Friday, February 11, 2011

कहानी ‘घर घर’ की!

रेडिओवर बातम्या सुरू आहेत.. नक्षलवाद्यांच्या उच्छादाच्या, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालल्याच्या.पेपरात हेडलायनी आहेत.. हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या. सत्ताधीशांनी देश विकून खाल्ल्याच्या.
महान राष्ट्र अशी ज्याच्या नावाची फोड होते, त्या आपल्या महान राज्याची थोरवी आता लयाला चालली आहे, हे पाहून आमचा जीव तळतळतो. महाराष्ट्राच्या अशा चौफेर ऱ्हासाचे काय बरे कारण असावे, या विचारांनी रात्र रात्र झोप येत नाही. अहोरात्र या विषयावर मनन-चिंतन-मंथन-कुंथन सुरू असताना एके दिवशी अचानक घरघर असा अस्फुट घोष ऐकू येऊ लागला. लोडशेडिंगच्या काळातील इन्व्हर्टरचलित पंख्याप्रमाणे घरघर घरघर असा एकच शब्द डोक्यात सतत घुमू लागला. सहसा चिंतनमग्न झाल्याक्षणी अस्मादिकांच्या कंठमण्यातून घरघरघुर्रघुर्र असा स्वर आपोआप उत्पन्न होऊ लागतो. याला अडाणीजन घोरणे असे म्हणतात. ही त्याच प्रकारची घरघर आहे, असे आप्तजन कुत्सितपणे म्हणाले. मात्र, अस्मादिकांच्या हे लक्षात आलेच की हा काहीतरी खास दृष्टांत आहे. अखेर एके दिवशी न्हाणीघरात असताना या घरघरीचा अर्थ उमगला. आम्ही युरेका युरेका असे ओरडत बाहेर आलो, तर अर्धागिनीला ते सुरेखा सुरेखा असे ऐकू गेले. दु:खद योगायोग म्हणजे हेच आमच्या तरुण कामवालीचेही नाव असल्याने नंतर जे काही घडले ते येथे सांगणे इष्ट नाही. असो.
 संशोधनयज्ञातून ज्ञानाचा प्रसाद लाभण्यासाठी किती चिकाटी, कष्ट, यातना, अवहेलना यांची आहुती द्यावी लागते, याची कल्पना येण्यासाठीच हा व्यक्तिगत प्रसंगांचा उल्लेख होता. त्या दिवशी न्हाणीघरात झालेला उलगडा असा की डोक्यातील अखंड घरघरचा घर घर म्हणजे घर असा आहे, महाराष्ट्राला घरघर का लागली आहे हे शोधण्यासाठी घर घर भटकले पाहिजे, हे आम्ही ओळखले. कपालभातिभस्मेश्वर महाराजांच्या अनुग्रहाने लाभलेल्या सिद्धीचा वापर करून सूक्ष्मदेह धारण केला आणि काही घरांचे गुप्तपणे निरीक्षण केले. त्या तपासाचा हा वृत्तांत. 
  • घर क्र. एक
आजोबा दाढी कुरवाळत बसलेले होते. मुलगा कुंडीतल्या झाडांचे, पानांचे, चिमण्यांचे, कावळय़ांचे फोटो काढत होता. तेवढय़ात, पोरसवदा नातू धावत आला. त्याच्या हातात पेटलेली चूड.
 ‘‘अरे अरे, माझा कॅमेरा तोडशील. सांभाळ, सांभाळ,’’ वडील ओरडले. नातू त्याकडे दुर्लक्ष करून आजोबांकडे गेला. त्याचा दोष नाही. आजपर्यंत त्याच्या माहितीतील प्रत्येकजण त्याच्या वडिलांकडे दुर्लक्ष करून आजोबांकडेच जातो, हे त्याने पाहिलेले आहे. ‘‘आजोबा, आजोबा, मी आत्ताच एक पुस्तक जाळलं.’’
‘‘वा, वा, शाब्बास,’’ आजोबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्याला उचलून घेतलं, ‘‘आता काय माझी दाढी जाळायला आलायस? लांब धर ती चूड..’’ आजोबांना विनोद करायची फार सवय. त्या नादात गंभीर बोलणं ते साफ विसरूनच गेलेत. फारसा फरक पडत नाही म्हणा. ते गंभीरपणे बोलले, तरी लोकांना ते विनोदीच वाटतं.
‘‘पाहिलंस का रे, फोटोग्राफरा. या एवढय़ाशा पोरानं काय कमाल केली ते. नाहीतर तू.’’वडिलांनी पाय आपटले आणि ते चिडून म्हणाले, ‘‘बाबा, हे तुमचं नेहमीचंच आहे. आधी तुम्हाला त्या राजाचं कौतुक होतं, आता माझ्या मुलांचं. माझी तुम्ही कायम हेटाईच करता.’’
‘‘नाहीतर काय करू? तू नेहमी दुस-यांचे फोटो काढायला जातोस आणि स्वत:च्या डोळय़ांवर फ्लॅश मारून घेतोस. पुढे तीन दिवस घरात चाचपडत फिरतोस.’’आजोबांनी नातवाला प्रेमभराने जवळ घेतले आणि कफनीतून छोटीशी तलवार काढून त्याच्या हातात दिली, हे घे तुझं बक्षीस. नातवानं तलवार उंचावली, ती आजोबांनाच लागली. ‘‘अरे, अरे, सांभाळून.. मी दिलेली तलवार माझ्यावरच चालवतोयस. काकावर गेलायस की काय? असा वागशील, तर पाळण्यात तुझा भाऊ झोपलाय ना, त्याच्या हातात देईन हा तलवार.’’
‘‘द्या, द्या, मग मी त्याच्याशीच युद्ध युद्ध खेळीन,’’ नातू नाखूष व्हायच्याऐवजी खूष होऊन तलवार नाचवत चित्कारला. आजोबा आणि बाबांनी कपाळावर हात मारून घेतला. आजोबा म्हणाले, ‘‘आपल्या घराण्यावरच गेलाय पोरगा. भाऊ भाऊच भांडत बसणार कायम?’’  
  • घर क्र. दोन
प्रचंड मोठय़ा आवारात प्रचंड मोठं घर, पण आत माणूसच नाही. घरभर पोलिसच पोलिस. त्यांच्या गराडय़ात दिसेल ना दिसेल असा लहानखुरा माणूस कपाळाला हात लावून बसलेला दिसतो. हे कथानायक आबा. साध्या वेषातला एक माणूस आबांपाशी आला आणि आबा दचकून जागे झाले आणि पिसाटून ओरडले,  
‘‘पोलिस, पोलिस, लवकर या. लवकर या. अरे शंभर नंबर फिरवा, माझी शिट्टी कुठाय.’’ एक पोलिस अधिकारी पुढे झाला आणि सॅल्यूट ठोकून म्हणाला,  
‘‘साहेब, शांत व्हा. आम्ही सगळे इथेच आहोत. घाबरण्याची काहीच गरज नाही.’’
‘‘तुम्ही सगळे माझ्याजवळ असण्याचीच मला हल्ली भीती वाटू लागलीये. तुम्ही असतानाही गुन्हेगार माझ्याशेजारी येऊन बसतात आणि लोक हसतात, मिडिया बोंब मारतो. इतकी वर्ष चेह-यावर गरीब, भाबडे भाव ठेवून, अतिशय गांभीर्यपूर्वक बोलण्याची केलेली प्रॅक्टिस एका दिवसात बाराच्या भावात जाते. माझ्या सत्शील इमेजची माती होते. आत्ताही बघा, तुम्ही सगळे असताना हा गुंड माझ्याजवळ आलाच ना!’’ आबांनी टुणकन खुर्चीत उडीच मारली.
 ‘‘साहेब, घाबरू नका. हा आपलाच माणूस आहे.’’
‘‘अरे, ते मला ठाऊक आहे, पण, असल्या आपल्या माणसांना माझ्याजवळ फिरकू देऊ नका. जे काही असेल, ते परस्पर मिटवून टाकत जा.’’
‘‘अहो, साहेब, तसं नाही. हा डिपार्टमेंटचाच माणूस आहे.. स्पेशलवाला.’’
‘‘हां, मग ठीक आहे. काय रिपोर्ट?’’ मघा मेणाहुनि मऊ झालेले आबा आता वज्राहुनि कठोर आवाज लावून विचारते झाले.
‘‘साहेब, रिपोर्ट जरा वाईट आहे. तुम्ही डायलॉगबाजी जरा जपून करा.’’
 ‘‘अरे, काय माणूस आहे हा! माझ्या बोलण्याला माझ्याच तोंडावर डायलॉगबाजी म्हणतोय हा.’’
‘‘साहेब, स्पष्टपणे सांगितलं नाही, तर आपणच चिडाल. बदनामी करणाऱ्याला बघून घेईन, माझं डिपार्टमेंट त्याला सोडणार नाही, ही भाषा आपल्या इमेजला शोभणारी नाही. आपलं डिपार्टमेंट आपल्या व्यक्तिगत कामांसाठी राबवणारे तुम्ही नाही आहात, अशी समजूत आहे लोकांची.’’‘‘गैरसमजूत आहे ती.’’‘‘तेही लोकांना कळूनच चुकलंय म्हणा. पण, भावनेच्या भरात तुम्ही बोलून गेलात की बदनामी करणाऱ्यांचे कपडे उतरवेन.’’‘‘मग, खोटं बोललो की काय मी. खरंच तसं करून दाखवीन.’’‘‘आपले विरोधकही त्याचीच वाट पाहतायत. मिडियाही कॅमेरे घेऊन  सज्ज आहे.’’‘‘अरे, मग वाईट काय? माझी करारी इमेज एस्टॅब्लिश करण्याची हीच सुसंधी आहे.’’‘‘नाही साहेब. तुम्हाला पुरतं मातीत घालण्यासाठी यावेळी तुमची बदनामी करण्याची सुपारी विरोधकांनी काही बारबालांना दिली आहे!!!’’ 
  • घर क्र. तीन
. दोनपेक्षा मोठा बंगला. साहेब एक पेपर वाचताहेत आणि पुटपुटताहेत..
‘‘शी शी शी शी! फार घाण! गलिच्छ!’’
 ‘‘साहेब, आपण उगाच तो पेपर वाचताय. त्यात त्यांच्याच साहेबांची भाषणं छापून येतात. ती अशीच असतात. नुसती शिवीगाळ आणि कमरेखालची भाषा. बीभत्स, उथळ शेरेबाजी. कशाला वाचून सकाळ खराब करताय?’’ शेजारी अटेन्शनमध्ये उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
‘‘अरे बाबा, त्या साहेबांचं भाषण नाही वाचत आहे मी. त्या घाणेरडय़ा पुस्तकातला घाणेरडा उतारा वाचतोय. काय भयंकर भाषा आहे..’’
‘‘पेपरात पुस्तक वाचताय.. म्हणजे?’’
‘‘अरे, संपूर्ण पुस्तक वाचायला वेळ कुणाला आहे? इथे यांनी एक उतारा ट्रान्स्लेट करून दिलाय. तो पाहतोय. भयंकर. या पुस्तकावर बंदीच घातली पाहिजे.’’
‘‘आँ’’ असे उद्गारून अधिकारी स्वत:च्या तोंडावर पाणी मारून घेतो.
‘‘पण साहेब, ही मागणी तर आपल्या विरोधकांनी केली होती. तीच आपण करायची.’’
‘‘त्यांची कारणं वेगळी असतील. आपली वेगळी आहेत. आपण फक्त व्यक्तिगत मत व्यक्त करतोय.’’
‘‘कमाल झाली साहेब. अहो, तिकडेही लोक पुस्तक न वाचता बंदीची मागणी करताहेत. इकडे तुम्हीही पुस्तक न वाचता अर्धवट उतारे वाचून तीच मागणी
करताय. त्यांची मागणी त्यांना शोभते. तो पक्षच तसा आहे. आपला पक्ष तसा नाही. आपण अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करतो.’’
‘‘मग, मी काय करतोय? मीही विरोधकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करतोय आणि स्वत:च्या विचाराची अभिव्यक्ती करतोय.’’
‘‘अशाने शत्रूचा फायदा होईल.’’
‘‘कोण शत्रू? अरे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र.’’अधिकारी बुचकळय़ात.
 
‘‘नाही कळलं? मग, एक आध्यात्मिक सुविचार सांगतो. शत्रू बाहेर शोधू नका, खरा शत्रू आतच असतो. कळलं?’’आता अधिकारी गालातल्या गालात हसू लागला आणि साहेब पुन्हा गलिच्छ मजकूर मन लावून वाचू लागले.  
  • घर क्र. चार
रेडिओवर बातम्या सुरू आहेत.. नक्षलवाद्यांच्या उच्छादाच्या, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालल्याच्या.पेपरात हेडलायनी आहेत.. हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या. सत्ताधीशांनी देश विकून खाल्ल्याच्या.टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज आहेत.. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे लचके तुटत असल्याच्या. ऊन्ह-पाऊस-थंडीचं सगळं चक्र विस्कटून गेल्याच्या..
आणि घरात चार माणसं झोपलेली आहेत..
 
मुलाच्या मनात स्वप्न.. स्वप्नात समोरची गोरीचिट्टी छावी.
 
मुलीच्या मनात स्वप्न.. स्वप्नात रास दांडियाची ढम ढम.
 आईच्या मनात स्वप्न.. स्वप्नात दुपारच्या सिरीयलचा 13 हजार 270 वा भाग.
बापाच्या मनात स्वप्न.. स्वप्नात घर घर.
 अरेच्चा, हे तर आपलंच घर!

(28/10/10)

No comments:

Post a Comment