Friday, February 11, 2011

आत्महत्येचा पेपर

गर्र गर्र कुंई गर्र गर्र कुंई गर्र गर्र कुंई..
 
वर मरतुकडा पंखा कुरकुरत फिरत असेल..
 
तरीही त्याच्या मानेखांद्यावरून घामाचा ओघळ वाहात असेल..
 
कुर्र कुर्र कुर्र कुर्र कुर्र कुर्र..
 
वर्गभर को-या कागदांवर तुटून पडलेली पेनं वाजत असतील..
 
त्याच्या घामचिक्कट हातातलं पेन मात्र चारवेळा निसटून खाली पडलं असेल.. समोरचा कागद त्याच्या भवितव्यासारखा कोरा.
 
सर्र सर्र सर्र सर्र सर्र सर्र सर्र सर्र सर्र..
 
समोरचा प्रश्न पाहताच त्याच्या उत्तराचा सगळा अभ्यास इतर विद्यार्थ्यांच्या मन:चक्षूंपुढे उभा राहात असेल..
 
त्याच्या मिटल्या डोळय़ांसमोर काजवे चमकत असतील आणि डोळे उघडल्यावर त्यांत साचलेल्या पाण्याने धूसर केलेल्या प्रतिमा.
 
फर्र फर्र फर्र फर्र फर्र फर्र फर्र फर्र..
 
उत्तरपत्रिकांना भरारा पुरवण्या जोडल्या जात असतील..
 
त्याच्यासमोरच्या उत्तरपत्रिकेवर मात्र एखाद-दुस-या ऑब्जेक्टिव्ह उत्तराची साशंक नोंद..
 
सगळे दहावीचा किंवा बारावीचा पेपर सोडवत असतील..
 
..तो मात्र आत्महत्येचा पेपर समोर घेऊन बसला असेल.. तो किंवा ती.
 
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. आपल्याच माहितीतले, जवळच्या नात्यातले किंवा कदाचित कुटुंबातले कुणी विद्यार्थी ही परीक्षा देत असतील. यांच्यातले काही बोर्डात येणार आहेत. काही 95 टक्क्यांच्या वर गुण मिळवणारे भाग्यवान ठरणार आहेत. काही 90-95टक्के गुण मिळवूनही नॉट सो भाग्यवान ठरणार आहेत. काही डिस्टिंक्शनवाले, काही फर्स्ट क्लासवाले, काही सेकंड क्लासातले, काही पास- काही नापास आणि काही आत्महत्यावाले.
 
भयंकर धक्कादायक आणि क्रूर वाटेल, असं आत्ताच कुणी सांगणं पण यांच्यातलीच काही मुलं-मुली निकालानंतर किंवा खूपच कच खाल्ली असेल, तर परीक्षा झाल्यानंतरच खचून आत्महत्या करणार आहेत.. कुणी छताच्या पंख्याला लटकावून घेऊन, कुणी कसलंतरी विषारी औषध पिऊन, कुणी धावत्या ट्रेनसमोर स्वत:ला झोकून देऊन.
 
आत्महत्या करण्यासाठी नापासच व्हायला पाहिजे, असं काही बंधन नाही. 35 टक्क्यांच्या भोज्ज्यालाही न शिवू शकलेला कोणी मस्त मजेत शिक्षणाच्या आयचा घोम्हणून जगाच्या शाळेत नाव घालेल, कोणी ऑक्टोबरच्या तयारीला लागेल. त्याचवेळी 92.3 टक्क्याला हवी ती अ‍ॅडमिशन क्लोज झाली म्हणून 92.2 टक्के मिळालेला कोणी छताच्या गरगरणा-या पंख्याकडे अनिमिष नजरेने पाहात असेल.. वर्षभर अभ्यास बरा केला असेल, उजळणीही व्यवस्थित झाली असेल, पण, ऐन पेपरच्या वेळी केवळ प्रचंड ताण आल्याने काहीच आठवलं नाही, असेही एखाद्याचं झालं असेल. अभ्यासात अशीच ख्याती असलेला खात्रीने सुटेल, हुशारीचा बट्टा लागलेल्याची मात्र खर नाही, अशी उफराटी स्थिती.
 
कारणं नाना प्रकारची.
 
फलित मात्र एक.. आत्महत्या.
 
अपयश आणि अपेक्षा या दोन अपशब्दांचं हे अपत्य.. आत्महत्या.
 
जगात काहीही करायचं असेल, काहीही बनायचं असेल, तर एसएससी-एचएससी झालंच पाहिजे. ती गुरुकिल्ली काही बरं बनण्याची.. घरचं गडगंज नसेल तर. समुद्रासारख्या अथांग आणि आकाशासारख्या विशाल जगाची ही कवाडं मात्र चिंचोळय़ा बोळकांडींसारखी. मुलामुलींचे नाना स्वभाव, आयक्यू, ईक्यू, रुची, अभिरुची, कल, आवड, निवड.. पण, सगळ्यांनी पारंगत व्हायचं ते मात्र एकाच प्रकारच्या अभ्यासात. सगळ्यांना सगळं आलंच पाहिजे.. नाहीतर पुढच्या मोठय़ा माणसांच्या जगात तुमची डाळच शिजणार नाही, असा सगळा बागुलबुवा.. छातीवर मणामणांचं दडपण आणणारा.. श्वास गुदमरवणारा.. क्वचितप्रसंगी बंदही पाडणारा.
 किती दम आहे या बागुलबुवात?
काहीच नाही.
 
बोर्डात आलेल्या मुलांना नावं ठेवू नयेत. ती एका प्रकारची हुशार मुलं असतातच आणि आपापल्या क्षेत्रात यशही मिळवतात. पण, असामान्य कर्तबगारीने एखाद्या क्षेत्रात आयकॉन ठरलेल्यांपैकी कितीजणांनी एसएससी-एचएससीमध्ये भीमपराक्रम गाजवलेला असतो. आपल्या आसपासच्या सर्वच्या सर्व मान्यवरांची यादी आठवून पाहा.. यांच्यातल्या कितीजणांचे दहावी-बारावीचे गुण चमकदार वगैरे होते? काहींनी तर दहावी-बारावीची पायरीही चढली नसेल, काही तिच्यावरून घसरून पडले असतील.. तरीही ते पुढे गेलेच, मोठे झालेच..
 ज्याच्या अंगात काही असतं, तो नापास झाला, काठावर पास झाला तरी पुढे जातोच.. ज्याच्या अंगात काही नसतं, तो बोर्डात पहिला आला तरी मागेच राहतो.. हा जगाचा नियम आहे.. व्हेरी सिम्पल.
असं असताना आपण बाऊ कशाला करतो सगळ्याचा?
 
का मुलांवर टनावारी अपेक्षा लादतो?
 दहावी-बारावीतल्या यशापयशानं आयुष्य थांबत नाही, तसं ते आयुष्य पुढे ज्या त्यापेक्षा कैकपटींनी भीषण परीक्षा घेतं, त्यांच्यातल्या अपयशानंही थांबत नाही, हे आपण मुलांना का सांगत नाही?
आपल्याला काय वाटतं?
 
हे कळलं तर आपले दिवटेशिटय़ा मारत फिरतील आणि परीक्षेला फाट्यावर मारतील?
 
आपले पाल्य तसे दिवटे असतीलच, तर ते परीक्षा देऊन, यशस्वी होऊनही पुढे लावायचे ते दिवे लावतीलच. मग, आतापासूनच त्यांना धास्तावून आपण नेमकं काय मिळवतो?
 
बहुतेक मुलं इतकी बेजबाबदार नसतात. त्यांच्यापरीनं जीव तोडून तयारी करतात. अभ्यास करतात. आईबापांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्नही करतात. पण, कुठेतरी काहीतरी चुकू शकतं. आपलंही चुकतं, तर त्यांचं तर वयच आहे चुका करण्याचं. त्यांच्यावर डाफरताना एक हात त्यांच्या पाठीवर नको? की त्यांना एका चुकीसाठी सगळं आयुष्य संपवण्याची शिक्षा घ्यायला भाग पाडायचं?..
 
..ती शिक्षा त्यांना होत नाही, ते तर एका खटक्यात सुटतात..
 
..शिक्षा भोगावी लागते ती मागे राहिलेल्यांना..
 
आई-बापांना.. रोजच्या रोज.. 24 तास.. प्रत्येक मिनिट.. अगदी मरेपर्यंत..
 
आईबाप आहात की उलटय़ा काळजाचे राक्षस? तुमच्या अपेक्षांनी तुमच्या मुलांचा बळी घेतला? स्वत:च्या मुलांचे मारेकरी आहात तुम्ही..
 
..हे दर वर्षी घडत आलंय..
 
..या वर्षीही घडणार आहे..
 
..आत्ता जी मुलं दहावी-बारावीची परीक्षा देताहेत, त्यांच्यातली काही आत्महत्येचा पेपर सोडवताहेत..
 
..पण, ती आत्ता आपल्यात आहेत, आपल्याबरोबर आहेत..
 
..आत्ताच त्यांना जवळ घ्यायला हवं, त्यांच्या पाठीवरून मायेचा आश्वासक हात फिरवून सांगायला हवं, ‘बेटा, न घाबरता, न बिचकता बिनधास्त परीक्षा दे. तुझ्याकडून हंड्रेड परसेंट देण्याचा प्रयत्न कर. पुढे जे होईल ते होईल, त्याची फिकीर करू नकोस. काहीही झालं तरी आयुष्य संपत नाही. निकाल काहीही लागो, आम्ही आहोत तुझ्याबरोबर.
 
हे आत्ताच करायला हवं..
 
अगदी आत्ताच..
 
..या आत्महत्येच्या पेपरात सगळेच्या सगळे विद्यार्थी नापास झालेच पाहिजेत.

(7/3/10)

2 comments:

  1. hoy, he attach sangnyachi garaj aahe........shivay aajchya parikshet changlyanach gachka aani sumarana bachka hi padhathi aahe......tyamule he aatach sangnyachi garaj aahe.............

    ReplyDelete