Sunday, February 13, 2011

महारिकन अमेराष्ट्रीय

अमेरिकेत फिरताना सतत तिथे राहणारी मराठी माणसं भेटतात.
 
त्यांनाही अमेरिकेत सतत इकडून जाणारी मराठी माणसं भेटत असावीत. कारण, सातासमुद्रापारच्या परदेशात महाराष्ट्रातून आलेले मराठी बांधव भेटत आहेत, याचं त्यांना काही विशेष कौतुक दिसत नाही. आनंदाचं भरतं वगैरे येणं तर फारच दूर. अन्य भारतीयांच्या किंवा भारतीय उपखंडातल्या आशियाईंच्या उमाळेबाज वर्तनापुढे हे अगदीच कोरडंठाक वाटतं. सगळय़ा शुभ्र गो-या, निमगो-या किंवा ठार काळय़ा कातडय़ांच्या गदारोळात गव्हाळ वर्ण दिसला की भारतीय उपखंडातल्या आशियाईंची नजर लकाकते. सगळय़ांच्या वर्तनात, स्वरात आपुलकीचं मार्दव उतरतं. आपला कट्टर दुश्मन पाकिस्तान. पण, पाकिस्तानींनाही हिंदुस्तानींबद्दल निदान परदेशात तरी विलक्षण जिव्हाळा वाटतो. बांगलादेशी तर बंगालीच वाटतात (म्हणूनच इकडेही घुसखोर पटकन ओळखू येत नाहीत). भारतीय माणसांपैकी गुजराती (इथेही) अनेक दुकानांमध्ये दिसतात आणि (इथेही) गोड बोलून वस्तू विकतात. पंजाब दे पुत्तर कायम मेरे देश की धरतीच्या मूडमध्ये. यश चोप्रांच्या सिनेमातच वावरत असल्याप्रमाणे तिकडे आयुष्यभर सरसों दा साग आणि मक्के दी रोटीचं आणि देश की मिट्टी की खुशबूचं दळण सुरू असतं. भारतीय माणूस दिसला रे दिसला की त्यांच्या खातिरदारीला उधाण येतं. नायगारात भेटलेल्या एका पापाजींनी त्यांच्या हॉटेलला दारूचा परवाना नसताना तिथे दारू पाजण्याची मेहमाननवाजी केली होती. आपण एका हिंदू माणसाच्या बेकायदा पासपोर्टवर कॅनडातून अमेरिकेत घुसखोरी केलेली असल्याने आपल्याला शीख असून दाढी बाळगता येत नाही, याची खंत ते (स्वत:ही दोन पेग मारून) व्यक्त करीत होते. तीही कुणासमोर तर जेमतेम एका दिवसाचे पाहुणे असलेल्या अनोळखी मंडळींपुढे. एवढा डेंजरस अघळपघळपणा करण्याचं कारण एकच- आम्ही त्याच्या मायदेशातून आलेले पाहुणे होतो, त्याचे गाववाले होतो.
आयटीवाली दक्षिणी मंडळीही खूप दिसतात, पण ती त्यांच्यात्यांच्या विश्वात रममाण असतात. एकमेकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधत असतात. त्यांचे आई-वडील वगैरे इकडून तिकडे गेलेले पाहुणे मात्र हिंदी भाषा बोलण्याचा द्राविडी प्राणायाम करीत इतरांशी उत्साहाने संवाद साधत असतात. आपल्या लेकरांचं कौतुक सांगत असतात. या सगळय़ांच्या तुलनेत इकडच्या मराठी माणसाला तिकडचा मराठी माणूस मात्र अगदीच साधेपणाने भेटतो. आपण वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाऊससमोर आहोत की पुण्यात अप्पा बळवंत चौकात, असा प्रश्ना पडावा, इतक्या अलिप्त मराठी पद्धतीने. तिथला मराठी माणूस तुमच्या तोंडी मराठी भाषा ऐकून अरे व्वा! महाराष्ट्रातून आलात का? असे सानंदाश्चर्याने विचारत नाही आणि तुमचा काहीसा हिरमोडच होतो. (हा प्रश्ना फजूलच आहे म्हणा! मराठी बोलणारा माणूस महाराष्ट्रातून नाही येणार, तर काय टिंबक्टूहून?) अमेरिकेतला मराठी माणूस इथल्या मराठी माणसाला पाहून आनंदाचे भरते येऊन मिठय़ा वगैरे मारत नाही. आपल्या भाषेचा मज मिळो कोणी अशी त्यांना आस लागलेली दिसत नाही. मराठी माणूस भेटल्याने त्यांना गहिवरून वगैरे येत नाही. जग लहान झालं आहे, कुणीही कुठेही भेटू शकतं, अशी विश्वात्मक भावना त्यांच्यात रुजली की काय?
गंमतीचा भाग सोडा आणि या वर्णनावरून अमेरिकेतली मराठी माणसं माणूसघाणी आहेत, असा स्वस्त निष्कर्षही काढू नका. एकेकाळी अमेरिकेत जाणं हे तुकोबांच्या सदेह वैकुंठाला जाण्याइतकं नवलाईचं आणि रोमांचकारी होतं. त्या वेळी तर विमानप्रवास केलेल्या माणसाला भेटायलाही माणसं जमायची.. काशीला जाऊन आलेल्याच्या पाया पडल्यावर काशीयात्रेचं पुण्य लाभतं, अशातलाच तो प्रकार. पण, हल्लीच्या काळात मराठी माणसांचं परदेशांत, विशेषत: अमेरिकेत जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नुसतं पर्यटनाला जाणारेही खूप आहेत. त्यामुळे, जसं आपल्याला अमेरिकेचं तेवढं कौतुक उरलेलं नाही, तसं तिथे राहणा-या मराठीजनांनाही सातासमुद्रापार मराठी माणूस भेटण्याचं उरलेलं नाही. ज्या काळात तसं कौतुक उभयपक्षी होतं त्या काळात महाराष्ट्रातून गेलेल्या पाहुण्यांचं आगतस्वागत अगत्यानं अमेरिकेतही झालं होतं. पण, त्या आदरातिथ्याचा गैरफायदा घेतला गेला. मराठीतल्या मान्यवरांनी तिकडे पायधूळ झाडताना आपले मातीचे पाय दाखवले. त्यामुळे, अमेरिकेतला मराठी माणूस इकडून जाणा-या मराठी माणसाला थोडा सावधपणे वागवतो म्हणे!
आणखी एक अडचणीचा मुद्दा म्हणजे आदरातिथ्याच्या कल्पनांमधला फरक. इकडून फक्त तिकडची सुखं दिसतात, समृद्धी दिसते. त्यासाठी सगळय़ा कुटुंबाला उपसावे लागणारे कष्ट दिसत नाहीत. इकडची मंडळी अघळपघळ. तिकडचा सगळा कारभार आखीवरेखीव, वेळापत्रकानुसार चालणारा. इकडच्या माणसांना सरबराई म्हणजे अक्षरश: प्रत्येक गोष्ट बसल्याजागी हातात मिळण्याची सवय. तिकडे घरांत मोलकरणी नाहीत, ऑफिसांत शिपाई नाहीत. सगळा समाज स्वावलंबी. तिथे पाहुण्यांनीही अगदीच कुक्कुलं बाळपणा करू नये, अशी यजमानांची माफक अपेक्षा असते. ती अनेकदा पूर्ण होत नाही आणि शक्य ते सगळं करूनही तिकडच्यांना अगत्य नाही, असा कुजकट शेरा ऐकून घ्यावा लागतो.
इथून तिथे जाणा-यांची आणखी एक खोड असते. तो भारतातून अमेरिकेतल्या भारतीयांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोनच आहे, म्हणा ना! इकडचे लोक तिकडच्या माणसांना तुम्ही काय राजे! तुमची काय ब्बुव्वा, ऐश असते! तुमची कमाई डॉलरमध्ये! तुमच्याकडे पैसाच पैसा! असं सदोदित ऐकवत असतात.. तेही साधारण अशा टोनमध्ये की तिकडचे लोक संपन्न आहेत, हा जणू त्यांचा गुन्हाच आहे. या विधानात आणखी एक छुपा वार असतो. तो कधीकधी उघडपणेही केला जातो. आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा, आपली माणसं हे सगळं सोडून तुम्ही निव्वळ पैशासाठी अमेरिकेत आला/गेला आहात. या विखारी बोलण्यात गृहीतक काय की, आपला देश-संस्कृती-भाषा-माणसं हे सगळं भयंकर उच्च दर्जाचं आहे, त्यात पैसा नाही ही फार क्षुल्लक गोष्ट आहे आणि इतकं महान काहीतरी सोडून फडतूस पैशासाठी तुम्ही अमेरिकेसारख्या भुक्कड देशात आला/गेला आहात, म्हणजे तुम्ही किती कमअस्सल आहात पाहा.. हे भयंकर आहे. अमेरिकेतल्या मराठीजनांनी डॉलर मोजून भारतातून आयात केलेल्या, अभिजनांच्या वाचस्पती बुवाने त्यांना त्यांच्याच संमेलनात ऐकवलं, तुम्ही अमेरिकेत आहात म्हणजे भौतिकाच्या कर्दमात लोळत आहात. इथे तुमच्यापाशी पैसा असेल, समृद्धी असेल, पण, सुख नाही. कारण, खरं सुख हे धर्मात असतं. संस्कृतीत असतं. आध्यात्मात असतं. याइतका आत्मवंचनेचा आणि दुटप्पीपणाचा कळस दुसरा नसेल. धर्माचा, आध्यात्माचा, संस्कृतीचा खंदक असलेल्या आपल्या भारतातली मुलं-मुली अमेरिकेकडे डोळा का लावून असतात? फक्त पैशांसाठी? फक्त भौतिक सुखांसाठी? इथल्याच संस्कारांमध्ये वाढतात ना ती? तरीही त्यांना तिथे का जावंसं वाटतं? इकडच्या कुणाच्याही मनात आलं आणि तिकडे प्रवेश मिळाला, हारतुरे घेऊन अमेरिकन मंडळी स्वागताला उभी राहिली, असं नसतं. तिथे जाण्यासाठी काहीएक बुद्धिमत्ता असावी लागते, एखाद्या विषयात गती असावी लागते. ज्यांच्या जाण्याने ब्रेन ड्रेन होतो, असं आपण म्हणतो, त्या ब्रेन्सना इतकं कमी लेखतो आपण! बरं, इकडून तिकडेच लोंढे का जातात भौतिकाच्या कर्दमात लोळायला, तिकडून तेवढय़ाच प्रमाणात गोरे लोक का येत नाहीत इकडे आध्यात्माच्या पुष्पशय्येवर लोळायला? या सुसंस्कृत, धर्मपरायण, पारलौकिक कल्याणकारी प्रदेशात येऊन स्थायिक का होत नाहीत?
आपलं कुणी तिकडे नसेल, तोवरच मंडळी इकडचे गोडवे गातात. याच मंडळींच्या मुला-मुलीला अमेरिकेत नोकरी मिळाली की स्वर्ग दोन बोटं उरल्यासारखा आनंद का होतो? मुलगी अमेरिकेत उजवली गेली की गगन ठेंगणं का वाटू लागतं? मग, जिमखान्यावर कृतार्थ किंवा सार्थक नावाच्या बंगल्यात म्हातारा-म्हातारीने भुतासारखं एकटं राहावं लागलं तरी बिघडत नाही. मुलांचं कसं कोटकल्याण झालं, याचा टेंभा त्या एकाकीपणाच्या दु:खालाही उजळून का टाकतो? आपण किंवा आपला कुणी गेला, तर तो जात्याच हुशार आणि दुसरा कुणी किंवा दुस-या कुणाचा कुणी परदेशात गेला की तो पैशासाठी देश सोडून पळाला! व्वा रे व्वा!
भारताच्या वेगवेगळय़ा प्रांतांमधून अमेरिकेत वेगवेगळय़ा प्रकारची माणसं गेली आहेत. देशांतर्गत स्थलांतरात एक्स्पर्ट असलेली गुजराथी-मारवाडी ही बेपारी मंडळी सगळय़ात आधी जगभर विखुरली. व्यापार आणि पैशाची उलाढाल त्यांच्या रक्तात आहे. पैशासाठी गेलात हा आरोप जास्तीत जास्त त्यांच्यावर होऊ शकतो. पण, त्यात आरोप करण्यासारखा गुन्हा काय? आज त्यांच्यातलेच पाठक, मित्तल परदेशांत स्वत:चं साम्राज्य उभं करतात, तेव्हा आपल्याला त्यांचा अभिमानच वाटतो ना!
महाराष्ट्रातून अमेरिकेत साठ-सत्तरच्या दशकात इंजीनियर-आर्किटेक्ट गेले, सायंटिस्ट गेले, आता डॉक्टर, बँकर, आयटीवाले जाताहेत. ही बहुश: बुद्धिजीवी मंडळी आहेत. पैशाचा हपापा ही काही त्यांची ओळख नाही. कुणाच्या अध्यात ना मध्यात अशा नेमस्तपणे शांत-समृद्ध आयुष्य जगावे, हीच त्यांची अपेक्षा असणार. ती असण्यात पाप काहीच नाही. यांच्यातलं फारसं कुणी पिढीजात श्रीमंत नाही. बहुतेकजण स्वभाषेत शिकून, काबाडकष्ट करून वर आले आहेत. शिक्षणासाठी किंवा चांगली नोकरी मिळाली म्हणून अमेरिकेच्या आकर्षणापोटी ते तिकडे गेली असतील. तेव्हा अमेरिकेतच राहावं, असा काही त्यांचा निर्धार नसणार. उलट तिथे जुळवून घेताना प्रचंड त्रास होतात. कितीही झालं तरी आपण तिकडचे भय्याच. तरीही तिकडची चिकित्सेला उत्तेजन देणारी, ज्ञानाचा सन्मान करणारी, उत्तम जीवनमानाची हमी देणारी समाजव्यवस्था त्यांना जे सुख देते, ते केवळ पैशाने लाभत नाही. कोणत्याही ज्ञानशाखेमध्ये मूलभूत संशोधन किंवा उच्चशिक्षण घेणारी माणसे त्या शाखेला आणि पर्यायाने जगाला समृद्ध करणारी भर टाकत असतात. त्यासाठी सतत मनात तो विषय घोळवत राहणे, त्या विषयावरील अद्ययावत माहिती, संशोधनाच्या यंत्रणा उपलब्ध असणे, मानसिक स्वास्थ्य असणे आणि अवतीभवती पोषक वातावरण असणे, या साध्या गरजांची पूर्तता करणारं वातावरण इकडे किती ठिकाणी, किती प्रमाणात आहे?
तिकडे काही काळ राहून इथे परतल्यानंतर तिकडच्यांचा भ्रमनिरास होतो. इथल्या भ्रष्ट, बेशिस्त, आपमतलबी आणि ढोंगी समाजव्यवस्थेशी जुळवून घेताना तिकडून आलेल्यांना भयंकर त्रास होतो. साध्या साध्या गोष्टींमधली तफावत खुपत राहते. आपल्या मायदेशासाठी काही करावं, ही ऊर्मी इथल्या अनागोंदीमध्ये जिरून, विझून जाते. आपल्या देशापेक्षा अमेरिका हा परका देशच त्यांना आपला वाटू लागतो, हा पराभव कुणाचा? तिकडे गेलेल्यांना इथे खेचून आणण्यासारखं काहीही इथे निर्माण झालेलं नाही, नजीकच्या भविष्यात निर्माण होण्याची शक्यताही दिसत नाही. तिकडच्याप्रमाणे इकडेही मुंबईत भव्य इमारती, टोलेजंग सोसायटय़ा वगैरे तयार झाल्याचं एकमेकांना दाखवून मंडळी टाळय़ा पिटत महासत्ता झाल्याच्या बाता मारत असतात. अशा, बकालीने, दारिद्रय़ाने, अज्ञान, अनास्था आणि भ्रष्टाचाराने वेढलेल्या समृद्धीच्या चिंचोळय़ा नंदनवनांवर महासत्ता नांदत नसतात, मूर्ख लोक राहतात. तरी तिकडची मंडळी अधूनमधून भारतात येऊन आयुष्यात कधीतरी, किमान निवृत्त झाल्यावर तरी आपण इथे येऊन राहू शकतो का, याची चाचपणी करत असतात. त्यातून त्यांच्या लक्षात येत जातं की आपण अमेरिकेत लता मंगेशकरांची सोज्वळ कॅसेट लावून अथर्वशीर्षपठणासह समंत्र गणेशस्थापना करीत आहोत आणि महाराष्ट्रात मात्र स्पीकरच्या भिंती उभारून, फिल्मी गाणी लावून, गणपतीचे कान किटवत, त्याला अचकटपाचकट नृत्यदर्शन घडवत उच्छादरूपी उत्सव साजरा होतोय.. अमेरिकेत जाताना आपण सोबत बाळबोध भोंडला घेऊन गेलो होतो, आता महाराष्ट्रातही गर्भपात क्लिनिकांचा धंदा वाढवणारा, नाचाच्या चालीत शोकगीतंही बसवणारा ठोंब्यांचा रास दांडिया चालतो.. आपल्या आठवणी लग्नाच्या पंगतींमधल्या जिलबी-मठ्ठा-मसालेभाताच्या, अळूच्या पातळ भाजीच्या किंवा पत्रावळीतून ओघळणा-या वांगी-बटाटा रश्श्याच्या. महाराष्ट्रात मात्र आता मराठीजनांची लग्नं गुजराती वेषात आणि पंजाबी थाटात लागतात, तिथे बुफे जेवणात पाणीपुरी आणि चायनीज एका ताटात घेऊन खातात.. आपण ज्ञानेश्वर-तुकारामांचे अभंग आणि समतेचा संदेश देणारी वारकरी परंपरा घेऊन गेलो होतो, गाडगेबाबांची सुधारक वृत्ती आपल्याला वंदनीय होती, इकडे बुवा-बापूंचे, प्रसिद्धीविनायकांचे पेव फुटले आहे आणि वारकरीही सहिष्णुतेची परंपरा सोडून नाठाळांचे माथा काठी हाणायला धावत आहेत.. पुण्याची हवा तेवढीशी निरोगी राहिलेली नाही आणि तिथे छोटासा बंगला बांधण्यापेक्षा अमेरिकेतच एखाद्या कोप-यात बंगला बांधणं परवडेल आणि तिथेच अधिक शांत-निवांत आयुष्य लाभेल, असा साक्षात्कार झाल्यानंतर मग माणसं साहजिकच तिथेच राहण्याचा निर्णय घेतात. त्याची कौटुंबिक, सामाजिक किंमत मोजतात. आपली नाळ आपल्या हाताने मातीत लोटण्याचं दु:ख पचवतात. इकडचे संस्कार घेतलेलं रोप तिकडच्या मातीत रुजवताना जी काही सामाजिक सांस्कृतिक पोकळी निर्माण होते, ती भरून काढण्यासाठी तिकडे संमेलनं होतात. इकडची नाटकं, भावसंगीताचे कार्यक्रम, शास्त्रीय संगीताच्या मैफली आयोजित केल्या जातात. सण-समारंभ साजरे केले जातात. पुस्तकं पोहोचतात, वृत्तपत्रांच्या वेबसाइटवरून महाराष्ट्राची खबरबात ठेवली जाते. कुणी मराठीत रेडिओ चालवतं, कुणी ई-प्रसारण करतं, कुणी पॉडकास्टिंगमधून मराठीपणा जपण्याचा प्रयत्न करतात.
ही सगळी महारिकन (हा शब्द व्यंगचित्रकार मिलिंद रानडे यांचा) मंडळींची दुखणी. म्हणजे आधी महाराष्ट्रीय असलेल्या आणि नंतर अमेरिकन झालेल्या पहिल्या पिढीतल्या स्थलांतरितांची दुखणी. जे अमेरिकेतच जन्मले आहेत, तिथेच वाढले आहेत, त्या अमेराष्ट्रीयांना म्हणजे जन्माने अमेरिकन आणि वंशाने महाराष्ट्रीय असणा-यांना हा त्रास नाही. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला आलेले अनेक महारिकन आई-वडील जिथे तीन दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत मराठी भाषेचं, मराठी कार्यक्रमांचं, मराठी जेवणाचं, त्यांच्या दृष्टीने अमृतमय रसपान करीत होते, तेव्हा त्यांची अमेराष्ट्रीय मुलं मस्तपैकी फिलाडेल्फिया एन्जॉय करीत होती. ती संमेलनाकडे फिरकलीसुद्धा नाहीत. तसं त्यांनी केलंच पाहिजे, असा धाक तिकडच्या व्यक्तिस्वातंत्र्यवादी वातावरणात त्यांचे आईवडीलही घालू शकले नाहीत. गंमत पाहा. आपल्या राज्यात आलेल्या भय्याने छटपूजा सोडून गणेशोत्सव स्वीकारावा, मराठी भाषेत(च) बोलावे, अशी एकीकडे अपेक्षा ठेवायची.. तीही आपण आणि आपली मुलंबाळं महाराष्ट्रात सतत हिंदीत किंवा इंग्रजीत बोलण्याचं स्वातंत्र्य उपभोगत असताना. तिकडेच जन्मलेल्या मराठी मुलांनी मात्र तिकडच्या संस्कृतीत समरस व्हायचं नाही. तिकडे आहे कुठे संस्कृती, असं नाक उडवून म्हणायचं आणि त्या मुलांनी इकडची, त्यांनी कधीच न पाहिलेली, न अनुभवलेली आणि आता मूळ महाराष्ट्रातही तशी न राहिलेली संस्कृती जपावी, असा आग्रह धरायचा? कमाल आहे.
अर्थात, हा महाराष्ट्रीय, महारिकन, अमेराष्ट्रीय तिढा फार काळ टिकणार नाही. अगदी लवकरच तो संपून जाईल. कारण, सगळा गोंधळ होता तो इथून मराठी संस्कार घेऊन तिकडे जाणा-यांमुळे. आता आपण महाराष्ट्रातूनच मराठी संस्कार हद्दपार करण्यात यशस्वी होतो आहोत. कोणीही समंजस, प्रगतीशील, विचारी, बुद्धिमान, ज्ञानपिपासू, चिकित्सक माणूस पुरता घुसमटून जाईल, अशी सगळी व्यवस्था केली जात आहे. इथली मराठी मुलंच आता ब्लू स्कायच्या खाली बसून पिंक रोझचा स्मेल घेतात, अ‍ॅपल नाहीतर बनाना खातात, डॉगी किंवा कॅटचं चित्र काढतात आणि त्यांचे मराठी आईवडील त्यांना खूप प्यार करतात. इंग्रजीत शिकणारी, हिंदी बोलणारी आणि चिकित्सेला नाकारणाऱ्या, अत्यंत ऊग्र, बेदरकार, मस्तवाल, मठ्ठ, कर्मठ, भोंगळपणाला मराठी संस्कृती मानून ती जपणारी पुढची पिढी इथे तयार होते आहे. ती महाराष्ट्रावर मदाची, उन्मादाची, भयाची, न्यूनगंडाची सत्ता गाजवत राहील.. त्याचवेळी अमेरिकेतला महारिकन माणूस तर सोडाच, कोणीही संवेदनशील महाराष्ट्रीय माणूसही अतीव आनंदाने, कोणताही अपराधगंड न बाळगता मनोमन अमेराष्ट्रीय होऊन जाईल. 


(प्रहार, दिवाळी २००९)

4 comments:

  1. Mukesh dada ,

    tula mahit aahe ka , tuza blog vachnyasathi mi chakka proxi site varun blog pahatey...china madhye hi site bann aahe...masta zalay lekh....tu chin la ye aata ....ethlya lokanbaddal sudhha lihita yeil tula...

    sulakshana..

    ReplyDelete
  2. surekh... agdi kharay!!!

    ReplyDelete
  3. श्री. मुकेश माचकर.. नमस्कार ! आपला 'महारिकन अमेराष्ट्रीय' हा लेख वाचला .. आवडला.. अप्रतिम जमलाय.. आपण लिहिलेली ही वस्तुस्थिती तंतोतंत खरी आहे.. त्यातही आपण बारकाईने टिपलेल्या काही गोष्टी.. त्यांची घेतलेली नोंद.. मार्मिक अन् परखड शब्दांत ते नेमकेपणाने मांडण्याचे आपले कौशल्य पाहून खरंतर सलामच करावासा वाटतो.. माणसाच्या दुटप्पीपणाचे जे नमुने आपण पेश केले आहेत ते तर अफलातूनच.. जसे की..
    'आपलं कुणी तिकडे नसेल, तोवरच मंडळी इकडचे गोडवे गातात. याच मंडळींच्या मुला-मुलीला अमेरिकेत नोकरी मिळाली की स्वर्ग दोन बोटं उरल्यासारखा आनंद का होतो? मुलगी अमेरिकेत उजवली गेली की गगन ठेंगणं का वाटू लागतं? मग, जिमखान्यावर ‘कृतार्थ’ किंवा ‘सार्थक’ नावाच्या बंगल्यात म्हातारा-म्हातारीने भुतासारखं एकटं राहावं लागलं तरी बिघडत नाही. मुलांचं कसं कोटकल्याण झालं, याचा टेंभा त्या एकाकीपणाच्या दु:खालाही उजळून का टाकतो? आपण किंवा आपला कुणी गेला, तर तो जात्याच हुशार आणि दुसरा कुणी किंवा दुस-या कुणाचा कुणी परदेशात गेला की तो पैशासाठी देश सोडून पळाला! व्वा रे व्वा!'..
    'आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा, आपली माणसं हे सगळं सोडून तुम्ही निव्वळ पैशासाठी अमेरिकेत आला/गेला आहात.’ या विखारी बोलण्यात गृहीतक काय की, आपला देश-संस्कृती-भाषा-माणसं हे सगळं भयंकर उच्च दर्जाचं आहे, त्यात पैसा नाही ही फार क्षुल्लक गोष्ट आहे आणि इतकं महान काहीतरी सोडून फडतूस पैशासाठी तुम्ही अमेरिकेसारख्या भुक्कड देशात आला/गेला आहात, म्हणजे तुम्ही किती कमअस्सल आहात पाहा..' मुकेश.. पुढील लेखांसाठी तसेच नूतन वर्षाच्याही आपणांस अनेक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  4. Atishay sundar lekh! saglya muddyana haat ghatlay tumhi. kahi vela bhartat rahun ithlya marathi/bhartiy lokana kinva in general american mansikatela samjun ghenyacha prayatna kela tar 'deshdrohi' aslyacha shikka marla jau shakto. tyamule tumcha lekh adhik vandaniy! tumchya saglyach lekhanparamane lekhan ani vicharancha uccha darja disala. manapsun dhanyavaad!
    -Anita

    ReplyDelete