Friday, November 22, 2013

फेकू की पप्पू?

``नारायण नारायण...'' तंबोरा बाजूला ठेवून दासीने दिलेल्या पात्रातल्या थंडगार पाण्याने घामेजल्या चेहर्यावर हलका हबका मारून तो उत्तरीयाने पुसत नारदमुनींनी अंतःपुरात प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या मनात खिन्नता दाटून आली होती. एक काळ असा होता, जेव्हा नारदमुनी विष्णुमहालात येताहेत म्हटल्यावर लगबग वाढायची. भगवान विष्णू आणि लक्ष्मीमाताच नव्हे, तर महालातले सेवकगणही मुनिवरांनी आणलेली पृथ्वीवरची खबर ऐकायला उत्सुक असायचे, आणि आज... आज साध्या दासीलाही त्यांची दखल घ्यावीशी वाटत नव्हती...
``या मुनिवर, या, काय खबर?...'' लक्ष्मीमातेच्या प्रसन्न हास्याने नारदमुनींची तंद्री भंग पावली. त्यांनी विचारलं, ``प्रणाम माते, भगवान कुठे दिसत नाहीत?''
मातेच्या कपाळावर दोन आठय़ा चढल्या. तुटकपणे ती म्हणाली, ``ते कुठे असणार?''
काडी घालायची संधी दिसताच नारदमुनींची कळी खुलली आणि ते म्हणाले, ``अप्सरांच्या सहवासात रममाण झालेली दिसतेय स्वारी?''
``तेवढं त्या बिचार्या अप्सरांचं भाग्य कुठलं? तुमचे लाडके भगवान बसले आहेत त्यांच्या लाडक्या टीव्हीसमोर...''
``ओहोहोहो, चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतायत की काय? मी सांगतो माते, तो क्रिकेटमधला देव निवृत्त झाल्याशिवाय भगवानांचा हा टीव्हीचा चस्का सुटायचा नाही...''
``चुकलात मुनिवर चुकलात,'' महालात प्रवेश करत भगवान विष्णु म्हणाले, ``तो क्रिकेटचा देव हल्ली मैदानात आला कधी आणि गेला कधी ते कळतही नाही. वर्षाचे 365 दिवसरात्र, 24 तास हा पैशांचा खेळ पाहणार कोण? तो मक्ता भारतवर्षातल्या रिकामटेकडय़ांचा...'' आसनावर विराजमान होत त्यांनी प्रश्न केला, ``बोला, काय खबर पृथ्वीची? सगळं क्षेमकुशल?''
अहाहा! हीच ती संधी! याच क्षणाची मुनी वाट पाहात होते. निवडणुकांच्या कव्हरेजला परराज्यात जाणार्या राजकीय वार्ताहराप्रमाणे मिळतील तेवढी स्थानिक वर्तमानपत्रं मिळवून, टीव्हीची न्यूज चॅनेलं पाहून मुनिवर आपल्या डोक्यात भगवान विष्णुंना सादर करण्याच्या रिपोर्टची कॉपी तयार करायचे आणि `सनसनी'च्या निवेदकाला लाजवतील इतक्या नाटय़मयतेने ती सादर करायचे. तोच हा क्षण... पण... पण, नारदांनी पहिला शब्द उच्चारण्याच्या आत भगवान मिष्कीलपणे म्हणाले, ``काही म्हणा मुनिवर, भारतवर्षात पप्पू आणि फेकू मजा आणतायत की नाही?''
मुनिवरांचं बोलण्यासाठी उघडलेलं तोंड उघडंच राहिलं... त्यांचा आ मिटेचना... कारण, त्यांचं वाक्यच त्या त्रिकालज्ञानी भगवंताने हिरावून घेतलं होतं... मुनिवरांच्या नजरेसमोर त्यांच्या कल्पनेतला सीन तरळून गेला... नारदमुनी महालात येताच सगळय़ा अप्सरा, सेवकगण, देवदेवता गोळा झालेल्या आहेत. शेषनागानेही कान टवकारले आहेत. भगवान विष्णुंनी पृथ्वीतलावरची खबर विचारताच मुनी म्हणतात, ``सध्या पृथ्वीतलावर पप्पू आणि फेकू यांनी धूम उडवून दिलेली आहे.'' भगवान गोंधळून विचारतात, ``पप्पू आणि फेकू? हे कोण आहेत? ही नावं तर कधी ऐकली नाहीत? अटल, लाल, सोनिया, सुषमा, लालू, नीतिश, माया, ममता, जयललिता हे सगळे रिटायर झाले का?'' मग विजयी हास्य करत नारद त्यांना पप्पू म्हणजे कोण आणि फेकू म्हणजे कोण, हे सांगतात आणि सगळय़ांच्या कौतुकाच्या नजरा झेलतात... पण, इथे तर फटा पोस्टर, निकला झीरो... भगवानांनी रिपोर्टातली हवाच काढून घेतली.
``त..त..त..तुम्हाला हे माहिती आहेत दोघेही?'' नारदमुनींनी कसनुसं हासत प्रश्न केला.
``ऑफकोर्स!'' भगवान म्हणाले, ``24 तास न्यूज चॅनेल पाहात असतो मी!''
``पण, तुम्ही तर अंतर्यामी, त्रिकालज्ञानी. तुम्हाला काय गरज टीव्हीवरच्या बातम्या पाहण्याची?''
``तुम्हाला काय वाटतं, मी बातम्यांसाठी न्यूज चॅनेल पाहतो? अहो, मी ते पाहतो ते मनोरंजनासाठी. राजकारण, पुढारी, त्यांचे हितसंबंध, त्यांच्यातला भ्रातृभाव आणि शत्रुभाव, देशकालस्थिती याचं कसलंही भान नसलेली पॅनेलवरची फुटकळ माणसं फार मनोरंजन करतात. त्यांना वाटतं आपण, मोठमोठय़ाने बोललो किंवा पंचक्रोशीतले सगळे डास पळून जातील इतके वेगवान हातवारे केले की लोक आपल्याला सर्वज्ञ समजतील. आजकाल हिंदी सिनेमातही असे निखळ विनोदवीर राहिलेले नाहीत. 24 तास काय दाखवत राहायचं, हा या वाहिन्यांना पडणारा प्रश्न फेकू, पप्पू आणि कंपनी ज्या प्रकारे सोडवते, ते पाहणं फार इंटरेस्टिंग असतं. जो साधा माणूस असतो, तो मौनात जातो आणि विद्वत्ता, चारित्र्य, सचोटी असतानाही अकारण मौनमोहन म्हणून कुप्रसिद्धी पावतो. पप्पूचा बालिशपणा आणि फेकूची चमकोगिरी मात्र जोरदार प्रसिद्धी पावते, हा काळाचा महिमा.''
``भगवान, आता तुम्ही इतकी खबर ठेवताच आहात तर एक प्रश्न विचारू का? काय वाटतं तुम्हाला? कोण होईल सिंहासनावर विराजमान? पप्पू की फेकू?'' नारदमुनींनी उत्कंठेने विचारलं.
``नारदमुनी, भारतात राहून तुम्हीही भारतीयांसारखेच बनून येता बरं का! मुक्काम थोडा लवकर आटोपता घेत चला, नाहीतर काही खरं नाही तुमचं,'' भगवान हसून म्हणाले, ``अहो, श्रीशांत आता बाउन्सर टाकणार का नो बॉल, यावर आयपीएलचा सट्टा लावत असल्यासारखे सगळे भारतीय याच प्रश्नात अडकून पडलेले आहेत... पप्पू येणार की फेकू? गंमत म्हणजे यांच्यातला जो कोणी विराजमान होणार, त्याला हेच सिंहासनावर बसवणार आहेत. तरीही यांनाच उत्सुकता. खरंतर कोणालाही प्रश्न असा पडायला हवा की पप्पू आला किंवा फेकू आला, तर सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनमानात काही बदल होणार आहे का? तो होणारच नसेल, तर कोण आला याने काय फरक पडतो?''
``असं कसं म्हणता भगवान, मध्यंतरी भारतीयांनी भाकरी पलटली होती...''
``...आणि भाकरीबरोबरच हात पोळून घेतला होता... टु बी प्रिसाइज... हात वेगळय़ा प्रकारे पोळून घेतला होता... आधी एका प्रकारे पोळतच होता, आता दुसर्या प्रकारे पोळला, एवढाच काय तो बदल. मला सांगा, हे `मंदिर वही बनायेंगे'चा नारा देत आले होते ना सत्तेत? एक वीट तरी रचली का पाच वर्षांत? आमचे रामभाऊ हुरळले होते, मी त्यांना तेव्हाच सांगितलं, थांबा आणि गंमत पाहा. यांच्या फक्त उक्तीतच राम आहे, कृतीत नाही. आता पटलं त्यांना! काय वेगळं झालं हो त्यांच्या सत्ताकाळात आणि काय वेगळं होतंय यांच्या सत्ताकाळात? सत्तेत पोहोचण्यासाठी आणि तेवढय़ापुरत्याच यांना एकमेकांपेक्षा विरोधी भूमिका घ्याव्या लागतात. नंतर यांचे बोलवते आणि करवते धनी वेगळेच असतात. सत्तेत कोणीही येवो. सगळे मिळून, वाटून खातात. पप्पू आला म्हणून फेकूचं काही बिघडत नाही, फेकू आला म्हणून पप्पूचं काही अडत नाही.''
``म्हणून मी मागेच म्हणालो होतो, महाराष्ट्रातून सतत हिमालयाच्या मदतीला धावणार्या सहय़ाद्रीवर जरा वरदहस्त ठेवा. जाणत्या राजाची लॉटरी लावा. शेतकर्यांचं तरी भलं होईल,'' नारदमुनींनी पोरासाठी ऍडमिशनसाठी आमदाराची चिठी आणलेल्या बापासारखा बापडा सूर लावला.
``मुनीवर, जाणत्या राजाच्या राजवटीत शेतकर्यांनी शेती करण्याऐवजी शेतांवर नांगर फिरवून स्टेडियम बांधली क्रिकेटची, तरच त्यांचा काही फायदा होऊ शकतो. यांच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातले निम्मे शेतकरी गुंठेपाटील बनून बरबाद झाले, निम्म्यांनी कीटकनाशकं तरी घशात ओतली नाहीतर गळफासात तरी मान दिली. त्यांच्यावर कृपा केली तर देशातल्या सगळय़ांचे बारा वाजतील आणि उरल्यासुरल्या शेतकर्यांची तिरडी क्रिकेटच्या स्टम्पांनीच बांधायला लागेल.''
भगवानांचं हे प्रक्षुब्ध वाक्ताडन ऐकून नारदमुनी गालातल्या गालात हसू लागले... भगवानांनी त्यांच्या हसण्याचं कारण विचारलं. नारदमुनी म्हणाले, ``तुम्ही भारतवर्षाबद्दल असे पोटतिडकीने बोलू लागलात की माझ्या मनात लगेच विचार येतो, आता भगवानांच्या अवताराची वेळ झालेली दिसते आहे. घेऊन टाका अवतार आणि बसवून टाका भारतवर्षाची सगळी घडी.''
``म्हणजे हे पुढे विस्कटायला मोकळे. आतापर्यंत एवढे अवतार घेऊन यांच्यात काही फरक पडलाय का नारदमुनी?'' भगवान सात्विक संतापाने कडाडले, ``दर पाच वर्षांनी हे अशीच वाट पाहात असतात कोणा ना कोणा अवतारपुरुषाची. हे आळशी गंगाराम ओठावर पडलेलं पिकलं जांभूळ ढकलायलाही अवतारपुरुषाची वाट पाहतील. यांच्यासाठी पप्पू आणि फेकूच योग्य आहेत. तीच त्यांची लायकी आहे. ती वाढलीच कधी चुकून तर हे स्वतःच देश बदलतील, त्यासाठी त्यांना कोणा अवतारपुरुषाची गरज पडायची नाही.''
``और अब एक आखरी सवाल?'' नारदमुनींनी वातावरण हलकं करण्यासाठी एकदम न्यूज चॅनेलच्या निवेदकाच्या स्टायलीतच बोलायला सुरुवात केली, ``तुमचं मत कोणाला? पप्पूला की फेकूला?''
``नारदमुनी, आपलं मत गुप्त ठेवायचं असतं हे माहिती नाही का तुम्हाला?'' भगवान हसून अगदी खासगी आवाज लावून म्हणाले, ``पण, तुम्ही आतल्या गोटातले म्हणून सांगतो, तुमच्या लक्ष्मीमाता कशावर विराजमान झालेल्या आहेत?''
``कमळावर?''
``...आणि आम्ही दोघे जेव्हा भक्तगणांना आशीर्वाद दय़ायला उभे राहतो, तेव्हा तो कसा देतो?''
``पंजा वर करून...'' आता नारदमुनींच्या डोक्यात टय़ूब पेटली आणि खो खो हसत ते म्हणाले, ``बापरे, तुम्ही तर या सगळय़ांपेक्षा मोठे पोलिटिशियन आहात भगवान! नारायण नारायण...''
(पूर्वप्रसिद्धी : गव्हर्नन्स नाऊ, २०१३) 

No comments:

Post a Comment