आता एक गुपित सांगावंच लागणार...
शाळेची वाट मी सहसा टाळतो...
पुण्यात कधी येणं झालंच तरी या वाटेकडे पाय वळू देत नाही...
का म्हणून काय विचारता?
तुम्हालाही ठाऊक आहे...
ही वाट फार डेंजर आहे...
या वाटेवर कधी पाय वळले,
तर काहीतरी अजब गजब होऊ लागतं... दाढीमिशा गायब होतात, अंगावरचे कपडे बदलतात, निळं शर्ट आणि खाकी पँट असा गणवेश चढतो मनातल्या
मनात. पाठीवरची `मोठ्ठय़ा
माणसा'च्या कामांची-विवंचनांची
ओझी उतरतात आणि एका अदृश्य दप्तराचंच ओझं चढतं... पहिल्या वळणावर आता चिकूचं झाड आहे
की नाही ठाऊक नाही- पण मला मात्र ते स्पष्ट दिसतं- त्यावर लगडलेल्या भरघोस चिकूंसह.
एक गल्ली ओलांडली की टण्णूचं झाड. टण्णू हे त्या परदेशी झाडाचं विचित्र फळ. केसरांच्या
गोल घट्ट झुबक्यामुळे टेनिस बॉलसारखं दिसणारं. त्याला एक लांब दांडी. ते केसर काढून
टाकले की सिनेमातल्या शेट्टी नामक नटाच्या टकलासारखं तुळतुळीत गोल गरगरीत टक्कल जोडलेली
दांडी उरायची. तो टण्णू लक्ष नसताना कोणीतरी टण्णकन डोक्यात हाणायचा आणि डोळय़ातून पाणीच
काढायचा.
इथपर्यंत पोहोचेस्तोवर मनाच्या डोळय़ांना आसपास सगळी शाळेची मुलंमुलीच
दिसू लागतात. निळं शर्ट, खाकी चड्डी, गर्द
निळा फ्रॉक आणि आत पांढरं शर्ट. कुणी एकटा. कुणी घोळक्यात. कुणी मस्त मजेत. कुणी बावरलेला.
कुणी सायकलवर टांग टाकून. कुणी सायकल हातात घेऊन. कुणी आपल्या तंद्रीत. कुणी कुणाला
शोधतोय... तिकडून येणारा मित्र आता भेटेल का?
होमवर्कच्या वह्या कॉपी करायला वेळ मिळेल का? पुस्तकपेटीतलं पुस्तक बरोबर घेतलं का? काल ज्याचं नाव वर्गशिक्षकांना सांगितलं, तो टेंपरवारी शत्रू आज पट्टीने `हल्ला'
चढवायला कुठे दबा तर धरून बसला नसेल ना? आपल्याला छान वाटणारी `ती'
त्या घोळक्यात असेल का?
आपल्याकडे पाहील का?
पाहिलं तर हसेल का?
एवढय़ाशा जिवाला एक ना अनेक उलघाली.
शाळेत पोहोचल्यानंतर तर हा मोठ्ठा दंगा. शाळेच्या आवारात निळा
महासागरच खळाळतोय. प्राथमिकचे वर्ग सुटलेत. त्यांना घ्यायला आलेले पालक. इंग्लिश मिडियमची
पोरं दडदडा धावत उतरतायत. त्यांच्याशी `लढाई' करत माध्यमिकची
पोरं वर्गांत घुसतायत. घंटा वाजून रेकॉर्डवर `जनगणमन' सुरू
होईपर्यंत नुसता हैदोसदुलाबेधुल्ला!
शाळेची वाट डेंजरस यासाठी की त्या वाटेवर गेलं की शाळा लोहचुंबकाप्रमाणे
याही वयात खेचून घेईल, अशी भयंकर भीती वाटते... शाळेच्या फाटकाजवळ आलं की आत वर्गात जाऊन बसायची ऊर्मी
अनावर होते. अजून असतील का ते बाक? दोन दोन जणांनी बसायचे. समोर पेनसाठी छोटीशी घळ आणि उताराचे डेस्क. खाली दप्तराचा
कप्पा. त्या बाकांवर करकटानं काय काय कोरलेलं. कुणाचं नाव. कुणी चोर आहे. कुणी डँबिस.
कुणा शिक्षकाचा पाणउतारा. कुठे कुठे बारीक अक्षरात कॉपी उतरवून ठेवलेली.
आपला बाकही ठरलेला आणि शेजारी बसणारा मित्रही.
आता तो कुठे आहे याचा पत्ता नाही,
त्याला आपली खबर नाही. तोही येईल का वर्गात? आता कसा दिसत असेल? `ती'
कशी दिसत असेल? घणघणघण घंटा वाजली की बाहेरच्या जगाशी संबंध संपला. आता आपण शाळेचे आणि शाळा आपली.
हात जोडून प्रार्थनेला उभं राहिलं की शाळेतला दिवस सुरू. सगळय़ा वर्गांमध्ये एकाच वेळी
सुरू झालेल्या प्रार्थनेच्या सुरांनी जणू संपूर्ण शाळेवर एक अभेद्य कवच तयार व्हायचं
आणि आत असायचं आमचं सुरक्षित जग. इथे खेळायचं,
बागडायचं, मजा करायची, मस्ती
करायची, हे सगळं
करता करता शिकायचं.
इतर शाळांचं आपल्याला काही ठाऊक नाही- माहिती करून घ्यायची गरजही
पडली नाही. पण, आपल्या
शाळेत घोकंपट्टीवाला अभ्यास कधीच कंपल्सरी नव्हता. एखाददुसरे शिक्षक होते कडकबिडक.
पण, साक्षात
वैद्य संरांसारखे हेडमास्तरच सांगायचे,
``माझ्याकडे एसेस्सीला बोर्डात येण्यासाठी खूप विद्यार्थी आहेत.
पण, नाटय़वाचन, वक्तृत्व,
नाटक, प्रसंगनाटय़दर्शन, विज्ञान प्रदर्शन या सगळय़ा उपक्रमांमध्ये शाळेचं नाव काढशील, अशी मुलं कमी आहेत. तुला हे सगळं येतं तर ते
कर. कशाला दहावीला बोर्डात येण्याच्या फंदात पडतोयस. तुझा मार्ग वेगळा आहे. त्याच मार्गाने
चाल.'' आता बोला.
अशा मुख्याध्यापकानं आणि त्याच्याच तालमीतल्या शिक्षकांनी भरलेल्या
शाळेनं काय दिलं, हा प्रश्न फिजूल आहे. शाळेनं काय दिलं नाही,
ते विचारा. शाळेनं दिलेलं नाही असं आयुष्यात काहीही नाही, असं उत्तर येईल हजारोंच्या मुखातून. आज जे
काही आहे, ते शाळेनंच
दिलंय.
दहा बाय बाराच्या मातीच्या भिंती आणि सारवलेली जमीन यांच्या
ओबडधोबड घरांच्या अंधाऱया वाडय़ांमध्ये वाढलेल्या,
शिक्षणाची परंपराही नसलेल्या फाटक्या तुटक्या धुवट कपडय़ांमधल्या
पोरांना या शाळेनं मायेनं जवळ घेतलं, पोटाशी धरलं. पुरात घरं बुडाली तेव्हा राहायला आसरा दिला आणि पुढे कोणत्याही पुरात
बुडू नयेत अशी भक्कम घरं बांधण्याचा आत्मविश्वासही. मागच्या बाकावरच्या पोरातही काही
ना काही गुण असणारच असा विश्वास बाळगणारी ही शाळा. शाळेला उशीर होत असताना कंडक्टर
आला नाही म्हणून स्वत: कंडक्टर बनून अख्खी बस शाळेपर्यंत विदाउट तिकीट आणणाऱया मुलाला
तंबी देऊन नंतर त्याच्या हिंमतीचं कौतुक करणारी ही शाळा. अभ्यास करायचा, गृहपाठ करायचा,
परीक्षा द्यायच्या,
या चक्राच्या पलीकडे पोरं जे काही करू मागतील ते आनंदानं करू
देणारी, त्यात
सहभागी होणारी ही शाळा. कोणत्याही नव्या उपक्रमात उडी मारायला लावणारी, त्यात तोंडावर पडलो तरी पाठीवर कौतुकाचीच थाप
मारणारी ही शाळा. माझ्या शाळेतल्या पोरांनी भेळेची गाडी टाकली तरी मला त्याचं कौतुकच
असेल कारण तो सचोटीनं, स्वकष्टानं मिळवून खात असेल, असं अभिमानानं सांगणारी ही शाळा. कुठल्या कुठल्या परिसरातले दगडधोंडे गोळा करून
त्यांना साफसूफ करून त्यांच्या मूर्ती घडवणारी ही शाळा.
कॉलेजबिलेज पुढचं फार काही लक्षात राहिलेलं नाही. त्यातलं जे
काही लक्षात आहे ते शिक्षणबाह्य कारणांकरता.
लक्षात राहिली ती शाळाच.
आमच्या नसानसांत भिनलेली.
कसोटीच्या प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची हिंमत देणारी.
जगाच्या बाजारू बुजबुजाटात ताठ मानेनं जगण्याची ताकद देणारी.
कधी कुठे एकटं पडल्यासारखं वाटलं तर पाठिशी सगळय़ा विद्यार्थ्यांचं
अख्खं `अधिवेशन' घेऊन उभी राहणारी.
आता सांगा, कधीही कुठेही मनाचा संपूर्ण ताबा घेणारी अशी शाळा डेंजरस नाही का?
म्हणूनच आजही शाळेची वाट मी टाळतो... कटाक्षानं टाळतो...
त्याचा काही फायदा नाही,
हे ठाऊक आहे...
ही वाट टाळली तरी अवचित कधी डोळे मिटल्यावर मनात ती वाट समोर
येते आणि बोट धरून शाळेला नेते...
किती मोठे झालो, यानं काहीच फरक पडत नाही. माझी शाळा अशी सॉलिड आहे की अजूनही तिचं बोट सुटलेलं
नाही... अख्ख्या आयुष्यात ते सोडायची इच्छाही नाही...
(पूर्व-प्रसिद्धी : आपटे हायस्कूल स्मरणिका)