यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होताच चित्रपट‘रसिकां’च्या मनात हा प्रश्न आला.. त्याला पुढे जोड होती.. ‘‘बोंबला, म्हणजे याही वर्षी आपल्या सुलोचनादीदींचा नंबर लागला नाही का? ललिताबाई (पवार) तशाच गेल्या..’’त्या दिवशीची सगळी वर्तमानपत्रं पाहिली, तर लक्षात येईल की हाच प्रश्न बहुतेक सगळय़ा, अगदी आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्रांनाही पडलाय.. कारण, सर्व ठिकाणी ही बातमी आली होती ती छोट्या बातम्यांच्या पट्टय़ात. तीही, ‘कागज के फूल’चे छायालेखक व्ही. के. मूर्ती यांना फाळके पुरस्कार’ अशी. ‘कागज के फूल’ का? तर तो भारतातला पहिला सिनेमास्कोप चित्रपट म्हणून आणि तसं वृत्तसंस्थेच्या मूळ इंग्रजी बातमीत दिलंय म्हणून. काही ठिकाणी ‘पाकीजा’ आणि ‘चौदहवी का चाँद’ या सिनेमांचा शीर्षकांमध्ये उल्लेख. या सगळ्या सिनेमांचं छायालेखन मूर्तीसाहेबांनीच केलंय आणि ते ग्रेटच आहे. पण, ती त्यांची ‘ओळख’ कशी होऊ शकते?
(24/1/10)
‘मुकद्दर का सिकंदर’, ‘हम’ आणि ‘पा’ या चित्रपटांतील अभिनेते अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव पुरस्कार, अशी बातमी वाचली, तर काय वाटेल?.. या तिन्ही सिनेमांमधील अमिताभ यांचा अभिनय उत्कृष्ट आहेच, पण असे रँडमली निवडलेले कोणतेही तीन सिनेमे ही त्यांची शीर्षकयोग्य ‘ओळख’ नाही ना! त्याचप्रमाणे, उपरोल्लेखित तीन सिनेमे ही मूर्तीसाहेबांची ओळख नाही; तर ‘गुरुदत्तचे छायालेखक’, ‘प्यासा, साहिब बिवी और गुलाम आणि कागज के फूल’चे छायालेखक’ ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या सगळ्या कार्यकर्तृत्त्वाचं सत्त्व त्या झगझगीत ओळखीत सामावलेलं आहे. आता घटकाभर असं गृहीत धरा की व्ही. के. मूर्ती यांच्या या ख-या ओळखीचंही सर्व ‘माध्यमादित्यां’ना नीट आणि नेमकं आकलन झालं असतं, तरी ही बातमी पहिल्या पानावरच्या छोट्या बातम्यांच्या चौकटीच्या बाहेर पडली असती का? तिला त्यापेक्षा मोठी जागा मिळाली असती का आणि मिळाली असती तरी वाचकांनी ती वाचली असती का?त्याचवेळी, मूर्ती यांच्याऐवजी त्यांच्या काळातील एखाद्या नट-नटीला हा सन्मान लाभला असता, तर? अगदी पहिल्या फळीतल्या नट-नटीची सोडा, दुय्यम फळीतला कोणी.. म्हणजे, आयुष्यभर मान डुगडुगवत ‘बेटा, ये तुमने क्या कर दिया’ छापाचे करुणार्त डायलॉग फेकणारा स्टीरिओटाइप चरित्र अभिनेता किंवा सात्त्विक चेह-याने शिवणयंत्र चालवून चाळिशीतल्या कॉलेज‘युवक’ हीरोला ‘गाजर का हलवा’ खिलवणारी प्रेमस्वरूप माँ किंवा जो कोणालाच काही आठवत नव्हतं त्या काळापासून सिनेमात होता मात्र, ज्याला कधी पडद्यावर पाहिल्याचं कोणालाच आठवत नाही, असा एखादा अतीव जुनापुराणा नट (प्राचीनपणा हेच ज्याचं क्वालिफिकेशन) असा कोणीही.. साडे तीन तासांच्या सिनेमात भले साडेतीन मिन्टं का होईना पण, पडद्यावर झळकणारा ‘चेहरा’ हा या वर्षीच्या फाळके पुरस्काराचा मानकरी ठरला असता, तर काय झालं असतं? तेही सोडा. गीतकाराने लिहिलेले गीत संगीतकाराच्या चालीवर सुरात आणि योग्य भावदर्शनासह गाणे, हे (आणि एवढंच) ज्यांचं काम आहे, अशा पार्श्वगायक-गायिकेला हा पुरस्कार जाहीर झाला असता तर? तर ती बातमी केवढी मोठी झाली असती. त्या काळातल्या असंख्य समकालीनांनी मनातल्या मनात बोटं मोडत वरपांगी मात्र या पुरस्कारप्राप्ताच्या अभिनयकुशलतेचे गोडवे गाणा-या ‘प्रतिक्रिया’ दिल्या असत्या. तमाम मंत्र्यांकडून अभिनंदनपर संदेश आले असते. सर्व वर्तमानपत्रांच्या सिनेमाविषयक पुरवण्यांची त्या आठवडय़ाची ‘सोय’ लागली असती. त्याचे/तिचे पाळण्यातले, झबल्यातले, तारुण्यातले आणि म्हातारपणीच्या कारुण्यातले जंगी फोटो छापले गेले असते. सदैव लेखणी पाल्हाळिक कौतुकाच्या पाकात बुचकाळून किंवा अश्रूंमध्ये भिजवूनच लिहिणा-या तमाम आस्वादक लेखकांनी ‘काय ते त्या/तिचे दिसणे, हसणे, पाहणे, बोलणे-अबोलणे, गाणे, मुरकी घेणे, तान घेणे, सारे कसे जीवघेणे’ छापाची भावविभोर दळणं घातली असती आणि दर पंधरवड्याला तोच मजकूर वाचूनही न विटलेल्या ‘रसिकां’नी ती पुन्हा तेवढय़ाच चवीने वाचली असती. पार्श्वसंगीत आणि पार्श्वगायन हे तर मूळ चित्रपटकलेवरचे भारतीय कलम. त्याचा सिनेमाशी थेट संबंध काहीच नाही. पण, कोणत्याही नटाला ‘स्टार’ बनवणारा, त्याच्याभोवती सिनेमा इंडस्ट्री फिरवणारा अभिनय हाही खरेतर सिनेमाकलेच्या केंद्रस्थानी नाही. सिनेमा साकारतो तो लेखन (कथा-पटकथा-संवाद, पण, प्रामुख्याने पटकथा; कारण बिनकथानकाचा आणि बिनसंवादांचा सिनेमा असू शकतो), दिग्दर्शन, अभिनय, छायालेखन आणि संकलन यांच्या एकत्रित कामगिरीतून. या पंचकडीतला अभिनय हा सर्वात दुय्यम भाग आहे. हे पटायला कठीण जात असेल, तर ही उदाहरणं पाहा. सर्गेई आयझेन्स्टाइन या विख्यात रशियन दिग्दर्शकाने एकदा एक फिल्म क्लिप लोकांना दाखवली. त्यात एक गुलाबाचे फूल, मग एक चेहरा, एक हत्यार, मग तोच चेहरा, एक करुण दृश्य, मग तोच चेहरा अशी मालिका होती. प्रेक्षकांना फुलानंतर त्या चेह-यावर रोमान्स दिसला, हत्यारानंतर हिंसक भाव, करुण दृश्यानंतर करुणा. प्रत्यक्षात आयझेन्स्टाइनने एका माणसाचा निर्विकार चेहरा टिपला होता आणि तोच सर्व दृश्यांमध्ये कॉमन होता. त्या निर्विकार चेह-यावर ‘भाव’ उमटले, ते प्रेक्षकाच्या मनात. (मान्यवर भारतभूषण, प्रदीपकुमार, मनोजकुमार, राजेंद्रकुमार यांच्याही संदर्भात असेच घडले असेल काय? एका शॉटमध्ये मधुबाला दिसल्यानंतर पुढे दिसणा-या ठोंब्यातल्या ठोंब्या चेह-यावर आपण प्रेक्षकच मनाने रोमँटिक भाव ‘पाहात’ असणार!)
सिनेमातला अभिनय हा असा सिनेमाकलेच्या इतर अंगांनी साधलेला ‘दृक्परिणाम’ असू शकतो.
आणखी एका चित्रपटात एका लहान मुलाच्या चेह-यावर विशिष्ट प्रकारचा अवघडलेला आणि नंतर सुटकेचा भाव दिग्दर्शकाला हवा होता. तो मुलगा इतका लहान की या भावनांचे वर्णन करून सांगणे अशक्य. मग दिग्दर्शकाने त्या मुलाला कल्पना न देता फ्रेम लावून सिनेमॅटोग्राफरला कॅमेरा चालू ठेवायला सांगून सेटवर त्या मुलाला अकारण झापले आणि अंगठे धरून उभे राहायला सांगितले. काही काळाने प्रेमाने बोलून अंगठे सोडायला सांगितले. या दोन गोष्टींमधून त्याला मुलाच्या चेह-यावर जे हवे होते, ते भाव मिळाले. ते सिनेमात पाहिल्यावर लोकांनी ‘काय नैसर्गिक अभिनय’ अशी तारीफ केली. सिनेमातला अभिनय हा असा करवून घेतलेलाही असू शकतो. आपल्याकडे अॅक्शन हीरो ते संवेदनशील अभिनेता असा प्रवास केलेल्या एका अभिनेत्याचा सगळा अभिनय हा चालू सीनमध्ये फ्रेमबाहेर बसलेल्या दिग्दर्शकाने त्याला करून दाखवलेल्या अभिनयाबरहुकूम असतो, असं म्हणतात, ते याच प्रकारातलं. जवळपासच्या एखाद्या चित्रपटाच्या सेटवर फेरी मारून या. तिथल्या सगळ्या धबडग्यात नट-नट्या या कळसूत्री बाहुल्यांच्या पद्धतीने किती मर्यादित चौकटीत फिरत असतात आणि सिनेमानिर्मितीचे किती घटक त्यांच्याकडून ‘अभिनय’ घडवून घेत असतात, ते समजेल. सिनेमातले मातब्बर अभिनेते रंगमंचाची भूक का बाळगून असतात, तेही उमजेल. मूर्तीसाहेबांच्या वाट्याला असले उमाळे आले नाहीत, हे एका अर्थी बरंच आहे. ते बहुतेकवेळा ‘वरलिया रंगा’ भुलणा-या अजाणबुद्धीचेच निदर्शक आहेत. बाकी काही असो! सिनेमाच्या पंचप्राणांपैकी एक असलेल्या सिनेमॅटोग्राफीसारख्या महत्त्वाच्या अंगाला आपल्या नावाने दिल्या जाणा-या सर्वोच्च सन्मानाचा मान लाभला, तोही व्ही. के. मूर्तीसाहेबांसारख्या दादा माणसाला मिळाला, याबद्दल स्व. दादासाहेब फाळक्यांच्या आत्म्यालाही आनंद झाला असेल. मूर्तीसाहेब कोणाला ठाऊक नाहीत, याबद्दल दादासाहेबांना फारसं आश्चर्य वाटणार नाही. उलट, ते मिष्कीलपणे विचारतील, ‘‘मूर्तीसाहेबांचे सोडा, ज्याच्या नावाने हा सन्मान देतात तो दादासाहेब फाळके कोण, तो कोणत्या सिनेमाचा हीरो होता, असाही प्रश्न पडत असेल तुमच्या ‘रसिकांना’’? (24/1/10)
पूर्वी वाचला तेव्हाही खूप आवडलेला हा लेख नव्याने वाचल्यावर जास्त आवडला...!!
ReplyDelete