Tuesday, February 15, 2011

धाडस

 रोंऽऽ रोंऽऽ रोंऽऽ रोंऽऽऽऽ...
दोन डोंगरांच्या मधोमध आडव्यातिडव्या पहुडलेल्या विशालकाय खडकांवरून धबाधबा कोसळत वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा अनाहत नाद. या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी पाण्यापासून 4050 फुटांवर बांधलेला स्टील वायर ब्रिज. म्हणजे बांधकामातल्या सळयांचा वायरीसारखा उपयोग करून बांधलेला खरंतर 'टांगलेला' पूल. त्याच्या सळयांमधून खालचे कपाळमोक्षोत्सुक पाषाण दिसत असतात. थरकापत्या जिवाचा करार करून पहिलं पाऊल ब्रिजच्या चारसहा सळयांवर पडतं, झुलता पूल पायाखाली सापासारखा थरथरतो, तेव्हा ब्रह्मांड आठवतं...
...आपला पाय सळयांमधून खाली जाईल का? पुलाला हेलकावा बसून आपण डावीउजवीकडे पडलो, तर कडेच्या तारांमधून खाली पडू का? पुलाच्या मध्यावर प्रचंड हेलकावे बसतात, तिथे पूल पीळ बसून उलटा झाला तर?...
...एक ना दोन, नाना (बालिश) शंका भेडसावत असतात. हवेत चालत असल्यासारखे आपण ब्रिजच्या मध्यावर येतो. अचानक पूल गदागदा हलायला लागतो. भीतीने गाळण उडते. मागून दोन स्थानिक आदिवासी अनेक पिशव्या सांभाळत टिळक ब्रिजवरून चालल्यासारखे सहजपणे येतात आणि सहजगत्या ओलांडून पुढे निघून जातात... पुलावर झुलता झुलता मनात विचार येतो, ''काय धाडस आहे यांचं!''...
...समुद्रसपाटी सोडून उंच पहाडांत, थेट हिमालयात गेल्यावर जागोजागी हेच उद्गार मनात उमटत राहतात.
...आपल्याकडचे घाट हे ज्यांच्यापुढे 'एक्स्प्रेस वे' वाटावेत, असे अरुंद, एकमार्गी रस्ते. दरी आणि चाक यांच्यात जेमतेम सहा इंचाचं अंतर असा प्रवास इथले जिगरबाज ड्रायव्हर रोज करत असतात. खडी चढाई तुफान वेगाने चढत असतात किंवा गहिऱ्या खाईत उतरत असतात, त्यातच 'मौसम' तुटू न देता समोरच्या वाहनाला सराईतपणे जागा देत असतात...
...थंडगार पाण्यात टाकलेलं पाऊल शेवाळलेल्या दगडांवरून घसरत असतं. कसलाच अदमास येत नसल्यानं हडबडलेली अवस्था असते. समोरच्या खडकावर मात्र एक पोरगेलीशी माऊली आपल्या नकटया पोराला पाठुंगळी बांधते आणि चक्क स्लीपर्स चढवून सरळ त्याच पाण्यात पाय टाकते आणि चुटुकचुटुक स्लीपर्स वाजवत निघूनही जाते...
...सप्तपाताळात उतरल्यासारख्या खोल खोल दगडी पायऱ्या... जगातला सर्वाधिक पाऊस ज्या भागात पडतो, अशा प्रदेशातल्या. अरुंद आणि शेवाळलेल्या. समुद्रसपाटीवरचे अनेकजण इथे भयकारी पध्दतीने भुईसपाट झालेले पाहिल्याने बचावलेले घाबरलेत. काठीच्या आधाराने दबकत दबत पावलं टाकत उतरताहेत. मागून एकदम गलका येतो. स्थानिक लग्नाला निघालेले वऱ्हाडी आहेत ते. बायकामुलंबाप्येम्हातारेम्हाताऱ्या. सगळयांच्या पायात स्लीपर्स. कुणाच्या पाठुंगळी ओझी. झपाझप उतरणाऱ्या त्यांच्या पावलांकडे थक्क होऊन पाहात राहतात समुद्रसपाटीवाले...
...अशीच गत होते दरीकडेला शांत बसलेली किंवा हुंदडणारी चिल्लीपिल्ली पाहून. आपल्याकडे पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतून पोर जरा जास्त डोकावलं, तर धाकधूक होते आईबापांच्या जिवाची. इथे मुलं 'दरीकिनारी गं, दरीकिनारी गं' अशी बागडत असतात...
..............
जाऊ द्या हो समुद्रसपाटीवाले. नका वाईट वाटून घेऊ.
पहाडातला कुणी जेव्हा आपल्या समुद्रसपाटीवर येतो, तेव्हा आपलं धाडस पाहून तोही असाच आश्चर्यचकित होतो.
कसलं धाडस?
खच्चून भरलेल्या लोकलमध्ये उडी टाकण्याचं धाडस, घुसमटलेल्या डब्यात दोन पायांवर सरळ उभं राहण्याचं धाडस, झोकून देऊन लोकलमधून उतरण्याचं धाडस, फेरीवाल्यांनी भरलेल्या फुटपाथवरून चालण्याचं धाडस, आडव्यातिडव्या वाहतुकीतून गाडी चालवण्याचं धाडस, आडव्यातिडव्या येणाऱ्या गाडयांतून रस्ता ओलांडण्याचं धाडस...
...चिंबलेल्या अंगांगाने रोज रात्री झोपल्यानंतर रोज सकाळी जागं होण्याचं धाडस...
या हवेत रोज श्वास घेण्याचं धाडस!

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment