सतत कुणाचे ना कुणाचे पुतळे उभारतो.
इतके पुतळे उभारतो की या देशाला कालांतराने 'पुतळयांच्या देशा' म्हणावे लागेल, लोकसंख्येबरोबर एखाद्या गावाची पुतळेसंख्याही मोजावी लागेल.
का उभारतो आपण एवढे पुतळे?
महापुरुषांची स्मारकं म्हणून. त्यांच्याकडून फार प्रेरणा मिळते म्हणे त्यांचे पुतळे पाहून!
इतका सोपा उपाय पाश्चात्त्य देशांना आजतागायत सुचला नाही पाहा. त्यांची तर घरटी एक पुतळा उभारण्याची ऐपत आहे. पण, जगतायत बिचारे प्रेरणाहीन आयुष्य.
आता पुतळयाकडून प्रेरणा घ्यायला तुम्ही शेवटचे कधी गेला होतात, ते आठवा. शेवटचा कोणता पुतळा किती काळ निरखून पाहिलात, त्यात काय पाहिलंत ते आठवा.
अरेच्च्या! आठवतच नाही!
आपल्याकडे पुतळे उभारण्याची मोठी परंपरा आहे, ते 'पाहण्या'ची नाही.
पुतळा हा प्रेरणादायी असतो, तो स्मारक असतो, हे सगळे त्याचे 'उपयोग' झाले. तेही आपण किती करतो, हा प्रश्च आहे.
मुळात पुतळा हे शिल्प असतं, हे आपल्या कधी लक्षात येतं का? त्यात तो महापुरुषाचा पुतळा असेल, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं सगळं सार त्या एका पुतळयात आणण्याचा शिल्पकाराचा प्रयत्न असतो. एखाद्या अश्वारूढ वीरपुरुषाचा फरफरता अंगरखा, उंचावलेली तलवार, स्फुरलेले बाहू, चेहऱ्यावरचा जोशपूर्ण भाव आणि घोडयाची झेप यांच्यातून समग्रतेने त्या वीराचे व्यक्तिमत्त्व आकळून घ्यायचं असतं. कुणा समाजोध्दारकाच्या हातातले साधे जाडजूड ग्रंथराजही 'शिक्षणाविना खरंतर ज्ञानाविना तरणोपाय नाही' असा संदेश वंचित समाजाला देत असतात. एखाद्या महात्म्याच्या चालीमधला वेग स्थिर पुतळयातही पकडण्याची शिल्पकाराची किमया विस्मयचकित करते.
एखाद्या दगडामध्ये, मातीमध्ये, धातूमध्ये एक व्यक्तिमत्त्व साकारणं, हे खाऊचं काम नसतं. त्यासाठी त्या कलेची तपस्या लागते. पुतळयाची रेष न् रेष बोलकी होते तेव्हा ती तपस्या सार्थ होते.
पण, पुतळयाचं हे बोलणं आपण 'ऐकतो' का?
एखादा अप्रतिम पुतळा स्मारकस्थळी उभा आहे आणि शेकडो लोक त्याच्या अवतीभवती उभे राहून त्या पुतळयाचं सौंदर्य निरखताहेत, त्यावर एकमेकांशी बोलताहेत. आपल्याला सापडलेल्या 'जागा' एकमेकांना दाखवताहेत, असं चित्र कधीच कुठे का दिसत नाही?
पुतळयांचा वापर आपण फक्त वर्षातून दोन पाच वेळा हार घालण्यासाठी करतो... अनुयायी फुलांचा घालतात, विरोधक चपलांचा.
...
...
फार वाईट वाटून घेऊ नका पुतळयांनो,
आम्ही फक्त तुमच्याशीच असं वर्तन नाही करत, महापुरुषांशी तरी आम्ही कुठे वेगळे वागतो?
(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)
agadi barobar......
ReplyDeleteShaharaatalee sulabh shauchaalaye krupayaa nasht karoo nakaa.
ReplyDeleteItee
Shahar Kaak Sanghatanaa.
Khoop nirakhoon pahilyaavar Shivaji Mahaaraaj ghodeewar swaar aahet evadhech samajate.
Delete