`डाकूराणी'...
`फूलनदेवी'...
हेच पुण्याचं अस्सल `फॅशन स्टेटमेंट' नाही का?
म्हणजे कसं की नऊवारी साडय़ा नेसून, नथी वगैरे घालून मोटरसायकलीवर बसलेल्या बायका, असा फोटो पाहिला की `स्थळ डोंबिवली' हे सांगावं लागत नाही. ज्याला नववर्षस्वागतयात्रा वगैरे ठाऊक नसेल, त्याला डोंबिवलीतल्या सगळय़ा बायका रोज पारंपरिक पोषाखात मोटरसायकलीवरून ऑफिसला किंवा भाजी आणायला जातात असं वाटावं, इतकं हे चित्र डोंबिवलीशी जोडलं गेलंय. त्याचप्रकारे अंगात पेहराव कोणताही असला तरी जेमतेम डोळेच उघडे राहतील अशा प्रकारे तोंडाला ओढणी किंवा रूमाल गुंडाळलेल्या कोणत्याही वयोगटांमधल्या दुचाकीस्वार महिला दिसल्या की `स्थळ पुणे' हे वेगळं सांगावं लागत नाही.
आता धूर, धूळ काय इतर गावांमध्ये नसते. मातीरस्त्याच्या आडगावांमध्ये तर उन्हाच्या ठोंबात धुळीचा खकाणा उडतो. पण, तरीही तोंड झाकून दुचाकीला टाच देऊन `खबरदार जर याल पुढे'च्या थाटात वाहन दौडविणाऱया बायका म्हणजे पुणे, असं समीकरणच झालंय.
कोणत्याही फॅशन स्टेटमेंटमध्ये ते करणाऱयाच्या स्वभावाचं प्रतिबिंब पडावं लागतं. उदाहरणार्थ लेडी गागाची गाणी ऐकणाऱयाला ती लता मंगेशकरांसारखी शालीन साडीमध्ये दिसली, तर तो काहीही खातपीत नसताना त्याला जीवघेणा ठसका लागेल. तिच्या विचित्र वेशभूषेत तिच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब पडतं. तसाच पुण्याच्या फूलनदेवी फॅशन स्टेटमेंटमध्ये खास पुण्याचा नागमोडी चालीचा, फुरशाच्या डंखाचा, रोखठोक तिरकस स्वभाव अर्करूपाने उतरला आहे. म्हणजे जगभरात फॅशन म्हणून वेषभूषा, रंगभूषा, आभूषणं, ऍक्सेसरीज यांच्यात सुसंगती दर्शवली जाते.
पुण्यातल्या ललनाही तशी सगळी संगती करून मग तोंडाला फडकं गुंडाळून त्या रंगसंगतीवर बोळा फिरवतात. कारण, उपयुक्तता हा पुण्याच्या प्राधान्यक्रमातला सगळय़ात पहिला मुद्दा. गाडीवरून (दुचाकीला `गाडी' म्हणणारा हा एकमेव प्रांत) फिरताना धूळ तोंडात-नाकात जाऊ नये, ही सर्वात महत्वाची गरज. फॅशनबिशन गाडीवरून पायउतार झाल्यावर.
फॅशनच्या रूढ कल्पनांच्या विरोधात हे चिरगुटभर बंडच आहे म्हणा ना! कारण, बंड हा या शहराचा स्थायीभाव आहे. हे बंड कशाहीविरोधात असू शकतं. म्हणजे काल आपण जे बंड केलं होतं, त्या बंडाच्या विरोधातही असू शकत. असा हा बंडखोर गोषा योग्य वयातील तरुणींना काही नाजूक प्रसंगांमध्ये ओळखीच्या परिसरांत ओळख लपवायलाही उपयोगी पडतो, म्हणतात...
खासकरून त्या स्वत:च्या ऐवजी दुस`ऱया'च्या बाइकच्या पिछाडीवर, त्याच्या गळय़ात हात घालून अंमळ नजदिकीने स्वार झाल्या असतील तेव्हा. त्यामुळेच कधीकधी अशा फडकंनशीन सुंदरीला पाहून (म्हणजे खरंतर न पाहताच) एखादा तरुण शीळ घालतो आणि ती फडकं उतरवत `अरे ही मी आहे रे दादा' असं भाऊरायाला सांगते.
या `फॅशनी'चं खास पुणेरी तिरकस पद्धतीनं `डाकूराणी', `फूलनदेवी' असं नामकरण झाल्यामुळे पुण्यातल्या बायका भाले-बरच्या घेऊन घोडय़ांवरून दौडत अंगावर येतात, असं काहीसं कल्पनाचित्र पुण्याबाहेरच्या मंडळींचा मन:पटलावर उमटत असणार. यातला `अंगावर येतात' हा भाग तुम्ही पादचारी किंवा त्यांच्या वाटेत येण्याची जुर्रत करणारा वाहनचालक असाल तर खराच ठरतो; पण, भाले-बरच्या ही अतिशयोक्ती झाली. कारण, फर्गसन कॉलेज रोड, एमजी रोड यांसारख्या `प्रेक्षणीय'
म्हणून सुप्रसिद्ध ठिकाणी जेव्हा हे हिजाब उतरतात, तेव्हा या बालांना कलिजे खलास करायला भाले-बरच्यांची गरज काय, असाच नि:शंक करणारा प्रश्न पडतो.
ही प्रेक्षणीय स्थळं आणि फर्गसन, एसपीसारख्या कॉलेजांचे परिसर, भांडारकर रोड, प्रभात रोडवरचे काही नाके इथपासून सारसबाग, मोदी गणपतीपर्यंत वेगवेगळय़ा स्थळांना भेट दिली की पुणं फॅशनच्या बाबतीत किती अद्ययावत आहे, याची कल्पना येते. या प्रत्येक ठिकाणची तऱहा वेगळी, वयोगट वेगळा आणि फॅशन वेगळी. फर्गसन रस्ता ते कमला नेहरू उद्यान अशी एक काल्पनिक रेघ मारून तिचा मध्यबिंदू काढला आणि त्याच्या पाच किलोमीटर त्रिज्येचा परिसर न्याहाळला, तर मध्यमवर्गीय,
उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू तरुणाईची फॅशन दिसते.
सनग्लासेसपासून फुटवेअरपर्यंत सगळय़ा डिझायनर ब्रँड्सची दुकानं (सॉरी सॉरी, शोरूम्स किंवा स्टुडिओज), बुटीक्स याच परिसरात आहेत, हा योगायोग नाही. कोणत्याही काकाबुवा-काकुबाईचा नखशिखान्त मेकओव्हर करून त्याचं तिचं रूपांतर टेण्डी `कॅक्स'मध्ये करू शकणाऱया सलून्स, ब्युटी पार्लर्सचीही या भागात गजबज आहे.
जगातल्या तरुणांच्या अंगोपांगांवर लेटेस्ट काय आहे, हे इथली प्रचंड आकाराची होर्डिंग्ज दाखवत असतात आणि ते ताबडतोब इथल्या उच्चभ्रू, सुशिक्षित आणि वेल टु डू तरुणाईच्या अंगोपांगांवर झळकू लागतं. या भागांमध्ये फिरलात तर आंतरराष्ट्रीय नकाशावरच्या कोणत्याही महानगरात फिरत असल्याचा भास झाल्याखेरीज राहणार नाही. डेनिम्स-टीज हा इथला राष्ट्रीय पोषाख. वर्षातला बहुतेक काळ संध्याकाळची हवा थंड असल्यामुळे ऊबदार स्वेटर किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा पुलोव्हर मस्ट... त्यामुळे रणबीर कपूरचा काळ आला तरी इथला राष्ट्रीय हिरो ऋषी कपूरच... त्याच्याकडे असलेल्या स्वेटरांइतक्या साडय़ा जयललिताच्या कपाटातही असणार नाहीत.
या परिसरातल्या फॅशनचं सगळय़ात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे इथे बहुतेक वेळा `सांगोपांग' वस्त्रप्रावरणंच पाहायला मिळतात. म्हणजे इथले पोषाख शारीर सौंदर्याची सगळी बलस्थानं अधोरेखित करतात, पण थेट शरीराचं अपघातप्रवण दर्शन घडवत नाहीत. बुडत्याचा पाय खोलात नेणारे खोल गळे किंवा पाय झाकण्यापेक्षा उघडे टाकण्याकडेच कल असलेले स्कर्ट किंवा अंतर्वस्त्रदर्शक बहिर्वस्त्रं अशा चित्तविचलक फॅशनी पाहायच्याच असतील तर कॅम्पात वाट वाकडी करायला हवी. हा परिसर पहिल्यापासून कॉस्मो, हायब्रो आणि ब्रिटिश. पारशांचं आणि अँग्लो इंडियनांचं इथे प्राबल्य. सगळी लष्करी छावणी. शेजारीच पुण्याची मलबार हिल असलेला कोरेगाव पार्कचा परिसर. त्यामुळे, सगळा परिसर लंडनच्या एखाद्या उपनगरासारखा शांत-निवांत आणि झगेबहुल. चिरूट, पाइप वगैरे इंग्रजी सिनेमांमध्येच दिसणाऱया चिजांबरोबरच इंग्रजी सिनेमांतच दिसणाऱया अन्य `चिजा'ही याच भागात पाहायला मिळायच्या.
त्यात ओशोंच्या कम्यूनमुळे पुणेकरांच्या डोळय़ांबरोबरच भावविश्वही विस्फारलं. वेशीअल्याडच्या पुण्यात जेव्हा घेरेदार गोटय़ावर चप्प बसवलेल्या काळय़ा टोपीतून डोकावणारी शेंडी, कोट, दुटांगी धोतर ही पुरुषांची एकमेव `फ्याशन' होती, त्या काळापासून सायकलीवर टांग मारून अधूनमधून या भागात चोरून येण्याची फॅशन आहे. ऑम्लेट किंवा खिमा भरलेला सामोसा ही चोरून खाण्याची आणि चहा ही चोरून पिण्याची वस्तू असल्याच्या काळापासून अशा चोरटय़ा गोष्टी करणाऱया पुणेकरांचा या भागात राबता... कारण इथे गौरांग ही एरवी चोरून पाहण्याची गोष्टही आकर्षक आणि जेवढय़ास तेवढय़ा वेष्टनात मन:पूत पाहता यायची, ती याच भागात.
आता गौरांगाचं सावळांग, काळांग झालं असलं तरी दर्शनमात्रे मन:कामनापूर्ती करून घेण्यासाठी कॅम्पाला पर्याय नाही.
हाय एन्ड फॅशनची हौस आणि सदैव लो एन्डच्या धोकारेषेच्या नजीकच असलेलं पैशाचं पाकीट अशी परिस्थिती असलेल्या (म्हणजे 99 टक्के) तरुणांना आणखी एका गोष्टीसाठी कॅम्पात जाण्यावाचून पर्याय नाही... ती म्हणजे फॅशन स्ट्रीट. सगळय़ा डिझायनर ब्रँड्सच्या वस्त्रप्रावरणांच्या उत्तम दर्जाच्या नकला परवडेबल किंमतीत मिळण्याचं हे ठिकाण म्हणजे मुंबईच्या मूळ फॅशन स्ट्रीटप्रमाणेच एक रस्ता आणि त्याकडेचे स्टॉल.
अर्थात इथले कपडे आणि इतर वस्तू मूळ फॅशन स्ट्रीटच्या पुरवठादारांकडूनच येत असल्यामुळे ते किंमतीत मुंबई-पुणे प्रवासखर्च आणि वाटेतला चिरीमिरीखर्चही त्यांच्या किंमतीत ऍड करतात. इथे कोणत्याही वस्तूची दुकानदार सुरुवातीला जी किंमत सांगतो ती ऐकल्यावर प्रत्येक शर्ट एसी बसचं स्वतंत्र तिकीट काढून पुण्याला आलाय, असं वाटतं. तब्येतीत बार्गेनिंग केल्यानंतर मात्र हा प्रवासखर्च मालमोटारीच्या संयुक्त भाडय़ाइतका कमी होऊन जातो.
इथला प्रत्येक दुकानदार हा फॅशनतज्ञ असल्याच्या थाटात असल्यामुळे जगातलं बेस्टात बेस्ट आणि मोस्ट ट्रेण्डी काय ते इथेच मिळतंय, अशी गिऱहाईकाची भावना होत जाते. अर्थात, गंजीफ्रॉक आणि पट्टेरी हाफ चड्डी या वेषात देखील गुचीचे कपडे परिधान करून रॅम्पवॉक करत असल्याच्या थाटात चालणाऱयांचं हे गाव असल्यामुळे ही भावना झाली नाही तरी फारसा फरक पडत नाही.
गंजीफ्रॉक आणि पट्टेरी चड्डीच्या जागी पांढरं शर्ट, पांढरी पँट, पांढरे बूट, पांढरा पट्टा, पांढऱया काडय़ांचा गॉगल अशा वेषात रॅम्पवॉक करणारी `इथून तिथून अजून मिथुन' मंडळी `खडकी दापोडी' परिसरात अजून दिसतात म्हणे.
मिथुन चक्रवर्ती हा इथला राष्ट्रीय हिरो. त्याची जागा त्याच्यासारख्याच दिसणाऱया भोजपुरी नटांनी घेतली असेल कदाचित; पण, इथली फॅशन अरुण टॉकिजला लागणाऱया सिनेमाच्या पोस्टरवरून स्फुरते, अशी वदंता आहे. हे कपडे कुठे मिळतात, ते मात्र गुपित आहे. पिंपरीच्या सिंधी दुकानदारांकडून कापड घेऊन ते परिसरातल्या खास टेलरांकडून शिवून घेतलं जात असावं, अशी दाट शंका येते. `बॉम्बे' या नावाचं या परिसराला फार आकर्षण. त्यामुळे केस कापून घ्यायचे ते बॉम्बे हेअर कटिंग सलूनमध्ये, कपडे शिवायचे ते `बॉम्बे टेलर'कडे. फॅशनला म्हणायचं बॉम्बे फॅशन.
पुण्यात जेवढे चिरतरुण दिसतात, त्याहून अधिक चिरप्रौढ दिसतात... इयत्ता चौथीपासूनच यांच्या चेहऱयावर चिंता करितो विश्वाची असा रामदासी आविर्भाव आणि फडताळात नाक चेमटलं गेल्यासारखे त्रासिक भाव. ते सातवीत असताना गल्लीच्या नाक्यावर उभे राहून देशातील भ्रष्टाचार हटवण्यासाठी काय करायला हवं, याबद्दल पंतप्रधानांना सल्ला देऊ शकतात आणि दहावीत गेल्यावर `डिअर मिस्टर प्रेसिडेन्ट ऑफ युनायटेड स्टेट्स'ला सबप्राइम घोटाळा कसा टाळता आला असता, याबद्दल (स्थळ तेच) मार्गदर्शन करू शकतात.
यांचं सगळंच वयावेगळं, जगावेगळं असल्यामुळे त्यांची फॅशनही वेगळी... म्हणजे फॅशनेबल नसलेली. सध्या चलनात काय नाही, ते यांच्या अंगावर दिसणार. टाइट्सचा जमाना आला की हे ढगळ कपडे घालणार. प्लीट्सच्या ट्राऊझर बाद झाल्या की हे चार प्लीट्स आणि क्रॉस पॉकेट्सची फॅशन करणार. कोपरापर्यंत बाह्या दुमडलेला आणि दीड माणसाच्या आकाराचा शर्ट, हा यांचा राष्ट्रीय पोषाख.
(पुण्यात प्रत्येक माणूस हे स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र आहे, याची कृपया नोंद घ्यावी.) ही मंडळी लक्ष्मी रोडवर भारत वुलन किंवा तत्सम दुकानात मळखाऊ कापड घेणार आणि शगुनच्या चौकातून चार पिढय़ांच्या टेलरच्या चौथ्या पिढीकडून ते शिवून घेणार.
या चिरप्रौढ पुणेकरांच्या वैचारिक गूढगहन विश्वात कोणत्याही सर्जनशील कलेच्या आविष्काराची किंवा आस्वादाची किंचितशी शंका मिसळली की डायरेक्ट कलावंत किंवा विचारवंतच तयार होतात. त्यांच्यासाठी झब्बे मस्ट. ते फॅब इंडियाचे असणार की खादी ग्रामोद्योग भांडाराचे हे कलावंताच्या कलाबाह्य आणि रूक्ष अशा उदरनिर्वाह साधनाच्या बळकटीवर अवलंबून असतं. सवाई गंधर्व महोत्सव हा मंचावर शास्त्राeय संगीताचा आणि समोर अशा स्वघोषित अभिजात कलारसिकांच्या अभिजात, चिरंजीव फॅशनींचा एकसमयावच्छेदेकरून सुरू असणारा महोत्सव. इथे तरतऱहेच्या शालींचंही उपप्रदर्शन मांडलेलं असतं.
पुण्यातल्या तरुणीची- धुळीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणानं तोंडाला फडकं बांधायची गरज न उरलेली- प्रौढा किंवा पुरंध्री झाली की तिची पावलं फॅशन स्ट्रीटऐवजी तुळशीबाग आणि हाँगकाँग लेनकडे वळतात. अजून आपलं हे वय झालेलं नाही ही त्या वयातल्या स्त्राeची स्वत:ची भावना करून देणारी सगळी प्रावरणं आणि प्रसाधनं इथे मिळतात. अघळपघळ पंजाबी ड्रेस आणि मॅक्सी नावाचा, हॉस्पिटलातल्या पेशंटवरही भयाण दिसणारा गाऊन एवढीच फॅशन ज्यांच्या आयुष्यात उरलेली आहे अशा काकवांनाही `ताई, तुमचं ताई म्हणण्याएवढं वय झालेलं नाही,' असं पटवून देणारे चतुर दुकानदार इथे काकांच्या क्रॉस पॉकेट खिशांना चांगलीच चाट लावतात.
तुळशीबागेची आणखी वेगळीच तऱहा. ज्या मुंबईतून इथल्या बहुतेक चिजा येतात, तिथल्या मराठी बायका त्याच चिजा इथून जास्त भावाला घेऊन जातात आणि `तुळशीबागेतून आणली' म्हणून अभिमानानं मिरवतात. ही त्यांची पुणेप्रेरित फॅशन.
पुण्यात आता पुणे फॅशन वीकसुद्धा होऊ लागलाय. भारताच्या फॅशन-नकाशावरचं एक महत्वाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातंय. पण, गुची-अरमानीखाली काहीही तोंडी लावायला तयार नसणारांपासून `आमचे प्रेरणास्थान भंपकराव भुस्कुटे' हे तोंडाने न सांगताच बेंगरूळ पोस्टरांवरून कडक कांजीच्या पांढऱयाशुभ्र खादी पोषाखांतून जाहीर करणाऱया गल्लोगल्लीच्या बजरंग बगळय़ांपर्यंत कोणालाही विचारा, `तुही फ्याशन कंची?'
तो किंवा ती ताडकन उत्तरेल, ``ही फॅशनबिशनची छचोर थेरं आम्ही करत नाही. आय डोन्ट लुक फॉर इन्स्पिरेशन एनीव्हेअर. आय ओन्ली वेअर व्हॉट सुट्स माय पर्सोना. जे हाताला लागेल ते मी घालून बाहेर पडतो/ते.'' या सगळय़ा वाक्यांच्यामध्ये `मला काय काहीही छानच दिसतं,' असं एक वाक्य दडलेलं तरी असतं किंवा निर्ढावलेला पुणेकर ते उच्चारतोसुद्धा.
असला नार्सिससला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स देणारा बेडर आत्मस्तुतीपर स्पष्टवक्तेपणा हीच तर या शहराची ओळख बनलेली सगळय़ात मोठी चिरकालिक फॅशन आहे.
(पुण्यभूषण दिवाळी अंक, २०११)