Tuesday, November 15, 2011

छोटासा ब्रेक, ब्रेकिंग न्यूजला!

गेली 35 मिनिटे टीव्ही बंद आहे.. या घरात टीव्ही बंद असण्याचा हा उच्चांक आहे. याआधी तीन वर्षापूर्वी एकदा सतरा मिनिटे बंद होता टीव्ही, लाइट गेल्यामुळे.
 
टीव्ही बंद आहे आणि आम्ही त्यासमोर सुन्न होऊन बसलो आहोत.
 
हे असं कसं झालं याचा विचार करतो आहोत. असं कसं होऊ शकतं याचाही विचार करतो आहोत.
 
आमच्यापरीनं आम्ही प्रयत्न केला होता टीव्ही पाहण्याचा.
 
काही मालिका पाहून पाहिल्या. ‘बिग बॉस’च्या घरात डोकावलो. जगाची हिस्ट्री जाणून घेतली. फॅशन टीव्हीवर जॉग्राफी बघितली. योगगुरू, सद्गुरूंपासून महागुरूंपर्यंत सगळ्यांची टिवटिव ऐकली. गाण्यांच्या कवायती पाहिल्या. गेल्याच आठवडय़ात थिएटरला लागून एका आठवडय़ात सुपरहिटही झालेल्या सिनेमाचा चार चॅनेलांवरचा टेलिव्हिजन प्रिमियर पाहिला. शेवटीशेवटी जाहिरातीच बघितल्या. त्याच त्यातल्या त्यात मनोरंजक होत्या. पण ‘ती’ मजा कशातही नव्हती.. अखेरीस आम्ही रिमोट उचलला आणि टीव्ही बंद करून टाकला.
 
आमच्यासमोरचा टीव्ही बंद झाला म्हटल्यावर सौ. धावत आली, आधी तिनं लाइटचं कनेक्शन वगैरे पाहिलं. ‘मीच बंद केलाय तो’, असं सांगितल्यावर तिनं कपाळाला हात लावून ताप वगैरे आलाय का, हे पाहिलं आणि नंतर तोंडाचा वासही घेतला. आमच्या घरातला टीव्ही बंद, हे एवढं मोठं आक्रीत की शेजारपाजारचे सगळे चाळभैरव डोकावून ‘काय तब्येत बरी आहे ना साहेबांची?’ म्हणून विचारून गेले.
 
साहजिकच आहे. व्हीआरएस घेतल्यापासून दिवसातले झोपेचे सहा तास आणि आन्हिकांचे एक-दोन तास वगळले, तर उरलेला सर्व काळ आम्ही टीव्हीसमोरच असतो. सर्व काळ आमच्यासमोर टीव्ही सुरू असतो आणि त्यावर अहोरात्र न्यूज चॅनेल सुरू असतात. फक्त न्यूज चॅनेल. दुसरं तिसरं काहीही नाही. हे वाचून, आम्हाला बातम्यांचा फार नाद आहे, अशी कोणाची समजूत झाली असेल, तर त्या गृहस्थानं आयुष्यात न्यूज चॅनेल पाहिलेलं नाही, हे उघड आहे. टीव्हीवरच्या सगळ्या प्रकारच्या चॅनेलांमध्ये सर्वात जास्त मनोरंजन होतं ते न्यूज चॅनेलमधूनच, असा आमचा दावा आहे.
अहाहा! काय ते निवेदकांचे हातवारे! काय तो जिवंत अभिनय. आग लागल्याची बातमी अशी सांगतात की, वाटावं याचाच पार्श्वभाग ‘लाइव्ह’ पोळतोय. सनसनाटी गुन्हेगारी कार्यक्रमाचा निवेदक पाहिला की तो आत्ताच कुठेतरी बलात्कार करून, मुडदा पाडून, दरोडा घालून किंवा किमानपक्षी जबरी चोरी तरी करून आला असावा, असंच वाटतं. किती प्रत्ययकारी सादरीकरण. शिवाय दर मिनिटाला ब्रेकिंग न्यूज. काय घडतंय साहेबांच्या सभेत? साहेब बंगल्यावर जागे होऊन आळोखेपिळोखे देतायत.. ब्रेकिंग न्यूज. साहेबांनी आताच मुखमार्जन केले.. ब्रेकिंग न्यूज. नुकताच त्यांनी चहा घेतला.. ब्रेकिंग न्यूज. आताच त्यांनी बाहेर जाण्याचे कपडे चढवले.. ब्रेकिंग न्यूज. साहेबांचा ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतोय.. ब्रेकिंग न्यूज. साहेबांच्या गाडीनं पहिलं वळण घेतलं.. ब्रेकिंग न्यूज. बरं सगळय़ा बातम्या राजकीय, गुन्हेगारी वगैरे नाहीत हं. काही चॅनेलांवर मौलिक आध्यात्मिक ज्ञान. आज महिन्याचा तिसरा मंगळवार. आजचा दुसरा प्रहर शुभ की अशुभ. राहूचा खडा केतूच्या बोटात घातला आणि माणूस धंद्यात कसा साफ बुडाला. आता याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणाल. पण, न्यूज चॅनेलवरून विज्ञानाच्या किती बातम्या दाखवल्या जातात. मुर्शिदाबादच्या खेडय़ातल्या गायी चोरून नेतेय उडती तबकडी. एकदम सचित्र.. तबकडीच्या पोटातून निघालेला प्रकाश आणि त्यात उचलली गेलेली गाय.
असो, असो, असो. आमचं हे न्यूज चॅनेलप्रेम उफाळून आलं की आम्हाला कशाचंही भान राहात नाही.
 
आणि आज.. आज मात्र आम्ही तेच न्यूज चॅनेल बंद करून बसलो होतो.
 
कोणत्या डोळ्यांनी पाहणार हे चॅनेल तुम्हीच सांगा.
 
काय काय स्वप्नं पाहिली होती आम्ही ऐश्वर्या राय-बच्चनची.
 
चावटपणा करू नका. आम्ही ‘त्या’ स्वप्नांबद्दल बोलत नाही आहोत. कुणाच्याही सुनांकडे वाकडय़ा नजरेने पाहात नाही आम्ही. जे काही पाहायचं ते सरळच पाहून टाकतो. असो. ऐश्वर्याला बाळ होणार म्हटल्यावर आमच्या मनात घुंगुरवाळेच छुनछुनायला लागले होते.
‘निघाली निघाली, ऐश्वर्याला घेऊन गाडी हॉस्पिटलला निघाली’ या बातमीनं सुरू झालेलं ‘लाइव्ह’ बाळंतपण हे ‘आली आली ऐश्वर्या बाळाला घेऊन ‘जलसा’मध्ये परतली’ या बातमीनंच संपेल, याची खात्री होती आम्हाला! ऐश्वर्याला पहिली कळ आली.. ब्रेकिंग न्यूज. ऐश्वर्या लेबर रूममध्ये.. ब्रेकिंग न्यूज. ऐश्वर्याने बाळाला जन्म दिला.. ब्रेकिंग न्यूज. बाळ मुलगा की मुलगी- शंभर कोटी रुपयांचा सट्टा.. ब्रेकिंग न्यूज. बाळ मातृमुखी की पितृमुखी.. ऐका आजोबांच्या तोंडून.. ब्रेकिंग न्यूज. बाळाची जन्मकुंडली, भविष्य.. ब्रेकिंग न्यूज. ऐश्वर्यानं बाळाला जवळ घेतलं.. बाळाला पहिल्यांदा भरवला प्रेमपान्हा.. ब्रेकिंग न्यूज. डॉक्टरांच्या मुलाखती, वॉर्डबॉइजच्या मुलाखती. नर्सेसच्या मुलाखती. बाळाला भेटायला येणा-यांच्या मुलाखती. बाळाला भेटायला येणा-यांना पाहण्यासाठी गर्दी करणा-यांच्या मुलाखती. अहाहाहा! विचार करा. काय धमाल येईल. त्यात 11.11.11चा मुहूर्तही बाळानं गाठला, तर बहारच उडेल, म्हणून आम्ही पाच दिवसांचा चणे-मुरमुरे-दाणे यांचा स्टॉक करून टीव्हीसमोर बसायचा कार्यक्रम फिक्स करून टाकला आणि बातमी आली.. ‘बेबी बी’च्या आगमनाची बातमी कोणताही चॅनेल आमंत्रणाविना कव्हरच करणार नाही. बच्चन कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करणार म्हणे सगळे. वा वा वा! आणि आमच्यासारख्या अट्टल प्रेक्षकांना वा-यावर सोडणार!
 अरे कुठे फेडाल हे पाप? विसरलात ते जुने दिवस, जेव्हा हरिवंशराय यांच्या निधनाच्या रात्री अडीच वाजता तुम्ही ‘जलसा’समोर ओबी व्हॅन लावून आत हाक मारण्यासाठी येणा-या-जाणा-या प्रत्येकाला गाठून विचारत होतात, ‘‘अंदर कैसा माहौल है?’’ आत नाचगाणं सुरू नाहीये, हे समजून हायसं झाल्यासारखं बातमीदार पुढच्या माणसाला पुन्हा तेच विचारत होता. आणि आता तुम्ही ऐश्वर्याच्या बाळंतपणासारखी सुवर्णसंधी फुंकून टाकलीत. तिनं लेबर रूममध्ये कोणता गाऊन घातलाय, याची ब्रेकिंग न्यूज सांगितली नाहीत, तर त्याच्यासारखाच गाऊन आणा ना गडे, असा गोड हट्ट घरोघरच्या बायका- प्रसंगी आधीच्या दोन पोरांना भावंड आणण्याच्या उठाठेवीचा धोका पत्करून- कसा करणार? ऐश्वर्याच्या बाळानं घातलेल्या ड्रेसेसची फॅशन कशी येणार? ‘बेबी (बी) फूड’ची जाहिरात कशी होणार?
सगळ्यात महत्त्वाचं, आमच्यासारख्यांचं मनोरंजन कसं होणार?
 
आता सांगा. जो माणूस मुळात दिवसभर टीव्ही, त्यात न्यूज चॅनल पाहतो, त्याला विचार करण्याची प्रॅक्टिस राहिली असेल का? अशा माणसाला काही मिनिटांत एवढे विचार करायला भाग पाडणं, हे त्याच्या जिवाशी खेळणं नाही का? ज्यांच्यावर आम्ही एवढं प्रेम करतो, त्या न्यूज चॅनेलांनी आमच्या जिवाशी असा खेळ करावा? माणूस सुन्न होणार नाहीतर काय?
 
तेवढय़ात चिरंजीव बाहेरून धावत आले आणि म्हणाले, ‘‘बाबा, लवकर टीव्ही लावा. 11.11.11 रोजी 11 वाजून 11 मिनिटांनीच आत्महत्या करायला निघालेल्या बाईच्या शेजारणीची मुलाखत चालू आहे टीव्हीवर. नंतर तिला गळफास लावून घेतानाही दाखवणार आहेत..’’
 
‘‘..अरे, पण न्यूज चॅनेलांनी ते स्वत:हून स्वत:वर लादून घेतलेले निर्बंध..’’
 
‘‘ते ऐश्वर्या रायपुरतेच होते हो! कायमचे कसे असतील? घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या?’’
 
आम्ही हर्षभरित होत्साते रिमोटचे बटण दाबले आणि कोचात सैलावून प्लेटीतले बचकाभर मुरमुरे तोंडात सोडले.
 समोर पाटी झळकतच होती, ‘ब्रेकिंग न्यूज!!!’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, १३ नोव्हेंबर, २०११)

No comments:

Post a Comment