Sunday, May 8, 2011

तेरे बिन लादेन

फार म्हणजे फारच बोअरिंग होणार हे जग तुझ्याशिवाय..
 
..एकदम एकतर्फी होऊन जाणार सगळं..
 
..पूर्वी कसा, हिटलर होता नि दोस्त राष्ट्रं होती.. गंमत होती!
 
..त्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातलं शीतयुद्ध होतं.. थरार होता!!
 
..मग अमेरिका होती नि तू होतास.. डेंजरस फीलिंग होती!!!
 
..मुख्य म्हणजे फावल्या वेळात लढाईचा पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी आपापले राम आणि रावण निवडण्याची सोय होती.. लढाईतही सेव्हंटी एमएम भव्यता होती, डॉल्बी डिजिटल सराऊंड साऊण्डयुक्त रोचक रंगत होती..
 
तू गेल्यावर आता उरलं काय? मिळमिळीत अरब-इस्रायल संघर्ष आणि भारत-पाकिस्तानसारख्या काडीपैलवानांचे एकमेकांना दंडातल्या बेटकुळ्या काढून दाखवण्याचे हुलाहुलीचे खेळ. तुमच्या थरारक वर्ल्ड कपसमोर हे बचकंडे प्रकार म्हणजे ‘आयपीएल-फोर’च की! यापुढे असल्या फिकट फुळकवणीवर आमची रक्तरंजनाची तहान भागवावी लागणार.
 
का गेलास यार, तू का गेलास? तुझ्याविना कितीजणांच्या किती प्रकारच्या पंचायती झाल्या.
 
सर्वात मोठी पंचाईत झाली अमेरिकेची.
 
तू होतास तोपर्यंत या फुकट फौजदाराला हवेत दंडुका परजत जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही चार-दोन टपोरींना उगाचच्या उगाच अंदर करता येत होतं. वाटेल तिथे वाटेल त्याला सडकता येत होतं. सर्व प्रकारच्या दादागिरीला ‘वॉर ऑन टेरर’च्या लेबलाखाली दडवता येत होतं. आता तुझ्या रूपानं टेरर संपलीच, मग वॉर कुणाविरुद्ध करणार? आणि वॉर नाही तर मग बर्गर, पिझ्झा खाताना मज्जा काय?
 
पूर्वी कसं, अमेरिकेतल्या कोणीही धाकटय़ा बुशसारख्या भामटय़ा अध्यक्षाच्या रक्तपिपासू कारवायांविरुद्ध ब्र जरी काढला, तरी लगेच तुझा फोटो दाखवून ‘गप बश हा, नायतल हा बागुलबुवा येऊन खाऊन टाकेल तुला’ असा दम भरता येत होता. हा बागुलबुवा- जगातल्या इतर अनेक बागुलबुवांप्रमाणे- आपणच हवा भरून भरून तयार केला आहे, हे अर्थातच विसरून. आता बागुलबुवाच उरला नाही, तर भीती कशाची घालणार?
 
पाकिस्तानची तर चौफेर गोची झालीये तुझ्या जाण्यानं. केवळ विद्वेषाच्या, परधर्मअसहिष्णुतेच्या भावनेवर एक देश उभा करता येत नाही, एक धर्म, एक ईश्वरही तिथे कामी येत नाही, याचं जगातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हा देश नसलेला देश. (दुर्दैवानं आमच्या देशातले असेच पाकिस्तानद्वेष्टे भगवे(डे) त्या देशाचा पराकोटीचा तिरस्कार करतात आणि डोळ्यांसमोर ‘हिंदुस्थान’चं मॉडेल मात्र सेम टु सेम पाकिस्तानचं. आहे ना कल्पनाशून्यतेची कमाल!) एखाद्या देशाला देश म्हणवून घेण्यासाठी स्वत:ची तिजोरी, कामधंदा, काहीएक गौरवास्पद ओळख आणि मुख्य म्हणजे सार्वभौमत्व लागतं. इकडे सगळ्याचा ठणठणाट. अमेरिकेपुढे सदा पसरलेले हात आणि भारतावर सदा उगारलेली लाथ, ही यांची ओळख. तिची लक्तरं किती निघावीत? एक परका देश- परका तरी कसा म्हणायचा त्याला, त्याने फेकलेल्या डॉलर्सवरच इकडचा सगळा दारोमदार- थेट घुसून लष्करी तळाजवळ 40 मिनिटं कारवाई करतो आणि माफी न मागता, गरज पडली तर पुन्हा असेच ठोकून काढू म्हणून उलटा दम भरतो.. ये तो चुल्लूभर पानी में डूब मरनेवाली बात.. कसा आत्मसन्मान राहील अशा देशात राहणा-या कोणाच्याही मनात? आता तर भयंकरच अवस्था होणार.. इकडून अमेरिका कान उपटणार आणि तिकडून तालिबान आणि अल कइदाचे पिसाळलेले भाऊबंद बुडाखाली स्फोट करणार.. लाहौल विला कुव्वत.
 
अबोटाबादमधली तुझी तीन मजली हवेली ही पाकिस्तानची आणखी एक पंचाईत. ही हवेली म्हणजे आत्ताच एकदम हॉट इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन झालंय. ती पर्यटनस्थळ म्हणून डेव्हलप करता आली असती, तर काय धमाल आली असती.. खो-यानं डॉलर कमावता आले असते.. अमेरिकन टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंग तंत्र वापरलं असतं, तर इथे ‘स्टेल्थ हेलिकॉप्टर’मधून हवेलीचा फेरफटका मारण्याची सोय करता आली असती. आठवडय़ातून एखाद्या वेळी ‘तुम्हीच मारा लादेनला’ असा लाइव्ह गेम खेळण्याची व्यवस्था करून पर्यटकांना लादेनहत्येचं सुख देता आलं असतं.. लादेनची खेळणी, लादेनच्या की चेन, ‘किल लादेन’ गेमच्या सीडीज, ‘जिरोनिमो’ कॉमिक्स, असं काही बाही विकता आलं असतं.. तर नेमकी ती हवेलीच पाडायची पाळी आली.
 
कारण, अमेरिका सांगणार ती पाडून टाका. या भूतलावर कुठेही लादेनचं स्मारक नको आम्हाला! म्हणून तर त्याचा देह समुद्रतळाशी नेऊन गाडून टाकला. पण, हवेली राहिलीच. तीही पाडेल म्हणा अमेरिका. पण, भूमीवरची निर्जीव स्मारकं जमीनदोस्त करता येत असली, तरी माथेफिरू अनुयायांच्या मनांतली जिवंत स्मारकं अशी पाडता येत नाहीत- उलट तीच ठिकठिकाणचे उंच उंच मनोरे जमीनदोस्त करायला कारण ठरतात, हा धडा अजूनही शिकलेली नाही अमेरिका.
 
..अबोटाबादची ती हवेली खरंतर सगळ्यांचीच पंचाईत करते..
 
..कारण, त्या हवेलीत तू पाच वर्षं सुखनैव राहिला होतास म्हणे! जगातला सर्वशक्तिमान देश अब्जावधी डॉलर खर्च करून तुझा शोध घेत आणि जगातल्या सगळ्यात बेईमान माणसांनी बुजबुजलेल्या लष्कराचं तुला ‘संरक्षण’ असताना..
 
.. म्हणजे तिथे तू लपून होतास की तुला तुझ्याही नकळत लपवून ठेवला होता तुला शोधणा-यांनीच.. योग्य वेळ येताच ‘कुर्बानी’ देण्यासाठी.
 
काही म्हण गडय़ा! तू नाहीस म्हटल्यावर सगळं बोअरिंग झालंय खरं.. पण, तसं फार काळ राहणार नाही..
 ..आणखी एखादा लादेन कुठे ना कुठे ट्रेनिंग घेतच असेल.. अमेरिकेच्या छत्रछायेखाली.  

(प्रहार, ८ मे, २०११ )

No comments:

Post a Comment