Friday, February 11, 2011

नुस्ती अडगळ खंडेराव नुस्ती अडगळ!

उदाहरणार्थ तुम्हाला काय जातंय सांगायला खंडेराव की फक्त गोष्टच सांगत जा राव म्हणून.
 
हल्ली सांगायला गोष्टच तेवढी कुणाजवळ नसते, बाकी सगळं असतं, हे तर तुम्हालाही माहिती आहे, खंडेराव.
 असे मिशा फेंदारत्साते रोखून पाहू नका.. कितीएक शतकांची नि:शब्द सामसूम इतिहासजमा झाली.. इतकी शतके नि:शब्द घालवल्याचा बॅकलॉग आम्ही केवढय़ा कमी काळात कर्कश कोलाहलाने भरून काढला, ते तुमच्या कानी आलं नाही का खंडेराव! का तुम्हीही आमच्यासारखेच कानामनाने बहिरे होऊन गेलात राव!
पाच हजार वर्षानी या महानगराचं मढं उकरायला आलात खंडेराव. आमच्या बहिरेपणाचा वारसा पाच हजार वर्षं टिकला म्हणायचा!
 
यारू, गोष्ट सांगत होतोच आम्ही, पण ऐकायला कानच शाबूत नव्हते कुणाचे, त्याची गोष्ट सांगू का खंडेराव?
 
आमचा शाप आठवा खंडेराव केवलभृगु क्षत्रियद्वेष्टय़ा ऋषीने दिलेला. सिंधुसुंदरीच्या नावाचा अपभ्रंश होऊनच राहिलो आम्ही. सतत सर्वकाळ कोणाचे ना कोणाचे दास होऊनच राहिलो. आमच्याच नावाच्या सागरात गटांगळय़ा खाल्ल्या आम्ही. शून्यापासून अहिंसेपर्यंत सगळय़ा नका-या गोष्टींचेच शोध लावले आम्ही. पण या सगळय़ा ओम स्वाहाच्या नंतरचा आमचा समृद्ध हा हा हा हा हा हा हा हा ऐकायला येतोय का खंडेराव तुम्हाला? पाच हजार वर्षापूर्वी समुद्रदोस्त झालेल्या आमच्या गगनचुंबी महानगराच्या खंडहरातून घुमत, डहुळत.
  
आमच्या प्या-या, लाडल्या लल्लाच्या जन्मभूवरचा तो नापाक ढांचा आम्ही उन्मादी उठावाने जमीनदोस्त केला, तिथून आमच्या सांस्कृतिक उत्थानाची सुरुवात झाली. ढोल घुमू लागले. ताशे कडाडू लागले. भगवे फडाडू लागले. पावसाळय़ात फुगून वाहत्सात्या या गंगेला कॉपरेरेट कल्चरची मल्टिनॅशनल यमुना येऊन मिळाली आणि या जाखाऊच्या संगमावर आमचा ट्वेंटीफोरबायसेवन बाय थ्रीसिक्स्टीफाय कुंभमेळाच सुरू झाला. वज्रचुडेमंडित अखंड सौभाग्यवती दूरचित्रगणिका तो अनुपम सोहळा लाडेलाडे लाइव्ह टेलिकास्टित करू लागली.
 
अहाहा खंडेराव, काय तो नजारा?
 
सर्वत्र सदासर्वकाळ उत्सवांचा फुफाटा.
 
धतडततडततडततडधतडततडततडततड
 
कोणी 12 थर लावून मनीमायची मटकी फोडतायत.
 
धाडधाडधाड खाडखाडखाड खटॅक
 
आमचे तीन वीर कोसळले.
 
आमचे पाच.
 अरे हट! तुमच्या दोघांचे फक्त पायच तुटलेत नि एकाचा हात मोडलाय. आमचे तिघेही स्वर्गलोकी पुण्यप्रयाणित झालेत. धतडततडततडततडधतडततडततडततड
आता टेंभ्याच्या चौरस्त्यावर स्मारक उभारलंय. हंडी फोडणाऱ्या गोविंदाचं. फुल टु सोन्याचं. हंडी फोडणा-या गोविंदाच्या पुतळय़ाच्या डोक्यावर हेल्मेट आहे. संस्कृतीबरोबरच सुरक्षा महत्त्वाची. केवढा मोठा संदेश आहे! धतडततडततडततडधतडततडततडततड
 
कोणी 77 फुटी मूर्ती उभारलीये कोणी 82 फुटी.
 
सगळे रस्ते चौडे करा. सगळे खड्डे 10 दिवसांसाठी पार्सल करा.
 
सगळे पूल पाडा. फ्लायओव्हर उचकटून टाका.
 
श्रींचे आगमन निर्विघ्न झाले पायजेलाय.
 
गल्लोगल्लीचे भंपकराव भुस्कुटे पोस्टरापोस्टरातून दात विचकून दम भरतायत शुभेच्छांचा.
 
भक्तांनो, टूट पडो.
 
इधर का गणपती सेलिब्रेटी को पावताय.
 
इधरका गणपती नवसको पावताय.
 
आवो, रांग लगावो. चार दिन बाद दर्शन मिलने का गॅरंटी.
 
धतडततडततडततडधतडततडततडततड
 
अरे आमचा सेट दोन करोडचा.
 
अरे आमचा सेट पाच करोडचा.
 
अरे हट! तुमच्याकडची मुजिक शिष्टम डबडा. अजूनपर्यंत चार लोकांचे पण कान नाय फोडले. आमच्या शिष्टमनी अख्खा हॉस्पिटल उडवून दिला.
धतडततडततडततडधतडततडततडततड
 
कोणी फेर धरलाय दांडय़ामारामारीच्या नाचाचा.
 
उत्तररात्रीपर्यंत ही मारामारी आणि नंतर जोडय़ाजोडय़ांनी ती मारामारी.
 
अरे, आमच्या दांडियात 17 सेलिब्रेटी नाचल्या.
 
अरे, आमच्या दांडियात 24 सेलिब्रेटी नाचल्या.
 
अरे हट, तुमच्याकडचे सगळे मराठीतले टीव्हीस्टार. आमच्याकडे सगळा हिंदीतला सड्डम माल, यारू धतडततडततडततडधतडततडततडततड
 
कोणी दहा हजाराची माळ लावतोय.
 
तडतडतडतडतड
 
कोणी पंचवीस हजाराची माळ लावतोय.
 
कडकडकडकड
 सुंई सटक
अरे, माझ्या रॉकेटनी तर आकाशातल्या विमानाला
 
टक्कर दिली.
 
अरे हट, चंद्र बघ कसा भडभडून पेटलाय, माझ्याच रॉकेटनी वेध घेतलाय त्याचा.
 
धतडततडततडततडधतडततडततडततड
 
फक्त गोष्टच सांगत जा म्हणालात खंडेराव, म्हणून सांगतो.
 नुस्त्या बेंबीच्या बळावर समृद्ध वारसा मिळू शकत असेल. पण तो नुस्त्या बेंबीच्या देठापासून बोंबाटून टिकवता, वाढवता येत नाही..त्यातून निर्माण होते ती विश्वव्यापी अडगळ.. समृद्ध बिमृद्ध काही नाही, खंडेराव, नुसती अडगळ.


(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(11/9/10)

No comments:

Post a Comment