Sunday, November 20, 2011

इये आश्वासनांचिये नगरी!

‘आश्वासन नगरीत आपलं हार्दिक स्वागत’
 
समोरचा भव्य फलक पाहूनही भिकाजीराव मतदातेंचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
 
गेल्या काही दिवसांचे पेपर पाहिल्यानंतर ‘निवडणुका जवळ आल्या’ हे त्यांना आपोआपच कळलं होतं. माणसांना राहायला जागा नसताना कुणी कुत्र्यांसाठी उद्यान बांधून देण्याचं आश्वासन देत होतं, कुणी प्रत्येक झोपडीला नळ कनेक्शनचं, कुणी देवळांसमोरच्या मोकाट गोमातांना संरक्षण देण्याचं. निवडून आल्यापासून ज्यांचं दर्शन दुर्लभ झालं होतं, ते लोकप्रतिनिधी आता नाक्यानाक्यावर हात जोडून उभे होते. ज्या रस्त्यांचे खड्डे चुकवण्यात पाच वर्ष उलटली, ते रस्ते एकेका रात्रीत गुळगुळीत, चकचकीत होत होते. रस्त्यांवरचे दिवे प्रखर झाले होते. एकदा तर रात्री उशिरा आल्यावर आपण गल्ली चुकलो की काय असं वाटून भिकाजीराव पुढच्या गल्लीकडे निघाले होते.
 
अशात आज रविवारच्या सकाळी पेपर वाचता वाचता खुर्चीतच लागलेली डुलकी ‘‘भिकाजीराव, चला, लवकर तयार व्हा. जायचंय ना आपल्याला,’’ या अण्णा बोबडेंच्या उद्गारांनी मोडली. आधी भिकाजीरावांना दर रविवारप्रमाणे आजही फुकटचा पेपर वाचण्यासाठीच ते झोपमोड करतायत असं वाटलं होतं. पण, अण्णांनी ‘कुठे, कशाला’ या त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात वेळ वाया न दवडता झटपट कपडे घालून तयार व्हायला लावलं. चाळीच्या बाहेर एसी मोटारींची रांगच उभी होती. एक दार उघडून नगरसेवक उभा होता, दुसरं दार उघडून दुस-या पक्षाचा इच्छुक उमेदवार उभा होता आणि शोफरच्या वेषात तिसऱ्या पक्षाचा इच्छुक उमेदवार.
 
‘‘अरे बापरे, या सगळ्यांची एकी झाली म्हणजे मेलोच आपण,’’ भिकाजीरावांनी माफक विनोद केला, एरवी एखाद्या कार्यकर्त्यांनं कानफटलंच असतं त्यांना. पण, आज तिघेही उमेदवार समोर   पु. ल. देशपांडेच ज्योक मारतायत, अशा थाटात खो खो हसले. भिकाजीराव आणि अण्णा मोटारीत बसले. सुळ्ळकन मोटार निघाली. दहाव्या मिनिटाला ती या फलकासमोर उभी होती.
 
‘आश्वासन नगरीत आपलं हार्दिक स्वागत’
 
खाली उरलेल्या चार पक्षांचे इच्छुक उमेदवार पाणी, सरबत, स्नॅक्स घेऊन उभे होते. एकजण गाइड म्हणून सोबत निघाला. भव्य प्रवेशद्वारातून आत शिरताना त्यानं माहिती सांगायला सुरुवात केली, ‘‘भिकाजीरावसाहेब, नमस्कार. आश्वासन नगरीत तुमचं स्वागत. ही नगरी म्हणजे निवडणूक प्रचारातलं पुढचं पाऊल आहे. आतापर्यंत आम्ही- म्हणजे सगळ्या पक्षांचे किंवा अपक्ष उमेदवार काय करायचो, तर तुमच्याकडे जाहीरनामे पाठवायचो. दुपारी रिक्षांमधून कोकलून तुमची झोपमोड करायचो. टीव्हीवरून चर्चा करताना दिसायचो. पेपरांमध्ये जागा किंवा रिपोर्टर विकत घेऊन बातम्या पेरायचो. उद्देश काय, तर आम्हाला निवडून दिल्यास आम्ही तुमच्यासाठी काय करू, याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची. तुम्हाला भविष्याची आश्वासनं द्यायची. ही सगळी डोकेफोड टाळून तुम्हाला भविष्याचं थ्री डायमेन्शनल चित्र दाखवणारी ही नगरी आहे.. सगळ्या पक्षांनी मिळून तयार केलेली. इथं प्रत्येक पक्षाचा स्टॉल आहे. बिल्डर कसा बिल्डिंग पूर्ण व्हायच्या आधी बुकिंग घेताना सँपल फ्लॅट दाखवतो. तशी ही सँपल आश्वासनं. तुम्ही प्रत्येक स्टॉलवर जायचं, सगळे स्टॉल बघायचे. सगळी आश्वासनं समजून घ्यायची. ज्याची आश्वासनं सर्वात आकर्षक वाटतील, त्याला निवडणुकीच्या वेळी मतदान करायचं.’’
 
बोलता बोलता पहिला स्टॉल आलाच. संपूर्ण भगव्या रंगानं नटवलेल्या स्टॉलचं प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखं बनवण्यात आलं होतं. दारातच दाराच्या उंचीची धनुष्यबाणाची प्रतिकृती होती. ‘‘याऐवजी इथं मोठा कॅमेरा बनवून ठेवला असता तर बरं झालं असतं’’ प्रतिस्पर्धी उमेदवार फिस्सकरून हसत म्हणाला, तेव्हा बिचारा या पक्षाचा उमेदवारही कसनुसं हसला. करतो काय? सोबत साक्षात मतदारराजा. सुवासिनींनी ओवाळून भगवा टिळा लावल्यानंतर भिकाजीराव स्टॉलमध्ये प्रवेश करते झाले. दिवाळीतला शिवाजीचा किल्ला भव्य मैदानात मांडलेला असावा, तशी सगळ्या वॉर्डाची प्रतिकृती. हा आपलाच परिसर असं भिकाजीरावांना वाटूच नये, इतकी चकाचक. मोठमोठाल्या हवेशीर इमारती. ऐसपैस प्रकाशमान घरं. अतिक्रमणमुक्त फुटपाथ. फेरीवालेमुक्त रस्ते. होर्डिगमुक्त चौक. चरसीमुक्त उद्यानं.
झोपडय़ामुक्त मोकळी मैदानं.
 
प्रतिकृतीतला खेळण्यातला वाहतूक पोलिस गल्लीत लपून पावती फाडण्याऐवजी चौकात उभा राहून वाहतुकीचं नियंत्रण करताना दिसत होता. सरकारी कार्यालय म्हणून उभारलेल्या इमारतीतल्या सर्व टेबलांवर मान मोडून काम करणारी माणसं होती. बाहेर माहितीफलक होता आणि कर्मचारी अदबीनं बोलत होते. रस्त्यावरून पक्ष कार्यालयं, साई मंदिरं आणि उत्सवाचे मंडप गायब झालेले होते.
 
हे सगळं कल्पनाचित्र पाहून डोळ्यांतून पाणीच आलं भिकाजीरावांच्या. आतापर्यंत पालिकेत याच पक्षाची सत्ता होती आणि तरीही आश्वासन नगरीतलं एकही चित्र वॉर्डात प्रत्यक्षात कसं दिसलं नाही, हा साधा कॉमन सेन्सही विसरून त्यांनी भावनेच्या भरात ‘मतदान करायचं तर याच पक्षाला’ असा निर्धार करून टाकला. तेवढय़ात दुसरा स्टॉल आला. इथं सगळं हाय-फाय वातावरण. जिकडे तिकडे ब्लू-प्रिंटची नेत्रसुखद सजावट. भव्य कलात्मक प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर रेल्वेचं अख्खं इंजीनच ठेवलेलं होतं. ‘‘इथं खरं तर इंजिनाऐवजी डबा ठेवायला पाहिजे होता रेल्वेचा,’’ मघाचा कसनुसं हसावं लागलेला इच्छुक उमेदवार फिस्कारला, ‘‘इंधन मिळालं की कधीही कोणत्याही इंजिनाला जोडला जातो हा पक्ष.’’ आता कसनुसं हसणा-याची पाळी मघाशी फिस्कारणा-याची होती.
 
आत ‘किल्ला’ नव्हता, तर एक थिएटर होतं. तिथं भिकाजीराव बसले आणि त्यांच्या डोळ्यांवर एक चष्मा चढवला गेला. थ्रीडीमध्ये विकासाचा ब्लू प्रिंट सादर होऊ लागला. तेच ते मघाचंच सगळं. स्वच्छ, हवेशीर, प्रकाशमान, हे मुक्त ते आणि ते मुक्त हे, असं सुखसोयींनी सुसज्ज आयुष्य. इकडं आणखी एक अ‍ॅडेड बेनिफिट होता. आम्हाला मत दिलं तर तुमच्या सुखात उत्तरेकडून आलेले भिकारडे वाटेकरी नसतील, असं थेट सांगितलं जात होतं.. भिकाजीरावांना पुन्हा गदगदून आलं आणि आपलं मत यांनाच असा त्यांनी निर्धार केला..
 
..त्या दिवशी असा निर्धार त्यांनी 13 वेळा केला.. तेवढे स्टॉल पाहिले होते ना त्यांनी.. पक्ष वेगळा, चिन्ह वेगळं, स्टॉलची रचना वेगळी, माध्यम वेगळं, भाषा वेगवेगळी, पण, सर्व ठिकाणी थोडय़ाफार फरकानं हेच सुखचित्र उभं केलेलं होतं.. तीच भूल घातलेली होती..
 
..आश्वासन नगरीतल्या सुगंधी, थंडगार हवेतून बाहेर पडून कष्टकरी लेन, कामगार आळीतला कुंद, गरम हवेचा झोत अंगावर आला, तसे शहारून भिकाजीराव भानावर आले.
 
‘‘काय मग? कुणाला मत द्यायचं पक्कं केलंत?’’ अण्णांनी उत्सुकतेनं विचारलं..
 ‘‘जो मला निवडणुकीनंतर नव्हे, निवडणुकीच्या आधी, आज आत्ता ताबडतोब या आश्वासन नगरीमध्येच कायमस्वरूपी घर देईल त्याला!!!’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २० नोव्हेंबर, २०११)

No comments:

Post a Comment