Tuesday, June 28, 2011

बखरकार! खबरदार!!

' आम्ही या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांवर कधी विनोद केला नाही आणि होऊही दिला नाही ''...

एका पक्षाचे नेते टीव्हीवर तावातावाने सांगत होते. चर्चा सुरू होती जेम्स लेन प्रकरणावर. गाडी ' रिडल्स... ' प्रकरणावर आली तेव्हा दुसऱ्या पक्षाचे नेते आदल्याला खिंडीत गाठून चेवाने ओरडले , '' म्हणजे प्रभू रामचंदाची बदनामी झाली , तर तुम्हाला चालते ? ते तुम्हाला मंजूर आहे ?''... दुसऱ्याची ना ना करता करता त्रेधातिरपिट उडाली.

...
निवडणुकांच्या काळात , आजच्या काळातले , आजच्या नागरिकांचे असंख्य प्रश्ान् बाजूला ठेवून , ते सोडवण्यासाठी निवडले जाणारे नेते आपला कणभरही अभ्यास नसलेल्या विषयावर , एका इतिहासपुरुषावर आणि एका पुराणपुरुषावर दे दामटून बोलत होते आणि टीव्हीवरचा तो सांस्कृतिक राष्ट्रवादी अस्मितेचा संयुक्त ओजस्वी आविष्कार पाहून पाहणारांचे डोळे निवले आणि ऊर अभिमानानं भरून आला...

बरोबरच आहे हो , बाकी काहीही असलं तरी आम्ही या भूमीत एकाही राष्ट्रपुरुषावर विनोद होऊ दिलेला नाही , झालेला खपवून घेतलेला नाही...

 
आम्हाला कोणत्याही मोठ्या माणसाला हयातीत दुर्लक्षिण्याची आणि मरणोपरांत गौरवून डायरेक्ट राष्ट्रपुरुषपदाला , दैवत्त्वाला नेण्याची खोडच आहे. आम्हाला आमच्यासारखा हाडामांसाचा , भावभावनायुक्त , नियतीच्या अगम्य लीलांनी थापडला जाणारा असा माणूस वंदनीय म्हणून चालतच नाही मुळी! कोणताही त्रिमिती आकार आम्ही ताबडतोब पुठ्ठ्याच्या आकृतीसारखा सपाट , चेतनाहीन करून टाकतो. कोणतंही रंगीत व्यक्तिमत्त्वाचे रंग फिकुटवून त्याला ' ब्लॅक अँड व्हाइट ' करून टाकण्यात आम्ही एक्स्पर्ट!

...
पण , ते काहीही असलं तरी आम्ही या भूमीत एकाही राष्ट्रपुरुषावर विनोद होऊ दिलेला नाही , झालेला खपवून घेतलेला नाही...

आम्ही इतिहास सोडा , पुराणंही कधी वाचलेली नाहीत. मग अभ्यास वगैरे करण्याची तर फुर्सतच नाही आम्हाला. तरीही जगातले यच्चयावत विषय हे क्रिकेट किंवा सिनेमा असल्यासारखे बिनदिक्कत चघळतो आम्ही. कुठेही , कसेही! शिवाय ' डोक्याला ताप नको ' हे आमचं राष्ट्रीय ब्रीदवाक्य! त्यामुळे आम्ही आधी पुराणांचं सुलभसोप्या बालवाङ्मयात रूपांतर करतो. काल्पनिक पुराणपुरुषांना राष्ट्रपुरुष बनवतो. पुराणांनाच इतिहास मानतो... आणि बोजड क्लिष्ट इतिहास आम्हाला कुणा शाहिरांनी पेजेसारखा पातळ करून पाजल्याशिवाय पचतच नाही...
  


... पण , तरीही आम्ही या भूमीत एकाही राष्ट्रपुरुषावर विनोद होऊ दिलेला नाही , झालेला खपवून घेतलेला नाही!

अभ्यासकांनी आयुष्यं खचीर् घालून , बखरी-रूमाल-कागदपत्रं छानून शोधलेला शिवाजी... अगदी खरं सांगायचं तर बोअरिंग आहे... आमची ओळख शालेय पाठ्यक्रमातल्या शिवाजीशी आणि नाटक-सिनेमांतल्या शिवाजीशी... आमच्या मनातला शिवाजी ' आज जेवायला काय बेत आहे ' असा साधा घरगुती प्रश्ान् कधी कुठे विचारत नाही , विचारलाच तर ' बा अदब बा मुलाहिजा होशिय्यार ' च्या कृत्रिम , कागदपत्री , ' प्रमाण ' भाषेत. आमच्या सिनेमांत शिवाजी ' रॉबिनहूड ' असतो आणि नाटकांत... भर्जरी कपड्यांमधला उच्च मध्यमवगीर्य. रात्री झोपताना तरी शिवराय जिरेटोप काढून ठेवत असतील का , अशीच शंका आमच्या ' पॉप्युलर सायकी ' मधला शिवाजी आठवताना येते. अहो जिथे साक्षात प्रभू रामचंदाचा आम्ही तुपकट , बथ्थड अरुण गोविल करून टाकला , तिथे त्या मानाने शिवराय नशीबवानच म्हणायचे...

...
पण , एक लक्षात घ्या , बाकी काहीही झालं तरी आम्ही या भूमीत एकाही राष्ट्रपुरुषावर विनोद होऊ दिलेला नाही!
 


... त्याची गरज काय ? आम्ही आमच्या राष्ट्रपुरुषांना आजवर इतक्या विनोदी पद्धतीनं ' वागवलंय ', की या देशात , आपण पुढे राष्ट्रपुरुष होऊ की काय , या भीतीनं माणसं मोठी होणंच थांबून गेलंय!

(महाराष्ट्र टाइम्स) 

No comments:

Post a Comment