Friday, November 22, 2013

सचिनचा अखेरचा सामना आणि बाळासाहेबांची आतषबाजी!

स्थळ : वानखेडे स्टेडियम
वेळ : जी कधीच येऊ नये, असं भावनाशील भारतीय क्रिकेटचाहत्यांना वाटत होतं ती... सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीची.
सचिनमय झालेल्या सामन्याच्या अखेरीला सचिनला खास मानवंदना देण्यात आली. भावव्याकुळ चाहत्यांच्या आग्रहाखातर रवी शात्रीने गदगदल्या स्वरात सचिनला माइकपाशी बोलावलं आणि विचारलं, आज इथे कोण हवं होतं, असं तुला वाटतं? भावनांचा बांध संयमाने रोखण्याचा प्रयत्न करत सचिन म्हणाला, ``अर्थातच माझे बाबा हवे होते, असं वाटतं. पण, त्याचबरोबर आज इथल्या बाळासाहेब ठाकरे स्टँडमध्ये खुद्द बाळासाहेब माझा हा अखेरचा सामना पाहायला, आशीर्वाद दय़ायला हजर असते, तर मला फारच आनंद झाला असता...''
सचिनचं वाक्य पूर्ण होतं ना होतं, तोच आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट झाला... ही सचिनच्या रिटायरमेंटची इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांनी केलेली आतषबाजी असावी, असं सगळय़ांना वाटत असताना आकाशातून तेजाचा एक लोळ ठाकरे स्टँडवर स्थिरावला आणि आश्चर्यचकित स्टेडियममध्ये चक्क दिव्य कांतीचे बाळासाहेबच अवतरले. त्यांच्यासमोर जमिनीतून कणीस फुटल्यासारखा माइकही आपोआप वर आला आणि बाळासाहेबांची चिरपरिचित साद सगळय़ा स्टेडियमभर घुमली, ``इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो...'' टाळय़ांचा एकच कडकडाट झाला... विस्फारल्या डोळय़ांनी हे अद्भुत दृश्य पाहणार्या सचिनचाही सगळय़ांना विसर पडला आणि सगळे कॅमेरे क्षणार्धात बाळासाहेबांवर रोखले गेले. पाच मिनिटं सुरू असणारा कडकडाट हाताच्या इशार्याने थांबवून बाळासाहेब सचिनला उद्देशून म्हणाले, ``अरे डोळे फाडून काय बघतोस? मीच आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वरून खाली आलोय. खालून वर सगळेच जातात. पण, वरून खाली येणारा मी पहिलाच असेन (हंशा)... माझा हा स्वभाव आहे. माझ्या आवडीच्या माणसांसाठी मी खाली-वर वगैरे काही बघत नाही... एकदा माणूस आपला म्हटला की तो माझा झाला (टाळय़ांचा कडकडाट)... भले त्याला तसं वाटत नसलं तरी मग त्याला माझा नाईलाज आहे... (सचिनला टोला बसतो, लोक हसतात...) आज सचिनची ही शेवटची मॅच पाहायला वर आकाशातही दाटी झालेली आहे. इथे काही हजार लोक आहेत तर ही रेटारेटी आहे, तिकडे वर तेहतीस कोटींची गर्दी आहे... काय चेंगराचेंगरी असेल विचार करा! त्या बिचार्या अप्सरांची पुण्यातल्या गणपतीच्या गर्दीत सापडलेल्या माताभगिनींसारखी गत झालेली आहे... पण आज त्यांच्याकडे पाहायलाही कुणाला फुरसत नाही... सगळय़ांचे डोळे पृथ्वीवरच्या या क्रिकेटच्या देवाकडे लागलेले आहेत (टाळय़ांचा कडकडाट)... माझ्या महाराष्ट्रात, मुंबईच्या भूमीत, सर्वसामान्य मराठी घरात जन्मलेल्या या असामान्य पोराने तुम्हाआम्हालाच नव्हे, तर जिथे जिथे क्रिकेट खेळलं जातं, त्या प्रत्येक देशातल्या रसिकाला आनंद दिला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. (टाळय़ांचा कडकडाट). त्याच्या अंगात अस्सल मराठी रक्त आहे, म्हणूनच आजपर्यंत त्याची बॅट मैदानात तलवारीसारखी तळपत होती आणि शत्रूच्या बोलिंगच्या खांडक्या पाडत होती. (टाळय़ा.) त्यामुळे त्याच्याबद्दल मला पहिल्यापासून जिव्हाळा आहे. त्यालाही माझ्याबद्दल जिव्हाळा होता, असं वाटतं... (`होता' या शब्दामुळे एकदम सगळे शांत होतात. सचिन प्रश्नार्थक पाहू लागतो.) होय, तुम्ही बरोबरच ऐकलंत, मी `होता' असंच म्हणालो. हल्लीच्या काळात त्याला मुकेशभाई आणि नीताभाभींचा जास्त लळा लागलेला आहे. (हशा) त्यात त्याची काही चूक नाही. आमच्या राजकारणातही बर्याचजणांना यांचा लळा लागलेला आहे. (आणखी हशा) काय करणार, मनुष्यस्वभाव आहे हा! जिकडे (हाताने पैशांची खूण करत) मळा, तिकडे लळा (प्रचंड हशा) त्यांच्या टीमचा कप्तान झाल्यावर सचिनला साक्षात्कार झाला होता की मुंबई सगळय़ांचीच आहे. मी म्हणालो, अरे बाबा, आम्ही कुठं म्हणतोय की ती माझ्याच बापाची आहे! आम्ही इतकंच म्हणतोय की मुंबई ही आधी महाराष्ट्राची आहे आणि नंतर भारताची, त्यानंतर सगळय़ा जगाची (प्रचंड टाळय़ा)... आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेल्या घटनेनुसार या मुंबईवर सगळय़ांचा हक्क आहे, कबूल; पण सर्वात पहिला आणि सर्वात मोठा हक्क आमच्या मराठी माणसांचाच आहे आणि तो आमचाच राहणार, ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. (अतिप्रचंड टाळय़ा. थोडा पॉझ घेऊन खटय़ाळपणे) गेल्या वर्षी आमचं विमान वर उडालं, तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की आता आपल्या वाटेतला सर्वात मोठा काटा दूर झाला. आता मुंबई स्वतंत्र करू आणि इथल्या उरल्यासुरल्या मराठी माणसाला हुसकावून लावू. पण, याद राखा. मी वरून तुमची थेरं पाहतो आहे आणि खाली इथे माझा वारसा चालवायला उद्धव भक्कम आहे, त्याच्या जोडीला आता आदित्यही सरसावलेला आहे. (टाळय़ा.) माझा सच्चा शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत ही स्वप्नं झोपेतसुद्धा पाहण्याचं धाडस करू नका. गप हय़ाच्यावर ते ठेवून झोपून राहा. (प्रचंड हशा). हातावर डोकं हो! (अतिप्रचंड हशा.) माझा प्रत्येक शिवसैनिक हा अंगार आहे, तो तुमची राख केल्यावाचून राहणार नाही. (अतिप्रचंड टाळय़ा. पॉझ घेऊन.) माझा प्रत्येक कडवट सैनिक म्हणजे साक्षात मीच आहे, हे लक्षात ठेवा. तोच माझं जिवंत स्मारक आहे. (थोडं थांबून) स्मारकावरून आठवलं, हल्लीच मी ऐकलं... काय तर म्हणे स्मारक का नाही उभं राहिलं साहेबांचं वर्षभरात? साहेब असते, तर असं झालं नसतं... अरे गधडय़ांनो, अनादिअनंत काळ तुमची धुणी धुवायला साहेब काय अमरपट्टा घेऊन आला होता का वरून? (हशा). तुम्हीही काही कायमचे इथे नाही राहणार आहात, तुम्हालाही यायचंय... (हशा, पॉझ) लवकरच (प्रचंड हशा). आमचा काळ वेगळा होता, तेव्हाचे प्रश्न वेगळे होते, आताचा काळ वेगळा आहे, माझा मराठी माणूस बदललेला आहे, समाज बदललेला आहे, आता सगळं जुन्या स्टाइलने करून कसं चालेल? उद्धव त्याच्या पद्धतीने करतोय ना, त्याला करूदय़ात ना! कशाला त्याच्या मध्ये मध्ये मध्ये मध्ये लुडबुडताय. माझा शिवसैनिक रस्त्यावर राडे घालत होता, बेडरपणे तुरुंगात जात होता, तेव्हा तुम्ही काय करत होता? इतका माझ्या स्मारकाचा पुळका आलाय तर उभारा ना सेनाभवनासमोर तुमच्या जागेत स्मारक... त्या आमच्या झेरॉक्स कॉपीला सोबत घेऊन! ते जमायचं नाही. स्वतःचा फदय़ा सुटायचा नाही आणि आयजीच्या जिवावर बायजी उदार. बरं मला सांगा, आता यांना काय मिळायचं राहिलंय हो? शिवसेनेच्या सावलीत आलात म्हणून `गाव तिथे एसटी' व्हायच्या आधी गाव तिथे कोहिनूर उभी राहिली तुमची. एकटय़ाने मुतारी तरी उभारता आली असती का तुम्हाला? (थांबून) चुकीचा शब्द गेला का? शौचालय म्हणायला हवं होतं, नाही का? हल्ली देशात सगळीकडे तीच घाण पसरलेली आहे. तिकडे त्या मोदींना शौचालयं बांधायची घाई झालीये. अरे, इतकी घाईची होते, तर आधी इतका ढोकळा खायचाच कशाला? (छप्परफाड हंशा) आधी मंदिर मंदिर म्हणून बोंबलत होते, आता शौचालय शौचालय म्हणून बोंबलतायत! मंदिरासाठी विटा गोळा करायला लावल्यात आता शौचालयासाठी काय गोळा करायचं? (हशा) आणि आता त्या विटांचं काय करायचं, त्यांच्यावर काय डोकं फोडून घ्यायचं? (प्रचंड हशा) मतं मिळवण्यासाठी कोणाचंही काहीही कुरवाळायला जातात हे लोक! मित्र झाले म्हणून काय झालं! जे चूक ते चूक. पंतप्रधानपदासाठी आमच्या शुभेच्छाच आहेत त्यांना, पण हे असं लाचारीने टोप्या बदलणं, विचार बदलणं, विचार सोडणं आम्हाला कदापि मान्य नाही. आम्ही आमच्या विचारांवर कायम ठाम राहिलो. मतांसाठी कधी भूमिका बदलली नाही, कधी कोणाची लाचारी केली नाही, मोडू पण वाकणार नाही, हा बाणा कधी सोडला नाही. (टाळय़ा). कोणाला काय वाटतं याची आम्ही कधी फिकीर केली नाही. म्हणूनच आमच्या सचिनवर आम्ही कायम प्रेम केलं. पुत्रवत माया केली. आमचा सचिन शिवाजी पार्कावर वडापाव खाऊन प्रॅक्टिस करत होता, तेव्हापासून तो आमचा आहे. आता त्याला इटालियन पिझाची आवड लागली आहे. (हशा. सचिन लाजतो) वयोमानाप्रमाणे बदलतात आवडीनिवडी. आमची काही त्याला हरकत नाही. फक्त त्याने आजच्या या सुवर्णमय क्षणाला माझी आठवण काढली, म्हणून वडीलकीच्या नात्याने त्याला एक सल्ला देईन. तुला आवडतो तर पिझा, खा, पास्ता खा, हवंतर, त्या इटालियन बयेच्या मांडीवर जाऊन बस गोड वाटत असेल तर. पण, आज शेवटच्या मॅचमध्ये जसा तू तुझ्या माऊलीला, रजनीताईंना विसरला नाहीस, तसाच आपल्या वडापावाचा विसर पडू देऊ नकोस आणि तुझी आई असलेल्या मायमराठीचाही विसर पडू देऊ नकोस. तुझ्या क्रिकेटच्या कारकीर्दीबद्दल मी काही बोलावं, असं शिल्लक नाही. (खटय़ाळ हसून) आमचे पत्रकार बांधवही हे लक्षात घेतील, तर वाचकांची आणि टीव्हीच्या प्रेक्षकांची सुटका होईल. ते चॅनेलचे दांडेकर तर जो भेटेल त्याला विचारत सुटतात, आप सचिन की कोई आठवण बताओ. तोही कॅमेरा बघून चेकाळतो आणि सांगतो, माझ्या मावसकाकूच्या चुलतआजीच्या भाचेजावयाच्या साहेबांनी एकदा सचिनची फरारी पाहिली होती ओझरती. त्या आठवणींनी अजूनही आमचं अख्खं कुटुंब रोमांचित होतं. (प्रचंड हशा) हे असलं सगळं सुरू असतं टीव्हीवर. मीही दिवसभर पाहात असतो टीव्ही. आमच्याकडेही दिसतात सगळे चॅनेल. सांगायचा मुद्दा एवढाच की उगाच बॅटची आणि नशिबाची परीक्षा पाहात न बसता तू रिटायर झालास, हे चांगलं केलंस. भल्याभल्यांना हे जमत नाही. तुलाही थोडा उशीरच झाला. पण, देर आये, दुरुस्त आये. दुर्घटना से देर भली, हे तुला कळलं हेही काही कमी नाही. (हशा) आमचा विजय मर्चंट म्हणाला होता, लोक का रिटायर होताय, असं विचारतात, तोवर रिटायर व्हावं. कधी रिटायर होताय, असं त्यांनी विचारेपर्यंत वाट पाहू नये. आमचे पंत आणि परममित्र शरदबाबू यांनाही तुझ्यासारखीच सद्बुद्धी लाभावी, अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. तुझ्या भावी आयुष्यात तुला आतासारखंच उदंड यश लाभो आणि महाराष्ट्राचं, मराठीचं नाव तुझ्यामुळे उजळून निघो, हीच शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.''
(पूर्वप्रसिद्धी : गव्हर्नन्स नाऊ, २०१३) 


No comments:

Post a Comment