1. भारतात फुटबॉलवर बंदीची मागणी
हा खेळ संस्कृतीविरोधी
असल्याची टीका
फुटबॉल हा खेळ भारतीय
संस्कृतीच्या विरोधात असल्यामुळे त्याच्यावर सरकारने ताबडतोब बंदी घालावी आणि फुटबॉल
वर्ल्ड कपचे थेट प्रसारण रोखावे, अशी मागणी मौजे रिकामटेकडे येथील संस्कृतीरक्षक
परिवारातर्फे करण्यात येत आहे. भारतात फुटबॉल खेळायला, पाहायला, विकायलाच नव्हे,
तर हा शब्द उच्चारायलाही बंदी करण्यात यावी अशी मागणी परिवाराचे प्रमुख स्वामी
आचरटानंद यांनी केली आहे.
भारतीय संस्कृती ही
कोणालाही पाय लागला तर नमस्कार करण्याची आहे, फुटबॉलच्या खेळामध्ये एवढे खेळाडू
मिळून त्या एवढय़ाशा बॉलला दीड तास लाथा घालत असतात. ते जमले नाही, तर एकमेकांनाही
लाथा घालत असतात. हा हीन पाश्चिमात्य संस्कृतीतून उद्भवलेला राक्षसी स्वरूपाचा खेळ
पाहत लहानाची मोठी होणारी मुले भविष्यात आपल्या आईबापांना लाथा घातल्याशिवाय
राहणार नाहीत, असा इशारा स्वामीजींनी दिला आहे. ते म्हणाले, आजकालची मुले चुकून
कोणाला पाय लागल्यानंतर नमस्कार न करता नुसतेच `सॉरी' म्हणतात, हा या उर्मट
खेळाच्या प्रसाराचाच परिणाम आहे. संस्कृतीरक्षकांनी समाजाच्या व्यापक आध्यात्मिक
आणि आत्मिक विकासासाठी समाजाला शिस्त लावण्याचा थोडासाही प्रयत्न केला, तरी लगेच
धाव घेणारे समाजवादी विचारवंत, फेसबुकी विचारवंत, काँग्रेसी किडे, पुरोगामी पाखंडी
आणि मानवी हक्कांचा पुळका आलेले लोक या हिंत्र खेळाचा प्रसार होत असताना तोंडात
मूग धरून का बसलेले आहेत, असा जळजळीत सवालही स्वामी आचरटानंद यांनी केला.
दरम्यान, फुटबॉलच्या
लोकप्रियतेमुळे तमाम भारतीयांच्या आवडत्या क्रिकेटकडे कोणी ढुंकूनही पाहात
नसल्यामुळे मौजे रिकामटेकडे क्रिकेट नियामक मंडळानेच स्वामीजींना फूस दिली असून ते
अकारण या खेळावर दुगाण्या झाडत आहेत, अशी प्रतिक्रिया एका फुटबॉलप्रेमीने नाव
गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली आहे. स्वामीजी आणि त्यांचे चेले फुटबॉलचा कितीही
द्वेष करत असले तरी आपल्या विरोधकांना लाथाडण्यात त्यांनाही आनंदच मिळतो, त्यामुळे
आपला फुटबॉल होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेत असल्याचे तो म्हणाला.
.................................
2. बघ्यांमुळेच वाढते देशाचे आत्मिक
सामर्थ्य
एखादी हिंसक घटना घडत
असताना त्यात हस्तक्षेप न करता केवळ बघ्याची भूमिका घेणार्यांवर होणारी टीका
अनाठायी आणि अन्याय्य आहे. अशा बघ्यांमुळेच देशाचे आत्मिक सामर्थ्य वाढते, असे
स्पष्ट प्रतिपादन केवल बघे यांनी आज येथे केले. मौजे रिकामटेकडे येथील एका महिला
बस कंडक्टरचा विनयभंग होत असताना त्यात हस्तक्षेप न करता निव्वळ मजा बघत उभे
राहिलेल्या बघ्यांचा सत्कार आज येथील रविवारवाडय़ावर करण्यात आला. तेव्हा
बघ्यांच्या वतीने प्रातिनिधिक भावना व्यक्त करताना श्री. केवल बघे यांनी हे उद्गार
काढले.
ते म्हणाले, ``एक
माणूस आपल्यासमोर एका बाईला लाथाबुक्क्यांनी मारतो आहे, तिचे कपडे फाडतो आहे, तिला
शिवीगाळ करतो आहे, हे रोजरोज दिसणारे दृश्य नाही. एरवी असे दृश्य पाहण्यासाठी
पदरमोड करून सिनेमागृहांमध्ये जावे लागते. असे दृश्य दिसत असताना मनात कितीही राग,
त्वेष उसळून आला तरी तो काबूत ठेवून केवळ ते दृश्य पाहात राहणे हे सोपे काम नाही.
त्यासाठी उच्च कोटीची आध्यात्मिक साधना लागते, आत्मसंयमन लागते. आपला देश आणि आपली
संस्कृती आध्यात्मिकदृष्टय़ा इतकी उन्नत असल्यामुळेच या देशात असे श्रेष्ठ दर्जाचे
बघे निर्माण होतात, असे श्री. बघे म्हणाले तेव्हा सभागृहाने नुसते बघत न राहता
टाळय़ांचा कडकडाट केला. त्या महिला कंडक्टरला मारहाण होत असताना नुसते बघत उभे
राहिलेले लोक षंढ होते, या टीकेला उत्तर देताना श्री. बघे म्हणाले की अशी टीका
केवळ तथाकथित पुरोगामी विचारांचे खूळ डोक्यात भरलेले अर्धवट लोकच करू शकतात. त्या
महिलेच्या अंगावर हात उचलणार्या माणसाचा उन्माद केवळ पाहात बसलेल्या 40 प्रवाशांनी
जर ठरवले असते, तर त्या गुंडाचा क्षणात चट्टामट्टा झाला असता. पण, सगळे प्रवासी
शांत बघत उभे राहिले, कारण, त्यांच्या हस्तक्षेपाने ती महिला दुबळी झाली असती.
भविष्यात तिच्यावर हल्ला, विनयभंग किंवा बलात्कारासारखा प्रसंग ओढवल्यास तिने काय
दरवेळी मदतीचा धावा करायचा का, तिच्या मदतीला कोणी येण्यासारखी परिस्थिती नसेल, तर
तिला अत्याचार सहन करावा लागेलच. तिच्यातच या अत्याचाराचा प्रतिकार करण्याची
क्षमता येण्यासाठी बाकीच्यांनी मध्ये न पडणेच इष्ट होते, असे ठामपणे सांगून श्री.
बघे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी समाजात जास्तीत जास्त संख्येने असे बघे
निर्माण होणे आवश्यक आहे.
बाकीचे सर्व प्रवासी
आपल्या संस्कृतीला अनुसरून मारहाण पाहात असताना पलीकडून जाणार्या बसच्या चालकाने
आणि वाहकाने ती बस चालवण्याचे आपले कर्तव्य सोडून या मारहाणीत मध्ये पडून
हस्तक्षेप केला आणि त्या महिला कंडक्टरची सक्षमीकरणाची संधी हिरावून घेतली,
त्याबद्दल त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करणारा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
बसमधील त्या नाटय़मय प्रसंगाच्या- `तिकीट' काढून आलेल्या- प्रेक्षकांचा रसभंग
केल्याबद्दल त्या चालक-वाहकांना निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी मौजे
रिकामटेकडे नागरिक महासंघातर्फे एमआरटी महामंडळाकडे करण्यात आली आहे.
............................................
शाळाशाळांमध्ये लवकरच
दिले जाणार
पुस्तके फाडण्याचे
प्रशिक्षण
वेगवेगळय़ा पुस्तकांवर
वेगवेगळय़ा स्वरूपाच्या बंदी येत असताना आणि खुद्द न्यायालयही पुस्तकांच्या प्रती
फाडून नष्ट करून देण्याचे आदेश देत असताना काळाची गरज ओळखून सर्व शाळांमध्ये
पुस्तके शात्रशुद्ध पद्धतीने कशी फाडावीत, याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे मत
शालेय शिक्षण मंत्री अज्ञानराव अंगठेबहाद्दर यांनी मौजे रिकामटेकडे येथे व्यक्त
केले आणि यंदापासून हा अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यात असल्याची घोषणाही त्यांनी
केली. यापुढे पहिलीपासून सर्व शाळांमध्ये ग्रंथनिर्मूलनाचा तास सुरू होत असून
त्यात पुस्तके फाडून त्यांची होळी कशी करायची, याचे प्रशिक्षण दिले जाईल.
आजच्या आपल्या समाजाचे
सर्व नुकसान पुस्तकांमुळे झाले आहे, असे स्पष्ट मत श्री. अंगठेबहाद्दर यांनी येथील
मंबाजी बटॅलियनतर्फे आयोजित पुस्तकहोळी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून व्यक्त
केले. ते म्हणाले, आपल्या पूर्वजांनी भूर्जपत्रे, दगड वगैरेंवर लिहून ठेवलेला मजकूर
आपल्याला पुरेसा असताना नव्याने मजकूर लिहिण्याची काय गरज आहे, हेच मला कळत नाही.
आपल्या गुहेत राहणार्या, वल्कले नेसणार्या, पूर्वजांच्यापेक्षा तुम्ही शहाणे आहात
का, असा सवाल त्यांनी केला तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी `नाही, नाही' असे म्हणून
माना डोलावून त्यांच्या म्हणण्याला रुकार दिला. कोणीतरी उठतो आणि ऐतिहासिक कादंबरी
लिहितो, कोणी उठतो आणि आमच्या पवित्र धर्मग्रंथांवर टीका करणारी विश्लेषक पुस्तके
लिहितो आणि आपल्याच पूर्वजांना वेडय़ात काढतो, हे खपवून घेतले जाणार नाही, असे
त्यांनी टाळय़ांच्या गजरात सांगितले. पूर्वीच्या काळी पुस्तक लिहिण्याचा, वाचण्याचा
अधिकारच मर्यादित होता. पाठांतर हेच ज्ञान होते. ब्रिटिशांच्या राजवटीत कोणीही
उठून पुस्तक लिहू लागल्यामुळेच आज आपला समाज रसातळाला गेला आहे. ही सर्व पुस्तके
पृथ्वीतलावरून नष्ट केल्याखेरीज बटॅलियन स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.
देशात
व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जे खुळे चाळे सुरू झाले
आहेत, ते थांबवण्यासाठीच सरकारने आता प्रभावी दगडफेक, घेराव घालून शाई फासणे, झटपट
मोडतोड, असे नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यात न्यायालयाच्या पुढाकाराने नव्या
अभ्यासक्रमाची भर पडली आहे. त्याने समाजातील पुस्तकरूपी विषवल्ली नष्ट होण्यास मदत
होईल, असे श्री. अंगठेबहाद्दर यांनी सांगितले आहे. शक्यतोवर कोणी तशीच निकड
असल्याखेरीज पुस्तके छापू नयेत आणि छापल्यास ती फाडायला सोप्या अशा पातळ कागदाची,
विसविशीत बांधणीची असावीत, असे निर्देश सर्व प्रकाशकांना देण्यात आले असून
पुस्तकछपाईसाठी खास ज्वालाग्राही शाईच वापरण्यात यावी, असेही बंधन घालण्यात आलेले
आहे. एखादय़ा प्रकाशकाचे पुस्तक सहजगत्या फाटत किंवा पेटत नसल्याची तक्रार आल्यास
आणि तिच्यात सक्षम प्राधिकार्याने केलेल्या चौकशीअंती तथ्य आढळल्यास त्या
प्रकाशकाच्या व्यवसायावर बंदी आणण्यात येईल आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षाही
भोगावी लागेल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.