Tuesday, April 29, 2014

आम्ही न-मतदार!

आयुष्यात कसलाही फार मोठा पराक्रम न गाजवता मराठी वर्तमानपत्रात फोटो छापून आणण्याची संधी आजकाल सगळय़ांसाठी खुली झाली आहे. अर्थात एखादय़ा मराठी मालिकेत दीड मिनिटांचा रोल करणारा इसम जर मराठी वर्तमानपत्रात सेलिब्रिटी बनून आपली थोर जीवनकहाणी सांगत असेल, तर ती मालिका रोज पाहण्याचं धारिष्टय़ दाखवणार्या माणसाचा अर्धा कॉलम फोटो आणि त्याचं चार ओळींचं मत छापून यायला काहीच हरकत नसावी, नाही का? टीव्हीवरच्या महाचर्चांमध्ये सहभागी होणार्यांनाही जिथे विषयाची माहिती असण्याचं बंधन नाही, तिथे सर्वसामान्य माणसाला तर सर्वतर्हेने सामान्य राहण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आजकाल सीझन निवडणुकांचा आहे त्यामुळे नवमतदार ही वर्तमानपत्रांची हुकमी गिर्हाईकं. आपण पहिल्यांदाच मत देणार आहोत, याबद्दल एखादय़ाच्या मनात एव्हरेस्टवर चढाई करत असल्याचा आनंद 1947 सालापासून दाटत असणार. पण, तो आनंद तब्बल 10 लाख 7390 वाचकांपर्यंत पोहोचवण्याची (स-फोटू) संधी मात्र आताच्या काळातच मिळते. वर्तमानपत्रांमधून ओसंडणारा हा मतदानोत्साह पाहिल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत 127 टक्के मतदान होईल, असं वाटतं. पण, प्रत्यक्षात असं होत नाही. कारण जसे काही लोक मतदान करण्याचा घटनात्मक हक्क बजावण्याची संधी म्हणून निवडणुकीकडे पाहतात, तसे काही लोक मतदान न करण्याचा हक्क बजावण्याची संधी म्हणूनही निवडणुकीला सामोरे जातात. लोकशाहीचा हा हजारो कोटींच्या खर्चाचा महागडा प्रयोग सुरू असताना हे लोक त्यात सामील होत नाहीयेत म्हणजे काय? मतदानाच्या परमपवित्र कर्तव्यापासून ढळणे हा काही मराठी वर्तमानपत्रांना आवडणारा वाचकगुण नाही. त्यामुळे मतदान न करणार्यांची कधी कोणी मुलाखत घेत नाही. आम्ही या उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या शेलक्या मुलाखती.
...
पहिल्याच मुलाखतीसाठी आम्ही विशीतला कोवळा नव-न-मतदार गाठला. त्याला सातेक मिनिटं हाका मारल्यानंतर लक्षात आलं की डोक्यावरच्या जंगलात दडलेल्या त्याच्या इयरफोन्समधून वाजणार्या संगीतातून त्या त्याच्या कानी जात नव्हत्या. त्याचा खांदा धरून हलवल्यानंतर तो त्रासिक चेहर्याने वळला.
नव-न-मतदार : व्हॉट द फ....
आम्ही : सॉरी, तुमची मुलाखत घ्यायची आहे.
न-न-म : ओह, इंटरव्हय़ू. व्हॉट इज इट रिगार्डिंग.
आम्ही : तुम्ही म्हणजे तू नवमतदार आहेस. तुला एक्सायटेड वाटत नाही का?
न-न-म : मी काय आहे असं तुम्ही म्हणालात ते मला कळलं नाही. पण, येस येस ऑफ कोर्स. आय फील एक्सायटेड. आयॅम एक्साइटेड अबाउट द व्हेकेशन्स, अपकमिंग आयपीएल, फॉर्म्युला वन सीझन इज ऑल्सो कमिंग अप. इट्स गॉन्ना बी अ लॉट्स ऑफ फन!
आम्ही : मुला, ही मुलाखत मराठीत आहे रे!
न-न-म : म्हणूनच तर इंग्लिशमध्ये बोलतोय मी. मागे एकाने इंटरव्हय़ू केलं होतं फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये, तो म्हणाला होता, इंग्लिशमध्ये बोल, मराठी पेपरात छापायचंय.
आम्ही : तुझ्या वयानुरूप तुझी एक्साइटमेंटची आयडिया बरोबर आहे. पण, आम्ही निवडणुकीच्या एक्साइटमेंटबद्दल बोलत होतो. यू नो अपकमिंग इलेक्शन...
न-न-म : ओह, दॅट पप्पू, फेकू अँड कंपनी स्टफ. वेल. मी मधून मधून बघतो न्यूज चॅनेल. बट आय डोन्ट फॉलो दॅट. दॅट शिट इज नॉट फॉर मी. सॉरी.
आम्ही : अरे, तुझ्यासारख्या तरुणांनी असं म्हणून कसं चालेल. उदय़ाचं भविष्य तुमच्या हातात आहे. तो आदित्य बघ, तोही किती तरुण आहे, तरी राजकारणात उतरलाय...
न-न-म : आदित्य हू? ओह, दॅट पोएट. तो त्याचा फॅमिली बिझनेस आहे. डॅडींच्या पाठोपाठ तोच त्यांच्या गल्ल्यावर बसणार ना. आपला काय संबंध?
आम्ही : अरे, पण अशाने घराणेशाही वाढीला लागते राजकारणात. तुझ्यासारख्या तरुणांनी देशाचा कारभार चालवायला पुढे यायला हवं. बाकी सोड, किमान मतदान तरी करायला नको का?
न-न-म : सॉरी काका! बट मला सांगा, मला ज्या गोष्टीत इंटरेस्ट नाही, ज्या पब्लिकबद्दल मला काही माहिती नाही, त्यांच्यापैकी कोणाला तरी व्होट करून काय होणार? ऑल आर वन अँड द सेम!
आम्ही : अरे पण प्रत्येक निवडणुकीत कोणी चांगले लोक उभे राहात असतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहायचं असतं.
न-न-म : वुड आय बी एबल टु इव्हन सेव्ह हिज ऑर हर डिपॉझिट? बाकीचे लोक कोणाला मतदान करणार आहेत? निवडून कोण येणार आहे? यू नो वेल. 
आम्ही निरुत्तर.
न-न-म (मोबाइलवरचा गेम दाखवत) : डोन्ट वरी. ही पाहा माझी इलेक्शन. द न्यू एज स्टाइल. हे बघा माझे फेकू आणि पप्पू. (त्याच्या मोबाइलवर दोन रेसर दिसतात.) यांच्यातल्या पाहिजे त्याला मी जिंकवू शकतो, हरवू शकतो. अँड द मोस्ट इम्पॉर्टन्ट पार्ट इज हूएव्हर विन्स (इथे आमच्याकडे अमिताभ स्टाइल खदिरांगारी नजर रोखून) हे दोघे माझ्या आयुष्याचा किंवा माझ्या देशाचा सत्यानाश करणार नाहीत. (व्रूम व्रूम व्रूम, गेम सुरू होतो, पप्पू आणि फेकू एकमेकांना मागे टाकण्याची शर्थ करू लागतात...)
.............................
या जहाल नव-न-मतदारावर उतारा म्हणून आम्हाला एका मुरलेला न-मतदार शोधायचा होता. तो एखादय़ा हायफाय सोसायटीत सापडेल, याची आम्हाला गॅरंटी होती. त्या शोधात असताना एका बिल्डिंगीतून हाक आली. आम्ही वर गेलो. दरवाजा उघडला आणि पुरुषभर उंच वर्तमानपत्रांच्या ढिगाशी टक्कर होता होता राहिली. त्या ढिगामागून एक गॉगलधारी, तुकतुकीत चेहरा डोकावला आणि ऊग्र सुगंधाच्या दर्पाला आवाज फुटला, ``कैसा किलो लेते हो?''
आपण कोणत्या अँगलने रद्दीवाले दिसतो, या प्रश्नात गढून जाण्यासाठी आमच्यापाशी वेळ नव्हता. कारण, आम्हाला आंबा विक्रेता, तूप विक्रेता, वॉचमन, लिफ्टमन, प्लम्बर, इलेक्ट्रिशियन इतकंच नव्हे, तर रामदेवबाबाचं कसलंतरी चूर्ण विकणारा स्वयंसेवकही समजले जाण्याचा गाढा अनुभव आहे. ताईंच्या उच्चारणावरून त्या मराठी असल्याचं लक्षात आल्याने आम्ही खूष झालो होतो.
आम्ही : मी रद्दीवाला नाही, ताई, पेपरवाला आहे.
न-मतदार ताई : म्हणजे काय, दोन्ही एकच ना!
आम्ही : एका अर्थी तुमचं बरोबरच आहे आणि दुसर्या अर्थीही तुमचंच बरोबर आहे. आजचा पेपर आम्ही काढला नाही, तर उदय़ा तुम्ही ही रद्दी कुठून विकू शकाल?
न-म-ता : ओह, सो सॉरी! तुम्ही तसे पेपरवाले आहात का? माझ्या लक्षातच नाही आलं.
आम्ही : त्यात तुमचा दोष नाही. आजकाल मॅनेजमेंट आम्हाला जी काही कामं करायला लावते, ती करताना आमच्याही लक्षात राहात नाही, तुमच्या कुठून राहणार. मला तुमची मुलाखत घ्यायची होती.
न-म-ता (पाणी-चहा-बिस्किटांची व्यवस्था करून, आपले घरचे कपडे आणि अवतार फोटो काढणेबल आहे की नाही याची चाचपणी करून) : बोला, काय विचारायचंय तुम्हाला?
आम्ही : इतके पेपर वाचता तुम्ही. काय मत आहे यंदाच्या निवडणुकांबद्दल.
न-म-ता : खरं सांगू का? आयम् फेड अप विथ धिस इलेक्शन. तरी नशीब आमचे आदित्य, मेघना, श्री, जान्हवी, अप्पा, मामा, आईआज्जी, माईआज्जी वगैरे मंडळी (या सगळय़ा सिरीयलमधल्या व्यक्तिरेखा) मतदानाच्या तयारीला लागलेली नाहीत आणि राजकारणाच्या चर्चाही करत नाहीत. परवा गुढीपाडव्याला सगळय़ा सिरीयल्समध्ये चार दिवस गुढीपाडवाच चालू होता. मला वाटलं आता निवडणुकीच्या वेळेला दहा दिवस तीच चर्चा करतात की काय!
आम्ही : पण म्हणजे तुम्ही न्यूज चॅनेल वगैरे पाहातच नाही का?
न-म-ता : पाहतो ना! कुठेच काही इंटरेस्टिंग नसलं की न्यूज चॅनेल पाहतो. हमखास टाइमपास होतो.
आम्ही : पण या सगळय़ाचा तुमच्या मतदानावर परिणाम होतो का?
न-म-ता : होतो ना! यंदाही आपण व्होटिंगला जायचं नाही, असा निर्धार पक्का होतो.
आम्ही : म्हणजे तुम्ही कधीच मतदान करत नाही?
न-म-ता : नाही. रेकॉर्ड आहे माझा. आजपर्यंत एकदाही मी बोटाला शाई लावून घेतली नाही. माझ्या हातावर कसलाही डाग नाही.
आम्ही : लोकशाहीतला हक्क आहे तो आपला. तो बजावायला नको का?
न-म-ता : अहो, कोण जाईल तिकडे त्या मतदान केंद्रांवर. एकतर सगळय़ा निवडणुका उन्हाळय़ात ठेवतात. एसी कारमधून गेलं तरी बूथ एसी नसतात. सगळा मेकअप ओघळतो घामाने. शिवाय सिंपल अँड एलिगंट दिसायचं की एक्स्पेन्सिव्ह लुक ठेवायचा, हेही डिसाइड होत नाही पटकन. आणि खरं सांगू का, गव्हर्न्मेंट इज नॉट सिरीयस अबाउट इलेक्शन्स.
आम्ही : काय सांगताय काय? पण, सरकारचा तर सतत प्रचार सुरू असतो मतदान करा म्हणून. हजारो कोटी रुपये खर्चून तुमच्या मतदानासाठी व्यवस्था केलीये सरकारने.
न-म-ता : ऑल हंबग अँड बुलशिट. अहो, त्यांना आमची मतं नकोच आहेत. म्हणून तर या बाबा आदमच्या काळातल्या मेथड्स वापरतात इलेक्शनला. जग आता किती पुढं गेलंय. नेक्स्ट मिस सोमालिया कोण बनावी, याबद्दल मी इथून व्होट करू शकते माझ्या मोबाइलवरून. साहेबांचा बिझनेस आहे ना सोमालियात, त्यामुळे आम्ही तिकडे व्होटिंग करू शकतो. पण आपल्या देशातला खासदार-आमदार निवडायला आम्हाला इतका त्रास भोगायला लागतो. एक अख्खा दिवस खर्च करायचा. उकाडय़ाच्या दिवसांत, रांगेत उभं राहायचं आणि मग मतदान, ही केवढी मागासलेली पद्धत आहे.
आम्ही : पण मग तुम्ही तरी सांगा, मतदानाची कोणती पद्धत असायला हवी?
न-म-ता : एकतर त्यांनी प्रायर अपॉइंटमेंट घेऊन घरी यायला हवं व्होटिंग मशीन घेऊन. ते करायचं नसेल तर केबीसीप्रमाणे व्होटिंग लाइन्स करायच्या आणि ऑनलाइन व्होटिंग घ्यायचं. आम्ही तर आमच्या मोबाइलवरून व्होटिंग करू. कँडिडेट हँडसम आणि गुड लुकिंग असेल, तर त्याच्यासाठी 100 एसेमेस पण पाठवू.
यापुढे ताईंशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. आम्हाला फक्त एकच समाधान होतं... जिथे आजच्या पेपरची आजच रद्दी होते, असं घर आम्ही याचि देही याचि डोळा पाहिलं.
...................................
आमचा तिसरा न-मतदार आम्हाला योगायोगानेच सापडला. पन्नाशीपारचे हे काका गाडीवर सामान चढवत होते. त्यावरून अंदाज आला की काका सहकुटुंब दूरच्या प्रवासाला निघाले आहेत. आम्ही सहज विचारल्यासारखं संभाषण सुरू केलं.
आम्ही : काय काका, कुठे दौरा?
न-मतदार काका (सावधपणे- याला आपण तर ओळखला नाही, पण हा सलगी दाखवतोय म्हणजे ओळखीचा असू शकतो, या भावनेने ओथंबल्या स्वरात) : हे आपलं इथेच.
आम्ही : इथेच? तयारी तर मोठय़ा टूरची दिसते.
न-म-का : कसची मोठी टूर! आता चौपदरीकरण झालं रस्त्याचं. चार-पाच तासांवर आली गावं आपली. मुंबईत दादरवरून विरारला पोहोचायच्या आत गाडी पोहोचते महाडला.
आम्ही : म्हणजे गावीच निघालात तर!
न-म-का : होय. आंब्या-गर्याचा सीझन आहे. मुंबईत गरमा पण फार.
आम्ही (कोकणी बाण्याला जागून) : गावी काय बर्फ पडतोय का?
न-म-का : नाही, पण तिथे कशी शांतता असते, झाडांमधून सळसळत हवा येते, ती जरा गार वाटते. संध्याकाळची तर एकदम कूलरची हवा सुटते.
आम्ही : पण, म्हणून मतदानाचं कर्तव्य सोडून चाललात? अशाने आपल्या मराठी बांधवांचं काय होईल?
न-म-का : त्या दोघा बांधवांना एकमेकांशी भांडण्यातून फुरसत तरी आहे का आमच्याकडे पाहायला? पक्के मराठी ते! शिवाय जेव्हा मिळून मिसळून होते, तेव्हा काय केलंनी?
आम्ही : ते बरोबर आहे. पण, मतदान सोडून फिरायला जाणं म्हणजे...
न-म-का : मतदान सोडून?
आम्ही : म्हणजे, तुम्ही मतदान करून जाणार?
न-म-का : असं मी कुठे म्हणालो?
आम्ही : अरेच्चा, हे पण नाही, ते पण नाही. पण, मग मतदान करणार कसं?
न-म-का : आपलं मत काय आहे, ते स्पष्ट आहे... त्याचं दान होणं महत्त्वाचं. ते आपणच करायला हवं, असं काही बंधन आहे का?
आम्ही : म्हणजे काय?
न-म-का (डोळे मिचकावून) : अहो वाडीतली मुलं असतात. ती बघून घेतात. हजर-गैरहजर सगळय़ांच्या नावाने भरघोस मतदान होतं आमच्या बूथवर. प्रत्येकाला प्रत्यक्ष जायलाही लागत नाही. केवढी मोठी सोय. पूर्वीच्या काळी तर आम्ही इथे साहेबांसाठी 12-15 मतं टाकून वर गावी जायचो, तिकडच्या मतदानासाठी.
आम्ही : म्हणजे तुम्ही डब्बल मतदान करायचात?
न-म-का : तुम्हाला काय वाटतं? शाई पुसण्याचा शोध तुमच्या शरद पवारांनी लावलाय का?
आम्ही : म्हणजे तुम्ही इकडच्या मतदानाची व्यवस्था करून गावी जाणार आहात तर मतदानाला?
न-म-का : छय़ा हो, आम्ही दोन्ही ठिकाणी व्यवस्था करून तिसर्याच ठिकाणी जाणार आहोत इलेक्शनची सुट्टी एंजॉय करायला. पण, आम्हालाही आपल्या लोकशाहीची चिंता आहे. त्यामुळे, मतदान हे झालंच पाहिजे. ते कसं होतं हे महत्त्वाचं नाही. ध्येय महत्त्वाचं, मार्ग महत्त्वाचा नाही.
काकांचे हे चिंत्य विचार ऐकल्यानंतर सचिंत मुद्रेने आम्ही त्वरित मार्गस्थ झालो, हे सांगायला नकोच.

टाइम आणि टाइमपास

(उद्ध्वस्त, ओकाबोका, उदासवाणा महाल. रंग उडालेलं सिंहासन. पोपडे आलेल्या भिंती. खिळखिळे झालेले खांब. सिंहासनाच्या मागे भिंतीवर धनुष्यबाण टांगलेलं आहे. आता चमक हरवलेल्या धनुष्याची प्रत्यंचा तुटलेली आहे आणि बाण उडून सिंहासनाच्याच पाठीत घुसलेला आहे. मागे एक पुतळा आहे. तो वाघाचा असावा. पण, त्याचाही रंग उडालाय. शेपटी तुटलेली आहे आणि चेहरा मांजरासारखा दिसू लागलेला आहे. खूप वर्षं पडून असलेल्या एखादय़ा-एकेकाळच्या सुपरहिट ऐतिहासिक नाटकाच्या धूळ खात पडलेल्या सेटसारखी कुबट अवकळा पसरलेल्या त्या वातावरणात अचानक सेनाकार्यपती उद्धोबल्लाळ प्रवेश करतात. त्यांचे कपडेही त्याच नाटकातल्या रंगपटासारखे दिसतायत. मुळात अंगात घातलेला वेश त्यांच्या मापाचा नाही. छोटय़ा मुलाने मोठय़ा माणसाचे कपडे चढवून मोठय़ा माणसाचं सोंग आणल्यासारखा अवतार. बोलणं-वागणंही तसंच. कमरेला तलवार लावलेली आहे ती त्यांच्या छातीपाशी बांधली गेली आहे आणि तरीही तिचं टोक जमिनीला लागतंय आणि त्यात उद्धोबल्लाळ अधूनमधून अडखळतायत. मधूनच तोंडावर आपटी खातील की काय अशी भीती वाटते. आत येताच ऐटीत टाळय़ा वाजवण्याची स्टाइल मारून...)
उद्धोबल्लाळ : (तोर्यात) कोण आहे रे तिकडे? (संतापून) कोण आहे रे तिकडे? (आणखी संतापून, बेंबीच्या देठापासून ओरडत) कोण आहे रे तिकडे? सगळे मेलेत का काय? (या ओरडय़ामुळेही महाल थरथर कापतो, कुठेतरी एक भांडं पडल्याचा आवाज येतो, मग एक मांजर म्याँव करून जातं. अंधारातल्या प्रकाशयोजनेमुळे एखादा वाघ निघून गेल्यासारखी सावली पडते. उद्धोजी घाबरून एका खांबावर टुणकन उडी घेऊन त्याला हाता-पायांची मिठी मारतात. थरथर कापत आता घाबरून करुणार्त स्वरात) कोणी आहे का रे तिकडे? मी एकटा आहे रे इकडे... मला भीती वाटतेय.
(मागून जरबदार आवाज येतो.) च्यायला, येता-जाता टरकायला होतं, तर येरझार्या घालायच्या कशाला? गप बसून राहायचं ना एका जागी. मी आहे इथे. घाबरू नका.
उद्धोबल्लाळ (खांब सोडून, एकदम सावरण्याचा अभिनय करत आणि जणू आपण घाबरलोच नव्हतो अशा आविर्भावात) : त..त..तेच तर म्हणत होतो मी मिलिंदनारोजी... तुम्ही तर माझे डावा हात... (मागून जरबदार आवाज : शी शी शी, डावा नाही, उजवा म्हणा) तेच ते, तुम्ही तर माझा उजवा हात... मला सोडून कसे जाल... मी आपला अधूनमधून ओरडून खात्री करून घेत असतो, तुम्ही तरी आहात ना? की गेलात उडून?
मिलिंदनारोजी : (अदय़ाप नुसतं आवाजी अस्तित्त्व, आवेशपूर्ण स्वरात) अरे हट्, उडाले ते मावळे... (चुकचुकून) नेहमी गोंधळ होतो माझा. उडाले ते कावळे, आता सगळे घट्ट शिवबंधनाने बांधले गेलेले मावळेच आहेत उरलेले.
उद्धोबल्लाळ : असं आहे काय? मला कधी कधी असं वाटतं की थोरल्या साहेबांनी नेमकी कोणाची सेना बांधली होती... इतके सगळे कावळेच उडून जातायत म्हणून प्रश्न पडलाय मला.
मिलिंदनारोजी : डोन्ट वरी, आम्ही दोनचार अवली नग आहोत ना शिल्लक तुम्हाला पोहोचवायला.
उद्धोबल्लाळ (संताप+भीती यांच्या मिश्रणाने घडलेल्या आवाजात) : काय?
मिलिंदनारोजी : अहो, म्हणजे महाराष्ट्रगडावर भ ग वा  फ ड क वा य ला... (हे शब्द जपून, जोर देत, सावकाश उच्चारतो, नंतर खासगी आवाजात) हे वाक्य नेहमी दगा देतं आणि नेमकं तेच नेहमी उच्चारायला लागतं... तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवायला हो!
उद्धोबल्लाळ : तुम्हाला खात्री आहे ना यंदा आपण तो गड जिंकू याची?
मिलिंदनारोजी : म्हणजे काय, सिंह गेला तरी हरकत नाही, पण गड जिंकायचाच.
उद्धोबल्लाळ : अहो काय बोलताय काय, तुम्ही मला घालवायलाच निघालायत.
मिलिंदनारोजी : तुम्हाला? अहो तुम्ही काय सिंह आहात का?
उद्धोबल्लाळ (म्यानातून तलवार उपसण्याची आटोकाट कोशिश करत) : खामोश, काय बोलताय काय आणि कुणाशी बोलताय? तुमची जीभ छाटून टाकीन आत्ताच्या आत्ता.
मिलिंदनारोजी : साहेब, त्या तलवारीने साधी कोथिंबीर चिरली जात नाही, असं कालच आपला आचारी सांगत होता. ते एक जाऊदय़ात. चिडू नका. मी म्हणत होतो, तुम्ही सिंह नाही आहात, वाघ आहात.
उद्धोबल्लाळ (अजून घुश्शातच) : मग ठीक आहे. पण, मघापासून मी इथे तापात बडबड करत असल्यासारखा एकटाच फिरतोय आणि तुम्ही दिसतच नाही आहात. आहात तरी कुठे?
मिलिंदनारोजी : हा काय इथे? सिंहासनावर...
(सिंहासनावर प्रकाश पडतो. अव्वल टग्यासारखा दिसणारा मिलिंदनारोजी सिंहासनात सैलसरपणे पडून दात कोरतोय आरामात. तो थू थू करत दातातला कचरा थुंकत असताना उद्धोबल्लाळांच्या संतापाचा कडेलोट होतो- हा काही मनावर घेण्यासारखा प्रकार नाही, दिवसातून 17 वेळा असा कडेलोट होतच असतो आणि त्याचा काही उपयोगही नसतो. आव मात्र राणा भीमदेवी...)
उद्धोबल्लाळ (कडाडून तलवार उपसण्याचा अतीव करुण प्रयत्न करीत) : अरे कोण आहे रे तिकडे? आत या इकडे. या हरामखोराच्या मुसक्या बांधा आणि त्याला टकमक टोकावरून लोटून मग हत्तीच्या पायी दय़ा आणि नंतर तेलात तळून काढा...
मिलिंदनारोजी (विक्राळ हसत) : अहो साहेब मी म्हणजे काय शिववडापाव आहे का तेलात तळून काढायला. आपलं दिलंय तोंड म्हणून काहीही गर्जना करायला ही काही आपली जाहीर सभा नाहीये. शिवाय तुमचं वागणं म्हणजे ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं.
उद्धोबल्लाळ (अर्धवट उपसलेली तलवार आत ढकलण्याची अतोनात पराकाष्ठा करत) : माझ्या सिंहासनावर बसून तुम्ही माझं काय भलं करताय?
मिलिंदनारोजी (सिंहासनावरून उतरून खाली येत) : त्याची लाज राखतोय थोडीफार जमेल तशी. गैरसमज करून घेऊ नका. आजकालचा काळ कठीण आलेला आहे. गनीम कुठे आणि कसा दबा धरून बसलेला आहे, ते सांगता येत नाही. कुठून कसला दगाफटका होईल याची गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे कदम कदम फूंक के रखना पडता है...
उद्धोबल्लाळ : हा कदम कोण, सोमदास की काय? त्याला कुठे फुंकायचा?
मिलिंदनारोजी : मध्ये मध्ये फालतू शंका काढून लिंक तोडू नका बरं! (उद्धोबल्लाळही आपण कोण, हा कोण हे विसरून सॉरी म्हणतात आणि आपण या नोकराला सॉरी म्हणालो म्हणून परत स्वतःलाही सॉरी म्हणतात.) हां, तर सांगत काय होतो, तुम्हाला कुठूनही दगाफटका होऊ शकतो. तुम्हाला काही झालं तर आमची लेव्हलच लागली ना! (उद्धोजी टवकारून `क्काय' असं विचारतात, पण तो हातानेच त्यांना शांत करून) म्हणजे, मी, संजाबा राऊ, निळाक्का, एकोजी शिंदा असे आमच्यासारखे कावळे... आय मीन मावळे... पैशाला पासरी आहेत हो! आम्ही मेलो तर काही फरक पडत नाही. लाख मेले तरी चालतात, लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. (हे वाक्य उच्चारतानाच याला नेमकं काय म्हणायचं आहे, ते राजशेखर छाप हास्यातून स्पष्ट होतं. उद्धोबल्लाळ भाबडय़ा सूर्यकांतसारखे खूष होतात.) त्यामुळेच तुम्ही जे जे करणार असता, ते मी आधी करतो. तुम्ही जे खाता ते मी आधी चाखून पाहतो. तुम्ही जे पिता ते मी आधी पितो. तुम्ही सिंहासनावर बसण्याच्या आधी मी चेक करून पाहतो. कारण, ते तुमच्यापेक्षा जास्त खिळखिळं झालंय.
उद्धोबल्लाळ (सद्गतित होऊन) : अरे कोण आहे रे तिकडे? आमचा मोत्याचा कंठा आणून यांच्या गळय़ात घाला. (मिलिंदनारोजी : साडे सात वर्षांपासून तोच एक कंठा सारखा माझ्या गळय़ात घालतायत.) यांना बारा गावं इनाम दय़ा. (मिंना : माझ्याकडे 1250 गावं ऑलरेडी आहेत, यांच्याकडे 12 आहेत का?) यांचा शिवतीर्थावर जाहीर सत्कार करा. (मिंना : गर्दी कोण जमवणार? स्वतःला रसिकराज समजतायत की काय?) असे जिवाला जीव देणारे सहकारी असले आणि जीव ओवाळून टाकणारे मावळे असले की ग डा व र भ ग वा फ ड क णा र च. (`गडावर'पासून हेही स्लो मोशनमध्ये जातात. उगाच `ग'चा `ड' करणारी गडबड नको.)
मिलिंदनारोजी : काय लॉटरी लागली का बैलकर भेटायला आले होते की टिंबानींच्या बंगल्यावरून आलायत... महापालिकेचा अर्थसंकल्पही बराच दूर आहे... एकदम उदार झालायत ते.
उद्धोबल्लाळ : अहो तुम्ही माझ्यासाठी जिवावर उदार होता, मी इतकंही उदार होऊ नये! बरं मला सांगा युवराज आदिबल्लाळ कुठे गेले आहेत?
मिलिंदनारोजी : डायपर बदलायला.
उद्धोबल्लाळ : काय? युनिव्हर्सिटीत जातात आणि डायपर वापरतात.
मिलिंदनारोजी : ते युनिव्हर्सिटीत फक्त हवा टाइट करायलाच जातात लोकांची आणि हो, ते अजूनही डायपर वापरतात. गैरसमज करून घेऊ नका. आत्ताच त्यांना एक कविता झाली. म्हणजे त्यासाठी डायपर नाही वापरला. पण, त्यांना इंग्रजीतनं कविता होते ना. त्या कवितेत त्यांनी मीटरमध्ये बसतो म्हणून डायपर हा शब्द वापरला आणि तो बरा दिसणार नाही म्हणून तो बदलायला गेलेत ते.
उद्धोबल्लाळ : वायपर वापरायला सांग त्याला! असो. आणि आता सांग पट्टराणी कमलादेवी कुठे गेल्यात?
(या पृच्छेनंतर मिलिंदनारोजीचा सगळा नूर बदलतो. खांदे पडतात, सूर पिचतो, टाळाटाळीची देहबोली दिसू लागते. जणू आपण हा सवाल ऐकलाच नाही, अशा आविर्भावात मिलिंदनारोजी कल्टी मारण्याच्या बेतात असताना उद्धोबल्लाळ कडाडतात.)
आम्ही काय विचारतो आहोत, तुम्हाला मिलिंदनारोजी? कमलादेवी कुठे आहेत.
मिलिंदनारोजी : काय कल्पना नाही. बाहेर गेल्या असतील, येतीलच आता. त्यांना हल्ली दिल्लीपासून गल्लीपर्यंत बरीच कामं लागलेली आहेत ना.
उद्धोबल्लाळ : तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय मिलिंदनारोजी. एरवी तुम्ही राजे आणि आम्ही चाकर असल्यासारखे डाफरत असता आमच्यावर. आता ही विचारणा केल्यावर इतका सूर मवाळ झाला तुमचा.
मिलिंदनारोजी : मी माहिती घेऊन सांगतो ना तुम्हाला की त्या दादरला कशाला गेल्याहेत...
उद्धोबल्लाळ : अच्छा, म्हणजे त्या दादरला गेल्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे तर. दादरला आपल्या सेनासदनात त्या गेलेल्या नाहीत, हे तर स्पष्टच आहे. आम्ही तिकडूनच आलो आहोत. मग त्या गेल्यात तरी कुठे? (मिलिंदनारोजीचे कान पडतात. गोगलगायीसारखा तो मलूल पडतो. ते पाहून एकदम डोळे गरगरा फिरवत उद्धोबल्लाळ बोलू लागतात) अरे देवा, असं आहे तर... म्हणून तुम्ही गप्प आहात... बोला बोला... पण, आता आम्हाला असं सांगू नका की त्या तिकडे गेल्या आहेत... (`त्या तिकडे'वर योग्य जोर.)
मिलिंदनारोजी : घ्या आता! तुम्ही नेहमी असंच म्हणता की त्या तिकडे गेल्या आहेत असं मला सांगू नका. म्हणून सांगितलंच नाही तर म्हणता काही बोलत नाही. आम्ही करायचं तरी काय?
उद्धोजीबल्लाळ (हतबल होऊन गलितगात्र अवस्थेत) : भला उसकी कमीज मेरी कमीज से भगवी कैसे? हा कालचा पोरगा, आमच्या मांडीवर- आय मीन- आबासाहेबांच्या मांडीवर वाढलेला आज रसिकराज बनून आमच्या राणीवशाला भुरळ घालतो आहे. असं काय आहे तरी काय त्याच्यात?
मिलिंदनारोजी : टाइमपास!
उद्धोजीबल्लाळ : सुपरहिट पिक्चर होता ना? आपले मराठी लोकच फार बालिश...
मिलिंदनारोजी : त्या भरोशावर तर आपली दुकानं चालली आहेत साहेब. असो. मी टाइमपास म्हणालो ते रसिकराजांच्या संदर्भात. रसिकराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा मूर्तिमंत टाइमपास. लोक त्यांची भाषणं ऐकायला जातात. टाइमपास करतात. मतं वेगळय़ांनाच देतात. विचारा का?
उद्धोबल्लाळ : का?
मिलिंदनारोजी : कारण यांना मतं दिली की यांचे सदस्य सदनात काय करतात? टाइमपास! फक्त टाइमपास!
उद्धोबल्लाळ : म्हणजे तुमचं म्हणणं असं की कमळाबाई आम्हाला थुका लावून रसिकराजाकडे जातात त्यात सिरीयस काही नाही? नुसता टाइमपास आहे?
मिलिंदनारोजी : अहो, लोक न्यूज चॅनेल का बघतात? टाइमपाससाठी. न्यूज चॅनेलवर सगळय़ात जास्त वेळा कोण असतं? रसिकराज. आता दोन अधिक दोन करा पाहू.
उद्धोबल्लाळ : अरे, पण मग जन्मोजन्माचं, देवाब्राह्मणांच्या साक्षीने स्वीकारलेलं नातं तोडून गरत्या बायका अशा उथळ टाइमपाससाठी जातात? काय भयंकर आहे रे हे! पण, का, का, का?
मिलिंदनारोजी (आधी धूम ठोकण्याची ऍक्शन घेऊन) : कारण फारच सिंपल आहे. एकेकाळी आपला टाइम होता तेव्हा आपण सगळय़ा पब्लिकला विदाउट तिकीट फुल टाइमपास देत होतो, आता आपली टाइमपासचीही कुवत राहिलेली नाही.
(धूम ठोकतो. मागोमाग उद्धोबल्लाळ पिसाटून धावतात. पळापळ, धावाधाव, लपाछपी, पडझड असं सगळं सुरू असतानाच पडदा पडतो.)

नोटा आणि 'नोटा'

`मयूर ट्रान्सपोर्ट'च्या ट्रकमध्ये बासरी ब्रँड बासमती तांदळाची शेवटची गोणी चढवल्याबरोब्बर किस्ना खाली उतरला आणि मुकादमाला वेळ विचारून तडक निघाला.
`घंटी वाजली किस्नाची,' मुकादम भिम्याला डोळा घालत म्हणाला.
घाम पुसत ताडताड चालत किस्ना वस्तीकडं निघाला. शेअरिंगच्या रिक्षाने लवकर पोहोचला असता, पण पाच रुपये खर्च झाले असते. दारूच्या कोटय़ासाठी ते वाचवणं आवश्यक होतं. आंटीच्या अड्डय़ात शिरल्याबरोब्बर त्याला बरं वाटलं. अर्जुनाने, त्याच्या नेहमीच्या पोर्याने आणून ठेवलेल्या पुडीतून एक उकडअंडं तोंडात घोळवून आत सोडता सोडता त्याने ग्लास तोंडाला लावला आणि संपवूनच खाली ठेवला, वर मिठाची चिमूट जिभेवर दाबली. पोटातला डोक्यातला जाळ जरा आटोक्यात आल्यावर त्याने अर्जुनाला हाक मारली आणि खिशातून वर उचलून कार्ड दाखवलं. अर्जुना जवळ येऊन म्हणाला, ``मिळालं का फोटू कार्ड? आता अन्नाला सांगून टाकतो. एक गांधी फिक्स.''
दुसर्या ग्लासातला जाळ रिचवून किस्ना म्हणाला, ``काय ते लवकर फिक्स कर अर्ज्या, कमळाबाई बी लय मागं लागलीये. आपन पंजाचं निमक खाल्लंय म्हनून पयलं तुला सांगितलं लगा! नंतर बोलू नको किस्ना कसा पलटला...''
किस्नाच्या खिशातलं प्लॅस्टिकच्या कडांचं कार्ड चमचमलं, तसं गुत्त्यात दारू पिण्याचा अभिनय करत बसलेले ते पाच जणही चपापले. त्यांनी फटाफट आपल्या खिशांमधून फोन काढले. चटाचट एसेमेस गेले, व्हॉट्सऍपवर मेसेज गेले, एकाने तर किस्नाच्या नकळत त्याचा फोटोही काढून पाठवला... सगळय़ांनी अत्यंत आनंदाने लिहिलं होतं, `आणखी एक मतदार सापडला.'
फटाफट पावशेर मारून फुटाण्याच्या पुडीतले उरलेले फुटाणे तेंडात टाकत किस्ना बाहेर पडून लगेच पुढच्या गल्लीत शिरला. एका कळकट इमारतीतल्या छोटय़ा गाळय़ाच्या बंद शटरवर त्याने हलकेच ठोठावलं, शटर वर झालं, तो आत शिरला, आतल्या एका बाकडय़ावर बसून त्याने हाळी दिली, ``धर्म्या, वजरी धाड!'' स्वतः धर्माशेट वजरी-भाकरीचं ताट, वरनं लालजर्द रस्सावाटी फ्रीमध्ये लावून घेऊन आला आणि ताट ठेवता ठेवता म्हणाला, ``काम झालं का?''
खिशातलं चकाकतं कार्ड दाखवून किस्ना म्हणाला, ``दोन गांधी पायजेत. नायतर आपला पंजा फिक्स.''
``असं काय करू नको दादा, दोन गांधी आणि वर एक इंग्लिशची चपटी पन लागू करतो तुला. पण, आपला शेठजीला सबूद गेलाय. आता फिरू नकोस.''
तिथेही कार्ड चकाकलं. तिथेही जेवणाचा अभिनय करत बसलेले तीन-चारजण चमकले. त्यांनी लगेच फोन बाहेर काढले...
`आणखी एक मतदार सापडला.'
*****
पावशेर मारून, वजरी खाऊन झोपल्यानंतर किस्नाला आजवर कधी सकाळी सातच्या आत जाग आली नव्हती. दिवसभर हमाली करून, मणामणाची पोती उचलून थकलेलं शरीर बाजेवर पट्दिशी शिथील होऊन जायचं. आज मात्र किस्नाला झोपेत जाणीव झाली की झोपडीत आणखी कोणीतरी आहे, तो सावध झाला, प्रचंड कष्टाने त्याचा डोळा उघडला आणि तो चमकलाच... त्याला घेरून त्याच्या उशा-पायथ्याला बरेच लोक तो उठण्याची वाट पाहात ताटकळत बसलेले... एकदोन जण तर वाराही घालत होते... आयला, झोपेत आटोपला का काय कारभार आपला? त्याच्या मनात पहिला विचार आला. पण, आपण चचलो, तर या परक्या शहरात आपल्याला खांदा दय़ायला चार माणसं जमायची मुश्कील होईल, ही एवढी परीटघडीची, सुंदर सुवासाची माणसं कुठून आपल्या मर्तिकाला जमायला... मग त्याच्या एकदम लक्षात आलं, आज आपलं किसन नंदलाल यादव हे नाव सार्थकी लागलेलं दिसतंय... महाभारतात कुरूक्षेत्रावर लढण्याच्या आधी कौरव आणि पांडव भगवान श्रीकृष्णाकडे पाठिंबा मागायला गेले होते... कृष्णाने चतुराईने कौरवांना यादवसेना दिली आणि आपण स्वतः पांडवांच्या लढाईचा सूत्रधार बनला, हे त्याला आजीकडून ऐकलेल्या गोष्टींमधून माहिती होतं... आज आपण येवढे इम्पॉरटन झालो, हा विचार मनात येतो न येतो, तोच समोरच्या चाणाक्ष दाढीवाल्याने किस्ना जागा झाल्याचं ओळखून नमस्कार करत हात जोडला, ``जै शिरीक्रिश्ना...''
``नुसतं किस्ना म्हना मला, तेच नाव आहे माझं. उगाच जड अवघड नाव नको...''
``मी नमस्कार केला तुम्हाला शिरीक्रिश्न भाऊ! आपल्या धर्ममधी किस्ना म्हंजे शिरीक्रिश्नाचाच नाम झाला ना भाऊ! केम छो, मजामा ना!''
``मजामा मजामा, तुम्ही कोण? चेहरा वळखीचा वाटतोय...''
``सू वात करे छे? अरे समदय़ा टीवी चॅनलमाटे माजाच तर चेहरा दिसते ना हल्ली! मला नमो नमः म्हणतात.''
``आता कळलं, नमो नमः, नमो नमः, माझ्याकडं पाहा आणि फुलं वाहा... तेच ना तुम्ही? काय काम काढलंत?''
``काही नाही, तुम्हाला विकासाचा चहा पाजायला आलोय मी. एकदम फक्कड मसाळानी चाय, अडानी, अंबानी कंपनीचा टेस्टी मसाला घातलाय तिच्यात दोन हजार कोटीचा, तुम्हाला लई भावेल, हुश्यार वाटेल...''
गरमागरम चहाचा कप पुढे आला खरा, पण, तो गोंडस हाताने बाजूला सारत गोंडस चेहरा पुढे आला...
``अंकल अंकल, लिसन टु मी, प्लीज डोंट ड्रिंक धिस टी. हा चहाचा नाही, जहराचा प्याला आहे. यात साम्प्रदायिकता, दंगाफसाद, बुरसटलेली वृत्ती यांचं विष मिसळलंय, धिस इज टोटली अनहेल्दी फॉर यू. तुम्ही आमची, गरिबाघरची रोटी खा,'' बरेच दिवस ठेवून बुरसटलेली एक रोटी त्याने पुढे केली. च्यामारी, ही याची आयडिया आहे होय. गरीबाच्या घरी जेवायला जातो. रोटय़ा खिशात भरून घेतो. नंतर अशा आम्हाला वाटायला! किस्नानं खिशातनं एक लिमलेटची गोळी काढून चिडलेल्या गोंडस पोराच्या हातात दिली आणि त्याचा गालगुच्चा घेत तो प्रेमभराने म्हणाला, ``पप्पू ना रे तू? शोना रे माजा तू. घे हे चॉकलेट.'' फुरंगटून पप्पू म्हणाला, ``हा काय नॉन्सेन्स आहे यार! मी देशात इतक्या लोकांकडे जातो, मत मागतो, लोक गालगुच्चा घेतात, काही आंटय़ा तर पप्पी पण घेतात आणि चॉकलेट देतात, आमी नाई जा!''
किस्ना त्याला समजावणार इतक्यात त्याच्या नाकासमोर झाडू आला, झाडूमागे एक मफलर आणि एक टोपी एवढंच दिसत होतं, व्हिक्सच्या वासाचा चोंदलेला आवाज म्हणाला, ``किस्नाजी, कैसे है आप? या दोघांच्या नादाला लागू नका. त्यांच्या नादाला लागूनच आपल्या देशाची साठ वर्षं बरबादी झालेली आहे. तुम्ही फक्त हा झाडू हातात घ्या आणि यांना झाडून टाका. यांची जागा कचरापेटीतच आहे. आँ आँ आँ ऑच्छी...''
झाडूवाल्याच्या शिंका थांबेनात... एवढय़ात दुसरा दाढीवाला चेहरा पुढे आला आणि म्हणाला, ``ई देखिये किस्नाजी, आप तो यादव हैं, तो ब्रजवासी हुए. ये सब बडी जाती के बडे लोग है, आप से वोट लेकर अपना ही भला करेंगे. आज तक इन्होने येही किया है, और ये जो झाडूवाले है, इन को झाडने के अलावा सिर्फ मोमबत्ती जलाना आता है. ये सत्ता मिलने के बाद खुद का भला न कर सके, आप का क्या भला करेंगे? आप के भले की तो सिर्फ हम सोचतें हैं...हमरे बिहार में आईये और खुद देख लिजिये... हम है तिसरा विकल्प...''
`तुम्ही कसले तिसरे, आम्हीच तिसरे' असा एकदम गिल्ला झाला. त्यात पहिले आणि दुसरेही आम्हीच तिसरे असं म्हणत घुसले, हे पाहून किस्नाला भारी मौज वाटली. अचानक त्याच्या डोळय़ांसमोर खंजीर चमकला, तो दिसल्याबरोबर सगळा गिल्ला थांबला, `साहेब, साहेब' असा दबक्या आवाजात उल्लेख झाला. किस्नाला समजलं, आज साक्षात क्रिकेटमंत्र्यांनीही पायधूळ झाडलीये आपल्या झोपडीत. ``किसनराव, यांना भांडूदय़ात हवं तेवढं. यासंबंधानं मी तुम्हाला इतकंच सांगेन की आम्ही काही तिसरेबिसरे नाही. आम्ही नेहमी पहिलेच असतो. जो कोणी सत्तेत येईल, त्याच्याबरोबर आम्ही असतो. पहिला आला तरी आम्ही आहोत, दुसरा आला तरी आम्ही आहोत आणि तिसरा आला तरी आम्ही काही टळत नाही. तुम्ही मराठी आहात. तुम्हाला वेगळं काही सांगायला नको. महाराष्ट्राकडे देशातलं सर्वोच्च पद चालून येण्याची संधी यंदा आहे. तेव्हा यासंबधानं तुम्ही योग्य निर्णय घ्यालच, याची मला खात्री आहे.''
एकसुरात बोललेलं हे भाषण संपतं ना संपतं तोच त्याच्या नजरेसमोर इष्टमनकलर तारे चमकले आणि चट्टेरीपट्टेरी शर्टामागून आवाज आला,
`` वाघाला पँथरची साथ आहे
ऊसाला कमळाचा सुवास आहे
मत दे माझ्या मित्रा, आम्हाला
दास तुझा हा रामदास आहे''
`वाहव्वा वाहव्वा' असे काही आवाज नाईलाजाने उमटले आणि किस्नाचा हात कोणीतरी खस्सकन् ओढला... ``डॅडा डॅडा, सापडला सापडला...''
``आण तो इकडे,'' असा आवाज झाला आणि हाताभोवती फटाफट एक गंडा गुंडाळला गेला, कार्यकारीसम्राटांनी म्यानात नसलेली समशेर उपसून बोट (किस्नाचेच) कापण्याचा अभिनय केला, त्याच्या काल्पनिक रक्ताचा टिळा त्यालाच लावला आणि वर त्याला दम दिला, ``तुला आई भवानीची आण, तुला भारतमातेची आण, तुला हिंदवी स्वराज्याची आण, तुला शिवरायांची आण, तुला थोरल्या साहेबांची आण, तुला माँसाहेबांची आण, तुला अरबी समुद्राची आण, तुला वांद्रे वरळी सी लिंकची आण...''
``बेटा, तुझ्या डॅडांसाठी पलीकडच्या मडक्यातनं पाणी आण,' असं करडय़ा आवाजात सांगून मनसम्राट पुढे आले आणि म्हणाले, ``हे बघ किस्ना, मी काही तुझ्याकडे भीक मागणार नाही मताची. तुला दय़ायचं त्याला दे, पण, नंतर बोंबलत बसू नकोस पाच वर्षं. आत्ताच काय तो विचार कर. आतापर्यंत यांनी काय दिवे लावलेत ते पाहतोच आहेस तू. आम्हीही काय उजेड पाडलाय, ते तुझ्यासमोर आहे. नको तिथे फालतूगिरी करून आयुष्यभर आपल्या चुकांचा टोल भरत राहायचा की माझ्या विकासाच्या ब्लूप्रिंटवर शिक्का मारायचा, हे तू ठरव. येतो मी.''
``चला रे, काय दत्ताचं देऊळ आहे का हे आणि आज काय गुरुवार आहे का, उठताय का आणू बांबू,'' असा आवाज मनसम्राटांनी टाकताच किस्नाभोवतीची गर्दी पांगली. सगळे गेल्यावर किस्ना हुश्श करून डोळे मिटणार तेवढय़ात त्याला काठीचा आवाज आला... टक्टक् टक्टक्... समोर बापू...
``आलास का केमिकल लोच्या करायला?'' किस्नाने हात जोडून विचारलं.
``मी लोच्या करायला येत नाही किस्ना, मी झालेले लोच्ये दुरुस्त करायला येतो,'' बापू म्हणाले, ``इतके लोक तुला भेटून गेले. कोण कौरव, कोण पांडव हे कळेनासं झालंय या महाभारतात. आज यांना पाहून माझ्याच डोक्यात केमिकल लोच्या झालाय. या सगळय़ांच्या भेटीतून तुला काय समजलं, ते सांग.''
``बापू, आपला सीधा हिसाब आहे,'' किस्ना कुशीवर वळत म्हणाला, ``जो एक बापू देईल, त्याच्याकडून एक बापू घ्यायचा, जो दोन देईल त्याच्याकडून दोन घ्यायचे, कोण चपटी देईल तर ती घ्यायची...'' बापूंच्या चेहर्यावर निराशा दाटू लागली, किस्ना बोलतच राहिला, ``कारन हय़ांच्याकडनं आमच्यासाठनं नंतर काही होनार नाही, हे तर फिक्स आहे. हय़े परत पाच वर्षं तोंड दाखवायचे नाहीत. हय़ांच्याकडनं सगळं घ्यायचं आनि...'' बापू कानात प्राण आणून ऐकू लागले ``...आनि विलेक्शनच्या दिवशी येकच बटन दाबायचं...''
``कोणतं?'' बापूंनी उत्कंठेने विचारलं...
`वरीलपैकी कोणीही नाही!!''

बोला बोला, तुम्ही जाता का व्होटिंगला?

नमस्कार,
मी महापत्रकार शिरीष सर्वज्ञ माझ्या या कार्यक्रमात माझं... आय मीन तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय... तुम्ही पाहता आहात टीव्हीच्या जगतातला सगळय़ात लोकप्रिय कार्यक्रम, माझा कार्यक्रम, माझ्यासाठी पाहिला जाणारा कार्यक्रम `सवाल माझा'... या कार्यक्रमातून आपल्या `आय-माय' वाहिनीने जगच काय, पण मंगळावरच्या रहिवाशांनाही जिंकून घेतलेलं आहे, असं मला गेल्या मंगळवारीच समजलं. माझ्यामुळे हा कार्यक्रम लोकप्रिय झालेला आहे, तुम्ही मला पाहण्यासाठी टीव्हीला खिळून राहाता, तरी मी तुमचा हिरमोड करून मी या कार्यक्रमात काही इतर माणसंही दाखवतो आणि त्यांना मधून मधून अडीच ते साडेतीन वाक्यंही बोलायची संधी देतो... त्यांची वाक्यं मी अर्धवट तोडतो त्यामुळे अडीच किंवा साडेतीन असाच हिशोब करावा लागतो. रोज मी माझ्या मते सर्वात महत्त्वाचा असलेला प्रश्न जगातल्या जनतेच्या वतीने कोणालाही विचारतो. कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या तोंडासमोर चाकू नाचवल्यासारखी पेन्सिल नाचवत `सगळं जग तुमच्याकडे उत्तर मागतंय' असं ओरडून सांगून मी त्यांचा शक्य तेवढा अपमान करतो. तुम्हा सर्वांना कोणाही मोठय़ा माणसाचा `लाइव्ह' अपमान झालेला पाहायला भयंकर आवडतं, तुम्ही खूष होता. कधीकधी तो माणूस डब्बल चेवाने माझा अपमान करतो, तेव्हाही तुम्ही टाळय़ा वाजवता. मग मी संधी साधून तुमचा अपमान करतो आणि मी टाळय़ा वाजवतो, मग मी खूष होतो. माझा शब्द अंतिम असतो, अंतिम विजय माझा असतो. कारण हा कार्यक्रम माझा आहे, सवाल माझा.
आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे? आज मतदानाचा दिवस होता, त्यामुळे आजचा प्रश्न थेट आहे, तुम्ही मतदान केलंत का? केलं असेल, तर का केलंत, केलं नसेल, तर का केलं नाही? या माझ्या भेदक, मार्मिक आणि बिनतोड प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी इथे वेगवेगळय़ा क्षेत्रातल्या माणसांना बोलावलेलं आहे. आपण एकेका माणसाकडे वळूयात आणि त्यांना हा प्रश्न विचारून बोलतं करूयात. काळजी करू नका, मी त्यांना बोलू देणार नाहीच्चै. मीच बोलणार आहे, कारण हा आहे सवाल माझा!
या आहेत हिराबाई हरळे. या एका झोपडपट्टीत राहतात. मला सांगा, तुम्ही आज मतदान केलंत का?
हिराबाई ः हो! क्येलं की! (कॅमेर्याला बोटावरची शाईची खूण दाखवतात.)
पाहा पाहा, या बाईंकडे पाहा. या झोपडपट्टीत राहतात, पण त्यांना लोकशाहीचा चाड आहे. लोकशाहीतलं आपलं कर्तव्य त्यांना माहिती आहे, आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आपण बजावायला हवा, याचं भान त्यांना आहे. मी सलाम करतो त्यांना, त्यांच्या सजगतेला. तुम्हीही सलाम करा. मला सांगा हिराबाई. तुमी का मतदान केलंत?
हिराबाई ः का क्येलं म्हंजे? सकाळधरनं चार येळेला टेम्पो आलता, त्यो पंजावाला संभ्या आन् कमळवाला इज्या दोगंबी मानसं भरून भरून न्हेत हुते. घरटी किती ते मोजत होते. नाय गेलं शिक्का माराय आन् पक्या दादाला खबर लागली म्हंजी मग झोपडं र्हाईल का जाग्यावर माजं?
म्हणजे तुम्हाला मतदान करण्यासाठी धमकावलं गेलं? बळजबरीने मतदान केलंत तुम्ही?
हिराबाई ः आवो, जिबरदस्ती कसली त्यात. आता जो पेजेला दय़ेतो, तो शेजेला घेतोच की! यवडी चांगली साडी, येक ग्रमचं फस्क्लास मंगळसूत्र, वर वाटखर्चाला दोन गांधीजी देनार आसल कोनी शेट, तर त्याच्यासाठनं मिशिनीतलं येक बटन दाबाय काय जड हाय का आपल्याला?
बापरे! तुम्ही चक्क लाच घेऊन मत दिलंत आणि ते इथे माझ्या कार्यक्रमात माझ्यासमोर कबूल करताय. मला सांगा कोणी दिली लाच, कोणी दिली. ही ब्रेकिंग न्यूज आहे. या निवडणुकीत चक्क मतदारांना लाच दिली गेली आहे. मला सांगा. मला सांगा.
हिराबाई ः ये बाबा, काय याडबिड लागलं का तुला? लाचबिच काय नाय? फुकाट काय मिळतं का आजच्या जगात. कापल्या किरंगळीवर मूत म्हनलं तर मुततं तं का कोनी आसंच! आमी येवडं मत दय़ेयाचं, त्या बाब्याला निवडून दय़ेयाचं. त्या पाच साल पैसं खानार, माडी बांधनार, गाडी घेनार, तर त्येला खरच कराय नको का थोडाफार!
हिराबाई नुसतीच लाच घेत नाहीयेत, तर तिचं समर्थनही करतायत. मी हतबुद्ध झालोय. असं झालं की मी नेहमी जे करतो, तेच आता करणार आहे. मी घेणार आहे एक बेक.
( बेकनंतर) आता आपण वळूयात गंगाराम गोंदिवरेकरांकडे. हे एका चाळीत राहात होते, आता तिथे बिल्डिंग झालेली आहे. ते कनिष्ठ मध्यमवर्गातून वरिष्ठ मध्यमवर्गात आलेले आहेत. मला सांगा गंगारामभाऊ, तुम्ही मतदान केलं का?
गं. गो. ः हो केलं. (कॅमेर्याला बोटावरची शाईची खूण दाखवतात.)
का केलंत?
गं. गो. ः म्हणजे काय? लोकशाहीत सगळय़ा जन्तेचं कर्तव्य आहे ते, आपला अधिकार आहे. तो वाजवायलाच- आपलं ते हे- बजावायलाच हवा. आपण...
थांबा थांबा थांबा, इथे हे असे शब्दांचे फुगे फक्त मी उडवतो, मीच भाषण करतो, मीच तोंडची वाफ दवडतो, कारण हा माझा कार्यक्रम आहे, मी याचा सूत्रधार आहे, हा सवाल माझा आहे. तुम्ही भाषण देऊ नका. माझं काम करू नका. खरं कारण सांगा...
गं. गो. ः सिंपल आहे शिरीषभाऊ, जो लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काम करतो, दिवसरात्र झटतो, त्याला आपण मत तर दय़ायलाच पायजे का नाय! ते तर आपलं कर्तव्यच आहे.
म्हणजे तुमच्या भागातले लोकप्रतिनिधी खरोखरच लोकांच्या साठी काम करतात? अहो, ही स्वातंत्र्योत्तर काळातली सगळय़ात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. ही तुम्ही माझ्या कार्यक्रमात पाहताय. मी तुम्हाला ती देतोय. गंगारामभाऊ, उगाच अफवा पसरवू नका. काय कामं तरी काय करतात तुमचे लोकप्रतिनिधी सांगा तरी आमच्या प्रेक्षकांना?
गं. गो. ः अहो आमच्या सायबांचा कामांचा धडाकाच आहे. आमचे साहेब गोविंदा पथकाला टी शर्ट देतात, वर खर्ची देतात. आमच्या एरियातल्या ए टु झेड उत्सवांना देणग्या देतात. त्यांच्या प्रयत्नामुळे आमच्याकडचे सगळे दुकानवाले पण चुपचाप भंडार्याला, साई उत्सवाला, गणपतीला, दांडियाला हरी पत्ती ढिल्ली करतात...
म्हणजे तुमचे लोकप्रतिनिधी व्यावसायिकांना दम देऊन तुमच्या खंडण्यांची सोय करतात असं म्हणायचंय का तुम्हाला?
गं. गो. ः देवाच्या कामाला खंडणी म्हणता तुम्ही? अहो, सांस्कृतिक कार्य आहे हे. आमची अस्मिता आहे. गर्व आहे आम्हाला. तुम्ही असं बोलून आमच्या भावना दुखावता? हय़ाला एकदा खर्चापानी दिला पायजे, असं आमचे साहेब म्हणतात ते काय उगाच नाय!
तुमचे साहेब असं म्हणतात... ही तर मारहाणीची धमकी झाली. ती तुम्ही मला माझ्याच कार्यक्रमात येऊन देताय?
गं. गो. ः नाय वो, मिसअंडरस्टँडिंग करू नका. तुमचा हा जो काय पोगाम असतो, त्याचा खर्चापाणी देऊन एकदा तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाकू आणि सगळा मॅटर सेटल करून टाकू म्हणत होते आमचे साहेब. त्यांना भेटलात की तुमचं मतपरिवर्तन होईल. एकदम साधा माणूस वो. पाच वर्षांमागे रिक्षा चालवायचा. आज सोन्याचं घडय़ाळ वापरतो, गळय़ात सोन्याच्या चैनी आहेत आठ-दहा. फॉरच्युनर आणि पजेरोच्या खाली गाडी वापरत नाय, करोडोंमध्ये खेळतो, पण गल्लीत आला की गाडीतून उतरून पायाला हात लावणार आणि काका कशे आहात म्हणून विचारणार. काय अडीनडीला खिशात हात घालणार आणि जो बंडल निघेल तो हातात ठेवणार. माझ्या एका पोराला पण नोकरी दिलेली आहे बिल्डरकडे. दुसर्यालाही पाठवलाय साहेबांकडे ते सांगतील तिकडं दगड हाणायला.
थोडक्यात म्हणजे तुम्हाला ही सगळी लोकांची कामं वाटतात, समाजाची कामं वाटतात. ही लोकप्रतिनिधीची कामं वाटतात...
गं. गो. ः वाटतात म्हणजे? नायतर काय कामं असतात पब्लिकची? अभ्यासबिभ्यास करणार्या जंटलमन लोकांचा फायदा काय या कामात? पब्लिकची डिमांड समजली पायजे. आमच्या एरियात येऊन बघा. साहेबाला मत देणारे आम्ही सगळे येडे आणि हितं टीव्हीवर ज्ञान पाजळणारे तुम्ही शाणे, असं कधी असतं का राव.
गंगारामभाऊ, मला आता तुमच्याकडून पुढे वळावं लागतंय, आजच्या आपल्या शोच्या पुढच्या पाहुण्या आलेल्या आहेत. यांना तुम्ही इंग्रजी पेपरांच्या पेज थ्रीवर पाहात असता. या श्रीमंत वर्तुळातल्या पाटर्य़ांमध्ये वावरणार्या एक माजी मॉडेल आहेत. एका क्रिकेटपटूशी, दोन नटांशी आणि एका उदय़ोगपतींशी त्यांचा विवाह झाला होता. सध्या त्या एका तरुण, उगवत्या दिग्दर्शकासोबत सगळीकडे दिसतात. त्यांचं आपण या शोमध्ये स्वागत करूयात. वेलकम मिस छैला चैनसुखानी.
छैला ः हाय!
मला सांगा, तुम्ही मतदान केलं आहेत का?
छैला ः ओह माय गॉड! वॉज इट टुडे? तरीच मी लुलूला म्हणाले, बेबी, आज सगळीकडे इतके क्यू कसले दिसतायत अँड व्हाय सो मेनी पुलिस पीपल आर अराउंड. लुलू- माय स्वीट लिट्ल पूड्ल... अच्छा, ती व्होटिंगची गर्दी होती होय. आयम सॉरी मिस्टर सर्वग्य, आय मिस्ड इट ऑर रादर दि गाइज फायटिंग फॉर दि सीट मिस्ड मी.
अहो, तुम्ही इतक्या कॅज्युअली सांगताय मतदान न केल्याचं. मला भयंकर राग आलाय. संताप आलाय. मतदानासारखं पवित्र कर्तव्य तुम्ही चक्क विसरून जाता आणि वर हसत खेळत सांगता. कसा बदल होणार आपल्या देशात? कसं होणार परिवर्तन? कसा जाणार हा देश पुढे? उच्चवर्गीयांची ही अनास्था.
छैला ः ओह कमॉन मिस्टर सर्वग्य. कूल इट, कूल इट. टेक अ चिल पिल. व्हॉट्स द बिग डील इन व्होटिंग? मी व्होटिंग सेंटरला गेले असते, तरी त्यांनी मला अलाव केलं नसतं.
का?
छैला ः आय डोन्ट हॅव दॅट सिली व्होटर आयडी कार्ड. 
सिली?
छैला ः नाहीतर काय! इट इज सो ओल्ड फॅशन्ड. अ डिझाइन डिझास्टर. डु यू थिंक आय वुड कॅरी दॅट शॅबी थिंग ऑन माय पर्सोना. ओह नो, ओव्हर माय डेड बॉडी? अँड कोण तिकडे रांगा लावणार टु गेट दॅट कार्ड?
तुम्ही मतदार ओळखपत्र फॅशनेबल नाही म्हणून मतदान करणार नाही आणि ते घ्यायला रांगा लावायला लागतात, म्हणून ते काढणार नाही. अहो, लोकशाहीतल्या या मौलिक अधिकारासाठी थोडा वेळ दय़ायला काय हरकत आहे?
छैला ः व्हॉट रबिश! जग खूप पुढे गेलंय मिस्टर सर्वज्ञ. ऍक्चुअली त्यांनी फेसबुक, जीमेल, ट्विटर, व्हॉट्सऍपचा वापर करायला पाहिजे ही कार्ड डिलिव्हर करायला. गिव्ह मी अ कोड, मॅच इट अँड अलाव मी टु व्होट, इट इज सो सिंपल. ऍक्चुअली सगळं व्होटिंग सोशल नेटवर्किंगवर घेता येईल. आय कॅन व्होट फॉर एनी लूझर इन झुमरीतलय्या, फ्रॉम द कम्फर्ट ऑफ माय मर्क... मर्सिडीझ यू नो.
बाई, माझं डोकं भिंगून गेलं तुमचे हे थोर विचार ऐकून. या सगळय़ा सुधारणा झाल्या पाहिजेत, असं मलाही वाटतं. पण, त्या होईपर्यंत तुम्ही मतदानच करणार नाही आणि वय त्याचं समर्थन करणार, हे काही मला पटण्यासारखं नाही. प्रेक्षकांनाही पटण्यासारखं नाही. मतदान केलंच पाहिजे, त्याशिवाय देशातली लोकशाही परिपूर्ण होणार नाही, प्रत्येकाच्या बोटावर आजच्या दिवशी ही खूण असलीच पाहिजे आणि काही गर्वाने मिरवायचंच असेल, तर आपण ही खूण मिरवली पाहिजे...
(कॅमेर्याकडे बोट दाखवतो. त्यावर शाईची खूण...
टपाक्...
वरच्या एसीच्या व्हेंटमधून पाण्याचा एक थेंब बोटावर पडतो... शाई पुसट होते...
टपाक्
शाईचा बोटावर केलेला सगळा मेकअप पुसला जातो, तसा शिरीष सर्वज्ञच्या चेहर्यावरचा जग जिंकल्याचा भावही पुसला जातो. गडबडून... बोट मागे लपवत... पिचक्या आवाजात)
लोकशाहीतलं हे पवित्र कर्तव्य तुम्ही तरी पार पाडायला विसरू नका... तुम्ही पाहात होता, `सवाल माझा.' आता पाहा कलटी माझी.
(क्षणार्धात स्क्रीनवरून गायब होतो.)

वेलकम टु `झोल' नाका!

...गार हवेच्या सपकार्याने आम्ही अचानक जागे झालो आणि पाहतो तो काय! आम्ही एका शोफर ड्रिव्हन झुळझुळीत मोटारीत ऐटीत बसलेलो होतो आणि मोटार पोटातलं पाणीही न डुचमळवणार्या एका चौपदरी रस्त्यावरून वेगाने चालली होती... आम्ही चमकलोच. आमच्या बुडाखाली मऊशार आसनाची गारेगार मोटार. आरशात पाहिलं तर चेहरा आमचाच. अरेच्चा, हा काय चिमित्कार, असा विचार मनात येतो ना येतो, तोच भल्या सकाळी सहय़ाद्री गेस्ट हाऊसात झालेली, आमचे आदरणीय परममित्र आणि महाराष्ट्राचे मामु म्हणजे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबाजी चव्हाण यांच्याबरोबरची गुप्त भेट आठवली...
...भेट गुप्त असल्याने आम्ही दरवाजा न वाजवतात दालनात शिरून फायलींवर सहय़ा करीत बसलेल्या बाबाजींच्या जवळ गेलो. फायलींच्या ढिगाभोवती तीन नवीकोरी पेनं कोरडी होऊन उताणी पडली होती आणि चौथे बाबाजी झटकून पाहात होते, त्याचीही शाई बहुदा संपली होती. तिचा शिंतोडा आम्ही चुकवताना धडपडलो आणि आवाजाने ते तिकडे दचकले. ``काय हे, नॉक करायचं ना येण्यापूर्वी! तुम्हीही अगदी दादांसारखे...'' यांच्या आयुष्यातल्या दोन्ही (एक राष्ट्रवादी आणि दुसरे स्वपक्षीय कोकणसम्राट) दादा आठवून आम्ही सहानुभूतीपूर्वक हसलो.
विषय बदलून ते म्हणाले, ``जरा फोटोबिटो काढा. निर्णय घेत नाही, घेत नाही, म्हणून दोन वर्षं ओरडत होतात ना! आता वीस वर्षांचे निर्णय एकदमच घेतले, तेव्हा का नाही दखल घेत. चौथं पेन आहे हे निव्वळ सहय़ांनी संपलेलं. आहात कुठे?''
``आधी कल्पना दिली असतीत, तर गिनीज बुकवाल्यांना सोबत घेऊन आलो असतो. `ते' किंवा `हे', कोणतं तरी वर्ल्ड रेकॉर्ड झालंच असतं तुमच्या नावावर,'' आम्ही खिंकाळलो.
``करा, करा, चेष्टा करा. मित्र म्हणून बोलावून घेतलं गुप्त कामगिरीसाठी आणि हे खिल्ली उडवतायत...''
`गुप्त कामगिरी', `मसलत', `खलबत', `कारस्थान' वगैरे शब्द ऐकले की आम्हाला फार स्फुरण चढतं. (हा लहानपणी भालजी पेंढारकरांचे सिनेमे पाहिल्याचा परिणाम की आता मर्द उद्धोजींची भाषणं ऐकल्याचा परिणाम हे कोडं आम्हाला आणि आमच्या मनोचिकित्सकालाही अजून उलगडलेलं नाही.) आम्ही ताबडतोबीने `अटेन्शन'मध्ये उभं राहून प्रयत्नपूर्वक चेहरा गंभीर केला.
``हे पाहा. चार-सहा पेनं झिजवून आम्ही महाराष्ट्रावर निर्णयांचा पाऊस पाडलेला आहे. आता महाराष्ट्रात सगळीकडे आनंदीआनंद, आबादीआबाद आणि निवडणुकीत काँग्रेस झिंदाबाद... (चेहरा कसनुसा करून) काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झिंदाबाद! असं आमचं गणित आहे. तुम्ही गुप्तपणे राज्यात फिरा आणि दोनचार दिवसांत आम्हाला रिपोर्ट दय़ा की आमचं गणित किती यशस्वी होतंय...''
निघता निघता बाबाजींनी दोन किलोचा एक गठ्ठा हातात कोंबला होता... ही नुकत्याच केलेल्या निर्णयांची यादी होती म्हणे...
...त्यानंतर आम्ही थेट इथे होतो... या शोफर ड्रिव्हन मोटारीत... गाडीचा वेग मंदावल्याने आमची विचारतंद्री भंग पावली, समोर निरखून पाहिलं तर टोलनाका.
``अर्रर्रर्र, एखादय़ा बाजूच्या रस्त्याने घ्यायची ना रे गाडी! आजकाल महाराष्ट्रात पेट्रोलपेक्षा टोलचा खर्च जास्त होतो रे बाबा! तुला काय कळायची पगारदारांची दुःखं,'' असं म्हणे-म्हणेपर्यंत गाडी टोलनाक्यापाशी पोहोचली. आधी कळलं असतं तर पोतडीतून राज ठाकरेंचा फोटो आणि मनसेचं स्टिकर काढून चटकन् लावता आलं असतं... पण, आता काही उपयोग नव्हता, आता सदर्याचे खिसे चाचपण्याचा अभिनय तरी करणं आलंच... तेवढय़ात असे कडक शोफरच पैसे काढतात, असा आमचा (अर्थातच फुकट) प्रवासाचा दांडगा अनुभव सांगतो...
आम्ही जिवाच्या कराराने खिसे उलटेपालटे करत असताना गाडी नाक्यावरच्या बूथजवळ थांबली. ड्रायव्हरही पक्का बेरक्या. त्याने मागची बाजू बूथसमोर येईल अशीच गाडी उभी केली आणि आमच्याच बाजूची काच खाली केली. खिडकीतून अचानक हात आत आला आणि त्या हातात गुलाबाचं फूल!
...``आता या फुलाचेही दहा रुपये लावणार का टोलमध्ये?'' आम्ही जन्मजात खवटपणाला जागून बोललो, पण, पुढे त्याच हातातून पाचशे रुपयांची नोट डोळय़ांसमोर आल्यावर आमची बोलती बंद झाली.
टोलनाक्यावरचा कर्मचारी सुहास्यवदनाने आम्हाला 500 रुपयांची लाच देतो आहे! बाबाजींनी सोपवलेल्या गुप्त कामगिरीची खबर यांच्यापर्यंत पोहोचलीही! काय समजतात काय हे पत्रकारांना? (`काय चुकीचं समजतात?' आमचं खवचट मन आमच्याशीही तसंच वागतं.) असे संतप्त विचार मनात येऊन आम्ही त्याला झाडण्याच्या उद्देशाने दरवाजा उघडण्याच्या खटपटीला लागणार, तेवढय़ात आसपास लक्ष गेलं तर प्रत्येक बूथवर हाच प्रकार सुरू होता. चक्रावून आम्ही टोल कर्मचार्याला विचारलं, ``अरे बाबा, टोल नाकाच आहे ना हा?''
त्याने नाक्यावरच्या बोर्डाकडे बोट दाखवलं. त्यावर चक्क `झोल नाका' असं लिहिलेलं होतं. टोल नाक्यावर काय चालतं, ते थेट नावातूनच व्यक्त करण्याची ही आयडिया बेष्टच आहे, असं आमच्या मनात येतं ना येतं, तोच खाली त्याचा लाँगफॉर्म दिसला, `जन हित ओनामा लिमिटेड'.
``अरे, ही ओनाम्याची काय भानगड आहे?'' आमच्या पृच्छेवर तो सुहास्यवदन कर्मचारी उत्तरला, ``ओनामा म्हणजे श्रीगणेशा. जनहिताचा श्रीगणेशा.''
``अच्छा, म्हणजे पाच वर्षं एनिमा आणि निवडणूकवर्षात जनहिताचा ओनामा!'
आमच्या टिपणीकडे साफ दुर्लक्ष करून त्या सरकारी रोबोने पढवलेली पोपटपंची चालूच ठेवली,``हे महाराष्ट्र सरकार आणि इंटरनॅशनल टोल कलेक्टर्स म्हणजे आयटीसी यांचं जॉइंट व्हेंचर आहे. आता महाराष्ट्रात प्रत्येक टोल नाक्यावर वाहनचालकाने आम्हाला टोल दय़ायचा नाही, आम्हीच तुम्हाला झोल देणार... पेट्रोल भरण्यासाठी.''
``अहो, पण याने सरकारी तिजोरीवर ताण नाही का येणार?'' नको तिथे आमच्यातला इकॉनॉमिक टाइम्सपढिक अर्थजागरुक पत्रकार जागा होतो हो!
``छे छे, हा आयटीसीचा उपक्रम आहे. आम्ही गेल्या काही वर्षांत असा काही टोल ओरबाडला आहे की 27 विमानं, 72 हेलिकॉप्टरं, प्रत्येक लोकप्रतिनिधीवर कोटय़वधींचा वर्षाव, प्रत्येक पक्षाचा इलेक्शन फंड आणि आमच्या मालकांचे जगभरात 247 प्रासाद उभे राहिल्यानंतरही स्विस बँकेत आल्प्स पर्वताएवढे नोटांचे ढिगारे पडून आहेत, त्याने बँकेची बिल्डिंग पडायला आली. एकेकाळी रिक्षाने मुलं शाळेत ठेवणार्या आमच्या मालकांची मुलं आता हेलिकॉप्टरने शाळेत जातात आणि मधल्या सुटीत डबा खायला हेलिकॉप्टरनेच येतात. मालक म्हणाले, बास झालं! येणार्या दोन लाख पिढय़ांची सोय झाली. आता जनतेचा पैसा जनतेला परत करायला हवा.''
पाचशेची नोट लग्गेच दुमडून खिशात टाकत आम्ही डबडबलेल्या डोळय़ांनी पुढे येतो तो काय, टोलनाक्याला लागूनच मोठा मंडप आणि दोन बाजूला टाकलेल्या टेबलांमधूनच गाडी जाईल अशी व्यवस्था. रजिस्ट्रार ऑफिससारख्या फक्त नगदीवर चालणार्या सरकारी ऑफिसासारखी सगळीकडे कामाची लगबग. पहिल्या टेबलावर कोणीतरी खिशातून आमचं ओळखपत्र काढून घेतलं आणि समोरच्या कम्प्यूटरवर नाव टाइप करून `उत्तमराव उकिडवे' असा आमच्या नावाचा मोठय़ाने पुकारा केला. समोरच्या प्रिंटरमधून 15-20 गुलाबी कागदाच्या परफोरेटेड पावत्यांची चळत समोर आली. ती त्याने सुहास्यवदनाने आमच्या हातात कोंबली. पुढच्या टेबलावर गाडीच्या टपावर बारा सिलिंडरे चढली, आमचा हात खिशाकडे जायच्या आत, ``ते सबसिडी वगैरे आम्ही करून घेऊ परस्पर'' असं सांगून गाडी पुढे पिटाळली गेली. पुढच्या टेबलावर टोलेजंग इमारतींची मॉडेल्स होती... आमच्या गाडीची बनावट पाहून ``एचआयजी काढ रे एक'' असा आदेश गेला आणि उच्च उत्पन्न गटाच्या घरासाठीच्या अर्जावर आमच्या फोटोसह संपूर्ण भरलेला फॉर्म फक्त सहय़ा ठोकण्यासाठी समोर आला. ``अहो, पण माझं वांगणीला आहे एक घर...''
``साहेब, हे वरळीत आहे, सरकारी अधिकार्यांच्या, मंत्र्यांच्या डबल डबल झालेल्या घरांच्या सोसायटय़ा पाडून आता तुमच्यासाठी घरं बांधायला दिलीत हिरानंदानींना. घेऊन ठेवायला काय जातंय...''
पुढच्या टेबलांवर आमच्या पदरात दोन एकर शेतजमीन, तिला पाणी, बियाणं, मोफत वीजपुरवठा, विहिरीसाठीचं कर्ज अशा वेगवेगळय़ा कागदांवर सहय़ा झाल्या होत्या. गाडीच्या टपावर अनुदानस्वरूपात एक म्हैस, तीन शेळय़ा, नऊ कोंबडय़ा ठेवण्यात आल्या होत्या. आंतरजातीय विवाहाच्या टेबलापाशी पोहोचल्यावर मात्र आमचा धीर सुटलाच... समोर, कौटुंबिक वापराच्या टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कपाटं, भांडी अशा सगळय़ा सामानाचे ढिगारे गाडीच्या टपावर चढण्यासाठी वाट पाहात होते. समोर वरमाला घेऊन उभ्या असलेल्या विजातीय सलज्ज सुंदरींपैकी एकीची निवड करायची आणि रजिस्टरात सहय़ा ठोकायच्या की सगळं सामान गाडीवर, असा फटाफट कारभार. ``अहो, पण घरी आहे एक... आमचं लग्न झालंय...'' आमच्या कलत्राचा चेहरा डोळय़ांसमोर आल्याने पांढर्याफट्ट पडलेल्या चेहर्याने आम्ही वदलो, तेव्हा इतका वेळ रस्त्यावर स्थिर नजर ठेवलेले शोफरमहोदय वळून म्हणाले, ``आणखी एक करायला काय जातंय?...''
आँ!! हे तर दस्तुरखुद्द बाबाजी!! हेच आमचे शोफर!
...बराच वेळापासून दाबून ठेवलेली स्वतःला चिमटा काढण्याची ऊर्मी आता दाबण्यात अर्थ नव्हता... ओय ओय ओय असं किंचाळून आम्ही परळ-म्हसवडी येष्टीच्या दोन शिटांच्या मध्ये नावाला जागून उकिडव्या स्थितीत जागे झालो, तेव्हा आमची लाल डबा गाडी खडखडत टोलच्या लायनीत शिरत होती... गरम वार्याच्या झळा, डिझेल, धूर, प्रवाशांच्या बॅगा-पिशव्यांमधले जिन्नस यांचा एकत्रित गंध यामुळे डोकं भणाणलं होतं...
...पण, अशाही स्थितीत, सुखस्वप्न भंगून रखरखीत वास्तवात जागे झाल्यानंतरही आम्हाला हायसंच वाटत होतं.

`आप' इफेक्ट

आप म्हणजे आम आदमी पार्टी.
सांप्रतकाळी या पक्षाचा फारच बोलबाला आहे. आजवर ज्या पक्षांनी आणि त्यांच्या `पक्ष'पाती राजकीय लेखकांनी, उंटपृष्ठावतारी मार्गदर्शक संपादकांनी आणि राजकारण हा क्रिकेटप्रमाणेच एक क्रीडाप्रकार मानून त्याची मौज लुटणार्या बघ्यांनी या पक्षाची, त्यांच्या कार्यकर्त्यांची टिंगल उडवली, त्यांना आता आपले शब्द गिळावे लागले आहेत. हे काय आंदोलन करणार, म्हटल्यावर त्यांनी आंदोलन केलं, हे काय राजकारण करणार, म्हटल्यावर त्यांनी निवडणुका लढवल्या, हे काय निवडून येणार म्हटल्यावर त्यांनी दणदणीत विजय मिळवले, हे काय सत्ता सांभाळणार म्हटल्यावर त्यांनी सरकारही स्थापन केले... इतके झाल्यानंतर उपरोल्लेखित महानुभावांनी हे काय राज्य करणार, हा प्रश्न काही काळाकरता स्थगित करायला हरकत नव्हती... पण, तोही प्रश्न आताच विचारला जातो आहे... यांची राज्य करण्याची पद्धत वेगळी असेल, याची कल्पना असतानाही जुन्या, मोडक्या फुटपट्टय़ांनी यांना मापण्याचे उदय़ोग चालले आहेत. हे काय राज्य करणार या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मिळायचं तेव्हा मिळो, पण सध्या तरी हाती झाडू घेतलेल्या आणि डुईवर गांधी टोपी घातलेल्या आम आदमीने भल्या भल्या `खास आदमी पक्षां'ची झोप उडवून टाकली आहे, हे निश्चित. `आप'च्या उदयानंतर काही विशिष्ट उदय़ोगधंदय़ातल्या माणसांवर खूपच प्रभाव पडलेला आहे, त्यांच्या आयुष्यात बदल झाला आहे. चला, त्यांची भेट घेऊन जाणूयात त्यांच्यावर झालेले `आप इफेक्ट' त्यांच्याच तोंडून!
उचललास तू झाडू हातभर, साम्राज्याचा खचला पाया
झंपकलाल झाडूवाला, प्रोप्रायटर, डबलझेड झाडू सेंटर
हे पाहा, मी तुमच्याशी दोन मिनिटांच्यावर बोलणार नाही, टाइम नाही. आमच्या झाडून सगळय़ा पिढय़ा याच धंदय़ात आहेत, पण असा सेल आजवर कोणी बघितला नव्हता. आजवर आम्ही देशाच्या सफाईच्या कामात केवढं योगदान दिलं, याची कल्पना आजवर कोणालाही नव्हती. उलट सगळे आम्हाला हिणवायचे. मला रस्त्यावरचा कोणीही चायवालासुद्धा `झाडूवाला झाडूवाला' म्हणून टोचायचा. आता सांगा, झाडूच्या धंदय़ात काय वाईट आहे? आम्ही झाडू बनवले नसते, विकले नसते, तर तुम्ही घरदार स्वच्छ करू शकला असता का? आम्हाला तेव्हा चिडवणार्यांच्या हे लक्षात आलं नसेल की आम्ही एक दिवस अख्ख्या देशाच्या सफाईच्या कामाला येऊ. अरविंदभाईंनी आप पार्टीचं चिन्ह म्हणून खराटा निवडला आणि आमच्या धंदय़ाची गाडी झाडूवर बसलेल्या हॅरी पॉटरसारखी आकाशात उंच उंच उडायला लागलेली आहे. जिथे शेकडय़ांनी खप नव्हता, तिथे हजारांचे आकडे पार झालेले आहेत. आमच्या दोन ब्रँच ऑलरेडी ओपन झाल्यात, दोन लवकरच ओपन होतील. पूर्वी जंटलमन लोक आमच्या दुकानात फारसे यायचे नाहीत. त्यांच्याकडच्या कामवाल्याच झाडू घेऊन जायच्या. आता कामवाल्यांच्या घरासाठीही गॉगल घातलेल्या, सेंट मारलेल्या मॅडम लोक झाडू घेऊन जातात. एक आतली गोष्ट सांगतो. मी तर `आप'ची झाडू ब्रँच इथे आहे, असा बोर्डपण लावून टाकलाय आणि डोक्यावर गांधी टोपी घालून दुकानात बसतो. बाजारपेठेत हप्ता गोळा करणारे भाई लोक आणि पोलिसांचे पंटर आता आपल्या दुकानावरचा बोर्ड वाचून सुमडीमध्ये कल्टी मारतात. ज्यांना बोर्ड वाचता येत नाही, ते आत आले तर टोपी बघून पळ काढतात.
...
या टोपीखाली दडलेय डोके!
ना. य. डोके, मालक, स्वदेशी गांधी टोपी सेंटर
हसलात ना, माझ्या नावाला हसलात ना! हसा हसा! त्याने तुमचे अस्वच्छ दात दिसण्यापलीकडे काय होणार? तुमच्यावर कशाला रागावू? गेली 45 वर्षं डोक्यावर असलेल्या गांधी टोपीतून डोक्यात थोडा तरी अर्क पाझरला असेलच ना! तुमच्याप्रमाणेच आमच्या घरातलेही माझ्या नावाला हसत होते. गांधी टोपीच्या व्यवसायात मी आहे म्हणजे मला `डोके ना.य.' असंच त्यांना वाटत होतं. त्यांना हे ठाऊक नव्हतं की शहरांमधल्या, शिकल्या-सवरलेल्या मंडळींनी कितीही बोटं मोडली आणि बापूजींना कितीही नावं ठेवली तरी त्यांची ही टोपीच गोरगरिबांच्या डोक्याचं आजही उन्हापासून रक्षण करते. त्यातून आमची गाडी रुटुखुटू चालली होतीच. आम्ही पडलो सर्वोदयी. आमच्या गरजा फार नाहीत. आहेत त्या टोपीच्या धंदय़ातून भागत होत्या. बापूंची मात्र कमाल हो! पक्का बनिया. आयुष्यभरात आपण कधीच न घातलेली टोपी त्यांनी इतरांना घातली आणि तीच टोपी आमच्या अरविंदाने इथल्या सगळय़ा बनेल राजकारण्यांना घातली आहे. गांधीजींना गोळी घालून ते संपले नाहीत, तेव्हा त्यांच्याविषयी गरळ ओकून त्यांना संपवण्याचे प्रयत्न झाले. आम्हाला वाटलं तरुण पिढी याला बळी पडते की काय? पण, नाही हो! कसल्याबसल्या हंगेरियन टोप्या, फॅशनेबल माकडटोप्या वगैरे घालणार्या आजच्या पोरांनी हौसेने येऊन गांधी टोप्या खरेदी करायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं, अजून या देशाबद्दल आशा बाळगायला हरकत नाही. आपल्या अण्णांनी उपोषण केलं, तेव्हा `मैं अण्णा हूँ'च्या टोप्यांची चलती होती. पण, आम्हाला तेव्हाच लक्षात आलं होतं की या टोप्यांचा स्टॉक ठेवायचा नाही. बनवायच्या, विकायच्या, हे प्रकरण टिकणारं नाही. अण्णांनी स्वतःचा उदोउदो थांबवायला हवा होता. नंतर अरविंदाने पक्ष काढला तेव्हा आता `मैं अरविंद हूँ' अशा टोप्या बनवायला लागतात की काय! पण, अरविंदा शहाणा निघाला. त्याने `मैं आम आदमी हूँ'च्या टोप्या तयार करवल्या, तेव्हाच लक्षात आलं की या गडय़ाच्या टोपीखाली कच्चं मडकं नाही, पक्कं मडकं आहे. आता आमच्या सगळय़ा कारागिरांच्या हाताला उसंत नाही, इतक्या टोप्या बनताहेत, खपताहेत. आदिवासी गावातल्या पोरांच्या शिक्षणावर ही सगळी कमाई खर्च होणार आहे. एक गंमत सांगतो आणि मग काउंटरकडे जातो, गिर्हाइकं खोळंबलीत. आमच्याकडे रात्रीच्या अंधारात चोरून प्रस्थापित पक्षाचे काही पुढारी येतात. अमक्या रंगाची टोपी बनवा, तमक्या रंगाची टोपी बनवा, अशा ऑर्डरी घेऊन. काहींना जरीच्या, वेलबुट्टीच्या, इम्पोर्टेड कापडाच्या डिझायनर टोप्या हव्या होत्या. मी सांगितलं, बापूंनी बनवली तीच टोपी इथे बनणार. तुमचं डोकं कधी चुकून त्या मापाचं झालंच, तर या! आता सांगा, `हा. य. ना डोके'?
...
झाडून सार्याजणी!
हौसाबाई, भागूबाई आणि गुणाबाई (रस्ता झाडणार्या झाडूवाल्या)
आत्ता गं बया! मुलाखत आन् आमची? हय़ो येक तापच होऊन बसलाय बगा आमाला! त्या केजरीवाल बाबाला नव्हता धंदा! त्यानी आमचा झाडू उचलला आणि रोज स्वच्छ रस्त्यावरून फिरणार्यांना पयल्यांदाच आमची आटवन झाली. खरं सांग बावा, तू बी रोज हय़ा रस्त्यानं जात असशील. फाटे फाटे कधी जाताना आमी बायामान्सं झाडू मारताना, कचरा गोळा करून रस्त्याकडेला लोटताना, पाचोळा गोळा करताना आमास्नी बघत असशील, तुला आजपत्तूर कदी वाटलं होतं का आमच्याशी दोन शब्द बोलावंसं? आज तुला आमची मुलाखत घ्यावीशी वाटायला लागलीये. परवा ती टीव्हीवाली बाय बी आलीवती. मुकादम तर बोलला आता हितून पुडं कोन आला तर मुलाखतीचे शेपाश्शे रुपये मागून घ्या. येकदा त्या केजरीवाल बावावरून राजकारनाचा झाडू फिरला की आपल्या झाडूला परत कोनी इचारायचं नाही. आताच कमाई करून घ्या. तू किती देतोस बोल! अरं, आजकाल आमच्याकडं लई जंटलमन लोकं आनि बाया शिकवनीला येत्यात सांजच्याला. कायाची शिकवनी? झाडू धरन्याची, झाडू मारन्याची. परवा तर त्या लांब दांडय़ाच्या झाडूसारक्या दिसनार्या शेलाटय़ा माडेलनीबी आल्यावत्या, झाडू घ्येऊन फ्याशन शो करायचाय म्हनं त्यास्नी! म्या म्हटलं आदी कापडं तर घाला अंगभर. अशी बोटभर चिंदी गुंडाळाल तर लोक झाडूकडं काहून बघतील! काय काय लोक आपोजिट पार्टीचे पन येतात. झाडूची तपासनी करायला. या झाडूत अशी काय जादू हाय ते काय कळंना झालंय त्यांना. आप्रेशन करून बगनार म्हन्त्यात झाडूचं. येक तुला सांगून ठेवते बाबा! आमच्या कामातलं गुपित हाय. जिथं चिवट कचरा जमा हुतो ना, तितं नाजुक केरसुनीनं धुरळाबी उडत नाय, तिथं जाड हिराचा खराटाच लागतो खरखरीत. खराटा हातात घ्यायची पाळी येऊ दय़ाची नसेल, तर शान्या मानसांनी कचराबी येळच्या येळी झटकून टाकावा, साठवून ठेवू नये. काड शंबर रुपये!
वाचकहो, या झाडू आणि टोपीमाहात्म्याचा प्रचलित राजकारणावर काय परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी आम्ही आमचे स्फूर्तिस्थान असलेले आदरणीय नेते आबादादा बाबाजी यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे त्यांची मुलाखत या अंकात देणे शक्य झालेले नाही. कारण, आम्ही बंगल्याची पायरी चढत असताना आतून सौ. वहिनींचा सुपरिचित सुमधुर स्वर कानांमध्ये शिरला, त्या आदरणीय आबादादा बाबाजी यांच्यावर खेकसत होत्या, ``ती मेली गांधी टोपी डोक्यावर बसवण्याचा उदय़ोग थांबवा आणि आधी बाजारात जाऊन एक चांगलासा झाडू घेऊन या.'
``का?'' तेजतर्रार आदरणीय बाबाजींचा इतका मवाळ स्वर प्रथमच ऐकला.
``का काय विचारताय,'' वहिनींचा पारा आणखी चढला, ``त्या झाडूवाल्याने तुमचं राजकारण साफ करून टाकलंय पार. आता पक्षकार्यालयात चकाटय़ा पिटायला जाण्याच्या ऐवजी मला घर झाडून घ्यायला मदत करा! आधीपासून प्रॅक्टिस केली असती तर ही टोपीसुद्धा वेळेवर फिट बसली असती तुमच्या डोक्याला.''
आम्ही हातातला झाडू दडवण्याची कोशिश करत ताबडतोब तिथून पळ काढला, हे सांगणे न लगे!