Sunday, June 5, 2011

नळबाजार

हा सगळा गोंधळ नळांनी करून ठेवलाय यात शंकाच नाही.. हो हो नळांनीच..
 
नळ म्हणजे आधिक्य.. नळ म्हणजे चंगळ..
 
जिकडेतिकडे नळच नळ असले की काही म्हंजे काहीच करावं लागत नाही..
 
डोकं चालवावं लागत नाही, कष्ट करावे लागत नाहीत..
 
नुसती चावी फिरवायची की धो धो धार सुरू..
 
चावी बंद केली की धार बंद.. सो सिंपल.
 
चावी बंद केलीच पाहिजे, असं काही बंधनही नाही..
 
राहिली धार सुरू तर आपल्या बापाचं काय जातंय?
 
त्या कावळय़ाची गोष्ट आठवून पाहा.. लांबुळक्या माठाच्या तळाशी असलेलं घोटभर पाणी पिण्यासाठी बिचा-याला केवढी यातायात पडली होती.. इकडून तिकडून दगड आणण्यातच बिचारा अर्धमेला झाला असेल.. ‘अप्लाइड सायन्स’चा विद्यार्थी असल्याप्रमाणे डोकं चालवून दगडगोटे टाकून पाण्याची पातळी वाढवण्याचा उपद्व्याप केल्यावर त्याची तहान भागली होती..
 
जिथे नळ नसतात, तिथल्या आयाबायांनाही कावळ्याइतके नाही पण केवढे कष्ट पडतात.. डोईवर घागर, कमरेवर घागर आणि उन्हातान्हात मैलोन्मैलांची रपेट.. बाप्येही विहिरींमधून पाणी शेंदतात तास न् तास..
 
जिथे नळ असतात, पण, ते अहोरात्र वाहत नसतात, ठरल्या वेळी मरतुकडं ठिबकतात, तिथे नळांपेक्षा पिंपांचं महत्त्व अधिक आणि पाणी उपसणा-या तांब्ये-मगांचं महत्त्व तर सर्वाधिक..
 
च्यामारी, चांगला पाऊस आलाय, चार महिने तल्खली भोगलेल्या जिवाला जरा गारवा मिळालाय; जरा ‘आषाढस्य प्रथमे दिवसे’ किंवा ‘मेघ दाटले, जिवाला बरे वाटले’ किंवा ‘रिमझिमरिमझिम रुमझुमरूमझुम’ अशा शीर्षकानं भुरूभुरू गारेगार शब्दशिंपडूक लिहायचं सोडून हे कसलं रखरखीत, रणरणीत, टळटळीत भारतीय समाचारचित्र सुरू केलंय?..
 ठीकाय ठीकाय.. नळ बाजूला ठेवूया (शक्यतोवर बंद करून ठेवलात तर बरं).. आपण डायरेक्ट शॉवरच सुरू करू. मग तर चालेल? शॉवर म्हणजे नळाच्याही पुढची स्टेप.. कोणत्याही काळी कोणत्याही वेळी थेट पावसाचाच आनंद.. तोही आपल्याला हवा तेवढा.. आज नुसतीच भुरभूर हवी.. फिरवा नळ थोडासाच.. आज जरा रिमझिमचा मूड आहे.. आणखी थोडा खोला नळ.. आज काय घामचिक्कटच झालंय अंग.. त्याच्यावर मुसळधारच हवी.. मग खोलून टाका नळ, आहे काय त्यात!
अर्रर्र! इथेही नळ आलाच.
 
आणि नळ आला की गोंधळ आलाच.
 
एवढा काय गोंधळ घातलाय नळांनी?
 
तो समजून घेण्यासाठी पुन्हा नळ नसलेल्या स्थितीकडे जायला हवं.
 
त्या स्थितीत एक गोष्ट पक्की. ठरवूनही उधळपट्टी करता येत नाही.
 
अमुक हे जीवन आहे, तमुक अमूल्य आहे, ढमुक वाया घालवू नका, असं कुणीही काहीही ‘ग्यान’ देण्याची आवश्यकता नाही. ते अमुक-तमुक-ढमुक मिळवणंच इतकं जिकिरीचं, कष्टाचं की त्याचा वापर आपोआप आटोक्यात येतो.. यातला आपोआप हा शब्द महत्त्वाचा.. आपल्याला सगळं आपोआप हवं असतं म्हणून.. विचारपूर्वक काही करायचं म्हणजे केवढा ताप?
 
साधं ब्रश करून तोंड धुण्याचं उदाहरण घ्या.
 
दोन ते तीन मगांमध्ये सगळं काम. नळ असला की अर्धी बादली पाणी नुसतंच वाहून जाणार.
 
आंघोळ एका बादलीत होऊन जाते पाणी उपसून वापरायचं असलं की.
 
नळ असले की दोन बादल्या आणि शॉवर असला तर चार बादल्या पक्क्या.
 
नळ खुले होतात तिथे आपली विचारशक्तीच बंद होते..
 
नळ नसतात तेव्हा किती वापर करायचा, त्याचा निर्णय करावा लागतो, जबाबदारी घ्यावी लागते.. नळ असतील, तेव्हा ना निर्णयाची गरज ना जबाबदारीचं भान.
 
मग बरंच आहे की!
 
कशाला हवा प्रत्येक गोष्टीचा विचार?
 
ही फार मोठी सोयच आहे की.
 
करेक्ट.
 
माणसाला बुद्धीचा वापर कमीत कमी करायला लागणं ही सोय वाटत आली आहे.
 
म्हणूनच मग कॅल्क्युलेटर नावाचा आकडेमोडीचा नळ येतो.. तोंडी हिशोब आणि पाढे बासनात गुंडाळले जातात.
 
रिकाम्या डोक्यांचे गळके हौद भरायला चोवीस तास फुल फोर्सने टीव्हीवाहिन्यांचे नळ घरोघरी वाहू लागतात.. थिएटरात जाऊन नीट निवड करून मनोरंजनाचा आस्वाद घेण्याची क्षमता बधीर होऊ लागते.. दिवसातून चार तासच पाणी देणारा दूरदर्शनचा नळसुद्धा किती बुनियादी मोलाचा होता याचा हमलोग आता फक्त चित्रहार पाहतात मनातल्या मनात.
 
याच टीव्हीवरून माहितीचे नळही वाहताहेत बातम्या भरभरून. चोवीस तास ब्रेकिंग न्यूज. तरी सातच्या बातम्यांच्या दिवसभरात एकेक तांब्या ओतून भरलेल्या गारेगार वाळ्याच्या वासाच्या माठाची सर या संततधारेला नाही.
 
कम्प्यूटरवर बसा.. मैत्रीचे नळ वाहताहेत धो धो. कधी ओळख ना देख अशी माणसं फ्रेण्ड्स लिस्ट फुगवतायत.. ‘हाय वॉस्सप, कूल मॅन, यू टेल, नथिंग ग्रेट, पुलिंग ऑन’ अशा निर्थक संवादांचे शॉवर दिवसरात्र शिडकतायत..
 
इकडेतिकडे कुणी पाहत नाहीसं पाहून सर्चमध्ये तीन एक्सवालं काहीही टाइप करा.. अश्लीलतेचे पिवळ्या पाण्याचे नळ वाहू लागतात धो धो.. क्षणाक्षणाला सुभगसर्वागदर्शन घडवणा-या लाखो ललना आणि तेवढेच बाप्ये.. कल्पनाशक्तीच्या मर्यादा ओलांडून वात्सायनाला वाकुल्या दाखवतात चित्रमय किंवा थेट दृश्यात्मक.. पण, अभ्यासाच्या पुस्तकात दडवून वाचलेल्या पहिल्यावहिल्या ‘तसल्या’ पुस्तकाने उमटवलेल्या झिणझिण्यांचा पत्ताच नाही..
 
कुठे नशेचे नळ वाहताहेत, कुठे पैशांचे; कुठे खेळांचे नळ वाहताहेत, कुठे गाण्यांचे; गल्लोगल्ली उत्सवांचे नळ, मॉलोमॉली मालाचे नळ; इकडे नळ तिकडे नळ, पावलोपावली ज्याचे त्याचे नळच नळ..
 
पण, एक सांगा..
 
अख्ख्या आयुष्याचा कायमस्वरूपी मिलन सब वे व्हावा, इतके नळ डोक्यावर, डोक्यात, डोळ्यांत, अंगांगांवर, बदाबदा धो धो धारा धरून असतानाही प्रत्येक जण इतका कोरडाठाक आणि ठार एकटा कसा होत जातोय?..
 
हा सगळा घोळ नळांनीच करून ठेवलाय यात शंका नाही..
 हो नळांनीच..

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)


(प्रहार, ५/६/११)

No comments:

Post a Comment