Monday, May 2, 2011

बाबागिरीची ‘मंदिर-घंटा’ थिअरी

अखेर बाबांनी रामम्हटले..
 
खरं तर त्यांना शेवटचं काही म्हणायची संधीही मिळाली की नाही कोण जाणे. ते कोमातच गेले. नेमके कधी गेले, तेही सांगणं कठीण; कारण, त्यांचं अधिकृतपणेनिधन होण्याच्या आधीच त्यांच्यासाठी शवपेटीची ऑर्डरही दिली गेली होती म्हणे..
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्रिकालज्ञानी बाबांनी स्वत:च्या मृत्यूचं केलेलं भाकित चुकलं.. त्यामुळे जरा पंचाईतच झाली. त्यांचे भक्त सांगतात की बाबा असे कितीतरी वेळा कुडी सोडून जग भटकून आलेले आहेत.  प. वि. वर्तकांची मजल सूर्यमालेतल्या ग्रहांपुरती होती- बाबा तर साक्षात भगवान- ते मॉर्निग वॉकला दोन पाच आकाशगंगा सहज पालथ्या घालून येत असावेत.. आपला मृत्यू आणखी दहा वर्षानंतर आहे, असं ठामपणे सांगणा-या बाबांचा आत्मा बहुधा नेहमीप्रमाणे फेरी मारायला बाहेर गेला, पण परत येऊन पाहतो तो देहाच्या दाराला मोठ्ठं कुलूप.. असाच अजब प्रकार झाला..
 
हाताच्या पाच-सात झटक्यांनिशी सोन्याच्या घडय़ाळापासून भस्म आणि रुद्राक्षांपर्यंत काहीही डायरेक्ट हवेतून काढून देणा-या (अ)बाबांना अशा हातचलाखीने ना आपल्या आयुष्याच्या घडय़ाळाचा काटा दहा वर्षानी पुढे ढकलता आला, ना स्वत:ला वाचवणारा अंगारा काढता आला.. लालकृष्ण अडवाणींची तुरुंगातून सुटका होणार, हे शेंबडय़ा पोरानेही केले असते, असे भाकित अचूक करणाऱ्या साक्षात परमेश्वरस्वरूप बाबांना त्यांचा य:कश्चित चाकर असलेल्या मृत्यूने असे खिंडीत गाठावे? इयर एण्डचे टार्गेट पूर्ण झाले नव्हते की काय त्याचे?..
 
यावरही भक्तगणांकडे उत्तर तयारच असतं.. ते असं की, नरजन्मातले भोग भगवंतालाही चुकत नाहीत. साक्षात रामालाही वनवास भोगावा लागला होता. बाबांनीही त्यांच्या अशा सामान्य माणसासारख्या मृत्यूतून हाच दृष्टांत दिला.. भक्तांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दृष्टांत दिसत असतात. नास्तिकांना रात्रीच्या जेवणात अबरचबर खाल्ल्यावर अजीर्ण झालं की वेडीविद्री स्वप्नं पडतात, त्यांनाच आस्तिकांच्या भाषेत दृष्टांत म्हणतात.. प्रांतोप्रातीचे बाबाभक्त अंतू बरवा म्हणतील, ‘बेंबटय़ा, अरें जन्म-मृत्यू तुम्हांआम्हांला. साक्षात भगवंताला कुठलां आंलाय मृत्यू. बाबांनी फक्त एक खेळ करून दांखवलानी. आहेंस कुठें?’’
 
या खेळातून झालेली पंचाईत वेगळीच आहे.. बाबांचा पुढचा अवतार 23 वर्षानी जन्माला येणार आहे, ते मोजायचं कुठून? आत्ताच्या तारखेपासून की भाकितातल्या 10 वर्षानंतरच्या तारखेपासून?.. अर्थात प्रत्येक फडतूस घटनेची कथाआणि प्रत्येक हातचलाखीचा चमत्कारबनवणारी भाटमंडळी लवकरच याचीही एखादी नवी कहाणी रचून भावी अवताराची सोय करून ठेवतीलच, यात काही शंका नाही..
 
बाबांची शिकवण- कोणत्याही बुवा-बापू-महाराज-बाबांप्रमाणे- अर्धी अगदी साधी आणि अर्धी अगदी जडजंबाल. ईश्वर प्रेमस्वरूप आहे, कोणताही धर्म पाळा, पण सर्वावर प्रेम करा..असा एक भाग- ऐकायला सोपा आणि ती कुणी आचरणात आणली की नाही, याचा हिशेब ठेवणं इम्पॉसिबल. माझे खरे भक्त असाल, तर पान-तंबाखू खाऊन किंवा न खाता कोठेही पचापचा थुंकू नका’, अशी शिकवण एकही बु-बा-म-बा देत नाहीत.. कारण ही शिकवण पाळणार कोण? मग, ‘बु-बा-म-बाची व्हॅल्यू काय उरणार? त्यापेक्षा सत्य सदा वदावेछापाची कोणतीही सुभाषितवजा शिकवणी बेस्ट. कानांना गोड वाटते आणि सोप्या शब्दांत बाबांनी काय महान तत्त्वज्ञान सांगितलंय, असा भासही होतो. ज्या चिकित्सकभक्तांना कोणत्याही वाक्यात चार कठीण शब्द आल्याखेरीज आपण काही ग्रेट तत्त्वज्ञान ऐकतो आहोत, असं वाटतच नाही; त्यांना आत्मा-परमात्मा-चैतन्यतत्त्व-प्रेमतत्त्ववगैरे अध्यात्माच्या निबीड अरण्यातून मेड टू ऑर्डर गायडेड टूर घडवून आणायलाही बाबालोक सक्षम असतात.. शिवाय, हातात हवेतून वस्तू निर्माण करण्याचं चमत्कारी’-कसब. त्यातही गंमत पहा, जो लेकाचा याच्या-त्याच्या मुंडय़ा पिरगाळून किंवा वडिलार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकतीने गडगंज झालेला असतो- त्याला बाबा हवेतून काढतात सोन्याचं घडय़ाळ किंवा हिऱ्याची अंगठी; जो भक्त गरीब, फाटका किंवा मध्यमवर्गीय नोकरदार- त्याच्यासाठी निघते फक्त विभूती. साहजिकच आहे म्हणा- 25 हजाराच्या अंगठीचा प्रसादमिळालेला शेठजी बाबांना त्याच्या हजारपट नोट-पुडक्यांचा महाप्रसादचढवणार असतो..
 
भक्त म्हणतील- कलियुगात पापी माणसांना ईश्वराच्या मार्गाकडे वळवण्यासाठी संत-महात्म्यांनाही चमत्कार करावे लागतात- हे ईश्वराचे मार्गही अजबच. त्यांना विवेकाचं वावडं. म्हणूनच, राम-कृष्णांनाही धर्मरक्षणासाठी अधर्माचाच आसरा घ्यावा लागतो- फक्त तो धर्मासाठी असल्यानं अधर्मही धर्मच- म्हणजे काय, तर पोथी लिहिणाऱ्याच्या दक्षिणेची सोय जिकडे, तिकडे धर्म- बाकी अधर्म.
 
भक्त सोडा, भल्या भल्या सेक्युलर पुढाऱ्यांनी आणि वैचारिक वर्तमानपत्रांनीही बाबांना भावारती ओवाळत सांगितलं, बाबांनी हजारो कोटींचा संचय केला खरा- पण, तो सगळा (म्हणजे, आलिशान राजेशाही राहणीसाठीचा फुटकळ हिस्सा वगळता बाकी सगळा) ट्रस्ट करून गोरगरिबांच्या कल्याणार्थच खर्च केला.. केवढं मोठ्ठं सामाजिक काम आहे हे!
 
म्हणजे ही सार्वजनिक कामं करण्यासाठी ज्यांची निवडणूक आणि नेमणूक होते, ते सगळे पुढारी, मंत्री-संत्री, बडे अंमलदार हपापाचा माल गपापा करून ढेकर देत बाबांच्या दरबारी हजर होणार. बाबांकडून सोन्याच्या अंगठय़ा, घडय़ाळं यांचे प्रसाद मिळवणार. हा आवळा देऊन बाबा त्यांच्याकडून महाप्रसादाचा कोहळा काढणार. त्यातून स्वत:चा हिस्सा बाजूला करून ट्रस्टद्वारे तीच कामं करून घेणार- हे खास भारतीय अर्थशास्त्र जॉन मेनार्ड केन्सला समजलं असतं तर त्यानं अर्थशास्त्राचा अभ्यास सोडून इंग्लंडमध्ये आलं-लिंबूयुक्त रसवंतीगृह टाकलं असतं..
 
बाबांच्याच नव्हे तर सगळ्याच बु-बा-म-बांच्या बाबतीत एक गोष्ट समान असते- त्यांच्या या फार मोठ्ठय़ा सामाजिक कामाचं समाजातल्या विचारशील मंडळींनाही कौतुक असतं- त्यांचं ते अध्यात्म-चमत्कार वगैरे सोडा, पण, हे काम अव्वलअसं हे विचारवंत तोंडभरून सांगतात- बाबांच्या आश्रमात किती स्वच्छता असते, शिस्त असते, तिथे वेगवेगळ्या वर्गातले लोक एकत्र येऊन कशी सेवा करतात, आपलं उच्च पद आणि पत विसरून न लाजता हलकीसलकी कामंही कशी भक्तिभावानं करतात आणि त्यातून कसं आत्मिक समाधान मिळतं, याच्या पोथीपठणात विचारवंत मागे नसतात..
 
ही खास भारतातली मंदिर-घंटा थिअरीआहे.. 
 
म्हणजे, दिवसभर पापं करायची आणि रात्री झोपताना एक स्तोत्र म्हणायचं- मनाला हलकं वाटतं.
 
वर्षभर लोकांना लुबाडायचं, खोटं वागायचं, माणसं मारायची, पगाराचं कामही चोख करायचं नाही, खा खा लाच खायची आणि वर्षातून एकदा एखाद्या कष्टप्रद यात्रेला जायचं, अनवाणी पावलांनी डोंगर चढायचा, टळटळत्या उन्हात प्रदक्षिणा करायची.. मनाला हलकं वाटतं.
 दिवसभर मोहमायेच्या कर्दमात भरपूर लोळायचं आणि संध्याकाळी मंदिरात घंटा वाजवून स्व-गाली स्वहस्ते दोनचार थपडा मारून घ्यायच्या.. मनाला हलकं वाटतं.
म्हणजे एकदा मंदिरात जाऊन घंटा वाजवायची सोय असली की दिवसभर हवी ती पापं करायची मोकळीक.
 
म्हणूनच या सगळ्या भक्तगणंगांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की जनहो, अशा प्रेममय वागण्यातून, भेदभाव बाजूला ठेवून सेवा करण्यातून केवढा अपार आनंद मिळतो, याचा एवढा मोठा साक्षात्कार तुम्हाला खरोखरीच कुठे होत असेल, तर तो झाल्यानंतर तुम्ही नेहमीच्या आयुष्यातसुद्धा का नाही तसे वागत?
 तोच तुमच्या बाबांचा सर्वात मोठा चमत्कार असेल.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, १ मे, २०११)

No comments:

Post a Comment