हॅपी फादर्स डे, डॅडा!
असे दचकू नका.
डॅडा, पॉप्स, बॅब्ज (म्हणजे बाबा) या संबोधनांची आता सवय करून घ्या.
कारण, ज्या देशाचे ‘फादर ऑफ द नेशन’ बनण्याचा तुमचा प्रयत्न आहे, तो देश आम्हा तरुणांचा आहे. तुम्हाला आमचेच सुपरफादर बनायचंय. त्यामुळे, आमच्या लिंगोची आता तुम्ही सवय केली पाहिजे.. अं अं अं, काहीतरी भयंकर अश्लील कानावर पडल्यासारखा आंबट चेहरा करू नका.. लिंगो म्हणजे लँग्वेज, भाषा.
या पत्राच्या सुरुवातीला तुम्हाला भावीबरोबरच संभाव्य राष्ट्रपिताही म्हटलेलं आहे. लागोपाठ दोन समानार्थी शब्द वापरून द्विरुक्ती केली असल्यामुळे आमच्या पिढीची भाषा फारच बिघडली आहे, असा तर्क बांधू नका. हे असं आम्ही जाणून बुजून केलंय. कारण, संभाव्य हे विशेषण शक्यतो धोका आणि संकट या शब्दांना जोडलं जातं. तुम्ही राष्ट्रपिता होऊ पाहताय, हा आमच्यासाठी तर धोका आहेच.. एकदम तोंड पाडू नका, हिरमुसू नका.. डोन्ट टेक इट पर्सनली, आम्हाला आमचा जन्मदाता बापही संकटासारखाच वाटतो, तिथे राष्ट्रपित्याचे काय? आमच्या पिढीसाठी आमच्या वयात आमच्यापेक्षा कोणीही मोठा माणूस म्हणजे.. सॉरी टु टेल यू सो ब्लंटली, पण, कटकटच. सगळ्या मोठय़ा माणसांचा प्रॉब्लेम काय असतो, तर ते वयानं मोठे असतात. वय वाढलं की आपल्याला सगळय़ातलं सगळं कळत जातं, असं त्यांना वाटायला लागतं. आपलं फक्त वयच वाढलं आहे- कारण त्यात पर्सनल एफर्ट काहीच नाही; वयाबरोबर आकलन वाढलेलंच नाही, हे या माणसांच्या लक्षातच येत नाही. वुई आर इव्हन कूल विद दॅट. प्रत्येकाला स्वत:विषयी कितीही चुकीचं का असेना, मत असण्याचा अधिकार आहे. नो प्रॉब्ज. पण, हे लोक उगाच प्रत्येक मॅटरवर आणि प्रत्येक सब्जेक्टवर काही माहिती नसताना, अंडरस्टँडिंग नसताना पिटिरपिटिरपिटिरपिटिर बडबड करत बसतात. दॅट इज सो बोअरिंग आय टेल यू!
आणि डॅड लोकांचा तर आणखी वेगळा प्रॉब्लेम असतो. एकतर ते आमच्यापेक्षा मोठे. त्यात त्यांनी आम्हाला जन्म दिलाय म्हटल्यावर तर ते एकदम प्रेमाचा अधिकारच गाजवायला लागतात. आमच्यासाठी चांगलं काय, वाईट काय, हे आमच्यापेक्षा त्यांनाच कळतं, असं त्यांना वाटायला लागतं. ओके मॅन, तुम्ही मोठे असाल, तुमचं आमच्यावर प्रेम आहे, काळजी आहे, तुम्हाला कळतंही जास्त, बट धिस इज माय लाइफ बॉस! त्यात तुमचा से किती असणार याला काहीतरी लिमिट असायला पाहिजे ना. व्हॉट से?
वन मोअर थिंग! तुमच्या सगळ्या जनरेशन्सचा प्रॉब्लेम काय होता, गॉड नोज, पण आपल्या देशात ना, प्रश्न विचारलेलं कुणालाही आवडत नाही. लहानांनी मोठय़ांना क्वेश्चन केलं, तर तो उद्धटपणा मानतात. डॅड लोकांना काही विचारण्याची सोयच नसते, ते नुसतेच खेकसतात. बट डोन्च्यू थिंक, आज जगात जी काही प्रगती झाली आहे, ती चिकित्सेमुळे झाली आहे, जिज्ञासू वृत्तीमुळे झालेली आहे, वय-अधिकार याची तमा न बाळगता प्रश्न विचारल्यामुळे झाली आहे. मग, आम्ही का नाही विचारायचे प्रश्न?
तुम्ही म्हणाल, विचारा की बाळांनो प्रश्न.
मग आम्ही विचारू, डॅडा, आमच्यासाठी, आमच्या देशासाठी आंदोलन करताय, प्राण पणाला लावताय; पण, त्याबद्दल आम्हाला काही सांगितलंत का? काही विचारलंत का?
तुम्ही म्हणाल, यात काय विचारायचं?
आम्ही म्हणू, तुम्ही आम्हाला गृहीत धरताय.
उदाहरणार्थ यू आर कन्सन्र्ड विथ द करप्शन इन द कंट्री. पण, तुम्ही ज्या बिलासाठी भांडताय, ते बिल सगळ्या देशातलं करप्शन संपवणार आहे? तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. सॉलिड आदर आहे. आमची पिढी फक्त स्वत:चं स्वत:पुरतं पाहणारी आहे- ऑफकोर्स, वुई हॅव व्हॅलिड रीझन्स फॉर बिईंग सो. पण, आसपासचे सगळे लोक असेच स्वार्थी असताना एक माणूस फकिरासारखा राहतो आणि लोकांसाठी लढतो, हे सॉलिड आहे. पण, हे फार रोमँटिक नाही का डॅडा? सगळं गाव बिनचेह-याच्या, बिनकण्याच्या, बिनपर्सनॅलिटीच्या माणसांचं. मग तिथे ठाकूरसाहेबांनी बोलावलेले दोन हीरो येणार आणि गब्बरचा खात्मा करणार, तसं हे फिल्मी नाही वाटत?
तुम्ही म्हणाल, मी तुम्हा सगळ्यांना जागं करतोय. तुम्हीच लढायचीये ही लढाई.
आम्ही म्हणणार, बॉस, आमची पात्रता आहे का ही लढाई लढण्याची. बाकीचे सोडा, तुमच्याबरोबर जी गँग आहे, त्यांच्यातले किती लोक सस्पिशस कॅरेक्टरचे आहेत? तुम्ही म्हणता, गव्हर्मेटनी एक बिल पास केलं की देशातलं करप्शन खतम. आम्ही म्हणू, व्हॉट नॉन्सेन्स! आम्ही सगळे रोज करत असतो तो भ्रष्टाचार ब्रह्मदेवाचे पॉप्स उतरले तरी बंद नाही पडू शकत, त्याचं काय? त्यातला सगळा काही आम्ही नाईलाजानं करत नाही. आम्हाला आमचा नंबर वर काढायचा असतो, नियम मोडायचा असतो, दुस-यांना बायपास करून पुढे जायचं असतं, म्हणून आम्ही स्वेच्छेनं किती करतो भ्रष्टाचार. वेक अप डॅड, या देशातला सामान्य सामान्य म्हटला जाणारा माणूससुद्धा साळसूदपणे, जरासुद्धा अपराधी न वाटता सुममध्ये कसा भ्रष्टाचार करतो, ते पाहा. त्यावर आहे तुमच्याकडे सोल्युशन? तुम्ही सांगू शकता का आम्हाला हा भ्रष्टाचार थांबवायला?
एकदा कधीतरी आपल्या भावी मुलांना हे आवाहन करून बघा फादर, आपण किती वाभरटांच्या देशाचे राष्ट्रपिता व्हायला निघालो आहोत, ते तुम्हालाही कळून जाईल..
त्यातूनही नाही समजलं, तर आपले ओरिजिनल राष्ट्रपिता नंबर वन बापूजी यांचं लाइफ रिफर करा..
आणि डेथही..(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(प्रहार, १९ जून, २०११)
Not so appealing..
ReplyDeletepretentious language.
ReplyDelete