Tuesday, April 29, 2014

पीडब्ल्यूडी अर्थात `पार्टी' विथ डिफरन्स

चंद्रपूरच्या जंगलात रात्रीच्या किर्रर्र अंधारात वेगवेगळय़ा दिशांनी तीन आकृत्या दबकत चालत येत होत्या. तिघांच्याही डोक्यावर घोंगडी होती. इकडेतिकडे पाहात, सावधगिरीने अदमास घेत, एकेक पाऊल सावधपणे टाकत नेमके तिघे पाठमोरे एकाच ठिकाणी आले आणि एकाच वेळी एकमेकांना धडकून कोसळले. कोसळताना तिघेही एकसुरात दबक्या आवाजात किंचाळले, `पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी...' समोरच्याकडून अचानक परवलीचा शब्द ऐकून तिघांनाही अतीव आनंद झाला, आनंदाच्या भरात त्यांनी घोंगडी दूर भिरकावली, पण एकमेकांच्या चेहर्यांचं दर्शन होताच हा आनंद खेद आणि संतापात रूपांतरित झाला.
`अरेच्चा, परत आपणच भेटलो? बोंबला!' असे उद्गार तिघांच्याही तोंडून एकसमयावच्छेदेकरून निघाले. तिघांनाही एकमेकांना भेटल्याचा तीळमात्र आनंद झालेला नव्हता. ते त्यांच्यापैकी कोणाच्याही स्वरातून लपत नव्हतं. `छय़ा! हय़ा जंगलात पार्टी करण्याची कोणाची ही कंडम आयडिया?' हा तोंडावर आलेला प्रश्न विनोद तावडेंनी मागे सारला. कारण, ती ज्यांची आयडिया होती, ते नितीन गडकरी दुसर्या घोंगडय़ात होते आणि हा प्रश्न ऐकल्यावर ज्यांना गडगडाटी हसू येऊन गुप्त पार्टीची गुप्तता क्षणार्धात ढासळून पडली असती, ते गोपीनाथ मुंडे होते तिसर्या घोंगडय़ात. त्यामुळे सावरून तावडे इतकंच म्हणाले, `तरीच मी विचारात पडलो की मघापासून इतक्या माणसांना पीडब्ल्यूडी विचारलं तर कुणालाच माहिती नव्हतं, आता एकदम कोडवर्ड माहिती असलेले दोघे कसे भेटले?'
`आइका ना!' मुंडे धूळ झटकून उठत म्हणाले, `अहो, मी तर मघाशी एकाला पीडब्ल्यूडी विचारलं तर त्याने मला पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसचा पत्ता दिला. आता बोला!' आता ते गडगडाटी हसतील हे ओळखून गडकरी झटकन् त्यांना गप्प करीत म्हणाले, `इथून पुढचा रस्ता बहुतेक मला ठाऊक आहे. आपण एकत्रच जाऊ आता.'
चालता चालता तावडेंनी विचारलं, `मला सांगा नितीनभौ, पार्टीची जागा तुम्ही ठरवलीत, हे ठीक आहे. पण, मुळात 31 डिसेंबरची, नववर्षस्वागताची अशी गुप्त पार्टी करण्याची आयडिया कुणाची? थर्टी फर्स्टच साजरा करायचा होता तर मग आपण तो दणक्यात साजरा केला असता ना!''
``बरोबर आहे,'' मुंडे मुरगळलेला पाय ताणत, आखडत चालण्याचा प्रयत्न करत म्हणाले, ``नाहीतरी विधानसभा निवडणुकांची प्रिलिम आपण पास झालोच आहोत. आता वार्षिक परीक्षेतही आपलाच नंबर लागणार, यात शंका काय? पंजावाले काठावर पास झाले तरी पुष्कळ. मी तर अँटनीबाबांची केबिन पण बघून घेतलेली आहे...'
`तुम्हाला देशाचा संरक्षणमंत्री बनायचंय?' तावडेंनी तिसरीच्या मुलाने पायलट बनायचं स्वप्न सांगितल्यावर एखादय़ा खडूस काकाने पाहावं, तशा नजरेने पाहात मुंडेंना विचारलं. मुंडेही तात्काळ म्हणाले, ``अहो, पोस्टरं लावून तुम्ही महाराष्ट्राचे नेते बनू शकता, तर मी देशाचा संरक्षणमंत्री का नाही बनू शकत?''
``माझा आग्रह उदय़ोग खात्याचा राहील...'' गडकरी ओघात बोलून गेले आणि नंतर जीभ चावून ``सरसंघचालक सोपवतील ती जबाबदारी मी आनंदाने पार पाडेन'' असं म्हणून त्यांनी जिभेचा तुकडाच पाडायचा बाकी ठेवला! ``पंतप्रधान म्हणायचं होतं मला...'' असा गुळमुळीत खुलासा त्यांनी केला, पण तोवर बाण निघून गेला होता... वातावरण सैलावण्याचा प्रयत्न करत ते तावडेंना म्हणाले, `नरेंद्रभाईंच्या मंत्रिमंडळात मुंडेसाहेब संरक्षणमंत्री होतील, याची मला तरी खात्री आहे. पवार जे जे करतील ते ते करण्याचा यांचा नाद जुनाच आहे...'
``...आणि भाईंच्या मंत्रिमंडळात एकदा ते पंतप्रधान असले की बाकी कोण कसला मंत्री आहे, याने ना भाईंना काही फरक पडत, ना जनतेला.'' तावडेंनी घातलेली ही गोळी वर्मी लागल्याने गप्प झालेल्या गोपीनाथरावांची कळी खुलवण्यासाठी नितीनभौ म्हणाले, ``असं आहे मुंडेसाहेब, आपण आता कोल्ड्रिंकसुद्धा फुंकून प्यायला शिकलो आहोत. आता विजय आपलाच, असंच प्रमोदरावांनाही वाटलं होतं ना इंडिया शायनिंगच्या वेळेला. केवढी हवा केली होती आपण? काय झालं? एखादय़ाने थर्टी फर्स्टची जोरदार पार्टी करावी, तिच्यात बेफाम नाचावं, खावं, प्यावं, धमाल करावी आणि एक तारखेला कंपनीने हातात पत्र दय़ावं की `कालची पार्टी हाच आपला निरोप समारंभ समजून आजपासून कामावर येऊ नये', तशी गत केली पब्लिकने आपली. आमचं जजमेंट चुकलं, अशी तेव्हा प्रमोदरावांना जाहीर कबुली दय़ावी लागली होती, हे विसरलात का? आता पार्टी कोणतेही डोळय़ावर येणारे सोहळे करणार नाही.'
`त्यात आपला पक्ष हा शुचिर्भूत चारित्र्याचा पक्ष आहे. हिंदू संस्कृतीचा पक्ष आहे. हे थर्टी फर्स्टचे उच्छृंखल धंदे आपल्याला शोभा देत नाहीत,' तावडे अजूनही अभाविपमध्ये असल्यासारखेच सुभाषित बोलले.  मुंडे गालातल्या गालात हसत म्हणाले, `विनोदराव, तुमचं ते उत्शृंकल का काय आहे, ते आपल्याकडे कुणीच करत नाहीत, असं म्हणायचं का काय तुम्हाला? सीडय़ा देऊ का तुम्हाला एकेक शूचिर्भुतांच्या. आमच्यासारखे मर्द गडी जे जाहीर करतात, ते बाकीचे अंधारात करतात, एवढाच काय तो फरक. पण, ठीक आहे. नाहीतरी आपली पार्टी विथ डिफरन्सेस आहेच ना!'
``डिफरन्सेस नाही हो मुंडेसाहेब, डिफरन्स...' गोपीनाथरावांचं इंग्रजी कच्चं आहे, अशा समजुतीने विनोद तावडेंनी दुरुस्ती केली आणि गोपीनाथराव लगेच म्हणाले, ``आय नो द डिफरन्स बिट्वीन डिफरन्स अँड डिफरन्सेस अँड आय मेन्ट डिफरन्सेस व्हेन आय सेड सो.'' गोपीनाथरावांनी केंद्रीय मंत्रिपद किती मनावर घेतलंय याचा अंदाज आल्याने तावडे अंधारात शक्य तेवढे गोरेमोरे झाले आणि नितीनभौंकडे बघू लागले. नितीनभौ म्हणाले, `आता या उखाळय़ापाखाळय़ा बस झाल्या. तिकडे पार्टीतही एकी दाखवायची आहे आपल्याला. नरेंद्रभाईंपुढे पार्टीच्या आयडियेबद्दल काहीतरी वेडय़ासारखं बरळू नका तुम्ही. ही आयडिया त्यांचीच आहे.'
`वाटलंच होतं मला!' मुंडे पुन्हा मिष्किलपणे म्हणाले, `मला तर हल्ली नरेंद्रभाईंची भाषणं ऐकताना असं वाटू लागलं आहे की हिंदू धर्माच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत सगळय़ा आयडिया खरंतर त्यांनाच सुचल्या होत्या... ते जरा उशिरा जन्माला आले, एवढंच.' यानंतरचा गडगडाट कट करण्यासाठी आणि भाईंची आयडिया म्हटल्यावर तावडे चटकन उद्गारले, ``काही म्हणा, चंद्रपूरच्या जंगलात या कानाची खबर त्या कानाला लागू न देता, गुप्तपणे थर्टी फर्स्टची पार्टी साजरी करण्याची आणि तिला पीडब्ल्यूडी अर्थात पार्टी विथ डिफरन्स असं कोडनेम देण्याची आयडिया भन्नाटच आहे. मानलं नरेंद्रभाईंना.' तावडे कौतुकाने म्हणाले.
मोदींचं कौतुकही गडकरींना फार पचनी पडलं नाही. त्यांनी पुन्हा `तुम्ही गप्प बसा हो, तुम्ही लहान आहात अजून' असं म्हटल्यावर तावडे हिरमुसले. ते पाहून मुंडे गदगदून हसत म्हणाले, `तरी मी तुम्हाला सांगत होतो, तुम्ही ते चरबीचं ऑपरेशन करून घेऊ नका. तुम्हाला मोठं होण्याचा तोच एक मार्ग होता. आता आयुष्यभर हेच ऐकावं लागणार. तेही यांच्याकडून...'
अधिकच हिरमुसलेल्या तावडेंनी विषय बदलण्यासाठी अभ्यासू विदय़ार्थ्याची नेहमीचीच यशस्वी भूमिका घेतली. मुंडेंच्या टोमण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांनी नितीनभौंना विचारलं, `नितीनभौ, पार्टीचा अजेंडा काय?'
`अजेंडा? कोणत्याही पार्टीचा काय अजेंडा असतो? खाओ, पीओ, ऐश करो.'
`नितीनभौ, विनोदजी आपल्या पक्षाचा अजेंडा नाही विचारत आहेत, आजच्या पार्टीचा अजेंडा विचारतायत. त्या विचारणेची पूर्ती करा.' गोपीनाथरावांनी वर्मावरच्या टोल्याची परतफेड केली. नितीनभौंनी आपल्या चेंडूवर फलंदाजाने खेचलेला षटकार नजरअंदाज करीत उगाच बोलिंग ऍक्शनवर कॉन्सन्ट्रेट करत असलेल्या बोलरप्रमाणे आपल्याच तंद्रीत असल्याचा अभिनय केला आणि म्हणाले, ``तसा अजेंडा काहीच नाही. पण, दिल्लीत सगळय़ा वरिष्ठांना एक प्रश्न पडलेला आहे... त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न होईल कदाचित...''
``कसला प्रश्न?''
``आपली आघाडी सत्तेत आलीच, तर ती का येणार?'' भौंनी बौद्धिक घ्यायला सुरुवात केली.
``म्हणजे काय, काँग्रेसच्या राजवटीला लोक विटलेले आहेत, आपण वेगळय़ा प्रकारे कारभार करू, अशी त्यांना खात्री आहे, म्हणून लोक निवडून देतील आपल्याला.'' तावडेंनी नेहमीप्रमाणे लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवले.
``तोच तर मोठा पेच आहे,'' नितीनभौ सचिंत मुद्रेने म्हणाले, ``तीच जनता, तेच प्रशासन, तेच अधिकारी, तीच वृत्ती आणि वेगळय़ा कपडय़ांमधले तेच राजकारणी मिळून `परफॉर्मन्स विथ डिफरन्स' कसा करून दाखवणार?''
...
...
...चंद्रपूरच्या जंगलातली पार्टी अजून चालू आहे... तिच्यातल्या विचारमंथनातून उत्तर निघालं की नाही, हे जाणून घेण्यासाठी, कुठेही जाऊ नका, इथेच राहा. उत्तर मिळेल... काही महिन्यांतच.

No comments:

Post a Comment