Tuesday, July 29, 2014

गरीबनगर गरीबच राहिलं, त्याची गोष्ट!

गरीबनगराला श्रीमंत होण्याची संधी फक्त पाच वर्षांतून सरासरी तीन वेळा मिळते.
प्रत्येक वेळी ही श्रीमंती फार फार तर अडीच दिवस टिकते. म्हणजे पाच वर्षांतून साडेसात दिवसांची श्रीमंती.
हे साडे सात दिवस प्रत्येक गरीबनगरवासी बादशहा असतो. त्याची बादशहा असण्याची संकल्पना फारच सोपी असल्यामुळे हे शक्य असतं म्हणा! `टाकी फुल' असावी, खायला कोंबडीची तंगडी, भेजा मसाला, खिमा फ्राय नाहीतर हाडवळीचा रस्सा मिळावा, आठ दिवसांच्या खर्चीला एखादा गांधीबाबा खिशात असावा की झालाच तो बादशहा! गरीबनगराची हीच श्रीमंतीची व्याख्या आहे. रोज सकाळी कुठेतरी अंगमेहनतीचं काम मिळवून, दिवसभर घाम गाळून पाच-पन्नास रुपये हाती लागण्याचीही शाश्वती नसलेल्यांची श्रीमंतीची व्याख्या काय वेगळी असणार?
प्रत्येक निवडणुकीत एकगठ्ठा निकाल फिरवू शकेल, इतकी मतं या विस्तीर्ण झोपडपट्टीत आहेत. म्हणून गरीबनगरात श्रीमंतीच्या या पंचवार्षिक लाटा येतात आणि जातात. शंभर टक्के निखळ, भेसळमुक्त गरीबीच राहिली तर गरीबनगरातला प्रत्येकजण आपल्या गरिबीचं कारण शोधायला लागेल आणि ते देशातल्या श्रीमंतांना महागात पडेल म्हणून अधून मधून गरीबनगरात अशा लाटा उसळवण्यात सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी वर्गाला रस असतो. त्यामुळे सभेला श्रोते म्हणून भाडय़ाने जाण्यापासून मोर्चे-दंगलींसाठी मनुष्यबळ पुरवण्यापर्यंत वेगवेगळय़ा संधी गरीबनगरात सतत उपलब्ध असतात. साई भंडारे, दही हंडी, जयंत्या, गरबे, गणपती यांना कधी पैसा कमी पडत नाही. पण, गरीबनगरात सर्वांना समान लाभ देणारी संधी म्हणजे निवडणूक. त्यामुळेच गरीबनगरातल्या रहिवाशांना बहुमतातलं सरकार आलं की जाम वाईट वाटतं. असलं सरकार पाच वर्ष टिकाव धरून राहतं आणि पुढची निवडणूक पाच वर्षांनीच येते. सरकार अस्थिर असलं की गरीबनगर खुशीत असतं. कोणत्याही क्षणी हे सरकार कोसळेल, नव्याने निवडणूक लागेल. जो थोडक्यात हरला तो जिंकण्यासाठी आणि जो थोडक्यात जिंकला तो परत जिंकण्यासाठी गरीबनगरावर कॅश, दारू, दागिने, साडय़ा, कपडे यांचा वर्षाव करील आणि आपल्याला जास्त दिवस बादशहा बनायची संधी मिळेल, असं त्यांना वाटतं त्यात चूक काय?
****
यावेळी मात्र ठेंगा पक्षाने आघाडीचं सरकार दोन वेळा फुल पाच-पाच वर्षं चालवून दाखवलं, त्यामुळे गरीबनगरात त्याविषयी फार खुन्नस होती.
``अस्लम मिया, इस बार ना ये ठेंगावालोंको सबक सिखाते है,'' पानवाला अण्णा कलकत्ता पानावर किवामाची चटणी चोळत चोळत म्हणाला, ``गुलाबवाल्यांनाच व्होट टाकू सगळय़ांनी.''
``येडा का खुळा तू,'' तंबाखूची चिमटी दाढेखाली सरकवत रंग्या न्हावी म्हणाला, ``यंदा गुलाब पार्टीचा जोर आहे. आपणपण त्यांना व्होटिंग केलं तर मेजॉरिटीत येतील ते. मग बस पाच वर्षं बोंबलत. आपण ठेंगाच हाणायचा.''
रंग्याच्या डोकॅलिटीला सगळय़ांनीच दाद दिली. गुलाब पार्टीचा जोर असल्यामुळे तिकडून, ठेंगा पार्टीचा जोर नसल्यामुळे तिकडून आणि या दोघांमध्ये कालाकांडी करण्याची संधी पाहिजे म्हणून खंजीरवाल्यांकडून यंदा गरीबनगरावर पाऊस पडणार यात शंकाच नव्हती. खर्या पावसाळय़ाची जेवढय़ा आतुरतेने वाट पाहिली जात नसेल, तेवढी या पावसाची वाट पाहिली जात होती.
****
``आग लागू गं त्या विलेक्शन कमिशनला'' हौसाबाय नळावर पाणी भरताभरता सँड्राआँटीला म्हणाली.
``व्हॉट मॅन, व्हॉट प्रॉब्लेम. उसने तेरा क्या घोडा मारा रे?'' सँड्राने आपली बादली पुढे सरकवत विचारलं.
``आगं लई कडक काम केलंय सगळीकडं. पयले कशे विलेक्शन आली की सदाभाऊ, पीटरदादा, शेट्टी अण्णा लगोलग कायनुबायनु आणून दय़ायचे. आता लय बंधनं घातली गं खर्चावर? आमची रिक्षा पण यंदा लागली नाय प्रचारात?''
``मैं तो बोलती गवर्मेंटवालोंकू क्या मिलता है बीचमें टांग अडाकर?'' अमीनाबीबी हात ओवाळत म्हणाली, ``अरे, हमलोग किसीको चुनकर भेजते है तो भरपूर खाने के वास्तेही भेजते है ना? वो खायेगा, उसका पेट भरेंगा, तो हम को भी खिलायेंगा ना? उसको खाने से नै रोकती है ये गवरमेंट. हम को देने से रोकती है. ये कैसा इन्साफ हुआ?''
``इसीलिए बोलती हूँ, इस बार गुलाबकाच बटण दबाओ, ये ठेंगेवालोंको माती चखाओ,'' जोशीकाकूंनी प्रचाराचीही संधी साधून घेतली आणि आपली बादली तीन नंबरांनी पुढे सरकवण्याचीही.
****
यंदा आपल्याला श्रीमंत होण्याची संधी मिळणार की नाही, या विवंचनेने गरीबनगरातले काही गरीब अधिकाधिक गरीब होत चालले होते. विलेक्शन लागून महिना उलटून गेला तरी ना पत्ती आली ना खंबा म्हणून चिंतेने आणि निराशेने त्यांचा रोजचा कोटा वाढत चालला होता.
 ``कितना भी कडक बंदोबस्त होने दो भौ, अपना पक्यादादा माल लेकर आयेगा और सुमडीमे सबको खुश करेगा, सबर करो, धीरज रखो,'' असा दिलासा प्रत्येक पार्टीचा माणूस कोणा ना कोणा पक्या/जग्या/अन्वर/मुश्ताकच्या हवाल्याने देत होता. मध्यरात्रीच्या वेळी कधी दारावर चोरटी थाप पडली, तर घरोघरच्या बायाबापडय़ा खूष व्हायच्या. पण, दारात तर्राट अवस्थेत आपला नवरा किंवा त्याला झोपवल्यानंतर बोलवायला येणारा यार पाहून आनंद होण्याऐवजी त्यांना वाईट वाटायचं. दहा वर्षांपूर्वी मिळालेली सोन्याची फुलं, एकदा नगरसेवकाच्या इलेक्शनमध्ये देशीच्या जागी आलेले विंग्लिशचे खंबे, शंभर रुपडय़ांमध्ये मत टाकायला आम्ही काय रस्त्यावर पडलोय काय, एकेक गांधी काढा, असा कणबर्गी अप्पाने आवाज टाकल्यानंतर गरीबनगरात पसरलेली अस्वस्थ शांतता (ही नोटही जायची, म्हणून) आणि खंजीरवाल्याने `दिले, पण विलेक्शन हारली, तर तुला या चौकात चामडी पट्टय़ाने सोलीन आणि मिठात घोळवीन' असं सांगितल्यानंतर `आम्ही गरीब आहोत, पण नीच नाही' असा अप्पाने हाणलेला डायलॉग यांच्या रसभरीत आठवणी निघायला लागल्या. कोणत्या इलेक्शनमध्ये आपण काय मज्जा केली, याच्या चर्चांनी वातावरण हलकं व्हायचं, पण या आठवणींचा रस्सा करून कोरडय़ास घेता येणार नव्हता. त्यासाठी खरोखरची बोटी भगुण्यात पडायला हवी होती, त्यासाठी नोट खिशात यायला हवी होती आणि घशात जळजळता घोट.
****
``आजची रात्र जागे राहा. मध्यरात्रीचा दरवाजा वाजला तर बोंबटू नका, चटकन् दार उघडा, पटकन् माल घ्या आणि झटकन् हात आत घ्या,'' सगळीकडे निरोप गेला आणि मिटल्या दिव्यांच्या अंधारात, सापटीसांदरींमधून झिरपणार्या प्रकाशावर डोळे लावून सगळं गरीबनगर जागं राहिलं, उत्तररात्रीपर्यंत टक्क जागं राहिलं, पहाटेपहाटे दमून-थकून-चिडून झोप लागली, त्याआधी निरोप देणार्यांच्या सात पिढय़ांचा उद्धार करून झाला होता.
भल्या सकाळी पेपर आला आणि सगळय़ांना कळलं...
``गरीबनगरात पैसे वाटायला निघालेली गाडी पोलिसांनी पकडली, तपास चालू.''
****
या घटनेवर गरीबनगरात काय प्रतिक्रिया उमटली असेल, हे पाहण्याची काही गरज नाही. ती काय असेल, ते स्पष्टच आहे. गरीबाला गरीब राहिल्याचं फक्त दुःखच होतं आणि रागच येतो. शिवाय गरीबाच्या गरीब राहण्यात तो गरीब घरात जन्मला यापलीकडे त्याचा फार वाटाही नसतो. गरीबनगराची गरिबी दूर होता होता राहिली ती कशी, हे समजून घेण्यासाठी गरीबनगर सोडायला हवं.
****
``साहेब, घोटाळा झाला, गरीबनगरमध्ये वाटायच्या नोटा वाटेत पकडल्या गेल्या... आता काय करायचं?'' गुलाब पार्टीच्या उमेदवाराच्या सेक्रेटरीने साहेबाला विचारलं.
``अरे काय वेडा का खुळा तू? आपला साधनशुचितावाला पक्ष आहे. असले धंदे नाही करत आपण. ती गाडी आपली नव्हती, कार्यकर्ते आपले नव्हते, आपण त्यांना ओळखत नाही, हा आमच्या बदनामीचा कट आहे... कळलं ना पेपरांना काय खुलासा करायचा ते. चॅनेलांना मी बाइट देतो. (खासगी आवाजात) गरीबनगरात खबर पोहोचली का?''
``पोहोचली साहेब. सगळे हळहळतायत...''
``फुकटे साले भडवे. त्यांना सांगा, एक करोड पाठवले होते. पोलिसांनी हरामखोरी केली नसती, तर घरटी चार चार हजार रुपये मिळणार होते...''
``चार चार? आपले तर एकेकच ठरले होते...''
``मेल्या म्हशीला पाच शेर दूध ही म्हण कधी ऐकली नाहीत का? जे पैसे पोहोचलेलेच नाहीत, ते किती होते, याने काय फरक पडतो? आता एक काम करा. गरीबनगरात निरोप पाठवा. सध्या शांती राखली पाहिजे. तुमच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकलो, तर नंतर दुप्पट भरपाई करू, म्हणावं. निघा आता... (सेक्रेटरी गेल्याची खात्री करून फोन लावतो.) इन्स्पेक्टरसाहेब, खबर बरोबर निघाली ना? तुम्हीही भारी आहात राव! पन्नास लाख पकडलेत आणि वीस लाखाची रोकड जप्त म्हणून फोटो काढून झळकवलेत पेपरात? आता दहा तुम्हाला, तुमच्या टीमला ठेवून घ्या आणि ठरल्याप्रमाणे वीस पाठवून दया परत.'' फोन ठेवून दिल्यावर बायकोला बोलावून, ``इन्स्पेक्टर सोळंकींचा माणूस पैसे घेऊन येईल, ते कपाटात ठेवून दय़ा... इलेक्शनच्या कपाटात नाही, घरच्या कपाटात.''
****
``साहेब, साहेब, आनंदाची बातमी... गरीबनगरमध्ये मतदारांना वाटण्यासाठी पाठवलेली कॅश पकडली गेली...'' खंजीरवाल्या उमेदवाराच्या सेक्रेटरीने आनंदाने आरोळी ठोकली.
`` त्यात एवढा आनंद वाटून घेण्यासारखं काय आहे...''
``साहेब, ऑपॉझिशनची कॅश पकडली गेली आहे. आता तुम्ही खरमरीत प्रतिक्रिया दय़ा. लोकशाहीच्या गळय़ाला कसं नख लावतायत, म्हणून इलेक्शन कमिशनकडे तक्रार करा. चांगली संधी आहे या गुलाबाच्या पाकळय़ा खुडायची.'' सेक्रेटरी काल्पनिक खंजीराने काल्पनिक गुलाबाच्या पाकळय़ा खुडू लागला.
``कार्यकर्ते त्यांचे होते हे आयडेंटिफाय झालं का?'' साहेबाने सावधपणे विचारलं.
``छया, त्यांच्या **त कुठे ** आहे. ***नी कानावर हात ठेवलेत, हे आमच्या पक्षाचे नाहीत, यांचा आमचा काही संबंध नाही म्हणून...''
बेरक्या साहेबाने विचार करून बोलायला सुरुवात केली, ``सेक्रेटरी, वर्तमानपत्रांसाठी प्रतिक्रिया लिहून घ्या आणि हाच बाइट दयायला चॅनेलवाल्यांना बोलवा. करा सुरुवात... पकडली गेलेली माणसं कोणीही असोत, आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. ते पोलिसांच्या आणि निवडणूक आयोगाच्या दंडेलशाहीचे बळीही असू शकतात. ते राजकीय कार्यकर्ते होते का आणि कॅश कशासाठी नेत होते, हे अजून स्पष्ट व्हायचं असताना प्रसारमाध्यमांनी त्यांच्याबद्दल न्यायाधीशाची भूमिका घेणं हे लोकशाहीच्या दृष्टीने इष्ट नाही. आजकाल व्यापारी-व्यावसायिक, एवढंच काय- ज्यांच्या घरात लग्नकार्य आहे अशा सामान्य माणसांनाही रोख रक्कम किंवा दागिने घेऊन जाण्या-येण्याची भीती वाटू लागली आहे. याचीही नोंद सगळय़ांनी घेतली पाहिजे. पैशांचं राजकारण रोखलंच पाहिजे, पण त्यासाठी सामान्य माणूस भरडला जाता कामा नये.''
गोंधळलेला सेक्रेटरी म्हणाला, ``साहेब, अशी प्रतिक्रिया दिलीत तर पकडले गेलेले कार्यकर्ते आपलेच होते, अशी समजूत होईल लोकांची.''
``नाहीतर कशाला देतोय ही प्रतिक्रिया? राजकारणात लोकांची आपल्याला हवी तशी समजूत होणंच महत्त्वाचं असतं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय निष्पन्न व्हायचं ते होईलच निवडणुकीनंतर. हा खुलासा दिल्यानंतर आपली कॅश पाठवायची गरज उरणार नाही. गरीबनगरात तशी खबर फिरवा. गुलाबवाले गप्प बसणार नाहीत. पण, आपण कन्फ्यूजन क्रिएट केलं की काम झालं. इकडची कॅश दुसरीकडे फिरवून घ्या.''
****
``खजिनदार साहेब, नमस्कार. आजची बातमी वाचलीत का आमच्या मतदारसंघातली?'' ठेंगा पक्षाचा उमेदवार विनम्रपणे विचारता झाला.
``गरीबनगरची? वाचली ना. तुमचं काय म्हणणं?''
``आता आपल्याला संधी आहे चांगली.''
``कसली संधी?''
``साहेब गुलाबवाल्यांची कॅश पकडली गेली आहे. खंजीरवाल्यांनी हात आखडता घेतला आहे. आपण जरा मूठ उघडलीत तर जादू होईल. पारंपरिक मतदार आहे तो आपला.''
``पारंपरिक मतदार असेल, तर गुलाबवाल्यांकडून कॅश घेऊनही त्याने आपल्यालाच मतदान केलं असतं, आताही करेल.''
``ते बरोबर आहे साहेब. पण थोडं प्रोत्साहन मिळालं तर बरं वाटतं लोकांना.''
``उमेदवार साहेब, तुम्ही किती मतांनी हारणार आहात ते मी आता कोर्या कागदावर लिहून देऊ का सीलबंद लखोटय़ात? आपण सत्तेत आहोत. थोडीथोडकी नाही, 10 वर्षं. एवढय़ात तर बायकोही नवर्याला कंटाळते आणि नवराही बायकोला. आता आपली मधल्या सुट्टीची वेळ झालेली आहे. आपण कितीही टिमक्या वाजवल्या, कितीही प्रचार केला तरी आपल्या हक्काच्या जागा सोडल्यास बाकीच्या जागा निघणार नाहीत. हायकमांडलाही हे माहिती आहे. ही इलेक्शन आपण सोडून दिलेली आहे. पुढे दोन-अडीच वर्षं तरी आपल्याला ऑपोझिशनमध्ये काढायची आहेत. दहा वर्षांतली पुण्याई आता पुरवून पुरवून वापरायची आहे, आलं ना लक्षात. जिथं पार्टी जिंकणार्या घोडय़ावर पैसा लावत नाही, तिथे हरणार्या घोडय़ावर कसा हो लावेल? गरीबनगरातून जेवढी मतं तुम्हाला पडायची ती पडणारच आहेत. हवं तर तुम्हीही तिकडे योग्य ते संदेश धाडा. `गांधीबाबा' आपल्याच पक्षाचे आहेत हे लोकांना माहिती आहे. त्यांचा विश्वास बसेल. अडीच वर्षानंतर या. तेव्हा आपण गरीबनगराचं अमीरनगर करून टाकू.''
****
तर अशा रीतीने यंदाची निवडणूक आली आणि गेली, टीव्हीवाल्यांची, चॅनेलवाल्यांची, संपादकांची, आयटीवाल्यांची, फेसबुकवाल्यांची, व्हॉट्सऍपवाल्यांची, जाहिरातवाल्यांची चांदी झाली, पण गरीबनगर मात्र यंदा गरीबच राहिलं. आता राजकीय पक्षांना गरीबनगराला गरीबच ठेवण्याचा नवा फंडा सापडला, हे अधिक वाईट झालं की आपल्याकडे यायला निघालेली कॅश नेमकी कुणाची होती, याचा तलासच लागला नाही, हे अधिक वाईट झालं, हे सांगता येणं मुश्कील आहे.
गरीबनगर गरीबच राहिलं, यात आश्चर्य काहीच नाही.
पाच वर्षांतून साडेसात दिवसांच्या श्रीमंतीनेही ज्यांचं पोट भरतं, त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकारच आहे.


No comments:

Post a Comment