Friday, November 11, 2011

तारखेत काय आहे?

‘नावात काय आहे?’ असा सवाल शेक्स्पीअरने केला तेव्हा त्याच्या आसपास ‘अमुक नाही केलं तर नावाचा ढमुकराव नाही’ अशा गर्जना करणारे नरपुंगव नसावेत. त्याच्या आयुष्यकाळात 11 नोव्हेंबर 1611 ही तारीख (म्हणजे त्या शतकातील 11.11.11) येऊन गेलेली असल्याने असेल कदाचित; पण, ‘तारखेत काय आहे’, असे विचारण्याची हिंमत काही त्याने केली नाही. तो आजच्या काळात असता, तर 11.11.2011 ही तारीख साजरी करण्याची अहमहमिका पाहून हा प्रश्न त्याला पडला नसता, किमान तो ओठांवर तरी नक्कीच आला नसता. आज 11.11.11 रोजी 11 वाजता किंवा 11 वाजून 11 मिनिटांनी असंख्य बाळं जन्माला येणार आहेत. अनेक जोडपी विवाहबंधनात अडकणार आहेत. अनेक वस्तूंच्या खरेद्या होणार आहेत. बाळांबरोबरच अनेक वस्तूंचीही ‘डिलिव्हरी’ अगदी 11.11 च्याच ठोक्याला केली जाणार आहे. या दिवशी 11.11.11 याच नावाचा हॉलिवुडचा आपत्तीपट जगभरात प्रदर्शित होत आहे. शिवाय, एका भारतीय निर्मात्याने ‘प्रोजेक्ट 11’ या नावाने तयार केलेला चित्रपट जगभरातील 11 दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला आहे. पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजच्या 1993च्या बॅचचे देशविदेशांत विखुरलेले 35 माजी विद्यार्थी चंडीगडमध्ये 11 वाजून 11 मिनिटांनी भेटणार आहेत, तेही सेक्टर 11मधील 11 नंबरच्या घराजवळ. आता मुहूर्ताला नेमके अकराच जण आले नाहीत, म्हणजे मिळवली. हे झाले ओढून ताणून 11.11.11 साजरे करणे. अमेरिकेत बेट्सी आणि केटी ओव्हरमन या जुळय़ा बहिणींसाठी मात्र 11.11.11 खरोखरीच खास आहे. त्यांचा हा 11 वा वाढदिवस आहे. या शतकात तारीख, महिना, साल यांचा आकडा एकच असणारे 10 दिवस याआधी येऊन गेले आहेत. 01.01.01 पासून 10.10.10 पर्यंत. मात्र, आकडय़ांमध्येच नव्हे, तर जीवनव्यवहारांमध्येही पहिलेपणाचा मान असलेल्या 1 या आकडय़ाची द्विरुक्ती आणि त्याची पुनरावृत्ती, असा योग एकमेव. गंभीरपणे विचार केला, तर जे अनादि-अनंत आहे, त्या विश्वातील एका नगण्य ग्रहावरील य:कश्चित प्राण्याने रचलेल्या अगणित कालगणनांपैकी एकीमधील हा एक वैचित्र्यपूर्ण आकडा आहे, असे लक्षात घेतले, तर 11.11.11 चा फुगा फुटायला हवा. परंतु, 11.11.11च्या ‘उत्सवा’तून संपूर्ण मनुष्यजातीला जोडणारे काही धागे सापडतात. फुटकळ, नैमित्तिक गोष्टींमध्ये काही ना काही कार्यकारणभाव शोधणे, ही ‘अपोफेनिया’ या नावाने ओळखली जाणारी मानवी सहजप्रवृत्ती आहे. माणसाच्या सगळय़ा श्रद्धा-अंधश्रद्धा याच प्रवृत्तीतून निर्माण होतात, हा सगळीकडे समान असलेला एक धागा. शिवाय, सगळय़ा श्रद्धा-अंधश्रद्धा शुभाशुभाच्या कल्पनांशी जोडलेल्या असतात, हा दुसरा धागा. एकीकडे 11.11.11 हा शुभदिवस मानून त्या दिवशी मंगलकार्ये, खरेदी, मुलांचे जन्म जुळवून आणण्याची धडपड सुरू आहे. दुसरीकडे हा दिवस पृथ्वीचा घातवार ठरेल, प्रलय ओढवेल, मनुष्यजातीचा नायनाट होईल, अशा भयकारी आशंकांचे अवडंबर माजवले जाते आहे. त्यासाठी मध्य अमेरिकेत गेल्या 11.11.11ला म्हणजे 11.11.1911 रोजी झालेल्या आकस्मिक तापमानबदलांनी माजवलेल्या उत्पातांचा हवाला दिला जातो. ‘ग्रेट ब्लू नॉर्दर’ या नावाने ओळखल्या गेलेल्या या नैसर्गिक ‘फिनॉमिनन’मध्ये अनेक भागांत एकाच दिवसात तापमानाचे उच्चांक आणि नीचांक गाठले गेले. कन्सास शहरात दिवसाचे तापमान 24 अंश सेल्सिअस होते, ते रात्री शून्याखाली 11 अंशांवर घसरले. या हाहाकाराला वादळांची, चक्रीवादळांची जोड होती. त्यात 300 जण मरण पावले. मात्र, हा अपवाद वगळता, ज्यांत एक या आकडय़ाची पुनरावृत्ती आहे, अशा इसवी सनाच्या कोणत्याही वर्षात काहीही खास घडलेले नाही. शिवाय, ‘ग्रेट ब्लू नॉर्दर’ हा उत्तर गोलार्धात नोव्हेंबरमध्ये सर्रास घडणारा प्रकार आहे. अर्थात, ही सारी माहिती विश्वाच्या पसा-यात तारीख या गोष्टीचा फोलपणा जाणणा-याच्याच उपयोगाची. इतरांच्या उत्साहावर विरजण का घालावे? त्रिविधतापांनी गांजलेल्या मनुष्यमात्रांच्या आयुष्यात साजरे करण्यासारखे काही आहे, तोवरच गंमत आहे.
 
(प्रहार, ११.११.११)

No comments:

Post a Comment