Sunday, May 29, 2011

मराठी टक्के-टोणपे आणि टोणगे!

हल्ली कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की लगेच आपल्याकडे त्या परीक्षेत मराठी टक्काकिती वाढला, किती घटला, याच्या चर्चा सुरू होतात.. तो वाढलेला दिसला की आपल्याला आभाळाला हात टेकल्याचा आनंद होतो आणि घटल्याचं समजलं, तर हळहळ वाटते..
 
हा मराठी टक्का नावाचा प्रकारही अजब आहे.. महाराष्ट्रात तीन पिढय़ा राहिलेला, संस्कारांनीही मराठीझालेला, घरातसुद्धा अस्खलित मराठी बोलणारा कुणी गांधी, नायर किंवा सिंग असल्या बिनडोक खानेसुमारीत अमराठीठरतो आणि इंग्रजी-हिंदीच्या भेसळीशिवाय मराठीची दोन वाक्यंही धड बोलू न शकणारे, महाराष्ट्राशी कोणतीही नाळ शिल्लक नसणारे फक्त आडनावाचे मराठीहेच आपल्या लेखी अस्सल मराठी असतात..
 असो. मूळ मुद्दा तो नाही. ही परीक्षा यूपीएससीसारखी सनदी परीक्षा किंवा (आयआयटी/ आयआयएमला प्रवेश मिळवून देणारी) जेईईसारखी नगदीपरीक्षा असली, तर आपल्या मराठी यशाच्या किंकाळ्या आणखी कर्णभेदक होतात. हे यश मिळवणा-या मंडळींची मेहनत आणि त्यांची बुद्धिमत्ता यांचा उपमर्द करण्याचा अजिबात हेतू नाही. ते सगळे स्कॉलरच असतात, यात शंका नाही. काही जण तर अतिशय विपरित परिस्थितीत शिक्षण घेऊन ही झेप घेतात, हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत करीअरच्या पातळीवर कौतुकास्पदच आहे.
मग प्रॉब्लेम काय आहे?
 प्रॉब्लेम असा आहे की आपण या यशाकडे आणि यशवंतांकडे फारच भाबडेपणाने पाहतो आणि त्यांचं तेवढय़ाच मठ्ठपणे कौतुक करतो.
यात आयआयटी किंवा आयआयएमसारख्या संस्थांमध्ये शिरकाव करून घेतलेल्या मुलांच्या बाबतीत कौतुकाची दिशा निदान सरळ असते. ही मुलं आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर एकतर परदेशांत जाऊन तिथे झकास करीअर करत सेटल होणार किंवा देशातल्या बडय़ा कंपन्यांमध्ये बडय़ा पदांवर जाऊन गलेलठ्ठ पगार कमावणार, सर्व सुखांच्या राशी त्यांच्या पायांवर लोळण घेणार. हे सगळं म्हणजेच आयुष्यातलं परमोच्च सुख, असं मानणा-यांना या यशाचं खूप कौतुक असणं स्वाभाविक आहे.
 
पण, यूपीएससी-एमपीएससीसारख्या परीक्षांना त्या तागडीमध्ये तोलता येणार नाहीत. त्या परीक्षांमधून अधिकारी तयार होतात, ज्यांच्या हातात या देशाच्या कारभाराच्या सगळ्या नाडय़ा असतात आणि त्या नाडय़ांच्या दुस-या टोकांशी आपण असतो.. यानेकी सामान्य जनता..
 
..मग या परीक्षांमध्ये पास होणा-यांत मराठी टक्का वाढला, याचा किंवा गरिबीतून वर आलेली मुलंसुद्धा पास झाली, याचा आनंद नेमका कशासाठी करायचा?
 
आता ही आपलीमुलंही आयएएस, आयपीएस होतील आणि देशाच्या प्रशासनात नाव काढतील, म्हणून.
 
करेक्ट.
 
पण, नाव काढतील, म्हणजे काय?
 ती पुढे लाल दिव्याच्या भोंगावाल्या गाडीतून ऐटीत फिरतील, दृश्य-अदृश्य पट्टेवाल्यांचे सलाम झेलतील, सटासट आदेश सोडतील, भरपूर मलिदा कमावून पुढच्या सात पिढय़ांची सोय करतील, शहरातल्या प्राइम जागेवर त्यांची आदर्श सोसायटी असेल आणि तिच्यात हवेशीर प्रशस्त फ्लॅटमध्ये राहतील, सेवेच्या अखेरीस ते एखाद्या बडय़ा कंपनीत सल्लागार म्हणून जातील आणि सत्तर पिढय़ांची सोय करतील.. हेच होणार असेल, तर त्याबद्दल फारतरफार त्यांच्या कुटुंबियांना-इष्टमित्रांना आनंद व्हायला हवा आणि त्यांच्या भावी पिढय़ांनी कृतज्ञ राहावं..
एक समाज म्हणून आपण ते का सेलिब्रेट करतोय?
 
हेच सगळं करणारे सनदी अधिकारी आपल्या आसपास नाहीत का?
 
ते मराठी आहेत की अमराठी यानं आपल्या समाजजीवनात काय फरक पडला?
 
प्रशासन लोकाभिमुख करण्यात, सरकारी यंत्रणा सहृदय आणि कृतिशील बनवण्यात, भारतीय प्रशासनिक सेवा या नावातील सेवानावाचा भाग सार्थ करण्यात त्यांनी काही भूमिका बजावली का? आज यूपीएससी पास झालेली मुलंही पुढे जाऊन हे सगळं करणार आहेत का? तसं असेल, तरच त्यांच्या यशाचे डांगोरे पिटण्यात काही हशील.
 
मुळात ब्रिटिशांनी त्यांच्या पद्धतीने राज्यकारभार हाकणारे बुद्धिमान होयबा तयार करण्यासाठी या सेवांची रचना केली आहे. ती परतंत्र देश चालवण्यासाठी इतकी आदर्श होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नागरिक परतंत्रच राहतील, अशी व्यवस्था या सेवांनी आजतागायत करून ठेवलेली आहे. असले बाबूलोक त्यांच्यासारख्याच लोकप्रतिनिधींशी संगनमत साधून काय काय कारनामे करून ठेवतात, याचे जाहीर वाभाडे रोज निघत असतात. प्रशासनिक सेवांचा सगळा ढाचा बदलून ज्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना त्या त्या क्षेत्राचा प्रशासनिक कारभार हाकू द्यावा, अशी मागणी होत असते, ती यामुळेच.
 
इतक्या गुंतागुंतीच्या, व्यामिश्र समाजरचनेचा अवाढव्य देश चालवण्यासाठी घेतल्या जाणा-या परीक्षांमध्ये स्वतंत्र विचारक्षमतेला वाव असतं का, प्रयोगांना चालना देणारं काही असतं का की फक्त घोकंपट्टीला महत्त्व असतं? जिथे काम देश चालवण्याचं असतं तिथे बुद्धिमत्तेला, प्रज्ञेला, कृतिशीलतेला सचोटीची आणि व्यक्तिगत लाभाला फाटा देऊन देशहिताला प्राधान्य देणा-या प्रखर सामाजिक चारित्र्याची जोड असली पाहिजे. यूपीएससी परीक्षेत हमखास यशाची गॅरंटी देणारे किती क्लास ही शिकवणसुद्धा देतात? गरीब घरांतून शिकून मोठं झालेल्या विद्यार्थ्यांना तर देशाच्या दुर्लक्षित तळघरांमध्ये केवढं दैन्य, केवढय़ा यातना, केवढय़ा वंचना आणि विवंचना दडपलेल्या आहेत, याचं फर्स्ट हँड ज्ञान असतं; त्या काळकोठडीच्या शिसारीतूनच अनेकांनी उच्चतम यश मिळवून प्रशासनात शिरण्याची प्रतिज्ञा केलेली असते. अशी, देश बदलण्याच्या ध्येयवादाने झपाटलेली मुलेही या परीक्षांमध्ये यशस्वी होऊन जेव्हा प्रत्यक्ष देशकार्यात समाविष्ट होतात, तेव्हा तीच बदलतात आणि देश तसाच राहतो, हाच अनुभव जास्त येतो.
 
हे असं का घडतं?
 
हे असंच घडणार असेल, तर आपण साजरा करतो तो आनंद कशाचा?..
 
..निदान भविष्यात तरी आपल्याला लुबाडणारा टोणगा मराठी असणार, याचा?
(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, २९ मे, २०११)

No comments:

Post a Comment