Friday, November 22, 2013

नमो फोनाय नमः!

मोबाइल फोनच्या बाजारात सध्या `नमो सॅफ्रन 1' या नावाचा मोबाइलचा हँडसेट उपलब्ध झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने काढण्यात आलेल्या, साधारण 23 हजार रुपये किंमतीच्या या फोनमध्ये सगळय़ा स्मार्टफोन्समध्ये असतात त्या सोयीसुविधा आहेत, त्याशिवाय काही प्रीलोडेड ऍप्स आहेत. बीजेपी, नमो, नरेंद्र मोदी अशी या ऍप्सची नावं आहेत. भारतीय जनता पक्षाची माहिती, नरेंद्र मोदींचा परिचय, त्यांचं चरित्र, त्यांची भाषणं अशा प्रकारचं पक्षीय प्रचारसाहित्य या मोबाइलमध्ये डम्प करण्यात आलेलं आहे. त्यातली निम्मी ऍप्स धडपणे चालतही नाहीत, असा रिपोर्ट आहे.
मोदींच्या `चाहत्यां'नी केलेली ही निर्मिती, आम्हाला विचाराल, तर साफ फसली आहे. आता तुम्हाला कोण विचारतो, असं तुम्ही म्हणाल. पण, आम्ही वर्तमानपत्राच्या संपादकीय विभागात वीसेक वर्षे लेखणी आणि कीबोर्डवरच्या कळी झिजवलेल्या असल्याने आम्हाला सर्व विषयांत गती प्राप्त झालेली आहे. शिवाय, कोणत्याही विषयावर, त्यातलं काही कळत असो वा नसो, भाष्य करण्याचा अधिकार तर आम्हाला भारतीय नागरिक असल्याने घटनादत्तच प्राप्त झालेला आहे. येणेप्रमाणे बिनचूक युक्तिवादाने आम्ही तुम्हाला निरुत्तर केलेलं असल्याने आता मूळ मुद्दय़ाकडे वळूयात. हा मुद्दा आहे नमो फोनचा. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवला, तर कट्टर भाजपेयीही हे मान्य करतील की मोदींच्या इमेजच्या तुलनेत हा फोन जरा थंडाच आहे. तो पाहून उत्तर प्रदेशातल्या सभांमध्ये `मंदिर वही बनायेंगे' अशी सिंहगर्जना करण्याऐवजी `रामनामापेक्षा राष्ट्रनाम श्रेष्ठ' अशी गुळचट सेक्युलर भाषा करणार्या नमोंची आठवण येते. 
फोनचं नाव सॅफ्रन आणि बॉडी कोणत्याही इतर फोनसारखीच काळीपांढरी, गुळगुळीत आणि सुळसुळीत, हे काही बरोबर नाही. फोनला किमान भगवं कव्हर असलं असतं, म्हणजे मोदींप्रमाणेच हा फोनही बाजारात उठून दिसला असता. फोनचा आकार इतर फोनांप्रमाणे न ठेवता त्याला कमळाकार देता आला असता, तर हा फोन किती सुपरहिट झाला असता, विचार करा. पण, चिनी कारखान्यांमध्ये स्वदेशी डिझाइन्स असून असून किती असणार? नेक्स्ट टाइम! 
या फोनमध्ये इतर सगळय़ा अँड्रॉइड फोन्सप्रमाणे अँड्रॉइडचा प्लॅटफॉर्म आहे, इथपर्यंत काही वांधा नाही. देशात सगळय़ा पक्षांची व्यासपीठं एकाच प्रकारची असतात, अनेकदा एकच कंत्राटदार ती उभारून देतो, राहुल गांधींसाठी वेगळे बांबू आणि मोदींसाठी वेगळे बांबू, असे भेदभाव तो करत नाही. त्यामुळे अँड्रॉइडबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण, या फोनमध्ये यूटय़ूब, व्हॉट्सऍप, फेसबुक, गेम्स, ऍप्स स्टोअर वगैरे इतर ऍप्स आणि यंत्रणा देण्यात आल्या आहेत, हे काही फोनच्या नावाला साजेसं नाहीये. असं म्हणतात की नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याचं नाव ओळखा, असा प्रश्न अमिताभ बच्चनने केबीसीमध्ये शेवटचा प्रश्न म्हणून विचारला होता आणि एकही लाइफलाइन शिल्लक नसलेल्या स्पर्धकाने भलती रिस्क घेण्याऐवजी मिळाले तेवढे पैसे गोड मानून घरी जाणं पसंत केलं होतं. त्यानंतर अमिताभच्या कम्प्यूटरजीनेही सुटकेचा निःश्वास सोडला होता म्हणतात. कारण, या स्पर्धकाने एखादं नाव सिलेक्ट केलं असतं, तरी कम्प्यूटरजीला कुठे माहिती होतं की मोदींच्या मंत्रिमंडळात आणखी कोण आहे. कम्प्यूटरला, इतर अनेक देशवासियांप्रमाणे, असंच वाटत होतं की मोदींच्या मंत्रिमंडळात ते एकटेच आहेत. वेगवेगळय़ा वेळांना तेच सगळय़ा खात्यांचा कारभार पाहतात आणि तेच सगळे निर्णय घेतात. आमच्या गण्याला इंटरनेटवर मोदींचा साधेपणा दाखवणारा प्रचारकाच्या वेषात झाडू मारत असलेला फोटो कौतुकाने दाखवला, तर तो म्हणाला, मला वाटलं होतं, हे काम तरी तिकडं दुसरे कोणीतरी करत असतील. हा माणूस आहे का सुपरमॅन!
मोदींची ही इमेज असताना या फोनमध्ये इतर ऍप्स आहेत, हेच मुळात चुकीचं नाही का? व्हॉट्सऍप असेल, तर ते फक्त भगव्या परिवारातल्या मंडळींचीच प्रोफाइल दाखवणारं हवं, फेसबुकवरही तीच व्यवस्था हवी. यू टय़ूबवर मोदींच्या प्रेरणादायी भाषणांशिवाय काहीच दिसता कामा नये, इंटरनेटवर भाजप आणि मोदींच्या साइट्सपलीकडे काही उघडता कामा नये. गेम्सही मंदिराच्या विटा कमीत कमी वेळात रचा, शौचालयावर योग्य आकाराचं छत बसवा, हिरवे बॉल फोडा, विरोधकांच्या नावांच्या शत्रूंचा नायनाट करा, अशा प्रकारचे स्वदेशी खेळ असले पाहिजेत. मोदींच्या डोक्यावर टोपी घाला, हा तर फारच यशस्वी खेळ होऊ शकतो. मोदींच्या डोक्यावर देशातल्या सगळय़ा प्रकारच्या टोप्या कशा फिट्ट दिसतात, पण, प्रत्यक्षात एकच टोपी कशी फिट्ट बसते, याचं दर्शन या गेममधून घडवता येईल. त्यांच्या डोक्यावर मुस्लिम फरकॅप किंवा गोल टोपी घालू पाहणार्याचे हात फोनच कलम करून टाकेल, अशी व्यवस्था करता येईल. कॉन्टॅक्ट्सची यादीही गुजरातच्या मंत्रिमंडळासारखी हवी; खान, शेख, अन्सारी, हुसेन बिसेन सगळे बाहेर. ऍड कॉन्टॅक्ट करताच नाही आला पाहिजे यांचा.
या फोनमध्ये कॅमेराही देण्यात आलेला आहे. तो कशाला? लोकांना कशाला आपले फोटो काढायचे आहेत? ते कोण बघतो? हल्ली तर आपले कट्टर कार्यकर्ते दिवसाचे 24 तास नमोंचे मुखवटे घालून वावरत असल्याने आपला चेहरा विसरून गेले आहेत. आरशात कधी मुखवटा काढून पाहतील, तर आपल्या घरात हा कोण शिरलाय, असा भास होईल त्यांना. त्यापेक्षा प्रीलोडेड साताठशे फोटो मोदींचे देता आले असते. तेवढे तर साधारण 23 मिनिटांत निघतच असतील त्यांचे रोजच्या रोज. जागे मोदी, झोपलेले मोदी, हसणारे मोदी, कडाडणारे मोदी, हात वर केलेले मोदी, हात खाली केलेले मोदी. खादीतले मोदी, सुटातले मोदी, पठाणी वेशातले मोदी. फोनचं नाव नमो आणि त्यावर छबी फोन वापरणार्याची ही दळभद्री समाजवादी लोकशाही या फोनमध्ये असायचं काही कारण नाही. हा फोन वापरायचा असेल, तर स्क्रीनसेव्हरही नमोंचाच हवा आणि रिंगटोनही `नमो नमः' हाच असला पाहिजे.
या फोनचा वापर करताना प्रत्येकाने समोरच्या माणसाला हॅलोबिलो म्हणण्याची गरज नाही. ते अमेरिकन आपल्या भावी पंतप्रधानांना अजून व्हिसा देत नाहीत आणि आपण त्यांच्या स्टायलीत हॅलो म्हणायचं कारण काय? आपण `नमो नमः' असंच म्हटलं पाहिजे. जो इतर कोणत्याही शब्दांनी फोनवर अभिवादन करेल, त्याच्या गालावर कडाड्कन् पाच बोटं उमटवण्याची व्यवस्था या फोनमध्ये असायला हवी...
...अरेच्च्या, इतक्या सगळय़ा सूचना, सुधारणा तुम्ही शांतपणे ऐकून घेतल्यात, त्यांना माना डोलावल्यात आणि आता शेवटच्या सूचनेला एकदम चिडक्या नजरेने पाहू लागलात ते! ओहोहोहो, आता आलं लक्षात. नमो फोनमधून लोकांच्या गालांवर काँगेसचं चिन्ह उमटावं, हे तुम्हाला फारसं पसंत पडलेलं दिसत नाही... एकच शंका आहे... आपल्या महाविजयानंतर आपण देशभरात शौचालयं बांधून झाली की नंतर जी मंदिरं बांधणार आहोत, त्यातल्या भगवानजींच्या मूर्ती आशीर्वादपर हाताचा पंजा उंचावलेल्या असतील की समोर हात पसरलेल्या `हेल हिटलर' असं अभिवादन करणार्या नाझी पद्धतीच्या असतील?
 (पूर्वप्रसिद्धी : गव्हर्नन्स नाऊ, २०१३) 

No comments:

Post a Comment