Sunday, September 25, 2011

प्राणीसेना जिंदाबाद!

परलोकातल्या परदादा-परदादी पार्कात नेहमी तुरूतुरू चालणारे खुटखुटीत पणजोबा आज कोप-यात शांत बसून होते. आबा टिपरेंनी एका फेरीनंतर चाल मंद केली आणि त्यांच्याजवळ जाऊन काळजीच्या सुरात विचारलं, ‘‘बरं नाही का वाटत तुम्हाला? पृथ्वीतलावरच्या नातेवाइकांची आठवण येतेय का?’’
 
‘‘नाव घेऊ नका त्यांचं.. त्यांची आठवण न येण्याची काही व्यवस्था असती, तर बरं झालं असतं..’’ पणजोबा भडकलेच.
 
‘‘का हो? एकदम असं काय झालं?’’
 
‘‘काय सांगू तुम्हाला कर्मकहाणी; सगळ्या जगाचं प्रबोधन करत फिरलो आणि दिव्याखालीच अंधार राहिला.’’
 
‘‘म्हणजे?’’
 
‘‘आपल्या मातीचा एक खास गुणधर्म आहे. अनुयायीच पुढा-याचा पराभव करतात. माझे अनुयायी वगैरे फारसे झाले नाहीत, हे बरं झालं म्हणून खूष व्हावं, तर माझ्या मुलाबाळांनीच ती कसर भरून काढली.’’
 
‘‘कशी काय?’’
 
‘‘अहो, मी आयुष्यभर अंधश्रद्धेवर, बुवाबाजीवर कठोर प्रहार केले. भोंदू बाबांची रेवडी उडवली आणि माझाच मुलगा भगवी कफनी घालून बुवा होऊन बसला रुद्राक्षाच्या माळा खेळवत. आता याला काय बोलणार सांगा.’’
 
‘‘नशिबाचे भोग म्हणायचे आपल्या!’’
 
‘‘अहो, पण नॅशनल जिऑग्राफिकसुद्धा उलटावा..’’
 
आबा टिपरे चक्रावले. एकदम नॅशनल जिऑग्राफिक कुठून आला, त्यांना कळेना. पणजोबा बोलतच राहिले, ‘‘आपल्या मुलाबाळांची बुद्धी व्यापक व्हावी, दृष्टी विशाल व्हावी, पृथ्वीतलावर किती विपुल वैविध्य आहे, याची त्यांना माहिती व्हावी, यासाठी मी नॅशनल जिऑग्राफिकची आजीव वर्गणी भरली.’’
 
‘‘चांगलंच केलंत की मग. आंतरराष्ट्रीय ख्यातीचं मॅगझिन ते. किती सुंदर फोटो. किती नेटकी माहिती. मुलं चांगलीच तयार झाली असतील?’’
 
‘‘गप रे माकडय़ा!’’
 
‘‘आँ..’’
 
‘‘बघतोस काय सापडय़ा?’’
 
‘‘अरे बापरे..’’
 
‘‘तुला ठेचून काढेन झुरळासारखा.’’
 
‘‘अहो, काय बोलताय काय?’’
 
‘‘रंग बदलणा-या सरडय़ा!’’
 
आता आपल्यालाच फेफरं येणार की काय, असं आबांना वाटू लागलं. ते काढता पाय घेणार, एवढय़ात पणजोबांनी त्यांना हाताला धरून बसवलं आणि ते म्हणाले, ‘‘हे असं बोलत असतो माझा मुलगा सतत. वयानुसार काही पोक्तपणा, परिपक्वता, सभ्यता यायला पाहिजे माणसात. पण, यानं लहानपणापासून ते सगळे प्राणी पाहिलेले असल्यानं बोलण्यात सतत गाढव, डुक्कर, बैल, नंदीबैल, बगळे, कावळे, वटवाघळं अशी सगळी प्राणीसृष्टी नांदत असते. इथे परलोकात तर अनोळखी लोक मला विचारतात, पृथ्वीवर तुम्ही सर्कस चालवायचात का, म्हणून. परवा एकानं विचारलं, बापाचं पाहून माझ्या मुलाचा मुलगाही तेच शिकलाय. तोंडावरची माशी हाकलायची मारामार आणि भाषा मात्र ही अशी, विखारी, साप-सरडय़ांची. तो कोण तो सिनेमातला ठोकळा- भारतभूषण किंवा त्याच्यासारखाच दुसरा प्रदीपकुमार यांच्यातला कुणी छत्रपती शिवरायांची किंवा संभाजीराजांची भूमिका करायला उतरला, तर काय होईल, तसं वाटतं त्याचं बोलणं ऐकून पाहून. शिवाय फोटोग्राफीचा नाद.’’
 
‘‘अहो, चांगला नाद आहे. आजकाल फोटोग्राफरांना चांगली नोकरी मिळते, जाहिरातींची वगैरे कामं केली, तर फारच चांगले पैसे मिळतात.’’
 
‘‘कामं केली तर ना! यांना आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढायची सवय झालीये. पुरता हवेत गेलाय तो. अक्षरश: हवेत. कोणाचं तरी हेलिकॉप्टर मागून आणतो आणि हवेतून खाली कॅमेरा रोखून फोटो काढतो. आपलं घर पेटलंय, आपले लोक दु:खात होरपळतायत, हे काही याला खालूनही दिसत नाही आणि वरूनही दिसत नाही.
पाहावे कप्पाळ!’’ पणजोबांनी कपाळावर हात मारून घेतला.
 
‘‘पण मग नॅशनल जिऑग्राफिकच्या बरोबर इतर काही सकस वाचायला द्यायचं होतं मुलाला. थोरांची चरित्रं वगैरे.’’
 
‘‘नाव काढू नका थोरांच्या चरित्रांचं. त्यातून आणखी मोठा गोंधळ झाला. त्याला मोठय़ा कौतुकानं कुणब्यांच्या, मावळ्यांच्या, रयतेच्या राजाचं चरित्र सांगितलं आणि यानं त्याचा गोब्राह्मणप्रतिपालक हिंदुहृदयसम्राट करून टाकला. आयुष्यभर एकच खेळ शिवाजी म्हणतो, उठा, शिवाजी म्हणतो, बसा. शिवाजी म्हणतो, मद्राशांना चोपा. शिवाजी म्हणतो, पेटी आली, थांबा. तोच खेळ आता नातूही खेळू पाहतोय.’’
 
‘‘चांगलंच आहे की मग. पेटी येत असेल, तर कोणताही खेळ चांगलाच.’’
 
‘‘ते बरोबर आहे तुमचं. पण, इथे उठा म्हटलं तर उठायला कोणी उरणार नाही, अशी अवस्था येत चाललीये आणि यांच्या डरकाळ्या सुरूच. शिवाजी म्हणतो, लढा, मी फोटो काढून येतो. दोघेही तसलेच.’’
 
‘‘आता हा दुसरा कोण?’’
 
‘‘दुसरा नातू. दुस-या मुलाचा मुलगा. याला सिनेमाचा शौक. घरात थिएटर बांधलंय म्हणे. पॉपकॉर्नचा स्टॉलही असेल शेजारी. त्यामुळे तोंडातून शब्द नुसते लाह्यांसारखे तडतडत असतात. याला कोण तो उंच नट- अमिताभ की कोण तो- त्याचे सिनेमे पाहण्याचा जबरदस्त नाद होता. त्यामुळे सतत डायलॉग फेकत असतो आणि फेकत असतो.’’
 
‘‘चांगलं आहे की मग. अहो, हल्ली चांगल्या स्क्रिप्टरायटरांना आणि डायलॉग रायटरांना मागणी आहे फिल्म इंडस्ट्रीत. कोटींमध्ये खेळेल तुमचा नातू.’’
 
‘‘कधी? स्क्रिप्ट पूर्ण होईल तेव्हा ना! यानी ‘ब्लूप्रिंट’ नावाचं एक स्क्रिप्ट लिहायला घेतलंय ते किती वर्ष झाली लिहितोच आहे. तिकडे गुजरातेत सिनेमाही काढून मोकळा झाला म्हणे कुणी नरेंद्रकुमार. आता याच्यावर त्या सिनेमाचा रिमेक बनवायची पाळी येणार. लिहितो त्या सगळ्या पटकथांची थीम एकच- भाई-भाई.
 भावाभावांमधली दुष्मनी. थोरला धाकटय़ाला वाईट वागवतो आणि धाकटा त्याचा सूड घेतो. शिवाय डायलॉग लिहितो, तो मराठीत. इतर भाषांचा गंध नाही. कारण त्यांचा दुस्वास. आता सांगा मराठीतल्या डायलॉग रायटरच्या मेहनतान्यात चणे-फुटाणे तरी परवडतील का?’’
 
‘‘बरोबर आहे. एकंदर अवघड परिस्थिती दिसते. तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे.’’
 
‘‘अहो मला काळजी वाटतेय ती यांची नाही, यांच्या भजनी लागणा-यांची. आपल्या राज्यात बोलबच्चनगिरीलाच कर्तृत्व मानणारे लोक फार आहेत.’’
 
‘‘खरंय तुम्ही म्हणता ते, पण काळजी वाटण्यासारखी परिस्थिती नाहीये,’’ आबांनी पणजोबांना आश्वस्त केलं, ‘‘लोक तुमच्या प्रबोधनातून काही शिकले नसतील, पण स्वत:च्या अनुभवातून तर शिकतातच ना. यांच्या सगळ्या बेताल बडबडीतून चार घटकांची करमणूक करून घेतात फुकटची आणि आपापल्या वाटेला लागतात.’’
 ‘‘असं असेल, तर बरं आहे,’’ जरा सैलावून पणजोबा उठले आणि हळूहळू चालू लागले. त्यांच्याबरोबर चालताना चेह-यावरची रेषही न हलवता आबा अगदी साळसूदपणे सहज सुरात म्हणाले, ‘‘एक विचारू का राग येणार नसेल तर.. ती राणीची बाग, राणीची बाग म्हणतात तेच तुमचं घर होतं का पूर्वी?’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २५ सप्टेंबर, २०११)

No comments:

Post a Comment