Friday, June 17, 2011

एका साधूचा मृत्यू

देशातील जनतेत आता विलक्षण जागृती आली असून आता ती आपल्या लाडक्या समाजसेवकांच्या माध्यमातून सारा देश भ्रष्टाचारमुक्त केल्याखेरीज राहणार नाही, असा सामाजिक क्रांतीचा ज्वर कोणाला चढला असेल, तर हरिद्वारच्या स्वामी निगमानंदांच्या एकाकी मृत्यूने हा भ्रमज्वर ओसरायला हरकत नाही. स्वामी निगमानंद हे नाव प्रकाशात यायला कारणीभूत झाले ते बाबा रामदेव. त्यांचे नऊ दिवसांचे चमको उपोषण आणि आंदोलन डेहराडूनच्या ज्या रुग्णालयात संपले, त्याच रुग्णालयात दोन दिवसांनी स्वामी निगमानंदही भ्रष्टाचारविरोधी उपोषण करीत असतानाच निधन पावले, हा योगायोग. तो तेवढाच मात्र नाही. हे दोघेही भगवी वस्त्रे पेहेरणारे साधू. एक, हजारो कोटींची माया कमावलेला व्यावसायिक योगगुरू, तर दुसरा, फाटका संन्यासी. वरवर पाहता दोघेही भ्रष्टाचाराच्या भस्मासुराशी लढत होते. दोघांचेही हत्यारही सारखेच- सत्याग्रह आणि उपोषण. एकाचे आंदोलन हजारो समर्थकांच्या साक्षीने वातानुकूलित मंडपात सुरू होते. त्याच्या आगतस्वागताला आणि त्याच्याशी वाटाघाटी करायला केंद्र सरकारचे मंत्रीही सुरुवातीला तत्पर होते. दिवसाचे 24 तास जे घडेल ते दाखवायला किंवा काही घडत नसतानाही काही तरी घडतेच आहे, अशी समजूत करून द्यायला तत्पर वाहिन्या, छापील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि मेणबत्तीबाज समाजसुधारक यांचा गराडाच बाबा रामदेवांना पडला होता. निगमानंदांची लढाई एकटय़ाची होती. तेही ती लढत होते समाजासाठीच. किंबहुना त्यांचा लढा अधिक जमिनीवरचा आणि थेट मुद्दय़ाला हात घालणारा होता. त्यात त्यांचा स्वत:चा किंवा कोणत्याही परिवाराचा अंत:स्थ हेतू नव्हता. 
स्वामी निगमानंदांचा लढा समस्त हिंदूधर्मियांना श्रद्धेय अशा गंगा नदीच्या प्रदूषणाविरुद्ध होता. उत्तराखंडात हृषिकेशजवळ गंगेच्या तीरालगत सुरू असलेल्या बेकायदा खाणकामांमुळे होत असलेले हे प्रदूषण थांबवावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र, लंकेतील सोन्याच्या विटांप्रमाणे परदेशांत दडवलेल्या काळय़ा पैशाच्या मुद्दय़ावर आंदोलन करणे आणि त्याबद्दल वाटाघाटी करणे सोपे असते. कारण, त्यात कोणत्याही पक्षाने प्रत्यक्षात काही करण्याची गरज नसते. आश्वासनांचे कागदी घोडे नाचवले, तरी चालते. गंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न मात्र वास्तव होता. त्यात गुंतलेल्या राजकीय आर्थिक हितसंबंधांमुळे त्यावर निर्णय करणे उत्तराखंड सरकारला परवडणारे नव्हते. उत्तराखंडात हिंदुत्वाचा आणि शुचितेचा होलसेल ठेका घेतलेल्या सदाशुचिर्भूत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सरकार ढिम्म राहिल्याने उपोषण 115 दिवस चालले आणि ते सोमवारी निगमानंदांच्या मृत्यूनेच संपविले. काँग्रेसने या मृत्यूचे भांडवल करून उत्तराखंडातील भाजप सरकारच त्याबद्दल कसे दोषी आहे, याचे राजकारण सुरू केले आहे. ती भाजपच्या अशाच प्रकारच्या दुटप्पी राजकारणाची परतफेडच म्हटली पाहिजे. राजकीय पक्ष एकजात निबर कातडीचे म्हणावेत, तर स्वामी निगमानंदांच्या उपोषणाकडे प्रसारमाध्यमांनीही साफ दुर्लक्षच केले होते, त्याचे काय? आज निगमानंदांचा कढ आलेले सगळे जण उपोषणाच्या 115 दिवसांत त्यांच्याकडे फिरकलेही नव्हते. मृत्यूसमयी निगमानंदांच्या जवळ कोणीही नव्हते. पाच साधूंनी त्यांचे पार्थिव हरिद्वारला नेले. ज्यांच्यासाठी ते लढत होते, त्या भारतवासीयांना त्यांचे नावही ठाऊक झाले ते त्यांच्या मृत्यूचे स्थळ आणि वेळ यांची बाबा रामदेवांशी योगायोगाने सांगड बसल्यामुळे आणि बाबा व अण्णा यांचा प्रसारमाध्यमांमधील हैदोस दुलाबे धुल्ला काही काळापुरता थांबल्याने. यात काही अनपेक्षित नाही. गंगेला माता, देवता म्हणून पूजा-अर्चा करण्याच्या मिषाने घाणेरडय़ा अंगाने डुबक्या मारून, गाईगुरे धुवून, सांडपाणी सोडून, निर्माल्य वाहवून आणि मृतदेहांच्या अस्थी, रक्षेबरोबरच संपूर्ण मृतदेहही पाण्यात सोडून देणारा अतीव भाविक समाज आहे हा. त्याच्या कल्पनेतील गंगामय्या सर्व अशुद्धी पोटात घेऊन त्या पचवण्याची ताकद ठेवते. साक्षात देवी असलेल्या नदीचे प्रदूषण होऊ शकते, ही स्वामी निगमानंदांची कल्पनाच वेडगळपणाची म्हणायला हवी. त्याची फळे त्यांनी भोगली, एवढेच.

(प्रहार, १६ जून, २०११)

2 comments:

  1. सर खूप मस्त. पण हल्ली इतकं प्रॅक्टिकल लिहिलेलं लोकांना पचत नाही...

    ReplyDelete
  2. Mukesh Ji,the curt writing is very effective. Excellent, I will forward it to my associates. With Regards.

    ReplyDelete