Sunday, September 4, 2011

बालकथा : वेडा चाफा!

राजाला फुलांची फार आवड. त्याच्या बागेत देशविदेशांतली असंख्य प्रकारची फुलझाडं होती. कितीही काम असो, राजा रोज सकाळी आणि संध्याकाळी बागेत एक तरी फेरी मारायचाच. सोबत प्रधानजी, राणीसाहेब आणि बागेचा म्हातारा माळी हे असायचे.
 
राजाचीच बाग ती! राजा येतोय असं पाहिलं की फुलं फुलू लागायची. गुलाबांमध्ये अधिकाधिक मधुर सुगंध पसरवण्याची अहमहमिका सुरू व्हायची. तळ्यातली सगळी कमळं उमलून पाणीच दिसेनासं व्हायचं. रातराणी तर वेळकाळ सोडून उमलायची. राजा बागेत आला की प्राजक्ताचा मंद सडा पडू लागायचा आणि सूर्यफुलं सूर्याकडे असलेली तोंडं फिरवून ती राजाकडे करायची. राजा जाईल तशी तोंडं फिरवायची. राजा फूल खुडायला हात पुढे करायचा, तेव्हा तर सगळी फुलझाडं पुढे झुकायची. जणू माझं फूल घ्या, माझं फूल घ्याअसंच बोलत असल्यासारखी वा-यावर डोलायची. कारण, त्या दिवशी राजा ज्या झाडाचं फूल खुडेल, त्याला पौष्टिक खतांचा वाढीव खुराक मिळायचा.
 राजा खूष होऊन खुडलेलं फूल राणीसाहेबांच्या केसांमध्ये माळत माळीबुवांना म्हणायचा, ‘‘व्वा माळीबुवा, व्वा! फुलझाडांना शिस्त असावी तर अशी!’’
अतिशय प्रसन्न मनानं बागेत फेरफटका मारताना राजाच्या कपाळावर फक्त एकाच ठिकाणी हलकीशी अठी उमटायची. त्याच्या आखीवरेखीव बागेत फक्त एकच झाड कोणीही न लावता वेडय़ासारखं वाटेतच आपोआप उगवून आलं होतं. ते राजासाठी कधी फुलायचं नाही, कधी झुकायचं नाही, नुसतंच रासवटासारखं आपल्या मस्तीत वा-यावर झुलत राहायचं. राजानं एक-दोन वेळा माळीबुवांकडे या झाडाबद्दल नापसंती व्यक्त केली होती- पण माळीबुवांनी ‘‘वेडं झाड आहे ते, सांभाळून घ्या’’ असं सांगून वेळ मारून नेली होती. माळीबुवा राजाच्या आजोबांच्या काळापासून बाग सांभाळत होते. राजाला त्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं होतं. त्यांच्यामुळेच ते झाड वाचलं होतं. पण, राजा त्या झाडाशेजारून झटकन जाताना त्याच्याकडे पाहणंही टाळायचा.
 
साक्षात राजाच असं वागायचा म्हटल्यावर बाकीची फुलझाडंही या झाडाला नेहमी चिडवायची, ‘वेडा चाफा, वेडा चाफा.’’ काही फुलं तर पानांच्या टाळ्या वाजवत गाणंही म्हणायची, ‘‘चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना..’’ हे सगळं वेडय़ावाकडय़ा आणि उंच वाढलेल्या चाफ्याच्या कानावर तरी पडत होतं की नाही कोणास ठाऊक! त्यानं कधी त्या सगळ्याची दखल घेतल्याचं दिसलं नाही. तो आपला आपल्याच तंद्रीत.
 
एके रात्री राजा फुलबागेशेजारीच असलेल्या आपल्या शयनकक्षात गाढ झोपेत असताना एक गंमत झाली. मध्यरात्रीच्या सुमारास वा-याची एक हलकीशी झुळूक सोबत सुगंध घेऊन आली. आधी राजानं झोपेतच कूस बदलली. मग नाक खाजवलं. मग उठून थोडं पाणी प्यायलं. तरी अस्वस्थ भावना कमी होईना. राजा आता जागाच झाला. आपल्याला कसल्याशा धुंद करणा-या सुगंधानं जागं केलंय, हे त्याच्या लक्षात आलं. बागेतल्या यच्चयावत सगळ्या फुलांच्या सुगंधाशी आपला परिचय असताना हा अनोळखी सुगंध कसला, या विचारानं राजा तडक उठला आणि बागेकडे निघाला. त्याच्या चाहुलीनं माळीही जागा होऊन सोबत चालू लागला. बागेतल्या फुलांना राजा या वेळी येण्याची सवय नसल्यानं ती सगळी गुडुप्प झोपून गेली होती. ताड ताड चालत राजा थेट चाफ्यासमोर येऊन उभा ठाकला.. त्याचा संशय बरोबर निघाला होता.. वेडा चाफा वेडय़ासारखा फुलला होता. त्याच्या खाली पांढ-या, नाजुक फुलांचा ताजा सडा पडला होता. राजाची दखलही न घेता चाफा वा-यावर झुलत होता.. त्याच्या पानांमधून वाहणा-या वा-याची जणू शीळ वाजत होती आणि राजावर नाजुक फुलांचा अभिषेक होत होता.. राजाला वेडावणारा गंध चाफ्याच्याच फुलांचा होता.
 
मात्र, राजा खूष नव्हता. किंबहुना तो भयंकरच संतापलेला होता.
 
‘‘या झाडाची ही हिंमत! रात्रीबेरात्री फुलून मला- या राज्याच्या राजाला जागं केलं या झाडानं!’’
 
‘‘आता राजेसाहेबांना जागरण होणार. पुढचा त्यांचा सगळा दिवस खराब जाणार. राज्याचं केवढं मोठं नुकसान होणार!!’’ राजाच्या संतप्त आवाजानं जाग्या झालेल्या इतर फुलांमध्ये- राजाला ऐकू जाईल अशी- कुजबूज सुरू झाली.
 
‘‘माळीबुवा, ताबडतोब तोडून टाका हे झाड!’’ खडबडून जागा होऊन राजामागे धावत आलेला प्रधान डोळे चोळत जांभई देत म्हणाला.
 
‘‘उद्या सकाळी हे झाड इथे दिसता कामा नये,’’ राजानं आदेश दिला आणि तो आला तसा ताडताड निघून गेला.
 
दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे राजा बागेत आला. त्याला पाहून सगळी फुलं उमलली. सूर्यफुलांनी सूर्याऐवजी राजाकडे तोंडं फिरवली. रमतगमत, शीळ घालत राजा वेडय़ा चाफ्याजवळ आला आणि संतापानं लालेलाल झाला. ‘‘माळीबुवा,’’ राजाने ओरडूनच हाक मारली, ‘‘हा वेडा चाफा इथे अजून कसा? मी तुम्हाला सांगितलं होतं ना..’’
 
संतापानं थरथरणा-या राजापुढे शांतपणे उभे राहून माळीबुवा म्हणाले, ‘‘राजा, माझं काम झाडांना आई-बापाच्या मायेनं वाढवण्याचं आहे, त्यांना तोडण्याचं नाही. जे माझं काम नाही, ते मी करू शकत नाही.’’
 
‘‘पण, हा चाफा.. हा चाफा माझा उपमर्द करतो, तो मी कसा खपवून घेईन. माझा अपमान हा राज्याचा अपमान. सगळ्या जनतेचा अपमान. अखिल जगताचा अपमान..’’
 
‘‘..असं काहीही नाही,’’ माळ्यानं आता राजाच्या डोळ्याला डोळे भिडवले, ‘‘आपल्या सोबत असे तोंडपुंजे अधिकारी आणि आपल्या बागेत अशी लाळ घोटणारी फुलं असली की राज्यकर्त्यांची अशी गोड गैरसमजूत होत जाते. राजा, हा चाफा आणि त्याचा सुगंध तुला हेच सांगतोय की तूही एक माणूस आहेस.. हाडामांसाचा, साधा माणूस. तुझी दखल न घेता तुझ्याच बागेत एक झाड छान फुलू शकतं.. हे एकच झाड असं आहे जे राजाच्या येण्याजाण्याची फिकीर करत नाही, कारण त्याला तुझ्या अस्तित्वाची खबरच नाही. आपल्याला कोणी पाहणारं आहे का, कोणी आपल्या फुलांचा सुगंध घेणारं आहे का, याचा विचार न करता आपल्या मस्तीत राहणारं, आपल्याला हवं तेव्हा फुलणारं. राजा, शिस्तीत फुलणारी आणि तोच तोच सुगंध देणारी खूप झाडं आहेत तुझ्या बागेत. अर्ध्या रात्री तुला झोपेतून उठवून खेचून आणणारा स्वर्गीय सुगंध फक्त एकाच झाडाच्या फुलाला आहे.. असं वेडं झाड आपल्या बागेत असायला भाग्य लागतं राजा!’’
 
विस्फारलेल्या नजरेनं माळीबुवांकडे पाहणा-या राजाच्या डोक्यावर अल्लाद एक फूल पडलं. राजानं रागानं वर पाहिलं. जमिनीवरचं फूल उचलून हुंगलं आणि चाफ्याच्या बुंध्यावर- जणू एखाद्या मित्राच्या पाठीवर थोपटावं, तसं प्रेमानं थोपटून तो शीळ घालत राजवाडय़ाकडे निघाला.

(किलबिल, प्रहार)

8 comments:

 1. हि गोष्ट जरी लहान मुलांच्या 'किलबिल' सदरात छापली गेली असली तरी मोठ्या माणसांनी बोध घेण्यासारखे यात बरेच काही आहे.

  ReplyDelete
 2. so you can write this as well....

  ReplyDelete
 3. खूप छान गोष्ट आहे, धन्यवाद

  ReplyDelete
 4. खूप सुंदर पोस्ट

  ReplyDelete
 5. छान आहे वेड्या चाफ्याची गोष्ट 👌

  ReplyDelete
 6. गोष्ट वाचून, माझा अपमान म्हणजे समस्त मराठी माणसाचा अपमान, समस्त महाराष्ट्राचा अपमान, शिवरायांचा अपमान याची आठवण झाली.

  ReplyDelete
 7. वा ! मार्मिक !

  ReplyDelete