Friday, February 11, 2011

एकदा एक गाढव लोकल ट्रेनमध्ये चढले...

एकदा काय झाले?  
एक गाढव एका लोकल स्टेशनशेजारच्या स्कायवॉकच्या बांधकामावर रेती वाहण्यासाठी मुंबईला आले. रेती/दगड/सिमेंट वाहता वाहता हे गाढव आजूबाजूने लगबगीने जाणा-या येणा-या माणसांकडे पाहायचे. हे सगळे कोठे जातात, कोठून येतात, असा प्रश्ना त्याला पडायचा. स्टेशनात होणा-या अनाऊन्समेंट, लोकलचा आवाज, हॉर्न, हे सगळे आवाज त्याच्या कानी पडायचे. त्यामुळे लोकलविषयी त्याच्या मनात विलक्षण कुतूहल निर्माण झाले होते.
 
बांधकामावरच्या सर्वात वयोवृद्ध गाढवाने त्याला रेल्वे स्टेशन म्हणजे काय, लोकल ट्रेन म्हणजे काय, स्टेशनात ट्रेन कशी येते, माणसे तिच्यातून कसा प्रवास करतात, हे सगळे समजावून सांगितले. त्यामुळे तर गाढवाची उत्सुकता आणखी वाढली. त्याला आता ट्रेनने प्रवास करण्याचे वेध लागले.
 
‘‘गाढव आहेस का रे तू?’’ त्याचे हे स्वप्न ऐकून वयोवृद्ध गाढव कातावून उद्गारले, ‘‘अरे, लोकल ट्रेनमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नसते. म्हणूनच ट्रेनमध्ये एवढा वेळ लटकून उभे राहतात लोक, तरी त्यांच्या हाता-पायालाही मुंग्या येत नाहीत. एवढ्या गर्दीत तुझ्यासारख्या एवढ्या मोठ्या गाढवाला कसं शिरता येणार?’’
 
पण, शहाणपणाचे बोल ऐकेल तो गाढव कसला?
 
त्याने हेकाच धरला. अखेर एका वीकली ऑफला गाढवाने त्याच्या स्टेशनपासून मिनिमम भाड्याचे रिटर्न तिकीट काढले आणि ते प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहिले. ट्रेन आली, इतर प्रवाशांबरोबर गाढवानेही ट्रेनमध्ये शिरण्यासाठी मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. पण, ‘‘गाढव ट्रेनमध्ये शिरायचा प्रयत्न करतंय पाहा!’’, ‘‘हाकला हाकला त्याला’’, ‘‘हाणा’’, ‘‘मारा’’, अशा आरोळय़ा उठल्या आणि गाढवाची धुलाई झाली..
 
..‘‘सांगितलं होतं ना गाढवपणा करू नकोस म्हणून!’’ वयोवृद्ध गाढव त्याच्या जखमा शेकता शेकता डाफरले. पण, लोकलप्रवासाचा हट्ट काही गाढवाने सोडला नाही. मग, वयोवृद्ध गाढव म्हणाले, ‘‘ठीक आहे. आता गाढवासारखा नागवा जाऊ नकोस ट्रेनमध्ये. माणसांसारखे कपडे शिव आणि जा.’’
 
गाढवाने मालकाकडून सॅलरी अ‍ॅडव्हान्स घेतला आणि उत्तम पँट-शर्ट शिवून घेतले. एक गॉगल घेतला. ते कपडे परिधान करून मस्तपैकी गॉगल लावून शिटी वाजवत गाढव ट्रेनमध्ये चढले आणि एका कोप-यात जाऊन उभे राहिले. ट्रेन सुटली आणि तेवढ्यात एका प्रवाशाचे लक्ष गाढवाकडे गेले. पुन्हा ‘‘गाढव ट्रेनमध्ये शिरलंय पाहा!’’, ‘‘हाकला हाकला त्याला’’, ‘‘हाणा’’, ‘‘मारा’’, अशा आरोळय़ा उठल्या आणि गाढवाची धुलाई झाली..
 
..‘‘सांगितलं होतं ना हे सोपं काम नाहीये म्हणून!’’ वयोवृद्ध गाढव त्याच्या जखमा शेकता शेकता डाफरले. पण, दोनदा मार खाल्ल्यानंतरही लोकलप्रवासाचा हट्ट काही गाढवाने सोडला नव्हता. वयोवृद्ध गाढव म्हणाले, ‘‘ठीक आहे. मला जरा विचार करू दे.’’
 
दोन दिवसानंतर वयोवृद्ध गाढव म्हणाले, ‘‘आता माझ्या लक्षात आलं तुझं काय चुकलं ते. तू माणसांसारखे कपडे घातलेस, गॉगल घातलास. पण, गाढवासारखाच वागलास. तू माणसांसारखा वागशील, तर तुला कोणी ओळखणार नाही.’’
 
गाढवाने तीन दिवसांची कॅज्युअल लीव्ह टाकली आणि ते स्टेशनच्या जवळ रुळांच्या कडेला जाऊन उभे राहिले. माणसे स्टेशनात येतात कशी, प्लॅटफॉर्मवर कशी उभी राहतात, गाडीत चढतात कशी, ट्रेनमध्ये काय करतात, याचे त्याने सखोल निरीक्षण केले. पूर्ण अभ्यास केला. तिस-या दिवशी संध्याकाळी ते वयोवृद्ध गाढवाला म्हणाले, ‘‘उद्या मी ट्रेनचा प्रवास करणार.’’
 
‘‘ऑल द बेस्ट!’’ वयोवृद्ध गाढव काळजीयुक्त स्वरात म्हणाले.
 
दुस-या दिवशी गाढवाने कपडे परिधान केले, गॉगल चढवला. एका कामगाराकडून चायनीज मोबाइल मागून घेतला, दुस-याकडून गुटख्याची पुडी घेतली, तिस-याकडून मोठी सॅक घेऊन पाठीला लावली आणि तोंडात गुटख्याची पुडी रिकामी करत गाढव ऐटीत स्टेशनात शिरले.
 
‘‘पचक थू,’’ आत शिरताच त्याने प्लॅटफॉर्मवरच कोणाच्या पायावर पडेल की काय याची चिंता न करता पहिली पिंक टाकली. मग ट्रेन येईपर्यंत त्याचे सडासंमार्जन सुरू होते. ट्रेनमध्ये घुसताना त्याने कारण नसताना धक्काबुक्की केली. दोनजणांशी भांडण केले. आत शिरून ते चौथ्या सीटवर, उरलेल्या तिघांची अडचण करून, बसले. खिडकीत येताच त्याने तुंबलेले तोंड मोकळे केले. त्याने खिडकीलाही लाल रंगाचे सचैल स्नान घडले. मग गाढवाने सैलावून आपला चायनीज मोबाइल काढला आणि त्यावर ‘‘परदेसी परदेसी जाना नहीं’’ वगैरे नदीम-श्रवण युगातील झंकार बीट्सयुक्त गाणी, अलीकडे-पलीकडे दोन डब्यांना ऐकू जातील, अशा दणदणीत आवाजात लावली. थोड्या वेळाने ते पाठीला सॅक तशीच ठेवून हवा खायला दारात उभे राहिले. मागचा प्रवासी शिव्या घालून आत सरकला. स्टेशन आले. आत भरपूर जागा असतानाही गाढवाने प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांना आत चढू दिले नाही. त्याचे लक्ष समोर गेले आणि त्याच्या लक्षात आले, ‘‘आयला! व्हीडिओ कोच!’’ मग, समोरच्या लेडीज डब्यातल्या अंग चोरून उभ्या असलेल्या बायकांकडे पाहून इशारे, हातवारे करीत त्याने ‘‘क्या आयटम’’ वगैरे छेडखानी सुरू केली. पुढच्या स्टेशनात त्याने दाराबाहेर पूर्ण झुकून प्लॅटफॉर्मवरच्या दोन म्हाता-या  माणसांना टप्पू लगावले, दोन पोरींकडे पाहून अश्लील हातवारे केले आणि उडी मारून दोन बायकांना धक्का दिला. परतीच्या प्रवासात गाढवाने हे सगळे केलेच, शिवाय मस्तपैकी पत्त्यांचा डाव रंगवला आणि भजनाचा कंठाळी सूरही लावला..
 
..या सगळ्या प्रवासात त्याला एकानेही गाढव म्हणून ओळखले नाही..
 ..गाढवाने आता थ्री रूट पास काढला आहे. सेकंड क्लासच्या पासावर अधून मधून फर्स्ट क्लासमध्येही शिरण्याची कला त्याने अवगत केली आहे..
..गाढव हल्ली रोज लोकल ट्रेननेच प्रवास करते..
..तुम्ही पाहिलंयत का हो कधी त्याला?

(6/12/09)

1 comment: