्यांत चकचकीत रस्ता देण्याचं आश्वासन कुणी दिलंय, याच्या रसभरीत चर्चा सुरू असतात.
वातावरण असं की आता सगळे प्रश् सोडवूनच मंडळी मुंबईला परतणार. मग गावातला कुणी शहाणासुर्ता माणूस मुंबईकर पावण्याला सांगतो, 'अहो, हा इथला कायमस्वरूपी टाइमपास आहे. आज इथे मिटिंगा लावणारे, हिरीरीने भांडणारे एकदा मुंबईला गेले की सगळं विसरतात. राजकारण हा इथे जेवढया लोकांचा छंद आहे ना, त्यातल्या एक दशांश माणसांनी जरी तो 'व्यवसाय' म्हणून स्वीकारला असता, तरी आमच्या गावाचा कायापालट झाला असता...'
...'छंदवर्ग' चालू राहतो. पावण्याला प्रश् पडतो, 'असले रस्ते, पाण्याची बोंब, सहा सहा तास लाइट नाही, अशा गावात इतक्या हौसेनं का येत असतील लोक मुंबईहून?' त्याचं उत्तरही हळुहळू मिळत जातं... मुंबईच्या समुद्रातला एक थेंब असलेल्या माणसाची इथे 'ओळख' आहे काहीतरी. इथे कुणी खोत आहे, कुणी शेठ. इथे लहानाचा मोठा झालेल्याला मुंबईच्या 'चंद्रकांतराव'पेक्षा गावचा 'चंद्या' असण्यात जास्त गोडी वाटते. इथे कुणाला कैऱ्या पाडणारं, आडात उडया टाकणारं, नदीत डुंबणारं, रात्री खेकडे धरायला जाणारं बाळपण भेटतं. कुणाला मामेभावाबहिणींबरोबर केलेला दंगा आठवतो... त्यातलीच एक आता त्याची 'सौ' झालेली असते. गावात कुणाकुणाचे, कशाकशाचे धागे गुंतलेले असतात... नव्या पिढीत कुणाचे तसे धागे गुंतलेले नाहीत, याची विषण्ण करणारी जाणीव असते... 
पुढच्या पिढीतही 'गाव' संक्रमित करण्याची धडपड असते...
...'सोनियाचा नाम त्याला रुप्याचं ठसं... ह्यो पालखी कोन द्येव बसं' असं गात होळीला प्रदक्षिणा मारणाऱ्यांच्यात आपला मुलगाही काठी उंचावून रंगलेला दिसला की मुंबईकर गाववाल्याचे डोळे कृतार्थतेने पाणवतात...
सण संपतो. 'मुंबईवाल्यां'ची घरं एकामागोमाग एक कुलुपबंद होत जातात. गाडया भरभरून 'हुंबय'कडे रवाना होतात. मागे उरतो लाल धुरळा आणि खिन्न शांतता...
...पण, एक नक्की.
रस्ता होवो ना होवो,
पाणी येवो ना येवो...
आता गौरी गणपतीत गाव पुन्हा गजबजणार आहे...

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment