Tuesday, June 28, 2011

जेम्स बाँड नावाच्या 'माणसा'च्या गोष्टी

इयान फ्लेमिंगचा जेम्स बाँड 'मेहता पब्लिशिंग हाऊस'ने मराठी वाचकांच्या भेटीला आणला आहे. 'द स्पाय हू लव्ह्ड मी', 'थंडरबॉल', ' मॅन विथ द गोल्डन गन', 'लिव्ह अँड लेट डाय' आणि 'यू ओन्ली लिव्ह ट्वाइस' ही बाँडची गाजलेली साहसं त्यांनी मराठीत आणली आहेत. मूळ इंग्रजीचा बाज सांभाळणाऱ्या या अनुवादांमध्ये पुस्तकातला जेम्स बाँड भेटतो. तो कसा आहे? पुस्तकातला बाँडही 'हीरो' आहे. कोणत्याही कथानकात, कितीही संकटं आली, तरी अखेरीस तोच जिंकणार हे पुस्तकाचं पहिलं पान उघडण्याआधीच वाचकालाही माहिती असतं. पण, तरीही तो 'सुपरहीरो' नाही... विलक्षण बुद्धिमान आणि साहसी 'माणूस' आहे.



माय नेम इज बाँड... जेम्स बाँड!'

रूपेरी पडद्यावर उच्चारले जाणारे हे शब्द म्हणजे हंड्रेड परसेंट मनोरंजनाची गॅरंटी. सहा फूट उंचीचा, भरदार देहयष्टीचा, देखणा आणि रांगडा ब्रिटिश गुप्तहेर जेम्स बाँड अर्थात एजंट झीरो झीरो सेव्हन हा रूपेरी पडद्यावरचा 'सुपरहीरो' झाला आहे. जगभरात लाखो डॉलर्सचा गल्ला गोळा करणारे बाँडपट म्हणजे अर्तक्य कथानक, अचाट साहसं, 'बाँडर्गल्स' या नामाभिधानाने मशहूर असलेल्या मादक मदनिकांचे तांडे आणि दीड तासांची नजरबंदी असं समीकरण आहे.

पण, या 'सुपरमॅन' बाँडचा इयान फ्लेमिंगरचित मूळ जेम्स बाँडशी काही संबंध आहे का?

इयान फ्लेमिंगचा जेम्स बाँड 'मेहता पब्लिशिंग हाऊस'ने मराठी वाचकांच्या भेटीला आणला आहे. द स्पाय हू लव्ह्ड मी (अनुवाद : अजित ठाकूर), थंडरबॉल (अनु. : जयंत कणिर्क), द मॅन विथ द गोल्डन गन (अनु. : डॉ. देवदत्त केतकर), लिव्ह अँड लेट डाय (अनु. : अनिल काळे) आणि यू ओन्ली लिव्ह ट्वाइस (अनु. : जयवंत चुनेकर) ही बाँडची गाजलेली साहसं त्यांनी मराठीत आणली आहेत. मूळ इंग्रजीचा बाज सांभाळणाऱ्या या अनुवादांमध्ये पुस्तकातला जेम्स बाँड भेटतो. तो कसा आहे?

पुस्तकातला बाँडही 'हीरो' आहे. कोणत्याही कथानकात, कितीही संकटं आली, तरी अखेरीस तोच जिंकणार हे पुस्तकाचं पहिलं पान उघडण्याआधीच वाचकालाही माहिती असतं. पण, तरीही तो 'सुपरहीरो' नाही... विलक्षण बुद्धिमान आणि साहसी 'माणूस' आहे. हा बाँड जगाचा विनाश घडवून आणू पाहणाऱ्या (म्हणजे थोडक्यात, अमेरिका, ब्रिटन यांचं अहित करू पाहणाऱ्या) क्रूरर्कम्यांशी लढताना अनेकदा चुका करतो, मार खातो, गंडतो, थकतो आणि खचतोसुद्धा. म्हणूनच पुस्तकातला बाँड सिनेमातल्या बाँडपेक्षा जास्त लोभस आहे.

माणसांमध्ये न गुंतता थंड रक्ताने, दिलेलं 'मिशन' पूर्ण करणं, हे सिक्रेट एजंटचं काम. पुस्तकांमधला बाँड ते इमानेइतबारे करतो, पण, अनेकदा आपण करतो ते बरोबर की चूक, अशा मानवी दुविधेतही सापडतो. बाँडच्या प्रत्येक नव्या साहसकथेत एक तरी 'बाँडगर्ल' असतेच. मारधाड, चकवाचकवी यांनी भरलेल्या मजकुरात थोडी प्रणयाची 'हिरवळ' हेच त्यांचं प्रयोजन. पण, पुस्तकांमध्ये या बाँडच्या नायिकाही आयटम र्गल्स न बनता ठसठशीत, स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून भेटतात.

सिनेमाला काळाची मर्यादा असते. त्यामुळे मोजकं आणि नेमकं तेच निवडून पटकथा रचली जाते. त्यात तपशील हरवून जातात आणि नेमकं 'तपशील' हेच इयान फ्लेमिंगच्या लेखणीचं एक सर्वात मोठं बलस्थान आहे. वेगवेगळ्या खंडांमध्ये घडणाऱ्या बाँडच्या पराक्रमगाथा रचताना फ्लेमिंग त्या परिसराचं नेटकं शब्दचित्रण करतो. तिथली निसर्गसंपदा, माणसांची जीवनशैली, सांस्कृतिक चालीरीती, बोलण्यावागण्याच्या तऱ्हा यांचा कथानकाच्या रसपरिपोषासाठी चपखलपणे वापर करतो. या माणसाने एवढं जग कसं पाहिलं असेल, असा थक्क करणारा विचार वाचकाच्या मनात यावा, इतक्या तपशीलात फ्लेमिंग तो परिसर टिपतो. गुप्तचर यंत्रणांची आणि गुन्हेगारी टोळ्यांची कार्यपद्धती, हेरगिरीसाठी वापरली जाणारी साधनसामुग्री, आधुनिक शस्त्रास्त्रं, बोटी-विमानं-वाहनं, मासे-प्राणी-पक्षी यांचंही फ्लेमिंगचं ज्ञान अफाट आहे. ते पानापानांवर कथानकात गुंफून येत जातं.

फ्लेमिंगच्या थरारकथा रॉबर्ट लुडलुमसारख्या पानापानावर आश्चर्याचे धक्के देणाऱ्या कुळीतल्या नसतात. तो वेगही त्यांच्यात नाही. वेगवेगळ्या प्रसंगांच्या बांधणीतून छोटे छोटे क्लायमॅक्स गाठत त्या निवांतपणे पुढे सरकतात. हळूहळू वेग घेतात.

बाँडपटांमधल्या जेम्स बाँडला दीड तासांत क्लायमॅक्स गाठायचा असतो. त्याला वेळ नाही. त्यात तो (आणि प्रेक्षक) काहीतरी मौलिक गमावतो.

ते कमावायचं असेल, तर जेम्स बाँडचे प्रेक्षक होण्यापेक्षा त्याचे वाचक होणं श्रेयस्कर.

No comments:

Post a Comment