भारत देशाचे कधी नामांतर करण्याची वेळ आलीच, तर नवे नाव ‘बडबडिस्तान’ ठेवावे लागेल..
महाराष्ट्राला तर आतापासूनच बकबकराष्ट्र म्हणायला हरकत नाही..
इथली सगळीच माणसं अहोरात्र (झोपेचा वेळ सोडून- काही लोक झोपेतही बडबडतात, ते सोडा!) इतकी अखंड बोलत असतात की ही एवढी बडबड ऐकतो तरी कोण, असा प्रश्न पडावा? ‘कोणीही नाही’ हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. ते स्वाभाविकच आहे. कारण, जो तो बोलण्यातच मग्न असेल, तर ऐकण्याची फुर्सत आहे कुणाला?
शिवाय, ‘ऐकणे’ आणि ‘ऐकून घेणे’ यातल्या अर्थभेदाची सुप्त सीमारेषा इथल्या ढोबळमनस्क समूहमनातून लुप्त झालेली आहे. त्यात मराठी माणूस कुणाचं ऐकून घेत नाही, हा त्याचा ज्वलंत बाणाबिणा असल्यामुळे इथे कुणी कुणाचं ऐकून तर घेत नाहीच, पण नीट ऐकतही नाही.
आता जिथे कुणीच नीट ऐकतही नाही, तिथे सगळे सतत भयाभया कुणासाठी बोलत असतात, असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर ‘स्वत:साठी’ असं आहे. मात्र, बोलण्याच्या नादात माणसं स्वत:च बोललेलं स्वत: तरी नीट ऐकत असतील का, असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर नकारार्थी येतं. कारण, स्वत: बोललेलं माणसं ऐकत असती, तर आपण अत्यंत निर्थक, अनावश्यक बडबड करतो, हे त्यांना कळलं असतं आणि ती गप्प बसली असती. पण, ज्याअर्थी माणसं अजूनही बोलतायत, त्याअर्थी ती स्वत:चंही ऐकत नाहीत, असा कयास बांधायला हरकत नाही.
महाराष्ट्र देशी लोकांना बोलण्याची सवय इतकी की जगभरात ज्यांना ‘चित्रपट’ म्हणतात, ते महाराष्ट्रात ‘बोलपट’ म्हणून ओळखले जातात. त्या धर्तीवर, पात्रांच्या तोंडचे संवाद कमी पडतात म्हणून की काय, ती गप्प बसतील तेव्हा त्यांच्या मनातलेही संवाद ऐकवणा-या मालिकांनाही खरं तर ‘बोलिका’ म्हणायला हरकत नाही. (त्यातल्या नटांवर कॅमेरे इतक्यांदा झूम करत असतात, की ते भूमिका साकारत नसून ‘झूमिका’ साकारत
असतात! असो.) तीन तास अखंड बडबडीच्या धबधब्यात न्हायला मिळावं म्हणून इथले
लोक नाटक पाहायला जातात. स्टेजवर पात्रं एकामागोमाग एक बोलत असतात. ती
बोलणं थांबवून विनोदी कवायती करू लागली की प्रेक्षक हसत हसत एकमेकांशी
बोलून घेतात. ज्यांच्यापाशी बोलण्यासारखं कुणी नसतं, ते मोबाइलवरून बाहेर कुणाशीतरी बोलू लागतात.
बरं बोलणं एकमेकांशी विचारांची आदानप्रदान केल्यासारखं नाही, तर एकमेकांवर सदोदित खेकसल्यासारखं. आपल्या शेजारच्या एका प्रांताच्या भाषेबद्दल आपण विनोदानं म्हणतो की, एका डब्यात खडे ठेवून खडखडवले की जो आवाज होतो, तो आवाज म्हणजे ती भाषा. असे खडे भरलेले पत्र्याचे दोन डबे एकमेकांवर आपटल्यासारखं आपल्या भाषेतलं संभाषण चालतं, त्याचं काय? आपला प्रांत सगळ्या देशात भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध आहे, तो केवळ आपल्या या अनोख्या संभाषणकौशल्यामुळेच.
अखंड बडबडीच्या या सार्वत्रिक लागणीमुळे या प्रांतात वक्तृत्व नामक कलेला अतीव आणि अनावश्यक महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
शिवाय, प्रभावी वक्तृत्व म्हणजे काय, याचीही आपल्याकडची कल्पना ढोबळ आणि बटबटीत. भाषण हे अधिक व्यक्तींशी एकाच वेळी केलेलं संभाषण असायला हवं, तो एकमेकांशी समान पातळीवरचा संवाद असायला हवा. इथे त्या प्रकारचं अनाग्रही, समानशील वक्तृत्व अनाकर्षक ठरतं. अनावश्यक हातवारे न करता, आगखाऊ भाषा न वापरता, उगाच आवाज चढवून, डोळे
गरगरा फिरवून न बोलता आपले विचार शांत संथ संयत शैलीत मांडणारे गांधीजी
इथल्या वक्तृत्वप्रेमींच्या लेखी फ्लॅट बोलायचे. इतकं सरळ, नीरस बोलून त्यांनी सामान्य जनतेच्या मनात एवढं मोठं कसं स्थान मिळवलं, याचा विचार केला जात नाही. अत्यंत स्फोटक, जळजळीत, ओघवते, ज्वालाग्राही, मर्मभेदक, प्रखर युक्तिवाद करून विरोधी विचारांच्या चिंधडय़ा उडवणाऱ्या अमोघ वक्त्यांना श्रोते हजारोंच्या नव्हे, लाखोंच्या संख्येने मिळाले; अनुयायी मात्र दोन-चारही गोळा करता करता नाकी नऊ आले, त्याचं काय?
वक्तृत्वाची
आणखी एक लोकप्रिय त-हा म्हणजे आख्यानी वक्तृत्व. बोलणारा थोर विचारवंत
महान ज्ञान देतो आहे आणि ऐकणारे भाग्यवंत श्रोते आपल्या कर्णसंपुटात ते
विचारतीर्थ भक्तिभावाने साठवून ठेवत आहेत, अशी सत्संगी वृत्ती असल्याखेरीज या भाषणांसमोर टिकाव लागायचा नाही. कारण, मूलभूत विचारापेक्षा पाठांतर, घोटवलेली शब्दकळा, जमवलेली शब्दसंपदा, कमावलेला आवाज, कृत्रिम शब्दफेक आणि त्यातून निर्माण होणारा आघाती नाद, यांच्या
गारुडाने मोहित होऊन माना डोलावणा-यांचीच इथे बहुसंख्या. अशा मोहित
करणा-या विचारवंतांची भाषणं ऐकताना खरोखरीच विचार करू शकणा-या माणसाच्या
डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहतं. ते म्हणजे, तो वक्ता
साबणाचं पाणी आणि नळी घेऊन उभा आहे. त्या नळीतून हवा फुंकून तो सुंदर सुंदर
शब्दांचे आकर्षक बुडबुडे काढतो आहे आणि ते पाहून लहान मुलांसारखे श्रोते
टाळ्या पिटत आहेत.
ज्याच्यापाशी एवढीही पाठांतरसंपदा आणि शब्दसंपदा नाही, त्यालाही प्रभावी वक्ता बनण्यात काहीही अडचण नाही. त्यानं फक्त लोकांना सतत ‘हशिवलं’ पाहिजे.
त्यासाठी कितीही निर्बुद्ध आणि आचरट कोटय़ा केल्या तरी चालतील. अश्लील
किंवा द्वयर्थी बोलून महिलावर्गाच्या माना लाजेने खाली जातील, असं काही बोलता आलं तर फारच उत्तम. त्याने पुरुष तर खूष होतातच, पण, चक्क महिलाही ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ करून हसतात.
आता कुणी म्हणेल की, बोलणारे बोलतात, ऐकणारे ऐकतात, आपल्याला त्याचं काय?
त्यात आपल्याला प्रॉब्लेम एकच आहे.. तोंडाला येईल ते वाट्टेल त्या भाषेत बकणे, हा इथे नेतृत्वगुण मानला जातो. निव्वळ बोलबच्चनगिरीवर मराठी हृदयांवर कसे राज्य करता येते, याची असंख्य उदाहरणे आधुनिक महाराष्ट्रात सापडतात.
वक्तृत्व हा नेतृत्वगुणांमधला एक महत्वाचा गुण आहेच, त्यात वाद नाही. जगातले अनेक मोठे नेते हे मोठे वक्ते होते, असं इतिहास सांगतो. ते
स्वाभाविकच आहे. चार लोकांना नेत्याचे विचार समजल्याखेरीज ते अनुयायी कसे
बनणार आणि आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी प्रभावी वाणी असलीच
पाहिजे.
अगदी बरोबर आहे हे!
भानगड फक्त एकच आहे.. वक्त्याकडे विचार असेल, समाजाला दिशा देण्याची, यंत्रणा चालवण्याची, कारभार हाकण्याची कुवत असेल, तरच तो नेता होऊ शकतो ना! हे सगळे गुण असलेल्या माणसाकडे प्रभावी वक्तृत्व नसलं, तरी काय बिघडतं? आपल्याकडे प्रभावी वक्तृत्वाच्या भांडवलावर विचाराच्या नावाखाली नुसता विखार पेरणारे नेते होऊन बसले आहेत, त्यांचं काय?(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(२७ डिसेंबर, २०११)
Badabadeet hee aanakhee ek bhar .
ReplyDeletePan molaachee