Friday, February 11, 2011

पाठीला सॅक लावलेला माणूस

तो हल्ली कुठेही दिसतो..
 
पाठीला सॅक लावलेला माणूस पूर्वीही दिसायचा, पण एकदम डोंगरद-यांमध्ये. ही भलीमोठी पाच-दहा किलोची सॅक लावून चालणारा डोंगरभटक्या ट्रेकर.
 
तो पठारावर आला की त्याची सॅक माळ्यावर जायची. डकबॅकच्या कॅनव्हास शूजबरोबर. पुन्हा पुढच्या ट्रेकलाच ते शूजही बाहेर यायचे आणि सॅकही.
 
तेव्हा पठारावर वापरण्याच्या बॅगा वेगळ्या होत्या. ऑफिसमध्ये जाणारा पांढरपेशा असेल, तर ब्रीफकेस किंवा लेदर बॅग. इतर मंडळींकडे साध्या कापडी पिशव्या आणि इंटुक मंडळींकडे झोळ्या.
 
या झोलावाला सिंड्रोमग्रस्त मंडळींनी ज्या दिवशी खादीचे कुडते फेकून दिले, त्याच दिवशी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझेमिरवणा-या झोळ्याही गुंडाळून ठेवल्या. ते ओझं थेट पाठीवर घेतलं. छोट्या आकाराची सॅक खांद्याला, पाठीला दिसू लागल्या. बच्चेकंपनीच्या पाठीवरच्या आडव्या दप्तराची जागाही छोट्या, आकर्षक चित्रं असलेल्या रंगबिरंगी सॅकनी घेतली. पण, हा बदल फक्त मनमौजी असण्याची चैन परवडणा-या कलंदरांपुरताच होता. नाकासमोरच्या नोकरीपेशा मंडळींच्या आणि व्हाइट कॉलर सूट-बूट-टायवाल्यांच्या हातात अजूनही लेदर बॅगा आणि ब्रीफकेसेसच होत्या.
 
आता मात्र तसं राहिलेलं नाही.
 
दोन-अडीचशेच्या रेंजमधली सॅक आता दोन अडीच हजाराच्या घरात पोहोचली आहे.
 
लोअर परळची जशी अपर वरळी झाली, तशीच सॅकही आता हाय फाय बॅक पॅकझाली आहे. मऊ मुलायम वॉटरप्रूफ हाय क्वालिटी कापडाची, वजनाचा भार मणक्यावर पडू नये, यासाठी खास डिझाइन केलेली, आत अगदी लॅपटॉपसाठीही खास कप्पा असलेली.
 
आता ती सूट-बूट-टायवाल्या कॉपरेरेट माणसांच्याही पाठीवर सर्रास दिसते. आता ब्रीफकेसवाला माणूस ओल्ड फॅशन्डझाला आहे म्हणे.
 
त्यामुळे, पाठीला सॅक लावलेला माणूस हल्ली कुठेही दिसतो..
 
*****************
 
पाठीला सॅक लावलेला माणूस हल्ली कुठेही दिसतो.. कुठेही आणि कसाही घुसतो. कुठेही, कसाही उभा राहतो.
 
आता मुंबईच्या अफाट गर्दीत माणसाला ठिकठिकाणी घुसावंच लागतं आणि जागा मिळेल तिथे उभं राहावंच लागतं. उभं राहायचीही जागा मिळताना मारामार असते.
 
मग पाठीला सॅक लावलेला माणूसही लोकलमध्ये, बसमध्ये, लिफ्टमध्ये, लोकलच्या दारात जिवाच्या कराराने घुसतो आणि जागा मिळाली तर उभा असतो, त्यात प्रॉब्लेम काय?
 
प्रॉब्लेम इतकाच आहे की तो सॅकसह उभा राहतो.
 
कमाल झाली! बॅक पॅक ही चीजच पाठीवर लावण्यासाठी आहे. ती आणखी कुठे ठेवणार?
 
ही सॅक जेव्हा खूप भरून फुगलेली असते, तेव्हा ती मागे उभे राहणा-या एका माणसाची जागा अडवते आणि रिकामी असते, तेव्हाही मागच्या माणसाला टोचणी लावते. गर्दीने खच्चून भरलेल्या लोकलमध्ये, बसमध्ये किंवा लिफ्टमध्ये जेव्हा हा माणूस सॅकसह शिरतो, तेव्हा तो या सगळय़ा अडचणी करतोच, शिवाय, तो गर्दीत जेव्हा जेव्हा इकडे तिकडे हालचाल करतो, तेव्हा ती आसपासच्या पाचदहा माणसांना डिस्टर्ब करते. त्यांचं सुखानं उभं राहणंही मुश्कील करते.
सॅक पाठीला असल्यामुळे आणि तिला (म्हणजे पाठीला) डोळे नसल्यामुळे आपल्यामुळे केवढा त्रास होतोय, याचा त्याला पत्ताच नसतो. तो त्याच्या विश्वात मशगुल. इतरेजनही वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या सॅक घेऊन एकमेकांची अडचण करणा-या पंथातलेच असल्याने सहसा त्याला काही बोलत नाहीत.
 
फारच फुटकळ वाटतो ना हा मुद्दा!
 
स्नॉबिशही वाटत असेल?
 इतना मिजास करनेका है, तो फर्स्ट क्लास मे जानेका ना!हा सल्ला या संदर्भात देता येत नाही. फर्स्ट क्लासमध्येही पाठीला सॅक लावलेला माणूस त्या सॅकसह उभा असतो. ये बंबई है मेरे भाय! इधर की गर्दी मे इतना टच तो होताईच है. उसके बारेमे इतना टची नई होनेका,’ अशी समजावणी मनात दाटून आली असेल.
हा फक्त तात्पुरत्या अडचणीचा मुद्दा नाही. ती सॅकवाल्याला सॅक काढायला सांगून सोडवता येते. तो वैतागलेल्या चेह-याने का होईना, ती काढतो आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत उभा राहतो.
 
प्रश्न स्पेसचा आहे.
 
अवकाश. जो प्रत्येक माणसाचा असतो आणि ज्याचा त्याला अतीव प्रिय असतो.
 
सकस, समाधानी, सुंदर आयुष्य जगण्यासाठी तो अत्यावश्यक असतो.
 
कारण, एकमेकांपासून योग्य अंतर राखल्याशिवाय कोणत्याही जवळिकीला अर्थ प्राप्त होत नाही.
 
एकमेकांबरोबर कोंबलं जाणं, याला जवळीक म्हणत नाहीत. तसं असतं तर माणसांमाणसांमधली सर्वात मोठी जवळीक घडवून आणण्याचं श्रेय हिटलरला द्यावं लागलं असतं. त्याच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पांमध्येच ज्यू एवढय़ा मोठय़ा संख्येनं एकमेकांच्या सर्वात जवळआले होते ना!
 
स्पेसचीही गंमत असते. ती ज्याची त्याला हवी असते आणि समाज म्हणून एकत्र राहताना दुस-याची स्पेसही मान्य करावी लागते. ज्याला स्वत:ची स्पेस प्यारी असते, त्याच्यावर स्वत:बरोबरच इतरांची स्पेस जपण्याची सांभाळण्याचीही अनुस्यूत जबाबदारी असते.
 
पाठीला सॅक लावलेला माणूस नेमकी तीच जबाबदारी घेत नाही.
 
तो फक्त त्याची एकटय़ाची सोय पाहतो.
 
इतरांच्या गैरसोयीशी त्याचं सोयरसुतक नसतं.
 ज्याला त्रास होईल, त्याने सॅकवाल्यावर बळजोरी करावी किंवा सोपा उपाय म्हणजे स्वत: एक सॅक घेऊन यावी आणि तिचा ढालीसारखा किंवा शस्त्रासारखा
उपयोग करावा.
 
मी माझं पाहणार. त्यानं त्याचं पाहावं.
 
अरे मग आपण सगळे मिळून आपलंहित कधी पाहणार? ते कसं सांभाळणार?
 
समष्टीच्या हिताच्या बाता मारणा-या आपल्या देशात जिकडे पाहावं तिकडे अशा आप्पलपोटेपणाच्या दृश्यादृश्य सॅका पाठीला लावलेली माणसं कशी दिसतात?
 
*****************
 
काही दिवसांपूर्वी पाठीला सॅक लावलेल्या एका माणसाला फाशीची शिक्षा झाली..
 
..तो आणि त्याचे नऊ साथीदार पाठींना सॅका लावून मुंबईत आले. त्या सॅकांमधून त्यांनी बंदुका, बाँब काढून हिंस्त्र कल्लोळ माजवला. काहीशे लोकांचा बळी घेतला आणि अख्खा देश अडीच दिवस वेठीला धरला..
 
..आपल्या देशाची बरबादी हेच जीवितध्येय असलेल्या शेजारी राष्ट्राची ही करणी होती..
 ..पण, त्यासाठी त्या देशाने अशी पाठीला सॅक लावलेली माणसं प्रशिक्षित करून पाठवण्याचे कष्ट घेण्याची गरज काय? पाठीला सॅक लावलेली याच देशातली माणसंही हळू हळू का होईना, तेच तर करतायत.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(13/6/10)

1 comment:

  1. You have a great potential, energy and talent to turn trivial thing into a fine source of philosophy.

    ReplyDelete