Sunday, May 29, 2011

मराठी टक्के-टोणपे आणि टोणगे!

हल्ली कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की लगेच आपल्याकडे त्या परीक्षेत मराठी टक्काकिती वाढला, किती घटला, याच्या चर्चा सुरू होतात.. तो वाढलेला दिसला की आपल्याला आभाळाला हात टेकल्याचा आनंद होतो आणि घटल्याचं समजलं, तर हळहळ वाटते..
 
हा मराठी टक्का नावाचा प्रकारही अजब आहे.. महाराष्ट्रात तीन पिढय़ा राहिलेला, संस्कारांनीही मराठीझालेला, घरातसुद्धा अस्खलित मराठी बोलणारा कुणी गांधी, नायर किंवा सिंग असल्या बिनडोक खानेसुमारीत अमराठीठरतो आणि इंग्रजी-हिंदीच्या भेसळीशिवाय मराठीची दोन वाक्यंही धड बोलू न शकणारे, महाराष्ट्राशी कोणतीही नाळ शिल्लक नसणारे फक्त आडनावाचे मराठीहेच आपल्या लेखी अस्सल मराठी असतात..
 असो. मूळ मुद्दा तो नाही. ही परीक्षा यूपीएससीसारखी सनदी परीक्षा किंवा (आयआयटी/ आयआयएमला प्रवेश मिळवून देणारी) जेईईसारखी नगदीपरीक्षा असली, तर आपल्या मराठी यशाच्या किंकाळ्या आणखी कर्णभेदक होतात. हे यश मिळवणा-या मंडळींची मेहनत आणि त्यांची बुद्धिमत्ता यांचा उपमर्द करण्याचा अजिबात हेतू नाही. ते सगळे स्कॉलरच असतात, यात शंका नाही. काही जण तर अतिशय विपरित परिस्थितीत शिक्षण घेऊन ही झेप घेतात, हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत करीअरच्या पातळीवर कौतुकास्पदच आहे.
मग प्रॉब्लेम काय आहे?
 प्रॉब्लेम असा आहे की आपण या यशाकडे आणि यशवंतांकडे फारच भाबडेपणाने पाहतो आणि त्यांचं तेवढय़ाच मठ्ठपणे कौतुक करतो.
यात आयआयटी किंवा आयआयएमसारख्या संस्थांमध्ये शिरकाव करून घेतलेल्या मुलांच्या बाबतीत कौतुकाची दिशा निदान सरळ असते. ही मुलं आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर एकतर परदेशांत जाऊन तिथे झकास करीअर करत सेटल होणार किंवा देशातल्या बडय़ा कंपन्यांमध्ये बडय़ा पदांवर जाऊन गलेलठ्ठ पगार कमावणार, सर्व सुखांच्या राशी त्यांच्या पायांवर लोळण घेणार. हे सगळं म्हणजेच आयुष्यातलं परमोच्च सुख, असं मानणा-यांना या यशाचं खूप कौतुक असणं स्वाभाविक आहे.
 
पण, यूपीएससी-एमपीएससीसारख्या परीक्षांना त्या तागडीमध्ये तोलता येणार नाहीत. त्या परीक्षांमधून अधिकारी तयार होतात, ज्यांच्या हातात या देशाच्या कारभाराच्या सगळ्या नाडय़ा असतात आणि त्या नाडय़ांच्या दुस-या टोकांशी आपण असतो.. यानेकी सामान्य जनता..
 
..मग या परीक्षांमध्ये पास होणा-यांत मराठी टक्का वाढला, याचा किंवा गरिबीतून वर आलेली मुलंसुद्धा पास झाली, याचा आनंद नेमका कशासाठी करायचा?
 
आता ही आपलीमुलंही आयएएस, आयपीएस होतील आणि देशाच्या प्रशासनात नाव काढतील, म्हणून.
 
करेक्ट.
 
पण, नाव काढतील, म्हणजे काय?
 ती पुढे लाल दिव्याच्या भोंगावाल्या गाडीतून ऐटीत फिरतील, दृश्य-अदृश्य पट्टेवाल्यांचे सलाम झेलतील, सटासट आदेश सोडतील, भरपूर मलिदा कमावून पुढच्या सात पिढय़ांची सोय करतील, शहरातल्या प्राइम जागेवर त्यांची आदर्श सोसायटी असेल आणि तिच्यात हवेशीर प्रशस्त फ्लॅटमध्ये राहतील, सेवेच्या अखेरीस ते एखाद्या बडय़ा कंपनीत सल्लागार म्हणून जातील आणि सत्तर पिढय़ांची सोय करतील.. हेच होणार असेल, तर त्याबद्दल फारतरफार त्यांच्या कुटुंबियांना-इष्टमित्रांना आनंद व्हायला हवा आणि त्यांच्या भावी पिढय़ांनी कृतज्ञ राहावं..
एक समाज म्हणून आपण ते का सेलिब्रेट करतोय?
 
हेच सगळं करणारे सनदी अधिकारी आपल्या आसपास नाहीत का?
 
ते मराठी आहेत की अमराठी यानं आपल्या समाजजीवनात काय फरक पडला?
 
प्रशासन लोकाभिमुख करण्यात, सरकारी यंत्रणा सहृदय आणि कृतिशील बनवण्यात, भारतीय प्रशासनिक सेवा या नावातील सेवानावाचा भाग सार्थ करण्यात त्यांनी काही भूमिका बजावली का? आज यूपीएससी पास झालेली मुलंही पुढे जाऊन हे सगळं करणार आहेत का? तसं असेल, तरच त्यांच्या यशाचे डांगोरे पिटण्यात काही हशील.
 
मुळात ब्रिटिशांनी त्यांच्या पद्धतीने राज्यकारभार हाकणारे बुद्धिमान होयबा तयार करण्यासाठी या सेवांची रचना केली आहे. ती परतंत्र देश चालवण्यासाठी इतकी आदर्श होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नागरिक परतंत्रच राहतील, अशी व्यवस्था या सेवांनी आजतागायत करून ठेवलेली आहे. असले बाबूलोक त्यांच्यासारख्याच लोकप्रतिनिधींशी संगनमत साधून काय काय कारनामे करून ठेवतात, याचे जाहीर वाभाडे रोज निघत असतात. प्रशासनिक सेवांचा सगळा ढाचा बदलून ज्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना त्या त्या क्षेत्राचा प्रशासनिक कारभार हाकू द्यावा, अशी मागणी होत असते, ती यामुळेच.
 
इतक्या गुंतागुंतीच्या, व्यामिश्र समाजरचनेचा अवाढव्य देश चालवण्यासाठी घेतल्या जाणा-या परीक्षांमध्ये स्वतंत्र विचारक्षमतेला वाव असतं का, प्रयोगांना चालना देणारं काही असतं का की फक्त घोकंपट्टीला महत्त्व असतं? जिथे काम देश चालवण्याचं असतं तिथे बुद्धिमत्तेला, प्रज्ञेला, कृतिशीलतेला सचोटीची आणि व्यक्तिगत लाभाला फाटा देऊन देशहिताला प्राधान्य देणा-या प्रखर सामाजिक चारित्र्याची जोड असली पाहिजे. यूपीएससी परीक्षेत हमखास यशाची गॅरंटी देणारे किती क्लास ही शिकवणसुद्धा देतात? गरीब घरांतून शिकून मोठं झालेल्या विद्यार्थ्यांना तर देशाच्या दुर्लक्षित तळघरांमध्ये केवढं दैन्य, केवढय़ा यातना, केवढय़ा वंचना आणि विवंचना दडपलेल्या आहेत, याचं फर्स्ट हँड ज्ञान असतं; त्या काळकोठडीच्या शिसारीतूनच अनेकांनी उच्चतम यश मिळवून प्रशासनात शिरण्याची प्रतिज्ञा केलेली असते. अशी, देश बदलण्याच्या ध्येयवादाने झपाटलेली मुलेही या परीक्षांमध्ये यशस्वी होऊन जेव्हा प्रत्यक्ष देशकार्यात समाविष्ट होतात, तेव्हा तीच बदलतात आणि देश तसाच राहतो, हाच अनुभव जास्त येतो.
 
हे असं का घडतं?
 
हे असंच घडणार असेल, तर आपण साजरा करतो तो आनंद कशाचा?..
 
..निदान भविष्यात तरी आपल्याला लुबाडणारा टोणगा मराठी असणार, याचा?
(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, २९ मे, २०११)

Monday, May 23, 2011

लोकशाहीच्या विजयाच्या टेपा

कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागला की आपल्याकडे ज्याला त्याला लोकशाहीच्या सामर्थ्यांचे कढ येऊ लागतात..
 ..त्यात अशा निवडणुकीत प्रस्थापितांचा पराभव करून विरोधक जिंकले तर विचारूच नका. मग तर भारतीय मतदार कसे सुज्ञ आहेत, ते सत्तेने मदमस्त झालेल्यांना कसा धडा शिकवतात, वगैरे हुकमी पोपटपंची सगळ्याच्या सगळ्या माध्यमांमधून दिवसरात्र सुरू होते.. लिहिणारे तावच्या ताव खरडतात आणि बोलणारे तावातावाने ओरडतात, सगळय़ाचा मथितार्थ एकच असतो- लोकांनी बदलाच्या बाजूने कौल दिलाय, पब्लिकला चेंज हवाय, सगळीकडे बदलाचे वारे वाहताहेत..
अरेच्च्या! पण गेल्या वेळी हेच विरोधक सत्तेत होते, त्यांना मतदारांनी घरी पाठवलं होतं, तेव्हाही याच टेपा लागल्या होत्या. पुढच्या वेळी आताचे सत्ताधारी घरी बसले, तर तेव्हाही याच रेकॉर्डी वाजणार आहेत.. म्हणजे मग खरं काय?
 
तामिळनाडूचंच उदाहरण घ्या.
 
तिथल्या जनतेने द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे दोन जातिवंत वळू तहहयात पोसायला घेतलेले आहेत की काय, असं चित्र आहे. हे दोन्ही पक्ष तिथे आलटून पालटून सत्तेत येत असतात. दोन्ही पक्ष सारखेच भंपक. दोन्हीकडचं नेतृत्त्व सारखंच भ्रष्ट. दोघांच्याही राज्यकारभाराच्या कल्पना तद्दन फिल्मी आणि चीप. करुणानिधी सत्तेत असतील, तेव्हा त्यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या चघळल्या जातात. त्यावर जयललिता आवाजबिवाज उठवतात. जयललिता सत्तेत असतात, तेव्हा त्यांच्या ‘राणीशाही’ राहणीच्या कहाण्यांची चर्चा होते. त्याची करुणाकाका यथेच्छ टिंगलटवाळी करतात. दोन्ही पक्ष आणि त्यांचं राजकारण एवढं उद्वेगजनक आहे की मतदार खरोखरच सुज्ञ असते, तर त्यांनी या दोन्ही पक्षांना कायमचं घरी बसवलं असतं आणि आपला प्रदेश कायमस्वरूपी केंद्रशासित करून घेतला असता (याचा अर्थ केंद्रशासित असणं फार सुखाचं आहे, असा नाही- दगडापेक्षा वीट मऊ)..
 
पण, प्रत्यक्षात काय घडतं? या राज्यात हेच दोन पक्ष एकाआड एक निवडून येत राहतात. मतदार त्यांना जेव्हा ‘नाकारतात’, तेव्हा नेसूचं फेडून हातात देतात. जेव्हा ‘स्वीकारतात’ तेव्हा देऊळच बांधून मोकळे होतात. प्रत्येक पराभव प्रचंड, प्रत्येक विजयही प्रचंडच. बरं, यातला कोणताही पक्ष पराभवापासून काही बोध वगैरे घेतो, असंही नाही. लोकांनी जयललिता यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांना हटवलं होतं म्हणावं, तर पराभवानंतर त्यांच्या राहणीमानात आणि कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला नसताना पाच वर्षानी त्या पुन्हा भरघोस मतांनी निवडून येतातच.. पुढच्या खेपेला द्रमुकचा विजयही असाच दणदणीत असणार, ही काळय़ा दगडावरची रेघ. मग मतदार त्यांना सुज्ञपणे धडा शिकवतात म्हणजे काय?
 
लोकांना बदल हवा असतो म्हणजे काय?
 
लोक मतपेटीतून व्यक्त होतात म्हणजे काय?
 
तिकडे कोलकात्यात वेगळीच कथा. तिकडचा ‘लाल गड’ साफ झाला म्हणून इकडच्या कम्युनिस्टद्वेष्टय़ांना किती आनंद. माध्यमांमधल्या तथाकथित बुद्धिवाद्यांचीही गंमतच असते- कोणतीही ठोस विचारधारा नसलेल्या, कशाचाही सखोल अभ्यास नसलेल्या, संकुचित अस्मिता कुरवाळणा-या आणि भावनिक अवगाहनाचं सवंग राजकारण करणा-या टीआरपीखेचक कुपमंडुकांमध्ये त्यांना सम्राट वगैरे दिसतात आणि ज्यांच्या राजवटीमध्ये, राजकारणामध्ये काही विचार असतो, धोरण असते आणि ज्यांची व्यक्तिगत सचोटी बहुश: वादातीत असते, अशांच्या पोथीनिष्ठेबद्दल किती झोडाझोडी? जणू इतरांकडे पोथ्याच नाहीत आणि सर्वपक्षीय किळसावाण्या व्यक्तिस्तोमाचं काय?
 बंगालच्या जनतेने डाव्यांना नाकारताना आत्यंतिक आक्रस्ताळ्या ममताबाईंना डोक्यावर घेतलंय, याचा अर्थ त्यांचा कोणत्या ‘बदला’च्या दिशेने कौल दिलाय?
डावे त्यांची पोथीनिष्ठा बाजूला ठेवून राज्यात भांडवली गुंतवणूक आणत होते. बंगालचं सुशेगात कल्चर बदलून तिथल्या भद्रलोकांना थोडं कामाला लागावं लागलं असतं. त्याच वेळी ममताबाईंनी मात्र सिंगूरमधून नॅनो प्रकल्पाला पळवून लावलं. या नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली आहे. म्हणजे डाव्यांनी आर्थिक सुधारणा रेटल्या म्हणून त्यांचा पराभव झाला असेल, तर ममताबाईंच्या विजयातून बंगाल पुढे चाललाय की मागे?
 मग एकदाचे डावे पराभूत झाले ना, कुणीतरी तोंडावर आपटलं ना, कोणाचं तरी रक्त निघालं ना, मग झालं, म्हणून नुसत्या टाळ्या पिटण्यात पॉइंट काय?
मुळात बहुमताची लोकशाही हा काही राज्यशकट हाकण्याचा परिपूर्ण आणि सवरेत्तम मार्ग नाही- तो उपलब्ध पर्यायांपैकी सर्वात बरा पर्याय आहे, इतकंच. आर्थिक बळाशिवाय निवडणूक लढवणं अशक्य, भ्रष्ट मार्ग अवलंबल्याशिवाय आर्थिक बळ अशक्य आणि जातीपाती-धर्म-धाकदपटशा-अस्मिता यांच्या सवंग राजकारणाचा चिखल तुडवण्याची सक्ती- अशा भयंकर घेऱ्यात ही लोकशाही पद्धतशीरपणे अडकवण्यात आलेली आहे. अशी लंगडी लोकशाही किती श्रेष्ठ आहे आणि त्यातून भारतीय समाज काय थोर सुज्ञता दर्शवतोय, याचे ढोल सत्ताधारी वर्गाने (यात विरोधकही आले- कारण तेही सत्तेचे लाभार्थी असतातच) पिटत राहणं ठीक आहे, पण, त्यांच्यावर नजर ठेवण्याचं अंगभूत काम करणाऱ्या माध्यमांचं काय? तेही ही अफूची गोळी बिनदिक्कत कशी काय चढवतात?
 
निवडणुकांमध्ये एकूण मतदारांच्या किती टक्के लोकांनी मतदान केलं?
 
ज्यांनी केलं नाही, त्यांनी का नाही केलं?
 
त्यांनी मतदान टाळून बजावलेल्या ‘नकाराधिकारा’चं मतांच्या लोकशाहीत काहीच वजन कसं नसतं?
 
जे मतदानाचं ‘पवित्र कर्तव्य’ नेमाने पार पाडायला जातात, ते नेमके कोणत्या विचारानं मतदान करतात?
 
त्यात काही दूरगामी सामूहिक विचार असतो की तात्कालिक व्यक्तिगत लाभांची लालूच असते की राजकीय पुढा-यांनी कौशल्याने गुंफलेल्या हितसंबंधांच्या सामाजिक साखळीमध्ये ओवले गेल्यानंतरची मजबुरी असते?
 हे लोक विचारपूर्वक मतदान करत असतील, तर एकाला झाकावे आणि दुस-याला काढावे, अशाच (अ)पात्रतेच्या लोकांना ते आलटून पालटून का निवडून देतात?
या प्रश्नांची उत्तरं न शोधता कोणत्याही निकालाचं निव्वळ राजकीय साठमा-यांच्या अंगानं विश्लेषण करणं म्हणजे राजकारणाला टी ट्वेंटी क्रिकेट मॅचच्या- थिल्लर मनोरंजनाच्या- पातळीवर घसरवणं नाही का?
 ज्या देशात आमदार किंवा खासदार बनणं याच्याइतका कमी काळात प्रचंड उत्पन्न मिळवून देणारा धंदा दुसरा कोणताही नाही, असं वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून जाहीर होतंय त्या देशात निवडणुकांच्या निकालांमधून लोकशाहीचा विजय घोषित करणे ही आत्मवंचनेची परिसीमाच आहे.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, २२ मे, २०११)

Wednesday, May 18, 2011

घाऊक ‘श्रद्धाप्रामाण्य’

रामजन्मभूमी प्रकरणी अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने तिथली जमीन तीन भावंडांत वाटून देण्याचा निकाल दिला, तेव्हा तो अनेकांना चतुर, व्यावहारिक आणि अपरिहार्य वाटला होता. निकाल देणा-या तिन्ही न्यायाधिशांची तोंडं तीन दिशांना होती आणि त्यातले एक तर थेट हिंदू पार्टीचे धादांत पक्षपाती होते, हे स्पष्टपणे दिसत असूनही या निकालाने तीन धर्माना सलोख्याने राहण्याचा संदेशच दिल्याचा साक्षात्कारही अनेकांना झाला होता. अयोध्येतला मूळ दावा जमिनीच्या वाटणीसाठी नव्हता, ती कुणीच मागितली नव्हती, ही गोष्ट तेव्हाच्या, ‘बरं झालं, एकदाची कटकट संपलीपद्धतीच्या, सुस्का-यांमध्ये विरून गेली होती. यथावकाश या निकालाचा निकाललागला. आपल्या वाटणीला किती जमीन आली, यापेक्षा इतरांना किती मिळाली, यातच भारतीय भावंडांना अधिक रस असतो आणि त्यावरच सर्वात मोठा आक्षेपही असतो. तसा तो या भावंडांनाही होताच. साहजिकच सर्व भावंडांनी भ्रातृभाव त्वरेनं गुंडाळून ठेवून त्या निकालाला आव्हान दिलं. या तथाकथित समजूतदारनिकालाची संपूर्ण कल्हई सर्वोच्च न्यायालयाने आता काढली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल विचित्रठरवून निकाली काढल्यामुळे अनेक समाजहितचिंतकांना हळहळ वाटते आहे. आता या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा निघण्याचा मार्ग बंद झाला, असं त्यांना वाटतं. एखादा दावा न्यायालयात कधी येतो? त्यावर सामंजस्याने तोडगा निघण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर. एकदा तो न्यायालयात आला की, त्यावर कायद्याच्या चौकटीत न्याय झाला पाहिजे आणि त्या तयारीनं न्यायालयात आलेल्या प्रत्येकानं तो स्वीकारला पाहिजे. न्यायालयात आल्यावर सामंजस्याने तडजोडीच्या बाता कशाला मारायच्या? ‘न्यायका नाही स्वीकारायचा?
 
भारतीय मानसिकतेची खरी गोची इथेच होते. कारण, कायद्याचं राज्य ही संकल्पना आपल्या संस्कृतीतून उमललेली नाही, ती उसनी घेतलेली आहे, ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत लादलेलीच आहे. त्यामुळे आपल्या रक्तात ना कायद्याचा धाक आहे, ना त्याबद्दल आदर, त्याच्या पालनाची कर्तव्यकठोरता तर दूरच राहिली. इथला जो-तो सतत कायद्याला डावं घालूनपुढे कसं जाता येईल, याचा जुगाड करण्यात मग्न! त्यामुळे, न्याय या शब्दाची आपल्यासाठीची व्याख्या फार सोपी आहे- न्याय म्हणजे आपल्या बाजूने लागलेला निकाल. अलाहाबादच्या उच्च न्यायालयानं कोणत्याही एका पक्षाच्या बाजूनं निकाल दिला असता, तर तो त्या पक्षाच्या दृष्टीनं न्याय झाला असता आणि इतर पक्षांसाठी अन्याय. कोणाच्याही बाजूने निकाल लागणं हा न्यायअसतो, हे पचनी पडण्याइतकी परिपक्वता इथं नाही.
 
म्हणूनच तर अलाहाबादच्या न्यायाधिशांनी एकसमयावच्छेदेकरून सगळ्यांना थोडं थोडं खूष आणि थोडं थोडं नाखूषही करणारा सबगोलंकारी निकाल देऊन सुटका करून घेतली होती. त्या निकालातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट होती ती श्रद्धाही गोष्ट न्यायासाठी विचारात घेण्याची. वादग्रस्त भूमीत राम जन्मला होता अशी बहुसंख्यांची श्रद्धा आहे, त्यामुळे ते गृहीत धरून चालूयात, असा महाघातकी उपक्रम त्या न्यायाधिशांनी केला होता (त्यामुळेच तिथे राम जन्मल्याचं न्यायालयानं मान्य केलं, अशा गैरअर्थ काढणा-या हेडलायनी हिंदुस्थानीदैनिकांत झळकल्या.) मुळात अमुक एक बहुसंख्यांची श्रद्धा आहे, अशी (किमान न्यायालयाकडे तरी) माहितीअसायला हवी, तिला आकडेवारीची जोड असायला हवी. या देशात श्रद्धाळूंचा भरणा अधिक, त्यामुळे सर्वाची ती श्रद्धा असणारच, ही न्यायालयाची श्रद्धाच होती- माहिती नव्हे. बरं, जिथं उपलब्ध पुराव्यांच्या आधारे, ज्या संदर्भात खटला उभा राहिला आहे, त्या संदर्भात निकाल देणं अपेक्षित आहे- त्या न्यायालयात कोणाची काय श्रद्धा आहे, याची उठाठेव कशाला? बरं वादापुरतं हेही मान्य केलं की बहुसंख्यांची असेल बुवा श्रद्धा की इथंच बाळरामाने पहिला टय़ँहँकेला, तर त्याने तरी काय साध्य होणार? न्यायासाठी पुरावा लागतो, श्रद्धा नव्हे. साक्षात न्यायालयांनी इतक्या ढोबळपणाने चालायचं ठरवलं तर बहुसंख्य भारतीयांची श्रद्धा भूत असतंअशी निघेल, मग ती श्रद्धा गृहीत धरून जागोजागच्या बंगाली बाबांना रीतसर शिक्षणसंस्था काढून डॉक्टरांसारखी अधिकृतपणे एमईपीएस (मास्टर ऑफ इव्हिल प्रॅक्टिसेस अँड सायन्सेस) प्रमाणपत्रं द्यावी लागतील.
 
बरं श्रद्धेच्या बाबतीत बहुसंख्येचा- आधुनिक लोकशाहीतून आलेला- कौल प्रमाण मानायचं कारण काय? श्रद्धा अल्पसंख्यांचीही असू शकते. ती तेवढीच प्रखरही असू शकते. उदाहरणार्थ, राम-कृष्ण या लोकप्रिय महाकाव्यांमधल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा आहेत, इतिहासातली हाडामांसाची माणसं नव्हेत आणि देव तर नाहीतच नाहीत, ही कोणाची श्रद्धा असेल.. मग ही श्रद्धा बहुसंख्यांच्या श्रद्धेच्या विपरीत आहे, हे काही तिला नाकारण्याचं कारण असू शकत नाही. कारण श्रद्धेला पुरावा नसतो आणि त्यामुळेच कोणत्या श्रद्धेच्या बाजूला किती जण आहेत, असं संख्येचं मोजमाप तिला लावता येत नाही.
 
एकदा घाऊक प्रमाणात श्रद्धाप्रामाण्य स्वीकारलं की या सगळ्या गोच्या सुरू होतात..
 
..कारण श्रद्धा म्हणजे आळस.. विचार करण्याचा आळस.. चिकित्सा करण्याचा आळस.. प्रश्न विचारण्याचा आळस.. प्रश्न पाडून घेण्याचा आळस..
 
..आपण सारी भावंडं श्रद्धाप्रामाण्यवादी आहोत, यात आश्चर्य नाही आणि द्रौपदी असो, रामजन्मभूमी असो की सातबा-यावरची शेतजमीन- ती वाटूनच घेण्याची पाळी आपल्यावर येते, यातही काही आश्चर्य नाही.

(प्रहार, १५ मे, २०११)

Sunday, May 8, 2011

तेरे बिन लादेन

फार म्हणजे फारच बोअरिंग होणार हे जग तुझ्याशिवाय..
 
..एकदम एकतर्फी होऊन जाणार सगळं..
 
..पूर्वी कसा, हिटलर होता नि दोस्त राष्ट्रं होती.. गंमत होती!
 
..त्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातलं शीतयुद्ध होतं.. थरार होता!!
 
..मग अमेरिका होती नि तू होतास.. डेंजरस फीलिंग होती!!!
 
..मुख्य म्हणजे फावल्या वेळात लढाईचा पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी आपापले राम आणि रावण निवडण्याची सोय होती.. लढाईतही सेव्हंटी एमएम भव्यता होती, डॉल्बी डिजिटल सराऊंड साऊण्डयुक्त रोचक रंगत होती..
 
तू गेल्यावर आता उरलं काय? मिळमिळीत अरब-इस्रायल संघर्ष आणि भारत-पाकिस्तानसारख्या काडीपैलवानांचे एकमेकांना दंडातल्या बेटकुळ्या काढून दाखवण्याचे हुलाहुलीचे खेळ. तुमच्या थरारक वर्ल्ड कपसमोर हे बचकंडे प्रकार म्हणजे ‘आयपीएल-फोर’च की! यापुढे असल्या फिकट फुळकवणीवर आमची रक्तरंजनाची तहान भागवावी लागणार.
 
का गेलास यार, तू का गेलास? तुझ्याविना कितीजणांच्या किती प्रकारच्या पंचायती झाल्या.
 
सर्वात मोठी पंचाईत झाली अमेरिकेची.
 
तू होतास तोपर्यंत या फुकट फौजदाराला हवेत दंडुका परजत जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही चार-दोन टपोरींना उगाचच्या उगाच अंदर करता येत होतं. वाटेल तिथे वाटेल त्याला सडकता येत होतं. सर्व प्रकारच्या दादागिरीला ‘वॉर ऑन टेरर’च्या लेबलाखाली दडवता येत होतं. आता तुझ्या रूपानं टेरर संपलीच, मग वॉर कुणाविरुद्ध करणार? आणि वॉर नाही तर मग बर्गर, पिझ्झा खाताना मज्जा काय?
 
पूर्वी कसं, अमेरिकेतल्या कोणीही धाकटय़ा बुशसारख्या भामटय़ा अध्यक्षाच्या रक्तपिपासू कारवायांविरुद्ध ब्र जरी काढला, तरी लगेच तुझा फोटो दाखवून ‘गप बश हा, नायतल हा बागुलबुवा येऊन खाऊन टाकेल तुला’ असा दम भरता येत होता. हा बागुलबुवा- जगातल्या इतर अनेक बागुलबुवांप्रमाणे- आपणच हवा भरून भरून तयार केला आहे, हे अर्थातच विसरून. आता बागुलबुवाच उरला नाही, तर भीती कशाची घालणार?
 
पाकिस्तानची तर चौफेर गोची झालीये तुझ्या जाण्यानं. केवळ विद्वेषाच्या, परधर्मअसहिष्णुतेच्या भावनेवर एक देश उभा करता येत नाही, एक धर्म, एक ईश्वरही तिथे कामी येत नाही, याचं जगातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हा देश नसलेला देश. (दुर्दैवानं आमच्या देशातले असेच पाकिस्तानद्वेष्टे भगवे(डे) त्या देशाचा पराकोटीचा तिरस्कार करतात आणि डोळ्यांसमोर ‘हिंदुस्थान’चं मॉडेल मात्र सेम टु सेम पाकिस्तानचं. आहे ना कल्पनाशून्यतेची कमाल!) एखाद्या देशाला देश म्हणवून घेण्यासाठी स्वत:ची तिजोरी, कामधंदा, काहीएक गौरवास्पद ओळख आणि मुख्य म्हणजे सार्वभौमत्व लागतं. इकडे सगळ्याचा ठणठणाट. अमेरिकेपुढे सदा पसरलेले हात आणि भारतावर सदा उगारलेली लाथ, ही यांची ओळख. तिची लक्तरं किती निघावीत? एक परका देश- परका तरी कसा म्हणायचा त्याला, त्याने फेकलेल्या डॉलर्सवरच इकडचा सगळा दारोमदार- थेट घुसून लष्करी तळाजवळ 40 मिनिटं कारवाई करतो आणि माफी न मागता, गरज पडली तर पुन्हा असेच ठोकून काढू म्हणून उलटा दम भरतो.. ये तो चुल्लूभर पानी में डूब मरनेवाली बात.. कसा आत्मसन्मान राहील अशा देशात राहणा-या कोणाच्याही मनात? आता तर भयंकरच अवस्था होणार.. इकडून अमेरिका कान उपटणार आणि तिकडून तालिबान आणि अल कइदाचे पिसाळलेले भाऊबंद बुडाखाली स्फोट करणार.. लाहौल विला कुव्वत.
 
अबोटाबादमधली तुझी तीन मजली हवेली ही पाकिस्तानची आणखी एक पंचाईत. ही हवेली म्हणजे आत्ताच एकदम हॉट इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन झालंय. ती पर्यटनस्थळ म्हणून डेव्हलप करता आली असती, तर काय धमाल आली असती.. खो-यानं डॉलर कमावता आले असते.. अमेरिकन टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंग तंत्र वापरलं असतं, तर इथे ‘स्टेल्थ हेलिकॉप्टर’मधून हवेलीचा फेरफटका मारण्याची सोय करता आली असती. आठवडय़ातून एखाद्या वेळी ‘तुम्हीच मारा लादेनला’ असा लाइव्ह गेम खेळण्याची व्यवस्था करून पर्यटकांना लादेनहत्येचं सुख देता आलं असतं.. लादेनची खेळणी, लादेनच्या की चेन, ‘किल लादेन’ गेमच्या सीडीज, ‘जिरोनिमो’ कॉमिक्स, असं काही बाही विकता आलं असतं.. तर नेमकी ती हवेलीच पाडायची पाळी आली.
 
कारण, अमेरिका सांगणार ती पाडून टाका. या भूतलावर कुठेही लादेनचं स्मारक नको आम्हाला! म्हणून तर त्याचा देह समुद्रतळाशी नेऊन गाडून टाकला. पण, हवेली राहिलीच. तीही पाडेल म्हणा अमेरिका. पण, भूमीवरची निर्जीव स्मारकं जमीनदोस्त करता येत असली, तरी माथेफिरू अनुयायांच्या मनांतली जिवंत स्मारकं अशी पाडता येत नाहीत- उलट तीच ठिकठिकाणचे उंच उंच मनोरे जमीनदोस्त करायला कारण ठरतात, हा धडा अजूनही शिकलेली नाही अमेरिका.
 
..अबोटाबादची ती हवेली खरंतर सगळ्यांचीच पंचाईत करते..
 
..कारण, त्या हवेलीत तू पाच वर्षं सुखनैव राहिला होतास म्हणे! जगातला सर्वशक्तिमान देश अब्जावधी डॉलर खर्च करून तुझा शोध घेत आणि जगातल्या सगळ्यात बेईमान माणसांनी बुजबुजलेल्या लष्कराचं तुला ‘संरक्षण’ असताना..
 
.. म्हणजे तिथे तू लपून होतास की तुला तुझ्याही नकळत लपवून ठेवला होता तुला शोधणा-यांनीच.. योग्य वेळ येताच ‘कुर्बानी’ देण्यासाठी.
 
काही म्हण गडय़ा! तू नाहीस म्हटल्यावर सगळं बोअरिंग झालंय खरं.. पण, तसं फार काळ राहणार नाही..
 ..आणखी एखादा लादेन कुठे ना कुठे ट्रेनिंग घेतच असेल.. अमेरिकेच्या छत्रछायेखाली.  

(प्रहार, ८ मे, २०११ )

Monday, May 2, 2011

बाबागिरीची ‘मंदिर-घंटा’ थिअरी

अखेर बाबांनी रामम्हटले..
 
खरं तर त्यांना शेवटचं काही म्हणायची संधीही मिळाली की नाही कोण जाणे. ते कोमातच गेले. नेमके कधी गेले, तेही सांगणं कठीण; कारण, त्यांचं अधिकृतपणेनिधन होण्याच्या आधीच त्यांच्यासाठी शवपेटीची ऑर्डरही दिली गेली होती म्हणे..
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्रिकालज्ञानी बाबांनी स्वत:च्या मृत्यूचं केलेलं भाकित चुकलं.. त्यामुळे जरा पंचाईतच झाली. त्यांचे भक्त सांगतात की बाबा असे कितीतरी वेळा कुडी सोडून जग भटकून आलेले आहेत.  प. वि. वर्तकांची मजल सूर्यमालेतल्या ग्रहांपुरती होती- बाबा तर साक्षात भगवान- ते मॉर्निग वॉकला दोन पाच आकाशगंगा सहज पालथ्या घालून येत असावेत.. आपला मृत्यू आणखी दहा वर्षानंतर आहे, असं ठामपणे सांगणा-या बाबांचा आत्मा बहुधा नेहमीप्रमाणे फेरी मारायला बाहेर गेला, पण परत येऊन पाहतो तो देहाच्या दाराला मोठ्ठं कुलूप.. असाच अजब प्रकार झाला..
 
हाताच्या पाच-सात झटक्यांनिशी सोन्याच्या घडय़ाळापासून भस्म आणि रुद्राक्षांपर्यंत काहीही डायरेक्ट हवेतून काढून देणा-या (अ)बाबांना अशा हातचलाखीने ना आपल्या आयुष्याच्या घडय़ाळाचा काटा दहा वर्षानी पुढे ढकलता आला, ना स्वत:ला वाचवणारा अंगारा काढता आला.. लालकृष्ण अडवाणींची तुरुंगातून सुटका होणार, हे शेंबडय़ा पोरानेही केले असते, असे भाकित अचूक करणाऱ्या साक्षात परमेश्वरस्वरूप बाबांना त्यांचा य:कश्चित चाकर असलेल्या मृत्यूने असे खिंडीत गाठावे? इयर एण्डचे टार्गेट पूर्ण झाले नव्हते की काय त्याचे?..
 
यावरही भक्तगणांकडे उत्तर तयारच असतं.. ते असं की, नरजन्मातले भोग भगवंतालाही चुकत नाहीत. साक्षात रामालाही वनवास भोगावा लागला होता. बाबांनीही त्यांच्या अशा सामान्य माणसासारख्या मृत्यूतून हाच दृष्टांत दिला.. भक्तांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दृष्टांत दिसत असतात. नास्तिकांना रात्रीच्या जेवणात अबरचबर खाल्ल्यावर अजीर्ण झालं की वेडीविद्री स्वप्नं पडतात, त्यांनाच आस्तिकांच्या भाषेत दृष्टांत म्हणतात.. प्रांतोप्रातीचे बाबाभक्त अंतू बरवा म्हणतील, ‘बेंबटय़ा, अरें जन्म-मृत्यू तुम्हांआम्हांला. साक्षात भगवंताला कुठलां आंलाय मृत्यू. बाबांनी फक्त एक खेळ करून दांखवलानी. आहेंस कुठें?’’
 
या खेळातून झालेली पंचाईत वेगळीच आहे.. बाबांचा पुढचा अवतार 23 वर्षानी जन्माला येणार आहे, ते मोजायचं कुठून? आत्ताच्या तारखेपासून की भाकितातल्या 10 वर्षानंतरच्या तारखेपासून?.. अर्थात प्रत्येक फडतूस घटनेची कथाआणि प्रत्येक हातचलाखीचा चमत्कारबनवणारी भाटमंडळी लवकरच याचीही एखादी नवी कहाणी रचून भावी अवताराची सोय करून ठेवतीलच, यात काही शंका नाही..
 
बाबांची शिकवण- कोणत्याही बुवा-बापू-महाराज-बाबांप्रमाणे- अर्धी अगदी साधी आणि अर्धी अगदी जडजंबाल. ईश्वर प्रेमस्वरूप आहे, कोणताही धर्म पाळा, पण सर्वावर प्रेम करा..असा एक भाग- ऐकायला सोपा आणि ती कुणी आचरणात आणली की नाही, याचा हिशेब ठेवणं इम्पॉसिबल. माझे खरे भक्त असाल, तर पान-तंबाखू खाऊन किंवा न खाता कोठेही पचापचा थुंकू नका’, अशी शिकवण एकही बु-बा-म-बा देत नाहीत.. कारण ही शिकवण पाळणार कोण? मग, ‘बु-बा-म-बाची व्हॅल्यू काय उरणार? त्यापेक्षा सत्य सदा वदावेछापाची कोणतीही सुभाषितवजा शिकवणी बेस्ट. कानांना गोड वाटते आणि सोप्या शब्दांत बाबांनी काय महान तत्त्वज्ञान सांगितलंय, असा भासही होतो. ज्या चिकित्सकभक्तांना कोणत्याही वाक्यात चार कठीण शब्द आल्याखेरीज आपण काही ग्रेट तत्त्वज्ञान ऐकतो आहोत, असं वाटतच नाही; त्यांना आत्मा-परमात्मा-चैतन्यतत्त्व-प्रेमतत्त्ववगैरे अध्यात्माच्या निबीड अरण्यातून मेड टू ऑर्डर गायडेड टूर घडवून आणायलाही बाबालोक सक्षम असतात.. शिवाय, हातात हवेतून वस्तू निर्माण करण्याचं चमत्कारी’-कसब. त्यातही गंमत पहा, जो लेकाचा याच्या-त्याच्या मुंडय़ा पिरगाळून किंवा वडिलार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकतीने गडगंज झालेला असतो- त्याला बाबा हवेतून काढतात सोन्याचं घडय़ाळ किंवा हिऱ्याची अंगठी; जो भक्त गरीब, फाटका किंवा मध्यमवर्गीय नोकरदार- त्याच्यासाठी निघते फक्त विभूती. साहजिकच आहे म्हणा- 25 हजाराच्या अंगठीचा प्रसादमिळालेला शेठजी बाबांना त्याच्या हजारपट नोट-पुडक्यांचा महाप्रसादचढवणार असतो..
 
भक्त म्हणतील- कलियुगात पापी माणसांना ईश्वराच्या मार्गाकडे वळवण्यासाठी संत-महात्म्यांनाही चमत्कार करावे लागतात- हे ईश्वराचे मार्गही अजबच. त्यांना विवेकाचं वावडं. म्हणूनच, राम-कृष्णांनाही धर्मरक्षणासाठी अधर्माचाच आसरा घ्यावा लागतो- फक्त तो धर्मासाठी असल्यानं अधर्मही धर्मच- म्हणजे काय, तर पोथी लिहिणाऱ्याच्या दक्षिणेची सोय जिकडे, तिकडे धर्म- बाकी अधर्म.
 
भक्त सोडा, भल्या भल्या सेक्युलर पुढाऱ्यांनी आणि वैचारिक वर्तमानपत्रांनीही बाबांना भावारती ओवाळत सांगितलं, बाबांनी हजारो कोटींचा संचय केला खरा- पण, तो सगळा (म्हणजे, आलिशान राजेशाही राहणीसाठीचा फुटकळ हिस्सा वगळता बाकी सगळा) ट्रस्ट करून गोरगरिबांच्या कल्याणार्थच खर्च केला.. केवढं मोठ्ठं सामाजिक काम आहे हे!
 
म्हणजे ही सार्वजनिक कामं करण्यासाठी ज्यांची निवडणूक आणि नेमणूक होते, ते सगळे पुढारी, मंत्री-संत्री, बडे अंमलदार हपापाचा माल गपापा करून ढेकर देत बाबांच्या दरबारी हजर होणार. बाबांकडून सोन्याच्या अंगठय़ा, घडय़ाळं यांचे प्रसाद मिळवणार. हा आवळा देऊन बाबा त्यांच्याकडून महाप्रसादाचा कोहळा काढणार. त्यातून स्वत:चा हिस्सा बाजूला करून ट्रस्टद्वारे तीच कामं करून घेणार- हे खास भारतीय अर्थशास्त्र जॉन मेनार्ड केन्सला समजलं असतं तर त्यानं अर्थशास्त्राचा अभ्यास सोडून इंग्लंडमध्ये आलं-लिंबूयुक्त रसवंतीगृह टाकलं असतं..
 
बाबांच्याच नव्हे तर सगळ्याच बु-बा-म-बांच्या बाबतीत एक गोष्ट समान असते- त्यांच्या या फार मोठ्ठय़ा सामाजिक कामाचं समाजातल्या विचारशील मंडळींनाही कौतुक असतं- त्यांचं ते अध्यात्म-चमत्कार वगैरे सोडा, पण, हे काम अव्वलअसं हे विचारवंत तोंडभरून सांगतात- बाबांच्या आश्रमात किती स्वच्छता असते, शिस्त असते, तिथे वेगवेगळ्या वर्गातले लोक एकत्र येऊन कशी सेवा करतात, आपलं उच्च पद आणि पत विसरून न लाजता हलकीसलकी कामंही कशी भक्तिभावानं करतात आणि त्यातून कसं आत्मिक समाधान मिळतं, याच्या पोथीपठणात विचारवंत मागे नसतात..
 
ही खास भारतातली मंदिर-घंटा थिअरीआहे.. 
 
म्हणजे, दिवसभर पापं करायची आणि रात्री झोपताना एक स्तोत्र म्हणायचं- मनाला हलकं वाटतं.
 
वर्षभर लोकांना लुबाडायचं, खोटं वागायचं, माणसं मारायची, पगाराचं कामही चोख करायचं नाही, खा खा लाच खायची आणि वर्षातून एकदा एखाद्या कष्टप्रद यात्रेला जायचं, अनवाणी पावलांनी डोंगर चढायचा, टळटळत्या उन्हात प्रदक्षिणा करायची.. मनाला हलकं वाटतं.
 दिवसभर मोहमायेच्या कर्दमात भरपूर लोळायचं आणि संध्याकाळी मंदिरात घंटा वाजवून स्व-गाली स्वहस्ते दोनचार थपडा मारून घ्यायच्या.. मनाला हलकं वाटतं.
म्हणजे एकदा मंदिरात जाऊन घंटा वाजवायची सोय असली की दिवसभर हवी ती पापं करायची मोकळीक.
 
म्हणूनच या सगळ्या भक्तगणंगांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की जनहो, अशा प्रेममय वागण्यातून, भेदभाव बाजूला ठेवून सेवा करण्यातून केवढा अपार आनंद मिळतो, याचा एवढा मोठा साक्षात्कार तुम्हाला खरोखरीच कुठे होत असेल, तर तो झाल्यानंतर तुम्ही नेहमीच्या आयुष्यातसुद्धा का नाही तसे वागत?
 तोच तुमच्या बाबांचा सर्वात मोठा चमत्कार असेल.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, १ मे, २०११)