Friday, February 11, 2011

अपघात आणि अभिमान

फार मोठी पंचाईत झाली.
एकदम गोचीच म्हणा ना!
आपण एखाद्याला कौतुकाने डोक्यावर घेऊन नाचावे आणि त्याने आपल्या टाळक्यावर ठण्ठण् थापटून नाच थांबवावा, आपल्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून एक्स्क्यूज मी प्लीज म्हणत उडी मारून स्वत:च्याच मिरवणुकीतून थेट पसार व्हावे, अशातलाच हा प्रकार.

इतकी वर्षे अमेरिकेत राहिलेला आणि आपल्याला अजिबात ठाऊक नसलेला एक माणूस गेल्या आठवडय़ात रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी ठरला. तो मूळ भारतीय वंशाचा आहे, हे समजल्यावर आपल्या राष्ट्रीय अस्मितेला एकदम हर्षाचे धुमारेच फुटले. तामिळनाडूला तिसरे नोबेल, वडोदऱ्यात शिकलेला शास्त्रज्ञ नोबेलचा मानकरी, नोबेलविजेता इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसचा विद्यार्थी अशा विलक्षण अभिमानदर्शक हेडलायनींनी पेपर सजले. अण्णामलाई विद्यापीठाच्या कुणा गोविंदराजननी अरे हा तर माझ्याच हाताखाली शिकलेला वेंकू, अशी गुरुजनयोग्य सलगी दाखवली. रसायनशास्त्राच्या नोबेलचे मानकरी वेंकटरमण रामकृष्णन आता अमेरिका सोडून भारतात कायमचे परतू इच्छितात, अशीही बातमी छापून आली.

अखिल भारतवर्षाची छाती अभिमानाने फुगत चालली होती आणि तेवढय़ात हा हर्षवायूचा फुगा फट्कन् फुटला. तो वेंकटरमण महोदयांनीच फोडला.
ते म्हणाले, मी चिदम्बरममध्ये जन्मलो, हे खरंय, पण, वयाच्या तिसऱ्या वर्षी तिथून अमेरिकेला आलो. त्यामुळे मी भारतात कुठेही शिकण्याचा प्रश्नच येत नाही. एवढंच बोलून ते थांबले नाहीत. नोबेल मिळण्यात किंवा संशोधनात आपलं मूळ भारतीय असणं फारच दुय्यम आहे, कारण, राष्ट्रीयत्व हा फक्त एक अपघात असतो, असा बॉम्बच फोडला त्यांनी.

घ्या आता! हे काका मूळ भारतीय आहेत, म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल एवढा प्रेमाचा उमाळा आला आणि ते म्हणतात, राष्ट्रीयत्वाचे
मोलच काय?

वेंकटभाऊ, तुम्ही अमेरिकेत आहात, म्हणून बचावलात. इथे असतात, तर लाहौल विलाकुव्वत, विचारू नका, काय शोभा झाली असती तुमची. अहो, राखेचे तोबरे दिले गेले असते तुमच्या तोंडी. राष्ट्रीयत्वाचा अपमान म्हणजे इथल्या शंभर कोटी जनतेचा अपमान. कारण, मुळात जन्म नावाच्या अपघातावरच तर आमच्या अस्मितेचा सगळा डोलारा उभा आहे. आम्ही अमक्या धर्मात जन्मलो त्याचा अभिमान; अमक्या भाषेत जन्मलो, त्याचा अभिमान; अमक्या जातीत जन्मलो, त्याचा अभिमान; पोटजातीत जन्मलो, त्याचा अभिमान; अमक्या आळीत जन्मलो, त्याचा अभिमान; अशा नाना प्रकारच्या अभिमानांनी आमची १७ इंचाची छाती नेहमी ७० इंच फुगलेली असते. आम्ही जरा दम खायला उच्छ्वास टाकला की कोणी ना कोणी सम्राट, मोठा साहेब, छोटा साहेब, खोटा साहेब, पितळपुरुष नाही तर कथीलपुरुष येऊन गुरकावतो, तुम्हाला जरासुद्धा अभिमान नाही अमक्या गोष्टीचा? की लगेच आम्ही ओशाळवाणे होऊन छाती फुगवून उभे राहतो.

सारखी सारखी छाती फुगवल्यामुळे डोक्यावर काही परिणाम होतो का हो वेंकटभाऊ! हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात काही पॉइण्ट नाही म्हणा. कारण तुम्ही तर रसायनशास्त्रज्ञ, तुमचा वैद्यकाशी काय संबंध? पण, छाती फुगवली की डोकं बंद होतं, मती कुंठित होते, बुद्धी चालेनाशी होते, असा आमचा अनुभव आहे. कारण, हल्ली आम्ही कशासाठी छाती फुगवतोय, याचा जराही विचार न करता आदेश आला की चावीच्या बाहुल्यांप्रमाणे छाती फुगवतो. कुणी म्हणतं, तुम्ही हिंदू आहात, याचा अभिमान बाळगा.. आमची छाती तीन इंच वर. कुणी म्हणतं, अरे, शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलात, याचा अभिमान बाळगा.. आणखी तीन इंच वर. कुणी म्हणतं, जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतात जन्मलात, याचा अभिमान बाळगा.. घ्या आणखी तीन इंच.
या सगळय़ा अभिमानांमध्ये काही विसंगती आहे, याचा आम्हाला पत्ताच नाही. मराठीचा जाज्वल्य अभिमान बाळगायचा, तर भारतीयत्वाचं काय करायचं? कारण, आमची मराठी अस्मिता म्हणजे परप्रांतीयांच्या (म्हणजे फक्त रस्त्यावरच्या भय्याच्या बरं का-धनदांडग्या गुजराती, मारवाडी, जैनांच्या नव्हे) माथी पडणारी सणसणीत काठी! हिंदुत्वाचा अभिमान बाळगायचा, तरीही भारतीयत्वाचा संकोचच. कारण, भारतीयत्वात तर मुस्लिम, ख्रिश्चनही येतात. असा सगळा गोंधळ.

पण, तुम्हाला सांगतो वेंकटभाऊ, एकदा छाती फुगवण्याची नीट प्रॅक्टिस झाली ना की असले प्रश्नच पडत नाहीत. मग, अभिमान बाळगण्यासारखं आणि पोकळ अभिमानापलीकडे खरोखरच काय काय आहे आपल्याकडे, याची प्रांजळ चिकित्सा तर दूरच राहिली. देशप्रेम म्हणजे एखादा भूभाग, केवळ आपण तेथे जन्मलो म्हणून जगातला सर्वश्रेष्ठ भूभाग मानण्याची प्रवृत्ती, ही जॉर्ज बर्नार्ड शॉची प्रसिद्ध व्याख्या आमच्या देशप्रेमाबरोबरच धर्मप्रेमाला, भाषाप्रेमाला, प्रांतप्रेमाला, शहरप्रेमाला, गल्लीप्रेमालाही लागू पडते.

आताही पाहा. तुम्ही कोण आहात, हे कालपर्यंत आम्हाला ठाऊक नव्हतं आणि ते जाणून घेण्याची गरजही भासली नव्हती. आताही तुम्हाला नेमका कसला पुरस्कार मिळालाय आणि कशासाठी, असं विचारलं, तर आम्ही ततपपच करू. असं संशोधन परदेशातच का होतं? तुम्हाला संशोधनासाठी तिकडेच का राहावं लागतं? तिकडच्यासारखं ज्ञानमार्गी वातावरण, मूलभूत संशोधनासाठीच्या सोयीसुविधा इकडे का तयार होत नाहीत? तुम्हाला तुमच्या मायदेशात का परतावंसं वाटत नाही? हे प्रश्न आम्हाला पडत नाहीत. त्यांच्या खोलात आम्ही जात नाही. जगात तुमचं नाव झालंय आणि तुम्ही आमचे गाववाले आहात, एवढंच आमच्यासाठी महत्त्वाचं.

कधी कधी एखाद्या उच्छ्वासाच्या क्षणी प्रश्न पडतो की, आम्ही छोटय़ा छोटय़ा गोष्टींचे इतके दुराभिमानी कधी झालो? आता विश्वात्मके देवे असा थेट वैश्विक विचार करणारा, अखिल विश्वासाठी पसायदान मागणारा एक ज्ञानेश्वर आमच्याकडे बाराव्या शतकात होऊन गेला होता ना. त्याची परंपरा कुठे लुप्त झाली? ज्ञानेश्वराचं आम्ही कसं लोणचं घालतो, तर पसायदान आम्ही शाळकरी पोरांना पावणेचार मार्कासाठी शिकवतो, त्याच्या सोप्या अभंगांच्या कॅसेटी लावतो, दरसाल त्यांच्या पालखीची वारी काढतो आणि त्याच्यावरचे ट्रिकसीनयुक्त बालबुद्धीचे चित्रपट भक्तिभावाने बघतो.. त्यांचं ते विश्वात्मक मागणं हायर मराठीत असल्यामुळे आमच्या डोक्यावरून जातं, हे एक बरंच आहे.. कारण, त्याचा अर्थ कळता तर ज्ञानोबांनी आता महाराष्ट्रात्मके देवे असं का म्हटलं नाही, यावरूनही आमची अस्मिता दुखवायची.

(18/10/09)

6 comments:

 1. sir comment dyayla mi pillu ahe pan but i'l say nice
  regards
  vaidehi rane

  ReplyDelete
 2. सर खरच...अप्रतिम लेख लिहिला आहे...अशी आपली भारतीय मंडळी जिचे तंतोतंत वर्णन तुम्ही करून विचार करायला भाग पाडले.

  ReplyDelete
 3. Agdi fact ahe . Bhartachya baher jyani nav kela ashya lokana dokyawar basvaichi aapli parampara ahe.

  ReplyDelete
 4. NCE...Dusryancha kautuk karto apan manapasun pan apan tyatun kahich ghet nai fakta tonda warach asata apla swataha kahi karun dakhwat nahi...tyatun kahi shikat nahi apan...

  ReplyDelete